मैं पल दो पल का शायर हूँ ।

मोहम्मद रफी, मुकेश आणि किशोर कुमार यांनी भारतीयांसह जगभरात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यातील एक मुकेश यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
Nitin Mukesh
Nitin MukeshSakal
Updated on: 

मोहम्मद रफी, मुकेश आणि किशोर कुमार यांनी भारतीयांसह जगभरात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यातील एक मुकेश यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांची बहुतेक सर्व गाणी अजरामर आहेत. ते एक महान गायक तर होतेच; पण त्याहून एक माणूस म्हणून त्यांची उंची खूप मोठी होती. मुकेश यांच्या जन्माला २२ जुलै १९२३ रोजी शंभर वर्ष झाली. जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा मुलगा गायक नितीन मुकेश यांच्याशी साधलेला संवाद...

मुकेश, माझे वडील या जगातून जाऊन आज ४७ वर्षे झाली आहेत. आजही लाखो लोक वडिलांची आठवण काढतात. त्यांची गाणी गुणगुणतात. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रत्येक कलाकाराची हीच तर इच्छा असते. अर्थात आठवण काढणे सोपे असले, तरी प्रत्यक्षात वडिलांसारखे वागणे खूप कठीण आहे.

कारण मुकेश हे सर्वगुणसंपन्न व्यक्ती होते. जसे त्यांची गाणी साधी-सोपी वाटतात, तसाच त्यांचा स्वभाव होता. त्यांची कलेवर श्रद्धा होती, ते कलाकार म्हणून प्रामाणिक होते. त्यांचा काही वर्षांचा सहवास मला मिळाला. ते सर्व प्रसंग अविस्मरणीय आहेत. आजही त्यांना मी आठवतो तेव्हा त्यांचा साधेपणा मला प्रकर्षाने जाणवतो आणि माझे मन गहिवरते.

मुकेशजींनी मला कधीच शिकवलं नाही. ते म्हणत मी जे काही शिकलो ते गुरूंकडून... तूदेखील तुझ्या गुरुजींकडून शिक. मुकेशजींनी मला त्यांचे गुरू पंडित जगन्नाथ यांच्याकडे संगीत शिकवण्यासाठी पाठवले. मी त्यांना म्हणायचो, ‘पप्पा, तुम्ही एवढे मोठे गायक आहात. तुम्हीच मला का शिकवत नाही?’ त्या वेळी ते शांतपणे मला सांगत की, ‘बेटा, मी एवढा मोठा नाही. मीदेखील अजूनही शिकतो आहे.’ वडिलांच्या गायनाची शैली माझ्या आपोआपच रक्तात आली. मी कधीही नक्कल करायचा प्रयत्न केला नाही.

शेवटचे ते क्षण

७ जुलैला आम्ही अमेरिकेला जाण्यासाठी विमान पकडले आणि अमेरिकेतच २७ ऑगस्ट १९७६ ला मुकेशजी जग सोडून गेले; मात्र त्या महिन्यातील एक एक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता. मुकेशजी भल्या पहाटे उठायचे. ते अत्यंत प्रेमाने मला उठवत. या काळात त्यांनी मला अमेरिका दाखवली.

२७ ऑगस्टला त्यांची तब्येत अचानक बिघडली, तेव्हा मी रूममध्ये होतो. मी ओक्साबोक्शी रडायला लागतो. वडील मला म्हणाले, ‘अरे बेटा, तू कशाला रडतोस. मला काही होणार नाही. तू चिंता करू नकोस.’ पुढच्या अर्ध्या तासात ते जग सोडून गेले. रुग्णालयात नेताना त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला. त्यांची नजर माझ्यापासून जराही हटली नाही.

