नरभक्षक ‘अवनी’ची सत्यकथा
२ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘अवनी’ (टी-१) या नरभक्षक वाघिणीला देशातील नावाजलेले शिकारी नवाब शफाअत अली खान यांचा मुलगा असगर याने ठार केले. ‘अवनी’ला पकडण्याची मोहीम अडीच वर्षे चालली होती. या घटनेनंतर देशात बराच गदारोळ झाला. तब्बल पाच वर्षांनंतर शफाअत अली खान यांनी लिहिलेले ‘अवनी - एका नरभक्षक वाघिणीची सत्यकथा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक आरोप आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
पाच वर्षांनंतर ‘अवनी’वर पुस्तक का?
गेल्या ४० वर्षांपासून नरभक्षक वाघ पकडण्याचे किंवा मारण्याचे काम आम्ही करतो आहोत. मात्र ‘अवनी’चे प्रकरण वेगळे होते. २ नोव्हेंबरला माझा मुलगा असगर याने ‘अवनी’ला ठार केले. त्या दिवशी ‘अवनी’चे वागणे हे वेगळे होते. ती पिसाळल्यासारखी वागत होती. ती अशी का वागली याचा शोध मी घेतला. त्यातून १ नोव्हेंबरला या ठिकाणी दुसऱ्या वाघाचे मूत्र शिंपडल्याची माहिती मला मिळाली.
हा वास आल्यानंतर ‘अवनी’ला वाटले की, आपल्या क्षेत्रात दुसरा वाघ शिरला. त्यामुळे ती बिथरली. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही मोहीम सुरू असताना वाघाचे मूत्र आणले कसे? आरटीआयमार्फत मी वन खात्याकडून ही माहिती मागवली. तेव्हा असली कुठलीही परवानगी दिली नाही, असे लेखी उत्तर मला वनविभागाकडून मिळाले. एनटीसीच्या चौकशीत दोन वनअधिकाऱ्यांनी मूत्र शिंपडल्याचे कबूल केले.
माझा मुद्दा हाच होता की, ‘अवनी’ मारली गेली त्या दिवशी राळेगावला आठवडी बाजार भरला होता. सकाळी ट्रॅप कॅमेऱ्यात ‘अवनी’चे फोटो आले होते. अशा परिस्थितीत दुसऱ्या वाघाचे मूत्र शिंपडणे म्हणजे शेकडो लोकांचे जीव संकटात टाकण्यासारखे होते. माझा मुलगा असगर आणि त्याच्या टिमला संकटात टाकण्याचा हा कट होता. हे लक्षात आल्यावर मला हे पुस्तक लिहावे आणि सत्य पुढे आणावे असे वाटले.
वेबसीरिज, चित्रपटातून अन्याय
या मोहिमेदरम्यान आम्हाला बदनाम करण्यासाठी कुठलीही कसर वन्यप्रेमी संघटनांनी ठेवली नव्हती. दुसरीकडे बोराटीचे गावकरी दरवर्षी २ नोव्हेंबरला आम्हाला बोलावतात, आमचा सत्कार करतात. ‘अवनी’च्या हल्ल्यात ठार झालेल्यांचे स्मारक त्यांनी उभारले आहे. त्यात असगरचे नाव कोरले आहे. हे दोन वेगवेगळे विचार आहेत.
ज्या कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय गमावले, त्यांच्यासाठी आम्ही मसिहा आहोत. केवळ पैसा आणि नाव कमावण्यासाठी जे काम करतात, त्यातील काही वन्यप्रेमी संघटनांनी आमच्यावर टीका केली. ‘अवनी’वर आलेला चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये आमची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. ते मुद्दे खोडून काढण्यासाठी एक पुस्तक लिहावेसे वाटले.
जीवनाच्या अधिकाराचे काय?
