"विंदा' सौख्यभरे!

karandikar
karandikar

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ख्यातनाम साहित्यिक विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरु आहे. यानिमित्ताने या बहुपेडी साहित्यिकांच्या काही पैलुची ओळख रसिकांना नव्याने व्हावी, विंदाचे द्रष्टेपण, कोणत्याही काळाला जोडणारं समकालिनत्त्व नव्याने भिडावं यासाठी ही खास लेखमाला. आजपासून... 

विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दीवर्ष सुरू होऊन काही महिने झालेत.

जन्मशताब्दीनिमित्त काही कार्यक्रम झालेले आहेत व पुढील काही महिनेही ते होत राहतील. विंदाच्या कवितांचे अभिवाचन होईल. त्यांना चाली लावून त्या गायल्या जातील. विंदांबद्दलचे प्रेम व कृतज्ञता व्यक्त करणारे इतर काही कार्यक्रम होतील. हा सगळा सांस्कृतिक बहर छानच असेल आणि टिव्हीशरण समाजासाठी तो आवश्‍यकही आहेच.

ह्या लेखमालेचे स्वरूप मात्र थोडे वेगळे असेल. विंदांना केवळ आदरांजली अर्पण करायला किवा केवळ कृतज्ञ सलाम करण्यासाठी हे लेख नक्कीच नसतील. 
मग ह्या लेखमालेमागील हेतू काय? 

स्पष्ट करायला विंदाची एक आठवण सांगतो. 


"तुमचे स्फूर्तिस्थान कोणते?' असे विंदांनी एकदा मामा वरेरकरांना विचारले. मामांनी हात उंचावून हातातली विडी दाखवली. 
विंदांनी विडी हा शब्द तिथून संदर्भासहित स्विकारला व खास विंदाशैलीत वापरायला सुरवात केली. 
लेख लिहायला काहीतरी निमित्त लागतं, कोणाची तरी टोचणी लागते किंवा तशा लेखनाची प्रेरणा द्यायला काहीतरी घडावं लागतं. ही विडी असते. 
गोवर्धन पारिखांकडून असलीच एक विडी मिळाली होती म्हणून विंदांनी हेमिंग्वेवरचा लेख लिहिला. 

विंदांची जन्मशताब्दी ही ह्या लेखमालेसाठी एक विडीमात्र आहे. मुख्य हेतू वेगळाच आहे. 

आज सामाजिक माध्यमांमुळे रसिक वाचकांच्या गप्पांसाठी एक मंच मिळालेला आहे. आपापल्या वेळेनुसार, केवळ मोबाईल वापरून चर्चेत सहभागी व्हायची सोय झालेली आहे. मात्र, अशा बहुतेक मंचांवर ठराविक, साचेबद्ध प्रतिक्रिया व शेरेबाजीच दिसते. रसिक वाचकांच्या, फुललेल्या गप्पा सहसा आढळत नाहीत. 

या अभिप्रायाच्या मुद्‌द्‌यावरून विंदांच्या कवितेचा एक खास असा श्रोता आठवला. 
विंदा रत्नागिरीला गेले होते. समुद्रकिनारी उभे होते. तिथे आलेला खानोलकर हा कवीमनाचा एक पोरगा त्यांना भेटला. तो विंदांना ओळखत नव्हता पण "तुम्हीच विंदा करंदीकर ना?' असा काहीतरी प्रश्न त्याने आपणहून विंदांना विचारला. हे त्याला कसे उमजले ही नवलाची बाब आहेच पण खरी गोष्ट तर पुढेच आहे. 

दुसऱ्या दिवशी खानोलकर विंदांना त्यांच्या कविता ऐकायला भेटला. 

खानोलकर मॅट्रिकची परिक्षा द्यायला रत्नागिरीत आला होता पण तो कविता ऐकण्यात इतका रंगला की परिक्षेला गेलाच नाही. 

कवितेपायी नॉनमॅट्रिक राहिलेला खानोलकर जर आज आपल्याला भेटला व त्यादिवशी विंदांच्या कविता इतक्‍या का आवडल्या हे मनापासून बोलला तर? रसिक श्रोत्यांच्या, वाचकांच्या अभिप्रायातली ताकद जाणवेल आपल्याला. विंदांच्याच नाही तर आरती प्रभूंच्या कविता समजायलादेखील ह्या किश्‍शाची काही मदत होऊ शकेल. 

साहित्य-कलेबाबतच्या बहरलेल्या चर्चा, रसिक वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या रंगलेल्या गप्पा ही एक मोठी ताकदवान, सृजनशील घटना असते. साहित्यातील नवीन प्रवाह विकसित करणारा व वाचनसंस्कृती फुलवणारा माहौल रसिक वाचकांच्या गप्पांमधूनच घडत असतो. 

अशा गप्पांचे महत्त्व ओळखून त्या गप्पा घडतील, फुलतील,बहरतील असे प्रयास जाणीवपूर्वक केले गेले पाहिजेत. हा या लेखमालेचा मुख्य हेतू. 