Nitin Mukesh
Nitin MukeshSakal

मुकेशजींनी मला रामायण मागितले. मी रडत रडत ते दिले. त्यावेळी ते ‘अरे पागल, तू का रडतोस?’ म्हणाले. ॲम्ब्युलन्समधून त्यांना रुग्णालयात नेलं. तब्येत अधिकच बिघडल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात शिफ्ट करण्यात आले. मला आत जाता येत नव्हते. त्या वेळी पहिल्यांदा त्यांचा हात सुटला. माझे मन मला सांगत होते की, पप्पांचा हात सोडू नकोस... आतमध्ये जाईपर्यंत त्यांची नजर माझ्यावर होती. त्यानंतर दरवाजा बंद झाला. ही माझी आणि त्यांची शेवटची भेट. माझ्या अंतापर्यंत हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.

माझी आई मला नेहमी म्हणायची, ‘‘नितीन, तू खूप नशीबवान आहेस. तुला वडिलांचा एक महिना सहवास मिळाला.’’ आयुष्यभर मोठा मुलगा म्हणून त्यांनी माझ्यावर थोड्या जास्त जबाबदाऱ्या दिल्या; मात्र शेवटच्या क्षणी त्याची परतफेड करत त्यांनी ते अनमोल क्षण मला दिले. कदाचित बोनस टाईम दिला.

माणुसकी...

मुकेश एक महान गायक होते, तरीही कौटुंबिक जीवनात मात्र ते खूप साधे, सरळ होते. त्यांच्या मनात सर्वांबद्दल आदर आणि प्रेम होते. माणुसकी तर एवढी होती की आमच्या सोसायटीतील धोबी, स्वच्छता सेवक, वॉचमनपासून सर्वांची ते अत्यंत आपुलकीने विचारपूस करत. या सर्वांना ते आपल्या कुटुबांचा एक भाग समजायचे.

आमचा धोबी जवळच्या झोपडपट्टी भागात राहायचा. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचे मुकेश यांना निमंत्रण दिले. त्या दिवशी सर्व काम सोडून मुकेश यांनी आवर्जुन त्या लग्नाला हजेरी लावली. देशाचा एवढा महान गायक लग्नात आला. त्या दोघांचे डोळे भरून आले. आग्रह केल्यावर त्या समारंभात मुकेशजींनी गाणी गायली. मुलगा म्हणून माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले. एवढा मोठा गायक झोपडपट्टीतील त्या छोट्याशा कार्यक्रमात आनंदाने गात होता.

पप्पा घरातून एक-दोन दिवसांसाठी बाहेर जात असतील, तरी ते वॉचमनपासून ते झाडूवाल्यापर्यंत प्रत्येकाकडे जाऊन अदबीने त्यांना बाय बाय करायचे. मी बाहेर चाललो आहे; मात्र नितीन घरी आहे, काहीही लागलं तर बिनधास्त त्याला सांगा, असे सांगून ते जायचे. आमच्या गल्लीत ते वॉकसाठी निघायचे तेव्हा परिसरात राहणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासोबत बोलायचा. त्या भागातील सर्व लोक मुकेश यांच्यावर प्रेम करत.

महान गायक म्हणून मुकेश यांना जग ओळखते; मात्र मोठेपणाची ही भावना आपल्या मनात त्यांनी आयुष्यभर येऊ दिली नाही. ते कमालीचे साधे होते. अनेकदा कार उपलब्ध नसली, तर ते टॅक्सी पकडायचे. टॅक्सी नाही मिळाली, तर बेस्ट बसने प्रवास करायचे. यात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. मी त्यांना म्हणायचो, ‘पप्पा, तुम्ही एवढे लोकप्रिय आहात. तुमचा ऑटोग्राफ घेण्यासाठी सर्वजण तुम्हाला घेरून टाकतात.