यवतमाळच्या पांढरकवडा या भागात घनदाट सोडा, विरळ जंगलही नाही. त्यामुळे वन-अधिकाऱ्यांना इकडे अधिकचे पैसे कमावता येत नाहीत. मग या जंगलात ‘अवनी’ पकडण्यासाठी एक मोहीम सुरू होते. २०० पेक्षा जास्त लोक यात असतात.
५० गाड्यांचा लवाजमा, बेस कॅम्प... त्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये यायचे. काही जणांसाठी ही मोहीम सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली होती. त्यामुळे काही लोक मरत असतील तर मरू द्या, अशी मानसिकता त्यांची झाली होती. या देशाच्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला आहे. मग तो पंतप्रधान असो की बोराटीचा एक आदिवासी, त्याच्यापासून हा अधिकार कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही.
मग ‘अवनी’ तो अधिकार कसा हिसकावून घेऊ शकते? मुळात ‘अवनी’ तिच्या क्षेत्रापासून ७० किलोमीटर दूर कोअर किंवा बफर जंगलही नाही. ती या परिसरात का आली, त्यासाठी कोण जबाबदार आहे, वाघ जंगलात का नाही? माझा पाळीव कुत्रा मी बाहेर सोडला आणि तो कुणाला चावला तर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. मग वन-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल का नाही? सध्या २५ ते ४० टक्के वाघ जंगलाच्या बाहेर आहेत.
‘अवनी’ची पहिली भेट
नरभक्षक वाघ लवकर पकडला पाहिजे; मात्र ‘अवनी’ला पकडण्याची मोहीम अडीच वर्षे चालली. वनविभागाने तिला १२ वेळा पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. वनखात्याच्या प्रत्येक चुकीतून ‘अवनी’ने धडा घेतला होता. ती अधिक चपळ झाली. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र कापसाचे शेत असते. कापसाचे शेत ‘अवनी’ला लपण्यासाठी उपयुक्त होते.
पहिल्यांदा माझा आणि ‘अवनी’चा सामना झाला, तेव्हा तिने गाईची शिकार केली होती. ती एकदम चार्ज होऊन गुरगुरत माझ्यासमोर आली. तिच्यात आणि माझ्यात केवळ आठ मीटरचे अंतर होते. त्या वेळीच मी तिला ठार करू शकत होतो. मात्र त्या वेळी ‘अवनी’ला बेशुद्ध करण्याचे आदेश होते. ती धावत आली तेव्हा आमच्या पायाखालची जमीन हादरली; मात्र मी स्थितप्रज्ञासारखा उभा होतो. ती निघून गेली.
मी वर्षभरापूर्वी वनविभागाला सांगितले होते की, ‘अवनी’ला आता ट्रँक्युलायझिंग करणे अशक्य आहे. सर्वांना माहिती होते, ‘अवनी’चा अंत असाच होणार आहे. तिला पकडण्याचे केवळ नाटक रचले गेले होते.
‘अवनी’ला पकडण्याची दीर्घ मोहीम
‘अवनी’ला पकडण्याची मोहीम ही देशाच्या इतिहासातील आजपर्यंतची दीर्घकाळ चाललेली मोहीम होती. या मोहिमेकडे संबंध देशाचे लक्ष लागले होते. तिला बेशुद्ध करण्यासाठी १२ वेळा प्रयत्न झाले. यासाठी सहा महिने बेस कॅम्प चालला. हे प्रकरण अनेकदा कोर्टात गेले. या प्रकरणात नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी जेवढे प्रयत्न झाले त्यापेक्षा तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, असा माझा आरोप आहे.
२०० पेक्षा जास्त वन कर्मचारी, अधिकारी यात सहभागी झाले होते. १० कोटी रुपये खर्च झाले. खरे तर वाईल्ड लाईफ ॲक्टमधील ११ ब प्रमाणे कुठलेही जनावर धोकादायक झाले तर त्याला मारण्याचे अधिकार दिले आहेत; मात्र पुढे एनटीसीने आपल्या गाईडलाईनमधून ते अधिकार काढले.
