किशोरदांच्या जगण्याची गोष्ट

किशोर कुमार यांना जाऊन तीन दशकांपेक्षा जास्त काळ लोटून गेला; मात्र आजही त्यांच्या गाण्याची जादू कायम आहे.
Kishor Kumar
Kishor Kumarsakal
Summary

किशोर कुमार यांना जाऊन तीन दशकांपेक्षा जास्त काळ लोटून गेला; मात्र आजही त्यांच्या गाण्याची जादू कायम आहे.

किशोर कुमार हे गायक, अभिनेते, कॉमेडियन, पटकथा लेखक, संगीतकार, चित्रपट निर्माते आणि उत्तम छायाचित्रकार होते. किशोर कुमार माणूस म्हणून कसे होते, त्यांची जडणघडण कशी झाली, जन्मगाव खंडव्याशी त्यांचे नाते कसे होते, याचे चित्र कधी जगापुढे आले नाही. अनिरुद्ध भट्टाचार्य आणि पार्थिव धर या जोडगोळीने ‘किशोर कुमार : द अल्टिमेट बायोग्राफी’ या पुस्तकातून किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जगापुढे आणले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अनिरुद्ध भट्टाचार्य यांच्याशी साधलेल्या संवादातून शब्दचित्रित झालेले किशोरदा.

किशोर कुमार यांना जाऊन तीन दशकांपेक्षा जास्त काळ लोटून गेला; मात्र आजही त्यांच्या गाण्याची जादू कायम आहे. किशोर कुमार आपल्यातून निघून गेल्यावर ते अधिक लोकप्रिय आणि नंबर वन गायक झाले, असे म्हटले जाते. २०१२ मध्ये फिल्मफेअरने एक सर्व्हे केला, त्यात किशोर कुमार हे ऑलटाईम बेस्ट सिंगर म्हणून निवडले गेले. चित्रपट सृष्टीला माहीत असलेले किशोर कुमार आयुष्य कसे जगले, याविषयी सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्याची उकल वेगेवगळ्या मुद्द्यांतून अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी ‘सकाळ’शी बाेलताना केली.

या पुस्तकात काय वेगळे?

किशोर कुमार यांच्यावर आजपर्यंत असंख्य पुस्तके लिहिली गेली; मात्र या पुस्तकात किशोर कुमार एक यशस्वी गायक आणि चार लग्न यापलिकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फारसा प्रकाश पडला नाही. या पुस्तकात किशोर कुमार माणूस म्हणून कसे होते, हे आले आहे. या पुस्तकातील सर्व माहिती नवीन आहे. किशोर कुमार जन्माला येण्यापूर्वी त्यांचे कुटुंब, जन्मगाव खंडवा, आजोळ भागलपूरची माहिती आहे. साधारणतः १० ते १२ या वयात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. त्यामुळे किशोर कुमार यांच्या बालपणाबद्दल, त्यांचे मित्र, ते काय करायचे, याबद्दलचा तपशील आम्ही जाणून घेतला. किशोर कुमार यांचे खंडवाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांची एकही मुलाखत खंडवाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जगाच्या नकाशावर खंडवा केवळ किशोर कुमार यांच्यामुळे आले. नाव लिहिताना ते किशोर कुमार खंडवावाला असे लिहायचे. चित्रपटात जिथे शक्य असेल त्या ठिकाणी ते खंडव्याचा उल्लेख आवर्जून करायचे. किशोर कुमार यांचा स्वभाव, विचार, चिंता, खंडवाबद्दल त्यांची भावना, हे सर्व यात आलेले आहे.

खंडवाच्या किशोर कुमार यांचा शोध

किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व समजून आम्ही खंडवा येथील त्यांच्या अनेक मित्रांना भेटलो. ते किशोर कुमार या अभिनेता, गायकाला ओळखत नव्हते, तर किशोर कुमार यांना माणूस म्हणून ओळखतात; मात्र त्यात अडचण अशी होती की, किशोर कुमार यांचे बहुतांश मित्र हयात नव्हते; पण एक घनिष्ट मित्र रमनिक भाई होते. त्यांनी आम्हाला किशोर कुमार यांच्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या. किशोर कुमार यांचे आवडते गजकचे दुकान, लालजी जलेबीवाले यांच्या नातवाशी आम्ही बोललो. किशोर कुमार म्हणायचे दूध जलेबी खायेंगे, खंडवा में बस जायेंगे. किशोर कुमार यांची गाणी, फिल्म तुम्ही बघू शकता, मात्र ते माणूस म्हणून कसे होते, हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्वाधिक वेळ खंडवा येथे दिला.