त्यामुळे टॅक्सी किंवा बेस्टमधून प्रवास करू नका.’ असे सांगितल्यावर ते आमच्यावर रागवायचे आणि सांगायचे की, ‘परत मला हे कधी सांगू नका.’ कधी कधी आम्ही भावंडे त्यांना ते किती मोठे व्यक्तिमत्त्व आहेत, याची आठवण करून द्यायचो, तेव्हा ते म्हणायचे, ‘बेटा, जी भावना माझ्या मनात येत नाही, ती तुमच्याही मनात येणे योग्य नाही. आपण जसे आहोत, तसेच आहोत. आपल्यात आणि सामान्यांत काही फरक नाही.’ नेमकी हीच गोष्ट माझ्या बाबांना इतर दुनियेपेक्षा वेगळी करायची.

रफी-किशोर-मुकेश

मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश हे तीन समकालीन महागायक होते; मात्र तिघांमध्ये एकमेकांबद्दल स्पर्धा, हेवेदावे किंवा द्वेष मी कधी बघितला नाही. उलट तिघांमध्ये एकमेकांबद्दल खूप आत्मीयता होती. याला मागे सोडून मी पुढे जातो, अशी भावना तिघांच्या मनात कधीच आली नाही. या सर्वांचा मी साक्षीदार आहे.

ते एकमेकांचा एवढा आदर करायचे की, रफी साहेब किंवा किशोर कुमार यांचे एखादे गाणे आवडले, तर मुकेशजी तातडीने फोन करून कौतुक करायचे. वडील कित्येकदा असे म्हणायचे, ‘काश मै किशोर जैसा गा सकता.’ किशोर कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘काश मुझे मुकेश जैसी आवाज मिलती.’ मन्ना डे, तलत मेहमूद यांच्यासोबत त्यांची मैत्री होती.

वयाच्या नवव्या वर्षापासून मी वडिलांसोबत स्टेजवर गायचो. वडील मला सांगायचे की, मुकेशची गाणी गायला मुकेश आहे; मात्र तू किशोर कुमार आणि रफी साहेबांचे हे गाणं गा, ते गाणं खूप लोकप्रिय आहे. मी मनात विचार करायचो की, माझे वडील एवढे मोठे गायक आहेत.

त्यांची शेकडो गाणी आहेत; मग मला पप्पा इतरांचे गाणे का गायला सांगतात. मात्र कालांतराने लक्षात आले की, मुकेशजींचे मन एवढे मोठे होते, की ते समकालीन गायकांची गाणी आपल्या मुलाला गाण्यासाठी सांगत. हे सर्व पाहून मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे माझ्या मनात कुणाबद्दल स्पर्धा नाही, द्वेष नाही.

लतादीदींचा स्नेह

लतादीदी आणि मुकेश कुमार यांचे भावा-बहिणीचे घट्ट नाते होते. आशा, लतादीदींसोबत त्यांनी कित्येक अजरामर गाणी गायली. लतादीदी त्यांच्यापेक्षा वयाने लहान होत्या. मात्र ते त्यांना दीदी म्हणायचे. मला आश्चर्य वाटायचे. एकदा मी त्यांना याबद्दल विचारले. मुकेशजी म्हणाले, ‘‘लतादीदी भलेही माझ्यापेक्षा वयाने लहान असतील; मात्र त्या कलेने खूप महान आहेत.

आमच्या सर्वांपेक्षा कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत. इंग्रजीमध्ये म्हणतात ना, She command that respect त्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्यांना आदराने दीदी असं म्हणतो.’ लतादीदीदेखील माझ्या वडिलांना मुकेशभय्या अशी हाक देत. लतादीदींनी चांगल्या आणि वाईट वेळेत मुकेश यांना कायम प्रेम दिले. किंबहुना असे म्हटले जाते की लतादीदींनी मुकेश यांच्यावर जेवढे प्रेम केले, तसे फारच कमी लोकांच्या नशिबी आले असेल.

