तूम मुझे यू भुलाना पाओगे!

मोहम्मद रफी यांचे शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचित आहे. ते मोजकेच बोलायचे. घरच्यापेक्षा बाहेर आपल्या जवळच्या लोकांशी मात्र बऱ्यापैकी बोलायचे.
Mohammad Rafi
Mohammad Rafisakal

‘ना फनकार तुझसा, तेरे बाद आया, मोहम्मद रफी, तू बहोत याद आय...’ गीतकार आनंद बक्षी यांनी आपल्या या रचनेमध्ये महान फनकार मोहम्मद रफी यांच्या गायकीबद्दल केलेले वर्णन कित्येक वर्षांनंतर आजही खरे ठरते. शतकातील महान गायक मोहम्मद रफी यांचे २४ डिसेंबरपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. रफी यांच्या मधाळ, पहाडी आणि मदमस्त आवाजाची जादू अद्याप ओसरलेली नाही. त्यांचा आवाज दर्दभरा होता. त्यात साधेपणा, चारित्र्य, माणुसकी आणि विनम्रतेचे प्रतिबिंब झळकते. रफी यांची धाकटी मुलगी नसरीन आणि त्यांच्या कुटुबातील इतर सदस्यांशी साधलेल्या संवादातून त्यांचे संगीतापलीकडचे वैयक्तिक आयुष्य उलगडत गेले...

मोहम्मद रफी यांचे शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचित आहे. ते मोजकेच बोलायचे. घरच्यापेक्षा बाहेर आपल्या जवळच्या लोकांशी मात्र बऱ्यापैकी बोलायचे. रेकॉर्डिंग संपवून घरी आले, की घरात रमायचे. मुलांसोबत कॅरम, बॅडमिंटन खेळणे त्यांना आवडायचे. शनिवार- रविवारी सर्व मुलांना घेऊन लोणावळ्यातील बंगल्यात जायचे. मुलांची प्रत्येक मागणी त्यांनी पूर्ण केली. रफी बॉलीवूडमध्ये होते; परंतु त्यांच्या घरी बॉलीवूड नव्हते.

बॉलीवूडच्या पार्ट्या, सोहळ्यापासून ते कोसो दूर होते, कुटुबालाही त्यांनी दूरच ठेवले. १९६० नंतर रफींची प्रकृती बिघडली. त्यानंतर ते पत्नीला सोबत घेऊनच फिरू लागले. नसरीन सांगतात, शंकर-जयकिशन यांच्या एका म्युझिक शोला रफीसाहेब आम्हाला घेऊन गेले. त्या दिवशी वडिलांचे वलय काय आहे, याची झलक पाहायला मिळाली. त्यांचे घराबाहेरचे व्यक्तिमत्त्व समजले. रफीसाहेब एक ‘फॅमिली मॅन’ होते.

रफी अतिशय शांत आणि नम्र स्वभावाचे होते. ते कधी मुलांवर रागावले नाहीत किंवा त्यांच्या आवाजाचा स्वर कधी वाढला नाही. सुरुवातीच्या काळात रफी कुटुंबासह वांद्रे भागात भाड्याने राहायचो. घरात मुले मस्ती-गोंगाट करायची. मात्र, ते घरी आले की टाचणी पडल्याचाही आवाज येईल एवढी शांतता पसरायची. ते कमी बोलायचे, त्यामुळे त्यांच्या रागावण्याचा कोटा पूर्ण करायची जबाबदारी अम्मीकडे होती. मुले चुकली, तर रफीसाहेब एका शब्दाने बोलायचे नाहीत. मात्र, त्यांच्या डोळ्यात पहिल्यावर मुलांना त्यांची चूक लक्षात यायची.

रेकॉर्डिंग चांगले झाले की रफी खूष व्हायचे. घरी आल्यावर सर्व मुलांना बसवून त्यातील एक अंतरा ऐकवत असत. हार्मोनियम, तानपुरा घेऊन स्वतंत्र खोलीत ते रियाज करायचे. त्या खोलीच्या आजूबाजूला फिरकण्यासही मुलांना बंदी होती. मुलगी नसरीन यांचा आवडता गायक मुकेश. त्या वेळी ‘बिना का गीतमाला’, ‘सिलोन रेडिओ’वरून मुले वडिलांचे गाणे ऐकायची; मात्र ते आपले गाणे आहे असे न म्हणता अमुक हिरोचे आहे, असे म्हणायचे.