शिवाय विंदांच्या काही अनाकलनीय कविता समजून घ्यायचा थोडा प्रयत्नही करूया. 
आकलनीय कविता आणि अनाकलनीय कविता हे शब्द विंदांनीच आपल्या कवितांबाबत वापरलेले आहेत. त्यामुळे कवितेच्या अनाकलनीय असण्याबद्दलच्या गप्पाही आपण मारुया. 

येणार तर आत्ताच ये; 
येणार तर आत्ताच ये; 
उद्या तुझी जरूर काय? 
... आज आहे सूर्यग्रहण; 
आज मला तुझा म्हण;... 

"वेड्याचे प्रेमगीत' ह्या कवितेतल्या या ओळी विंदांनी एकदा जाहिर काव्यवाचनात वाचल्या. श्रोत्यांना त्या विनोदी वाटून ते हसायलाच लागले. 

या अनुभवानंतर श्रोतृवर्ग प्रगल्भ असेल तरच आपल्या काही कविता वाचायच्या असे विंदानी ठरवले. अशा कविता समृद्ध वाचकांसाठीच असतात, सगळ्यांसाठी नसतात असे त्यांचे मत झाले. अशा कविता सगळ्यांनाच नव्हे तर काहींनाच भावतील. अशा भावणाऱ्या कविता अनेक असतील. त्याबद्दल रसिकांनी बोलावं. ती कशी भावली हे सांगावं. जमलं तर बारकाव्यांनिशी. पत्र, मोबाईल किंवा ऑनलाईन. त्यातूनच गप्पा रंगतील. अनाकलनीय कविता समजून घ्यायच्या शक्‍यता लक्षात येतील व माझ्यासारखे अनेक वाचक समृद्ध होऊ शकतील. 

विंदा स्वतःच एक रसिक वाचक होते. अतिशय स्पष्टपणे व बारकावे दाखवत ते आपला अभिप्राय मांडत असत. आवडणारे कवी, प्रभावित करणारे कवी आणि मौलिक कवी असे तीन प्रकार त्यांनी एका अभिप्रायात सांगितलेले आहेत. म्हणजे, काही कवी विंदांना आवडत होते, त्यांच्या कवितेतून त्यांना काव्यानंद मिळत होता पण ते कवी मौलिक नव्हते ह्याची जाणही त्यांना होती.

"अत्र्यांची झेंडूची फुले, दिवाकरांच्या नाट्यछटा, एझ्रा पाऊंडची कविता ही सर्व मौलिक आहेत.... जे मौलिक वाटतं ते आवडतंच असं नाही. एझ्रा पाऊंड मला फारसा आवडत नाही. मौलिकता ही परंपरेच्या संदर्भात वस्तुनिष्ठपणे तपासता येते. जिथे जाणीव आणि तिची अभिव्यक्ती यांत एकदम बदल झालेला जाणवतो, तिथे मौलिकता प्रत्ययाला येते.' 

विजया राजाध्यक्षांनी 1983 साली घेतलेली विंदांची प्रदीर्घ मुलाखत "बहुपेडी विंदा- खंड1' ह्या पुस्तकात संग्रहित केलेली आहे. त्या मुलाखतीत विंदांनी मौलिकतेबाबतचे हे भाष्य केले आहे. ही मुलाखत वाचता वाचता विंदा व विजयाबाईंच्या साहित्यिक चर्चेत एखादा काव्यरसिक सहजच सहभागी होईल आणि रंगून जाईल. 

विंदा केवळ कवी नव्हते. ते तत्त्वज्ञानाचे अभ्यासकही होते. त्यांच्या सोप्या, लोकप्रिय कवितेतूनही तात्त्विक आशय झळकून जातो. 

द्राक्षांत आजच्या या, दारू असे उद्याची, 
आशा चिरंतनाची इतकीच ताणतो मी (जातक, पृ.89) 

हा केवळ "वाहवा' अशी दाद मागणारा शेर नाही आहे. काहीतरी चिरंतन असतं असं मानणाऱ्या भाबड्या, श्रद्धाळू मनाला थबकून अंतर्मुख करणारा आशय इथे जोरकसपणे उमटला आहे. 

अशा तात्त्विकतेबरोबरच खट्याळ, मिश्‍कील असेलेली तरूण कविताही विंदांनी लिहिलेली आहे.  तरुणीच्या कपाळावर असलेली अनेक बटांची मोहक केशरचना हादेखील त्यांच्या कवितेचा विषय होतो. 

लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतिल अक्षरें ; 
हा जन्म माझा संपला ती वाचतांना शायरी 

तात्त्विक, सामाजिक, प्रेमभावना व्यक्त करणारी, स्त्रीच्या मनाचा वेध घेणारी अशी विविधरंगी कविता विंदांनी लिहिली आहे. जीवनवेधी लघुनिबंध लिहिले आहेत, साहित्यसमीक्षा करणारे लेख लिहिले आहेत व राजा लियरसारखे प्रत्ययकारी अनुवादही केले आहेत. ह्या बहुरंगी, बहुपेडी लेखनाची सौख्यभरी साथसंगत या निमित्ताने घडावी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com