हल्ला पचवलेली ‘अनब्रोकन’ नायिका

२०१४ मध्ये ‘अनब्रोकन’ नावाचा हॉलीवूड सिनेमा आला होता. त्यात दुसऱ्या महायुद्धादरम्यान एक अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती सापडतो.
Actress Nidhi Chaphekar
Actress Nidhi Chaphekarsakal

२०१४ मध्ये ‘अनब्रोकन’ नावाचा हॉलीवूड सिनेमा आला होता. त्यात दुसऱ्या महायुद्धादरम्यान एक अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती सापडतो. ऑलिम्पिकपटू असलेला अमेरिकन सैनिक छळछावण्यांत अन्वनित अत्याचार सहन करूनही जगण्याची उमेद सोडत नाही... आशा सोडत नाही. २०१६ मध्ये ब्रुसेल्स विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर तेवढ्याच मरणयातना निधी चाफेकर यांनी सहन केल्या. मात्र, त्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांच्या प्रेरणादायी कहाणीचं नावही ‘अनब्रोकन’च आहे.

22 मार्च २०१६ सालचा तो दिवस ‘जेट एअरवेज’च्या केबिन क्रू मॅनेजर असलेल्या निधी चाफेकर कधीच विसरू शकत नाहीत. ब्रुसेल्स विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. दोन वर्षं त्यांना मरणयातना सोसाव्या लागल्या. मात्र, जिद्द, संयम आणि साहसाच्या जोरावर आज त्या पुन्हा ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. ब्रुसेल्सच्या त्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षं उलटून गेली; परंतु निधी यांच्या मनात आजही त्याच्या कटू आठवणी जाग्या आहेत.

त्या हल्ल्याने त्यांच्या आयुष्यातील अमूल्य क्षण हिरावून घेतले गेले. आज त्या एकदम पहिल्यासारख्या फिट दिसतात; परंतु त्यांच्या शरीरावर जखमांच्या अनेक खाणाखुणा आजही जिवंत आहेत. बॉम्बस्फोटांमुळे धातूच्या असंख्य तुकड्यांनी निधी यांच्या शरीराची चाळण केली. त्यातील अनेक तुकडे शरीरात घेऊन त्या जगताहेत...

निधी सांगतात, दहशतवादी हल्ल्याने माझं आयुष्य पार बदलून गेलं. संपूर्ण जग माझ्यासाठी प्रार्थना करत होतं. असंख्य आशीर्वादांमुळे मी मृत्यूला हात लावून परत येऊ शकले. यापूर्वी माझं मी जगत होते; परंतु दहशतवादी हल्ल्याने मला स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगण्याचं भान दिलं मला पुनर्जन्म मिळाला. आता इतरांच्या मदतीसाठी तो उपयोगात आणण्याची प्रेरणा मिळाली. निधी सांगतात, मेल्यानंतर तर आपली कुणीही आठवण काढतं.

मात्र, असं काही करा की जिवंतपणी लोकांनी आपल्याला विसरता कामा नये. या हल्ल्यात तीनशेपेक्षा जास्त जणांनी आपले काही ना काही अवयव गमावले. मात्र, माझे हात-पाय आणि सर्वच अवयव सुरक्षित होते. मग मी कुणाला दोष का द्यायचा?

माझी काहीच तक्रार नाही...

पंजाबच्या अमृतसरमध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या निधी खुराना बिनधास्त, बेधडक आणि तोंडावर स्पष्टपणे बोलणाऱ्या होत्या. आयुष्यात उंच भरारी घेण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाचा पाठलाग करत त्या १९९६ मध्ये ‘जेट’मध्ये केबिन क्रू म्हणून नियुक्त झाल्या. कामानिमित्ताने जगभर त्यांची सफर सुरू झाली. पुढे अंधेरीमध्ये राहत असताना इमारतीतील रुपेश चाफेकर नावाच्या मराठमोठ्या तरुणाच्या प्रेमात त्या पडल्या. एक पंजाबी मुलगी मराठी झाली.

आजही आठवणी ताज्या

निधी चाफेकर ‘तो’ दिवस आजही विसरू शकत नाहीत. ‘जेट’ची ब्रुसेल्सला जाणारी ती शेवटची फ्लाईट होती. त्या उड्डाणात निधी यांचं नाव नव्हतं. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांचा समावेश झाला. ब्रुसेल्स त्यांचं आवडतं शहर. त्या शहराला शेवटचा निरोप देण्यासाठी निधी आणि त्यांच्या टीमने भरपूर तयारी करून ठेवली होती. मात्र, नियतीने त्यांच्या पुढ्यात काही वेगळंच मांडून ठेवलं होतं.