वडिलांचा चहा अत्यंत स्पेशल बनायचा. रेकॉर्डिंगला जाताना थर्मासभर चहा भरला जायचा. रफी कुठल्याही समारंभात जाण्यासाठी तासभर तयार होत असत. मी कसा दिसतो, असे ते मुलांना विचारायचे. प्रत्यक्षात लग्नात मात्र १५ मिनिटांच्या पलीकडे ते कधीच थांबले नाहीत.

मी पैसे का मोजू?

मोहम्मद रफी यांनी आपल्या आयुष्यात पैसे कधीच मोजले नाहीत. देवाने मला कधी मोजून दिले नाही, तर मी का मोजायचे, असे ते म्हणत. रफींनी आयुष्यभर अनेकांना मदत केली. मात्र, ती कधी कळू दिली नाही. अगदी पत्नीलाही त्याबद्दल कल्पना नसायची. ते मुलांना तेच सांगायचे, की कधी आपला हात मागण्यासाठी पसरू नका... देण्यासाठी पुढे करा. रमजानच्या दिवशी त्यांच्या घरी अनेकांच्या रांगा लागायच्या. रफी कुणालाच परत पाठवत नसत.

अनेक नवोदित संगीतकांराचे करियर उभे करण्यासाठी रफींनी मोबदला न घेता गाणे गायले आहे. संगीतकारांच्या कुटुंबीयांना ते आर्थिक मदत करायचे. दर महिन्याला पैशाने भरलेले ३० ते ४० लिफाफे नियमित पाठवले जायचे. त्यासाठी माणसेही नेमली गेली होती. रफींचे निधन झाल्यामुळे त्या घरात पैसे जात नव्हते. तेव्हा ते रफींच्या बंगल्यावर आले आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.

दिलदार माणूस

रफी अत्यंत हळवे होते. दुसऱ्याचे दुःख, त्रास त्यांना बघवत नसायचा. एकदा रेकॉर्डिंगसाठी घराबाहेर पडताना लिफ्टमनने ‘साब मेरी बेटी की शादी है’ असे सांगितले. स्वभावाप्रमाणे रफी काहीच बोलले नाहीत. शांतपणे मान हलवली. रेकॉर्डिंग पूर्ण केले. त्यासाठी जेवढे पैसे मिळाले ते न मोजता तो लिफाफा जसाच्या तसा त्यांनी लिफ्टमनला दिला... एकदा वरळी सिग्नलवर रफीसाहेबांची गाडी थांबली होती. एक माणूस अनवाणी पायाने चालत होता.

उन्हामुळे त्याच्या पायाला चटके बसत होते. रफींना ते पाहवलं नाही. सिग्नल सुरू झाल्यावर त्यांनी गाडी बाजूला घेतली. पायातील चपला काढल्या आणि त्या माणसाला दिल्या... एके दिवशी वांद्र्यातील लकी रेस्टॉरंटच्या पदपथावर मराठीतील मोठा गायक वाईट अवस्थेत बसला होता. रफीसाहेबांची गाडी तिकडून जात होती. त्यांनी त्याला ओळखले. त्याला गाडीत बसवले आणि घरी नेले. आंघोळ घालून दिली. नवे कपडे दिले. पैसे देऊन त्याला घरी पाठवले. रफींच्या दिलदारपणाचे असे कित्येक किस्से आहेत.

अखेरपर्यंत पाळला वक्तशीरपणा

रफी अत्यंत वक्तशीर होते. एकदा संगीतकार ओमी यांच्याकडे रेकॉर्डिंगसाठी ते वीस मिनिटे आधीच पोहोचले. मात्र, ते आतमध्ये गेले नाहीत. बाहेरच दहा मिनिटे फिरत होते. वेळ पाळणारे रफी आयुष्यात एकदाच रेकॉर्डिंगसाठी तासभर उशिरा पोहोचले. संगीतकार ओ. पी. नय्यर संतापले. रफींनी शंकर-जयकिशन यांच्या रेकॉर्डिंगमुळे उशीर झाल्याचे सांगितले. त्यानंतर ओ. पी. नय्यर यांनी रफींकडून गाणे गाऊन घेणे बंद केले. काही काळानंतर झाल्या प्रकाराबद्दल रफी यांनी नय्यर यांची माफी मागितली. त्यानंतर दोघांच्या जोडगोळीने अनेक अजरामर गाणी दिली.