चतुरस्र व्यक्तिमत्त्व

किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व हे एक वेगळेच रसायन होते. सामान्य माणसासारखा विचार ते करत नसत. ‘दूर गगन की छाँव में’सारखा गंभीर चित्रपट बनवतो, तोच माणूस ‘बढती का नाम दाढी’ नावाचा विनोदी चित्रपट काढतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते. १९५० मध्ये सर्वाधिक चलती असणाऱ्या अभिनेत्यांपैकी किशोर कुमार एक होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले, त्यातील ५० टक्के चित्रपटांत ते हिरोच्या भूमिकेत होते. ते विनोदी अभिनेते म्हणून खूप लोकप्रिय होते. त्यांचा टाईमिंग जबरदस्त होता. ते स्वत:चे डायलॉग स्वत:च लिहीत. अनेकदा सेटवर दिग्दर्शकाकडे स्क्रिप्ट, संवाद नसायचे. त्या वेळी ते किशोर कुमार यांना विनंती करायचे. मग किशोर कुमार सेटवर कविता तयार करायचे. एकदा ‘दिल्ली का ठग’मध्ये त्यांनी असेच गाणे बनवले.

मै तूम बीन अधुरा

जैसे नमक बिन दाल

दाल बिना भात

भात बिना बंगाल

ते खूप चांगले पटकथा लेखक होते. त्यांनी ‘दूर गगन के छाव मे’सारखे चांगले चित्रपट बनवले. किशोर कुमार उत्तम छायाचित्रकार होते.

आणीबाणीतील कणखर गायक

आणीबाणीच्या काळात किशोर कुमार सरकारच्या हुकूमशाहीपुढे झुकले नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यांच्यासोबत आणीबाणीमध्ये जे झाले त्याचा सविस्तर तपशील अगदी तारीखवारासह या पुस्तकात आहे. आजपर्यंत हे फॅक्ट पुढे आले नाही. त्या वेळी रेडिओे आणि दूरदर्शनवर किशोर कुमार यांची गाणी वाजवण्यास बंदी घातली गेली. सर्वात मोठी रेकॉर्डिंग कंपनी एचएमव्हीला किशोर कुमार यांची गाणी रेकॉर्ड करू नका, असा आदेश दिला होता.

एचएमव्हीने सरकारचा आदेश मान्य केला. पॉलीडॉर कंपनीलाही किशोर कुमार यांच्या रेकॉर्डिंगवर बंदी घालण्याच्या सूचना सरकारने केल्या. मात्र सदर कंपनी जर्मनीची असल्यामुळे त्यांनी सरकारचा आदेश मान्य करायला नकार दिला. बीबीसीला किशोर कुमार यांची गाणी लावण्यास बंदी घातली गेली. अनेक संगीतकार किशोर कुमार यांच्याकडून गायन करून घेताना घाबरत असत. कारण त्यांना चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशी भीती वाटायची.

नैसर्गिक अभिनय मात्र गंभीर हिरो नाही

१९६० मध्ये चित्रपट देशप्रेमी स्वरूपाचे होते. त्यात राष्ट्रनिर्माणचे काम दाखवले जायचे. त्या वेळचे हिरो देशप्रेमी आणि देशासाठी त्याग करणारे होते. त्या वेळी राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार यांचा जमाना होता; मात्र त्या काळात किशोर कुमार यांची ओळख एक कॉमेडियन हिरो अशी होती; मात्र त्या वेळी हिरो कॉमेडियन असू शकतो, ही संकल्पना मान्य नव्हती. किशोर कुमार यांना रोमॅन्टिक सिन करणे आवडत नसे. त्यामुळे ते रोमॅन्टिक हिरो कधी बनू शकले नाहीत. आयुष्यभर कॉमेडियन हिरो राहिले. मात्र त्यांचा अभिनय नैसर्गिक होता.