ब्रुसेल्स विमानतळावर आपलं टर्निमल गाठण्यासाठी जात असताना कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. अक्षरशः मांस चिकटून असलेले कपडे हवेत सर्वत्र विखुरले गेले... क्षणभर निधी यांना वाटलं, की लिथियम बॅटरीचा स्फोट झाला असावा. पुढे जाणार तो एकाने त्यांना मागे खेचलं. काही मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने स्वतःला उडवून दिलं. मी ४० फूट दूर फेकले गेले, असे निधी सांगतात.

स्फोटात निधी यांचे केस जळाले, कपडे फाटले... दरम्यान निधी एकदाही रडल्या नाही. त्याही स्थितीत आजूबाजूला पडलेल्या माणसांना त्या धीर देत होत्या. संपूर्ण शरीर एकवटून उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. संपूर्ण शरीरात धातूचे तुकडे घुसले होते. शरीर उचललं जात नव्हतं. ऐकायला येतं नव्हतं. शेवटी बळ एकवटून त्यांनी आवाज दिला.

कडाक्याच्या थंडीत एक तास त्या स्ट्रेचरवर पडून होत्या. क्षणभर त्यांना वाटलं, की आता जाण्याची वेळ आली आहे. मात्र, डोळ्यासमोर मुलांचं काय होणार, याची चिंता होती. कमालीच्या वेदना सहन करत त्यांनी स्वतःला जागं ठेवण्याचा प्रयत्न केला. एकदा झोपलं, की सर्व संपलं याची त्यांना कल्पना होती.

डॉक्टरांनी त्यांना बांगड्या उतरवायला सांगितलं. त्या वेळी बांगड्यासोबत त्वचा बाहेर आली. तेव्हा आपण भाजल्‍याचं त्यांच्या लक्षात आलं. मग विचारचक्र सुरू झालं, मला समाज स्वीकारेल का? माझी नोकरी शाबूत राहील का? अशा असंख्य प्रश्नांसोबतच त्या कोमात गेल्या.

झुंज आणि पुनर्जन्म...

निधी चाफेकर यांच्यावर वीसपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या गेल्या. तरीही त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. ब्रुसेल्समध्ये ओळखीचे असलेले पाकिस्तानी नागरिक शब्बीर भाई जेव्हा पहिल्यांदा निधी यांना भेटायला आले तेव्हा त्यांचं शरीर बँडेजमध्ये गुंडाळलेलं होतं. ओळखणं शक्यच नव्हतं. निधी यांची परिस्थिती बघून शब्बीरभाई तिकडेच कोसळले.

त्यांनी त्यांचे पती रुपेश यांना तातडीने बेल्जियमला येण्याबाबत सांगितलं. त्यानंतर रुपेश आले. एका वेळी तर निधी यांचं हृदय बंद पडलं. शॉक देऊन सुरू करावं लागलं. निधी यांचा चेहरा फुगला होता. त्यानंतर त्यांना बेल्जियमच्या सर्वोत्तम रुग्णालयात एअर लिफ्ट केलं गेलं.

त्यांच्या रक्तात विष झालं होतं, फुप्फुस निकामी झालं होतं... हाडातही धातूचे तुकडे होते. २३ दिवस कोमात राहिल्यानंतर पंजाबचा प्रमुख सण असलेल्या बैसाखीच्या दिवशी निधी शुद्धीवर आल्या. त्या दिवसाचं स्मरण म्हणून आजही निधी यांचे दोन वाढदिवस साजरे केले जातात.

पहिल्यांदा निधी यांनी आपला चेहरा आरशात बघितला तेव्हा त्यांना जगायची इच्छा उरली नाही. त्या वेळी त्यांची आई म्हणाली, ‘माझ्यासोबत असं झालं असतं तर तू मला सोडून दिलं असतं का? तुझ्या मुलांना काय सांगशील? तू लढू शकली नाही..? त्यांना ते कसं वाटेल?’ आईच्या वाक्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही, असं निधी सांगतात.

पुस्तकाचा प्रवास...

बेल्जियममधील उपचारानंतर निधी मुंबईला परतल्या. मात्र, त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या. हालचाली करणं कठीण होतं. अजूनही उपचार सुरूच होते. त्वचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना वर्षभर ग्लोव्हज् घालून राहावं लागलं. वेदना सहन करून धाडसाने निधी संकटातून बाहेर पडल्या. एकदा आईने सांगितलं, की तुला गोष्टी लक्षात राहत नाही. तू त्या लिहीत राहा. मग डायरी लिहिणं सुरू केलं.