मैत्री जपणारे व्यक्तिमत्त्व

किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते एकमेकांना भाऊ मानायचे. आजच्यासारखी स्पर्धा त्यांच्यात नव्हती. रफी लग्नात हजेरी लावायचे. तयार होण्यासाठी तासभर लावायचे. मी कसा दिसतो, असे ते मुलांना विचारायचे. मात्र, लग्नात ते केवळ १५ मिनिटे थाबंत असत. किशोर कुमार लंडनमध्ये एका कॉन्सर्टसाठी गेले होते. त्या वेळी ते आवर्जून रफींच्या घरी जेवायला गेले.

मुकेश तर अनेकदा स्टुडिओमध्ये केवळ रफींचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी हजेरी लावत. नितीन मुकेश यांच्याशी एकदा संवाद साधण्याचा योग आला तेव्हा त्यांनी तिघांची एक आठवण सांगितली होती. रफी, किशोर आणि मुकेश यांना एकमेकांचे गाणे आवडले की ते थेट फोन करून कौतुक करायचे, असे ते म्हणाले होते... मुकेश तर आपल्या मुलाला रफी आणि किशोर यांची गाणी गायला सांगायचे.

भावाला न्यायला आलो आहे!

अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना मुकेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृतदेह मुंबई विमानतळावर आणण्यात आला. मात्र, काही कारणावरून कस्टम अधिकाऱ्यांनी तो देण्यास नकार दिला. राज कपूर यांच्यासह मोठमोठ्या अभिनेत्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु अधिकारी त्यांना जुमानत नव्हते. त्या वेळी रफी रुग्णालयात उपचार घेत होते. मुकेश यांच्याबद्दल समजल्यावर रफींनी डॉक्टरांकडे बाहेर जाण्याची परवानगी मागितली.

तिथून ते थेट विमानतळावर गेले. त्यांना बघताच कस्टम विभागाचे तत्कालीन प्रमुख असलेले अधिकारी म्हणाले, ‘रफीजी तुम्ही इथे काय करताहात?’ रफी म्हणाले, ‘मी माझ्या भावाला घेऊन जायला आलो आहे...’ त्यानंतर काही मिनिटांत मुकेश यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. रफींच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू त्यांच्या मृत्यूनंतर जगासमोर उलगडत गेले.

गाणे सोडू नकोस...

संगीतकार नौशाद यांचा रफी अतिशय आदर करायचे. हज यात्रेवरून परतल्यावर रफींनी गायन सोडून देण्याचा निर्णय घेतला. ते लंडनला निघून गेले. रफी जेव्हा पहिल्यांदा भारतात आले त्या वेळी नौशाद त्यांना भेटायला गेले. आता गाण्याची इच्छा होत नाही, असे रफी त्यांना म्हणाले. त्यावर नौशाद रफींना म्हणाले, ‘रफी, तू अंगुठाछाप आहेस (रफी फारसे शिकले नव्हते). वरच्याने तुला गळ्याची एवढी नेमत दिली आहे. जगाला देण्यासाठी याच्याशिवाय तुझ्याकडे काय आहे. गाणे थांबवू नकोस.’ नौशाद यांचे म्हणणे रफींनी ऐकले आणि त्यांनी पुन्हा गायनाला सुरुवात केली.

मुलांना बॉलीवूडपासून दूर ठेवले

रफी स्वतः कमी शिकले होते. मात्र, त्यांच्या मुला-मुलींनी खूप शिकावे, अशी त्यांची इच्छा होती. सुरुवातीपासून मुलांना त्यांनी बॉलीवूडपासून दूर ठेवले. शिक्षणासाठी त्यांना लंडनमध्ये पाठवले. रफींच्या मुलांच्या रक्तामध्ये स्वाभाविकपणे गाणे होते. मात्र, वडिलांची इच्छा ओळखून हौशी गायनाच्या पलीकडे मुले पुढे गेली नाहीत. त्यांचा धाकटा मुलगा शाहीन गातो. त्याचे गायन ‘शो’पुरते मर्यादित आहे.

वडिलांच्या इच्छेप्रमाणे मुलांनी उच्च शिक्षण घेतले. बहुतांश मुले विमानसेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. त्याचा रफींना अभिमान होता. आजचे बॉलीवूड बघता वडिलांचा निर्णय किती योग्य होता याची प्रचीती येते, असे त्यांची मुले आवर्जून सांगतात.