महत्त्वाचे म्हणजे असल्या जनावरांना पकडण्यासाठी ठराविक कालावधी निश्चित केला नाही. महाराष्ट्र सरकार, वनमंत्र्यांना ही मोहीम आम्ही तडीस न्यावी, असे प्रामाणिकपणे वाटत होते. मात्र वन-अधिकाऱ्यांचे पाहिजे तसे सहकार्य आम्हाला मिळत नव्हते. त्यामुळे दोनदा ही मोहीम सोडून गेलो.
वन्यप्रेमींच्या टीकेची पर्वा नाही
‘अवनी’ला पकडण्याच्या मोहिमेवर मुंबई-पुण्यातील वन्यप्रेमींनी सर्वाधिक टीका केली; मात्र त्यांना ग्राऊंड झिरोबद्दल काहीच माहिती नव्हते. ‘अवनी’ने मारलेल्या १४ जणांच्या कुटुंबांच्या अश्रूंचे त्यांना मोल नव्हते. त्यामुळे असल्या टीकेची मी कधीच पर्वा केली नाही. माझ्या मते, नरभक्षक वाघ आणि सिरियल किलरमध्ये फारसा फरक नाही.
एका दहशतवाद्यासारखी दहशत एक वाघ पसरवतो. राळेगाव भागातील २९ गावांत ‘अवनी’मुळे जी दहशत पसरली होती, ती कथित वन्यप्रेमींनी अनुभवली असती तर त्यांचा विचार बदलला असता. दुसरे म्हणजे मला बोलवा, अशी विनंती मी काही सरकारकडे केली नव्हती. आतापर्यंत मी देशात १०० हून अधिक मोहिमा यशस्वी केल्या.
‘अवनी’च्या प्रकरणात मात्र अनेकांनी न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल केले. त्यात १३ बळी हे रानडुक्कर, इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत गेल्याचा दावा केला गेला. मग २ नोव्हेंबरला ‘अवनी’ मारली गेल्यानंतर त्या भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकही माणूस का ठार झाला नाही, याचे उत्तर मला त्यांनी द्यावे. अलीकडे जवळपास ८० वाघ विष किंवा विद्युत करंट लागून मृत्युमुखी पडले; मात्र त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. फक्त नरभक्षक वाघ मारल्यावरच हा आरडाओरडा का?
धडा घेतलाच नाही
‘अवनी’च्या प्रकरणातून महाराष्ट्र वनविभागाने कुठलाच धडा घेतला नाही. ‘अवनी’च्या मृत्यूनंतर आज दुसऱ्या जिल्ह्यात वाघ माणसांचा बळी घेत आहेत. राज्यात वाघांची संख्या वाढली. आज चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वाघांची दहशत कायम आहे. दर दोन-तीन दिवसांनंतर वाघाच्या हल्ल्यात कुणी तरी ठार होतो. त्यातून वाघ आणि वनविभागाविरोधात संताप निर्माण होतात. त्यातून लोक पुढे जाऊन वाघांवर हल्ले चढवतील.
साधारणपणे एखादा नरभक्षक वाघ ठार झाल्यानंतर पीडित कुटुंबे किंवा तिथले राहिवासी संतप्त असतात. ते मृत वाघावर हल्ला करतात. यापूर्वी मी बिहारच्या वाल्मीकी अभयारण्यात एक नरभक्षक वाघ मारला. या वाघाने १० जणांचा बळी घेतला होता. त्या वेळी लोकांनी मृत वाघाची खांडोळी केली. वन्यप्रेमी संघटनांनी वनविभाग आणि वनवासीयांना प्राण्यांचे दुश्मन बनवून टाकले आहे. त्यामुळे बिहारमध्ये गेल्या वेळी एका वाघासाठी लोकांनी अभयारण्याला आग लावून दिली होती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण न होऊ देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘अवनी’ प्रकरणातील वैयक्तिक अनुभव
‘अवनी मोहिमे’साठी मी एक पैसा घेतला नाही. माझ्यासोबत माझे प्रशिक्षित चालक, ट्रॅकर्स, अन्य कर्मचारी होते. ‘अवनी’ ठार झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना रोजंदारीच्या दराप्रमाणे मोबदला द्या, असे सांगितले. त्यावर असा करारनामा न झाल्याचे पत्र मला तत्कालीन वनसंरक्षकांनी पाठवले. शेवटी मी माझ्या खिशातून ते पैसे दिले.