मोबदल्यात मुकेश यांनी दीदींना तेवढेच प्रेम, आदर दिला. माझे वडील गेल्यानंतर लतादीदींनी माझे बोट पकडून मला जग दाखवले. केवळ मुकेशभय्यांचा मुलगा असल्यामुळे मला हे प्रेम मिळाले. मला सांभाळले. नाही तर मी कोण होतो? मात्र केवळ लतादीदींमुळे मला सिडनी ऑपेरा हाऊस, लंडनच्या अल्बर्ट हॉलपासून जगातल्या सर्व मोठ्या कॉन्सर्टमध्ये गाता आले. दीदींचे निधन होईपर्यंत प्रेमाचा हा धागा त्यांनी जपला.

राज कपूर यांचा आवाज नाही, आत्मा

मुकेश हे राज कपूर यांचा पडद्यावरचा आवाज होते; मात्र प्रत्यक्षात मुकेश यांची ओळख करून देताना राज कपूर सांगायचे की, मुकेश हा केवळ माझा आवाज नाही, तर तो माझा आत्मा आहे. संगीत हे राज कपूर यांच्या सिनेमाचे महत्त्वाचे अंग असायचे. त्यांनी त्यांच्या असंख्य चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी मुकेश यांच्याकडून गाऊन घेतली आहेत. ती सर्व गाणी सुपरहीट होती. कोणते चांगले याची स्पर्धा लागायची.

‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हू’ या गाण्यांनी भारताची सीमा केव्हाचीच ओलांडली होती. ‘आवारा हू’ हे मुकेशजींचे गाणे त्या वेळी सोव्हियत संघ, चीन, ग्रीस, युरोपीयन देशात प्रचंड लोकप्रिय होते. कित्येक स्थानिक भाषांत या गाण्याचा अनुवाद झाला. आखाती देशात या गाण्याचे २३ ते २४ भाषांत भाषांतर झाले.

आवारा हू हे गाणे रेकॉर्ड होऊन आज ७५ वर्षे झाली; मात्र आजही रशियापासून जगभरात ते अगदी लहान मुलांच्या ओठावर आहे. आजही एकाहून एक चांगले गायक, संगीतकार आहेत; मात्र त्यावेळचा संघर्ष, ती मेहनत आजच्या तरुणांमध्ये पाहायला मिळत नाही.

त्यांच्या आवाजात एवढा दर्द का?

मुकेश खूप भावुक व्यक्ती होते. अनेक जण मला विचारायचे की, मुकेशजींचे आयुष्य कोणत्या अशा अडचणींनी भरले होते की, त्यांच्या गाण्यात एवढा दर्द (दु:ख) आहे? तो दर्द यासाठी होता की, प्रत्येकाचे दु:ख, भावना ते समजून घेत. म्हणून त्यांच्या गाण्यात त्याचे प्रतिबिंब पडायचे. मुकेशजी साधे आणि सोप्या पद्धतीने गात असत.

गाणे गात असताना उस्तादी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे मन मानवतेने भरलेले होते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे अजरामर झाले. त्यामुळे १९४१ मध्ये मुकेशजींनी गायलेले पहिले गाणे ‘दिल जलता है तो जलने दे’ हे आजही तेवढेच लोकप्रिय आहे.

मी चांगले गाणे गायले, तर ते मला म्हणायचे, ‘बेटा, तू मनाने गायलंस, उस्तादी दाखवली ठीक आहे; मात्र तू जेवढे हृदयाने, भावना समजून, चित्रपटातील प्रसंग समजून गाणे गाशील, तेवढे ते रसिकांच्या हृदयात उतरेल.’ हीच शिकवण मुकेशजींनी मला वडील म्हणून दिली. आजही मी जेव्हा स्टेजवर रामायणाची चौपाई गातो, तेव्हा ते माझ्या बाजूला येऊन बसले आहेत, हॉर्मोनियम वाजवत आहेत, असा भास मला होतो.

अनेक लोक मला म्हणतात, तुमच्या गळ्यातून मुकेशजी गात आहेत. त्यांची गायनाची शैली माझ्या रक्तात असेल. मी कधीच नक्कल केली नाही. मात्र तेच माझे गुरू होते. माझे वडील माझे देव होते. जन्मभर राहतील.