अजरामर भक्तिसंगीत

हिंदू धर्मीयांचा एक सण नाही जो रफींच्या गाण्याशिवाय सुरू होऊ शकेल. त्यांच्या गाण्यात भक्ती होती. रामजी की निकली सवारी, सुख के सब साथी... दुख में ना कोई, बडी देर भई नंदलाला, तुने मुझे बुलाया शेरावालिये... मराठीतील- शोधीशी मानवा, अशी किती तरी अजरामर भक्तिगीते त्यांनी गायली. रफींची एक खासियत होती. जे गाणे त्यांना दिले जायचे, ते फक्त त्या गाण्याचा प्रसंग (सिच्युएशन) विचारत असत. मग तल्लीन होऊन, त्यानुसार गायचे. असे अजब रसायन होते रफीसाहेब.

शेवटचे दिवस...

नसरीन ही रफी यांची दोन नंबरची धाकटी मुलगी. रफींना मुलींचा विशेष लळा होता. त्यांचे नातू-नातवंड लंडनला राहत. मुली मात्र भारतात. आपल्या निधनाच्या एक महिन्यापूर्वी म्हणजे जूनमध्ये मोहम्मद रफी एका ‘शो’साठी श्रीलंकेत गेले होते. योगायोग म्हणजे त्यांचा पहिला परदेश दौरा श्रीलंका होता आणि शेवटचाही.

श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यावर रसिकांच्या झालेल्या अफाट गर्दीचे वर्णन करताना रफींचे डोळे पाणावले होते. त्या शोला तब्बल १३ लाख संगीतप्रेमी उपस्थित होते. ३० जुलैला म्हणजे रफी जाण्यापूर्वी ते बंगाली भजनाची तालीम करत होते. रेकॉर्डिंगपूर्वीचा तो सराव होता. त्यादरम्यान त्यांना बरे वाटत नव्हते; तरीही त्यांनी तालीम पूर्ण केली. त्यानंतर एकाएकी त्यांची तब्येत बिघडली.

डॉक्टर आले नि म्हणाले, हृदयविकाराचा तीव्र झटका आहे. ते रफींना म्हणाले, तुमची तब्येत ठीक नसताना रेकॉर्डिंग उद्या केली असती. रफी ताडकन म्हणाले, की ते सर्व माझी वेळ घेऊन आले होते. त्यांना मी नाही कसे म्हणणार? रफींची कामाप्रती एवढी निष्ठा होती.

अब्बांना काही सांगायचे होते!

आपल्या वडिलांची अखेरची आठवण नसरीन यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘वडिलांच्या छातीत दुखायला लागले तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात जाण्यापूर्वी वडिलांनी दोन्ही मुलींच्या कपाळाचे चुंबन घेतले. ‘माझ्यासाठी दुवा मागा’ असे ते मुलींना म्हणाले. आम्हाला गुडबाय करत त्यांची गाडी निघून गेली.

रात्री मला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बोलावले गेले. तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्याच पाणी होते. शाहीन ‘आयसीयू’मध्ये गेली. दोन्ही मुली अब्बांच्या पाया पडल्या. म्हणाल्या, अब्बा, तुम्ही लवकरच ठीक व्हाल. रफीसाहेब मुलींकडे बघत राहिले. डॉक्टरांनी आम्हाला बाहेर जायला सांगितले. मात्र, शेवटपर्यंत रफी मुलींकडेच बघत होते. दोन मिनिटांनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले... वडिलांना काही तरी सांगायचे होते.

एवढ्या वर्षांनंतर आजही ते डोक्यातून जात नाही...’ मोहम्मद रफी यांच्या मृत्यूनंतर घरच्यांनी गाणे सोडून दिले. रफी साहेबांच्या २५ व्या स्मृतिदिनाला आग्रहाखातर पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबाने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. त्या दिवशी माझ्या वडिलांवर जग किती प्रेम करत होते, याची कल्पना आली. केवळ रफींची मुलगी म्हणून कित्येक जण माझ्या पाया पडले.

त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या नावांमुळे अनेक चौक आणि रस्ते ‘रफी’ नावाने ओळखले जातात. जेव्हा कधी परवानगी घेण्यासाठी पालिकेत जायचो तेव्हा प्रत्येक अधिकारी रफीसाहेबांचा फॅन निघायचा. काही मिनिटांत फाईलवर स्वाक्षरी करायचे... मला वाटत नाही, जगात एवढे प्रेम कधी कुणाच्या नशिबात आले असेल...

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com