जेव्हा ‘अवनी’ पकडली जात नव्हती, तेव्हा हाच अधिकारी मला दिवसातून पाच वेळा फोन करून मोहिमेवर येण्याची विनंती करायचा. या अधिकाऱ्याच्या खिशातून पैसे जाणार होते का? ‘अवनी’च्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना १५ लाख रुपये द्यावे लागत होते. मात्र आठ लोकांना २० हजार द्यायला ते तयार नव्हते. वनविभागातील काही अधिकाऱ्यांची मानसिकता अशी आहे.
मानव-प्राणी संघर्ष वाढणार
येणाऱ्या काळात मानव-प्राणी संघर्ष वाढणार आहे. लोकांचे जीव वाचवण्यात अपयश आल्यास लोक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर आपला रोष काढतील. त्यानंतर जनावरांना टार्गेट करतील. वने आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या कॅम्पा फंडमध्ये आज ४० हजार कोटी पडून आहेत. मात्र या निधीचा वापर होत नाही. ताडोबा, पेंच, टिपेश्वर यांसारख्या जंगलांना फेन्सिंग करायला पाहिजे. फेन्सिंग केले तर बाहेरचे जनावर आत जाणार नाही.
शिवाय जंगल संसाधने सुरक्षित राहतील. जंगलावर अतिक्रमण होणार नाही. राजस्थान, बिहार, गुजरातमध्ये नीलगाई शेती समाप्त करत आहेत. गुजरात सरकारने नीलगाई मारण्याचे आदेश काढले. मी वर्षभरात स्वतः १० हजार नीलगाई मारल्या. दुसरीकडे बिहार, गुजरात, महाराष्ट्रात रानडुक्कर, नीलगाईंमुळे शेतीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या नीलगाईंना ताडोब्यात सोडा. वाघांना अन्न मिळेल. कॅम्पाचा निधी यासाठी वापरला पाहिजे.
जीव वाचवण्यासाठी काम करत राहणार
वाघांच्या दहशतीत जगणाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन. मात्र त्यासाठी आरोग्य राखावे लागते. मी शिस्तप्रिय जीवन जगतो. सकाळी ५ वाजता उठतो. माझे घर उटीमध्ये आहे. सकाळी उठून मी घोड्यावरून जंगलाची रपेट मारतो. सिगरेट, दारूपासून दूर आहे. आजपर्यंत नेमबाजीत १०० पेक्षा जास्त गोल्ड मेडल जिंकली आहेत. केवळ चांगल्या आरोग्यामुळे हे शक्य झाले आहे. माझ्याकडे व्यापक अनुभव आहे.
आधुनिक गाड्या, हत्यारे आणि साहित्य आहे. केंद्र किंवा राज्य सरकारकडे असली संसाधने नाहीत. आमच्या अनुभवातून चार लोकांचे प्राण वाचले तर मला आनंद होतो. माझा मुलगा असगर किंवा नातू आम्ही या मोहिमेसाठी तयार असतो. आज आमचे नाव आहे. बिहार, आसाम, झारखंडपासून कुठेही गेलो तर लोक प्रेमाने आम्हाला जेवू घालतात. यवतमाळमध्ये आजही लग्नाचे निमंत्रण मला येते. याचे समाधान मला आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करत राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.