१९६० मध्ये आघाडीच्या संगीतकारांकडून दुर्लक्षित

किशोर कुमार यांच्याकडे १९६०च्या काळात त्यावेळच्या आघाडीच्या संगीतकारांनी दुर्लक्ष केले, यात काही तथ्य आहे. मात्र किशोर कुमार हे तोपर्यंत कॉमेडीयन म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा आवाज कॉमेडी गाण्यासाठी वापरला जायचा. त्यामुळे या काळात किशोर कुमार यांच्या वाट्याला केवळ कॉमिक गाणी यायची. राजेश रोशन सोडले, तर किशोर कुमार यांना नौशाद, ओ. पी. नय्यर यांनी फारशी संधी दिली नाही. ओ.पी. नाय्यर यांच्यासोबत त्यांची गाणी आहेत; मात्र ती बहुतांश विनोदी स्वरूपाची. नौशाद यांनी कधी किशोर कुमार यांचा वापर केला नाही. बहुतांश गाणी किशोर कुमार यांच्याऐवजी तलत मेहमूद यांच्या वाट्याला येत असत. त्यात १९६० नंतर मधुबाला लग्नानंतर आजारी होत्या. त्या वेळी किशोर कुमार यांनी गाणे सोडले होते.

आरडी बर्मन-किशोर म्युजिकल ट्यूनिंग

किशोर कुमार जेव्हा एसडी बर्मन यांच्या घरी गाण्याच्या रिहर्सलला जायचे, तेव्हा आरडी लहान होते. ते रिहर्सलदरम्यान चहा आणून द्यायचे. किशोर कुमार यांचे पंचमदावर अगदी लहान मुलासारखे प्रेम होते. आरडी बर्मन यांनी किशोर कुमार यांच्या रिहर्सल बघितल्या होत्या. ते एक एक स्वर कसे लावतात, गायनातले बारकावे, गायनाची रेंज, त्यांची स्टाईल हे सर्व आरडी बर्मन यांना तोंडपाठ झाले होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास किशोर कुमार यांची स्टाईल पंचमदा यांच्या डोक्यात अगदी फीट बसली होती. त्यामुळे ज्या वेळी आरडी बर्मन यांनी कामाला सुरुवात केली, त्या वेळी त्यांनी किशोर कुमार यांच्या स्ट्रेंग्थचा वापर मोठ्या खुबीने केला.

दोघांतील म्युजिकल ट्यून एवढी जबदरदस्त होती की आरडी आणि किशोर कुमार यांचा संगीत क्षेत्रातील उत्कर्ष एकाच काळात झाला. असे म्हणतात, आरडी हे त्यांचे संगीत किशोर कुमार यांना डोक्यात ठेवून कंपोज करायचे. त्यामुळे ‘कटी पंतग’, ‘अमर प्रेम’ची गाणी ऐका. ती कधीच जुनी होणार नाही. पुढची एक हजार वर्षे ती आनंद देणार आहेत. पंचमदा किशोरकुमार यांचा खूप आदर करायचे.

किशोर कुमार १० वर्षे जिवंत राहिले असते तर...

किशोर कुमार अजून १० वर्षे जिंवत राहिले असते, तर १९८० मध्ये उदयास आलेल्या नव्या गायकांना काम मिळाले नसते, असे मला वाटते. १९८० या दशकातील किशोर कुमार यांचे कुठलेही गाणे ऐका, आजच्या पिढीने ऐकले तरी ते ऐकत राहणार. कारण त्यांच्या आवाजात जादू होती. ती जादू काय आहे हे सांगू शकत नाही. अमिताभ बच्चन यांचा पडद्यावरचा वावर सर्वात जबरदस्त होता. मात्र काही गोष्टी अनुभवायच्या असतात. त्याचे विश्लेषण करता येत नाही. त्याच प्रकारे किशोर कुमार यांचे कुठलेही गाणे ऐका, तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडता, त्यासारखे वाटेल. प्रत्येक गाणे तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाते. मी गेल्या कित्येक वर्षांपासून संगीतावर लिहितोय, मी स्वत: गायक आहे, मात्र अजूनही किशोर कुमार यांच्या गाण्याचे विश्‍लेषण करणे शक्य होत नाही. केमिकल रिअॅक्शन आहे.

