आइन्स्टाइन यांचं वेगळंच दर्शन

अनुवादक विनीत वर्तक यांनी ‘जग माझ्या नजरेतून’ या पुस्तकाद्वारे, अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं अंतरंग वाचकांसमोर मांडलेलं आहे.
vinit vartak book on albert einstein jag mazya najretun
vinit vartak book on albert einstein jag mazya najretunSakal

- डॉ. हेमंत पाटील

जगाच्या दृष्टीनं मोठा असलेला माणूस प्रत्यक्षात त्याच्या खासगी जीवनात आचार आणि विचारांनीही तेवढाच मोठा असतो का, ही उत्सुकता सामान्यांच्या मनात दडलेली असते. आइन्स्टाइनसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही ही गोष्ट अपवाद कशी असेल?

अनुवादक विनीत वर्तक यांनी ‘जग माझ्या नजरेतून’ या पुस्तकाद्वारे, अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं अंतरंग वाचकांसमोर मांडलेलं आहे. आतापर्यंत आपण कवीला काय म्हणायचं आहे, लेखकाला काय सांगायचं आहे, एखाद्या प्रसिद्ध नटाच्या आयुष्यातले चढ-उतार त्याच्याच आत्मचरित्रातून जाणून घेतले आहेत, या प्रकारांना सरावलेलो आहोत. परंतु एका महान शास्त्रज्ञाला जगाला काय सांगावेसं वाटतं, जगाकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत, हे कळून घेण्याचा हा प्रयोग नावीन्यपूर्ण आहे.

मुळात आइन्स्टाइन ज्यू असल्याचं आपल्याला माहिती आहे. परंतु ज्यू असल्यामुळं ते ज्यू धर्माबद्दल काय सांगतात, हे वाचनीय आहे. इतर धर्मांबद्दल जराही पूर्वग्रहदूषित मते न मांडता, आइन्स्टाइन यांनी जे लिहिले आहे,

त्यामुळं आपल्या मनातील ज्यू धर्मीयांविषयीची जी नकारात्मक भावना, इतिहासकरांनी आतापर्यंत मांडली, ती कशी चुकीची आहे, हे कळतं. ज्यू म्हणजेच, यहुदी धर्माबद्दल आइन्स्टाइन यांनी जे लिहिले आहे, त्यातील दोन-तीन वाक्यांमधून त्यांचे धर्माचं अधिष्ठान काय आहे, याची चुणूक बघायला मिळते.

आइन्स्टाइन यांचा जागतिक दृष्टिकोन नेहमीपेक्षा चांगलाच वेगळ्या स्वरूपाचा आहे. जागतिक शांततेसाठी मुळात त्यांना सक्तीचं लष्करी शिक्षण आणि सक्तीची लष्कर भरती नकोय. शस्त्रं आणि बंदुका, मानवाला क्रौर्य आणि हिंसाचार शिकवतात.

त्यामुळे जागतिक पातळीवर शस्त्रबंदी व्हायला पाहिजे, याबद्दल ते आग्रही आहेत. शस्त्रबंदीची जबाबदारी सगळ्याच राष्ट्रांची आहे. त्यासाठी सगळ्यांनीच आणि विशेषतः प्रभावशाली व्यक्तींनी, त्यासाठी सतत क्रियाशील असावं, असं ते म्हणतात.

कारण युद्धामुळं दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान होतं. जगातील देशोदेशींच्या सीमारेषा मोडून, जग हेच एक मोठं राष्ट्र असावं, ज्यामुळे पृथ्वीवर सगळे जण शांततेत राहून, विधायक कामे करतील. कला, विज्ञान आणि आपापसातील संबंध सुधारतील. निसर्गाबरोबर राहून मानव प्रगती करू शकेल, ही त्यांची दृष्टी खरोखरच अनुकरणीय आहे.

जागतिक कीर्तीचा एक महान शास्त्रज्ञ, स्वतःमध्येच गुंतून राहिला होता का, असा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा आइन्स्टाइन यांनी त्याच्या परिचयातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध आणि गुणवान व्यक्तींबद्दल जे लिहिलंय, त्यावरून आइन्स्टाइन हा इतरांचं मोठेपण विनम्रपणे स्वीकारणारा माणूस आहे हे कळतं.

एच. ए. लॉरेन्ससारखा मानवतावादी शास्त्रज्ञ, कर्मयोगी अर्नोल्ड बर्लिनर, सर्जनशील शल्यविशारद कॅट्झेनस्टेन, विचारवंत आणि समाज यांच्यातील सेतू डॉक्टर सोल्फ, नर्मविनोदी टीकाकार जॉर्ज बर्नार्ड शॉ, आधुनिक मानसशास्त्राचे पितामह सिग्मंड फ्रॉइड आणि राज्यमंत्री प्रोफेसर हेलपॅच या सगळ्यांबद्दल जे गौरवोद्गार आइन्स्टाइन यांनी काढले आहेत, त्यावरून ते गुणग्राहक असल्याची खात्री पटते.

आपले सर्व प्रयत्न आणि इच्छा-आकांक्षा या समाजाशी निगडित आहेत. हा समाज म्हणजे, आपल्यासाठी अन्नं पुरवणारा शेतकरी, कपडे शिवणारा शिंपी, घर बांधणारा गवंडी, शिक्षण देणारा शिक्षक आणि इतर सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटक! जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतच्या क्षणापर्यंत, प्रत्येकाचं लौकिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व साकारणारी रचना, म्हणजे समाज! माणसाचे प्रयत्न जर समाजाच्या उत्कर्षासाठी असतील, तर ती व्यक्ती चांगली.

या पुस्तकात देवाबद्दलची त्यांची मते वेगळी आणि परखड आहेत. देव नावाची आभासी प्रतिमा माणसाला पाप-पुण्याबद्दल बक्षीस किंवा शिक्षा देते, यावरच मुळात त्यांचा विश्वास नाही. या जगातील घटना देव नाही, तर दैव,

म्हणजे निसर्ग नियंत्रित करतो, हे ते ठामपणे सांगतात. आजच्या भौतिकवादी जगात आपलं सर्वस्व पणाला लावून, विज्ञाननिष्ठ काम करणारी कोणतीही व्यक्ती ही खरी धार्मिकच असते, असे आइनस्टाइन यांचे मत आहे. जवळजवळ एका शतकापूर्वीचे हे व्यक्त केलेले विचार, काळाच्या कसोटीवर आजही खरे उतरलेले आहेत.

यावरून अल्बर्ट आइन्स्टाइन हा महान शास्त्रज्ञ, काळाच्या किती पुढे आणि किती प्रगल्भ होता, हे सिद्ध होतं. हे पुस्तक वाचून, जर कोणी निकोप वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संशोधन केलं, तर या पुस्तकाचं सार्थक झाले, असं नक्की म्हणता येईल.

पुस्तकाचं नांव : जग माझ्या नजरेतून!

प्रकाशन : साकेत प्रकाशन, पुणे - औंरगाबाद (०२०- २४४३६६९२, ०२४० -२३३२६९२ )

लेखक : अल्बर्ट आइन्स्टाइन

अनुवाद : विनीत वर्तक

पृष्ठं : १५२ मूल्य : २०० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com