‘डोंट वरी बेटा’ इन्स्ट्रक्शन फॉर यू

मुकेशजींना तीन मुली, दोन मुले. मी (नितीन मुकेश) माझ्या आईचा खूप लाडका होतो. ते सर्व मुलांसोबत खूप प्रेमाने वागायचे; मात्र मी घरातला सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे जेवढी सक्ती करता यायची, तेवढी माझ्यावर करायचे. ते म्हणायचे ‘डोंट माईंड बेटा, बट आय हॅव नो चाईस. यू च्युस टू बी माय एल्डर सन’.

माझे वडील माझ्या सर्व भावंडांना तुमच्यासाठी काय आणू विचारायचे; मात्र माझ्यासाठी केवळ इन्स्ट्रक्शन (सूचना) असायच्या. गाडी सर्व्हिसिंगला टाक, अमूक बिल भर, तमूक बिल भर... वगैरे.

मीदेखील माझा मोठा मुलगा नील याला तेच सांगतो. तीन भावंडांसाठी लाड मात्र तुझ्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आणि एक्स्पेक्टेशन. मुकेशजी कायम माझ्या आईला सांगायचे, तू जराही चिंता करू नकोस. माझ्यानंतर नितीन आहे, तुझा सांभाळ करेल. मला प्रेमाने ते ‘लाले’ अशी हाक मारायचे. मला आजही ते आठवते, मन खूप भरून येते.

मृत्युपश्चात दोन पुरस्कार

बासु दा यांच्या रजनीगंधा चित्रपटातील ‘कई बार यू ही देखा है’ या गाण्याला मुकेश यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुकेश यांनी शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी या संगीतकारांच्या तुलनेत सलील चौधरी यांच्यासोबत खूप कमी काम केले; मात्र सलीलदा सोबत जेवढी गाणी गायली ती सर्वच्या सर्व सुपरहीट ठरली. सलील चौधरी एक मास्टर संगीतकार होते. ते वडिलांना खूप मानत.

ते कायम म्हणायचे ‘मी जे गाणे कम्पोज करतो, ते मुकेश यांच्यापर्यंत पोहोचले, तर त्याला चार चाँद लागतात. ‘कभी कभी, मेरे दिल में खयाल आता है’ हे ‘कभी कभी’ या चित्रपटातील गाणे आणि ‘कई बार यूही देखा है’ या दोन गाण्यांना पुरस्कार मिळाला; मात्र त्यावेळी मुकेश या दुनियेत नव्हते. मृत्युपश्चात हा शब्द मला आवडत नाही. कारण कलाकार कधीच मरत नसतात. मुकेशजींना तर अमरत्व मिळाले होते.

नितीन यांच्या पसंतीची मुकेश यांची टॉप १२ गाणी

१. जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर) : १९८०

२. कही दूर जब दिन ढल जाये (आनंद) : १९७१

३. मैं पल दो पल का शायर हूँ (कभी कभी) : १९७६

४. चंदन सा बदन (सरस्वती चंद्र) : १९६८

५. हमने अपना सब कुछ खोया (सरस्वती चंद्र) : १९६८

६. मुझ को इस रात की तनहाई में आवाज न दो (दिल भी तेरा, हम भी तेरे) : १९६०

७. दिल जलता है तो जलने दे (पहिली नजर) (१९४१ मध्ये हे रेकॉर्ड झालेले मुकेश यांचे पहिले गाणे.)

८. जिना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा (मेरा नाम जोकर) : १९८०

९. डम डम डिगा डिगा मौसम (छलिया) : १९६०

१०. पतली कमर है, तिरछी नजर है (बरसात) : १९४९

११. सावन का महिना, पवन करे शोर (मिलन) : १९६७

१२. प्यार का नगमा है (शोर) गेल्या शतकातील सर्वांत सुंदर श्रेष्ठ गीत म्हणून याचा उल्लेख होतो.)

vinod.raut@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.