बंगालीत अतिशय लोकप्रिय

१९८० मध्ये किशोर कुमार यांना बंगाली चित्रपटात सर्वाधिक मागणी होती. त्यांनी कित्येक गाणी संगीतबद्ध केली. १९७० च्या मध्यात सर्व संगीतकारांना किशोर हवे होते. त्या वेळचे बंगाली सुपरस्टार उत्तम कुमार यांच्यासाठी किशोर कुमार यांचा आवाज होता. मात्र किशोर कुमार मुंबईत राहात होते. नुकतेच त्यांचे चौथे लग्न झाले होते. लिना यांच्यापासून त्यांना मुलगा झाला. सुमितचा जन्म झाल्यापासून ते एक चांगल्या वडिलांची जबाबदारी पार पाडत होते. अर्धा दिवस शूटिंग-रेकॉर्डिंगनंतर कुटुंब, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नसे. याच काळात त्यांना दोनदा हृदयविकाराचा धक्का बसला. यासोबत त्यांचे शो जास्त होत असत. त्यामुळे बंगाली चित्रपटासाठी वेळ काढणे कठीण होते. १९८० नंतर ते संगीताच्या बिघडलेल्या दर्जाबद्दल नाराज होते. या कारणामुळे त्यांना निवृत्ती घेऊन खंडव्याला जावे, असे सारखे वाटायचे.

चार विवाहाची कहाणी

किशोर कुमार यांचे वैवाहिक आयुष्य चांगले होते; मात्र ते सर्वाधिक आनंदी लिना यांच्यासोबत होते. पहिले लग्न फार चालले नाही. रुमाजी या सत्यजित रे यांच्या घराण्यातील होत्या. त्या खूप चांगल्या गायिका, डान्सर होत्या. त्यांना आपले करिअर स्वतंत्रपणे पुढे न्यायचे होते; मात्र किशोर कुमार यांना घर चालवणारी पत्नी हवी होती. तिथे वाद झाले, त्यामुळे ते लग्न टिकले नाही. दुसरे लग्न मधुबाला यांच्यासोबत झाले. साडेसात वर्षे ते चालले. या दरम्यान मधुबाला आजारी होत्या. हा किशोर कुमार यांच्यासाठी खूप कठीण काळ होता. त्यानंतर योगीता बाली यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले; मात्र अत्यंत अल्प काळ ते टिकले. लिना चंदावरकर यांच्यासोबत त्यांचे लग्न टिकले, ते खूप आनंदी होते. सुमितच्या जन्मानंतर तर किशोर कुमार एक कौटुंबिक माणूस म्हणून पुढे आले.

आख्यायिका...

1 मोहमद्द रफी आणि किशोर कुमार हाडवैरी? : मोहम्मद रफी आणि किशोर कुमार हे शत्रू कधीच नव्हते. प्रत्यक्षात दोघे एकदम चांगले मित्र होते. त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण ही लढाई त्यांच्या फॅन क्लबने सुरू केली आहे. दोघांमध्ये कधीच मतभेद नव्हते.

2 आजारी असलेल्या मधुबालापासून किशोर दूर गेले : मधुबाला यांच्यासाठी किशोर कुमार यांनी सर्व काही केले. आजारी असल्यामुळे मधुबाला यांच्याशी भावनात्मक भेटी कमी करा, असा सल्ला डॉक्टरांचा होता. त्यामुळे ते मधुबाला यांना भेटायला जात नसत. मात्र जेव्हा जेव्हा मधुबाला यांच्याकडून निरोप यायचा, तेव्हा किशोर भेटायचे. त्यांच्या आग्रहामुळे दोघे एकत्र जेवायचे.

3 किशोर कुमार यांना शास्त्रीय संगीताची जाण नव्हती? : भीमसेन जोशी, चक्रवर्ती, कुमार गंधर्व हे सर्वजण किशोर कुमार यांचे फॅन होते. भीमसेन जोशी आपल्या गाडीत कायम किशोरदांची गाणी ऐकायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com