जसं आठवलं तसं लिहिलं. तीन डायऱ्या लिहिल्या. तब्बल ७५० पानं लिहून काढली. त्याचं पुस्तक करायचं का, हेदेखील ध्यानीमनी नव्हते. मात्र प्रकाशकांनी माझ्याशी संपर्क केला आणि पुस्तकाचं काम सुरू झालं. वर्षभरानंतर पुस्तक तयार झालं. मात्र, जेट प्रशासन त्याला मंजुरी देण्यासाठी टाळाटाळ करत होतं.

दरम्यान जेट एअरवेज कंपनीच बंद झाली आणि पुस्तकाचा मार्ग मोकळा झाला. एवढा मोठा हल्ला मला मोडू शकला नाही. दहशतवाद्यांना जगाची शांतता आणि बंधुत्व भंग करायचं आहे; पण ते मला ब्रेक करू शकले नाही. म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव ‘अनब्रोकन’ ठेवण्याचा निर्णय घेतला, असं निधी सांगतात.

हल्ल्याची ‘ओळख’

दहशतवादी हल्ल्यादरम्यान विमानतळावर असलेल्या एका जॉर्जियन महिला छायाचित्रकाराने खुर्चीवर बसलेल्या निधी चाफेकर यांचं छायाचित्र क्लिक केलं होतं. तिने ११ छायाचित्रं काढली होती. जगभरातील न्यूयॉर्क टाईम्स, गार्डियन इत्यादींपासून सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी त्यातील निधी यांचंच ते छायाचित्र प्रकाशित केलं. त्यामुळे निधी त्या हल्ल्याची ओळख बनल्या. ते छायाचित्र धैर्य, साहस आणि खंबीर असलेल्या निधी यांचं दर्शन घडवते.

खूप काही सांगून जातं. निधी यांना त्यांच्या पतीने ३५ दिवसांनंतर छायाचित्र दाखवलं. त्या वेळी त्या हळूहळू फ्लॅशबॅकमध्ये गेल्या. एक दशलक्ष डॉलरमध्ये ते छायाचित्र विकत घेण्याची ऑफर छायाचित्रकाराला मिळाली होती; परंतु तिने नकार दिला. निधी यांच्या छायाचित्रामुळे युरोपमध्ये दहशतवादाविरोधात संतापाची लाट उसळली. युरोपमध्ये दहशतवादी कायदे वेगाने बनले.

आता दुसरी लढाई

दुसरं आयुष्य मिळालेल्या निधी चाफेकर आता इतरांसाठी लढण्याकरिता सज्ज झाल्या होत्या. जेट एअरवेज बंद पडण्याच्या मार्गावर होती. स्वतःची नोकरी गेली. ‘जेट’च्या इतिहासातील पहिली कामगार संघटना निधी यांनी स्थापन केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई-दिल्ली वाऱ्या केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून नागरी उड्डाण मंत्री आणि कामगार आघाड्यांसोबत असंख्य बैठका केल्या. मला दुसऱ्यासाठी काही तरी करायचं होतं. एवढीच प्रेरणा त्यामागे होती. दीड वर्षं लढा दिला. त्यातून हाती काही लागलं नाही; परंतु मी हार मानली नाही. कारण या हल्ल्याने तेच तर मला शिकवलं होतं, असं निधी सांगतात.

जीवनाचा हेतू बदलला

ब्रुसेल्स हल्ल्याचा खटला उभा राहिला तेव्हा साक्षीदार म्हणून निधी यांनी आपलं नाव नोंदवलं. ‘कोर्टात उभ्या असलेल्या ११ दहशतवाद्यांकडे बघून मी एक तास ४५ मिनिटे सलग बोलत होते. साक्ष पूर्ण झाल्यानंतर मला सागंण्यात आलं, की त्यातील दोन दहशतवाद्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी हेच सांगत होते, की तुम्ही द्वेषामुळे हल्ला करता. त्यात तीनशे जण जखमी झाले.

कुणी डोळे, हात नि पाय गमावले. ते आयुष्यात कोणत्या संकटाला तोंड देत असतील याचा कधी विचार केला का? तिथे उपस्थित नसणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य जणांना तुम्ही नुकसान पोहोचवलं. हल्ल्यानंतरच्या सात वर्षांत त्यांना आयुष्यात काय भोगावं लागलं असेल?’ असं सांगताना निधी आजही गहिवरून जातात. हल्ल्यादरम्यान ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सर्वांना निधी भेटल्या. त्यांना पहिल्यांदा उचलणारा पोलिस, डॉक्टर, नर्स, शब्बीर भाई इत्यादी असंख्य नावं त्यांच्या बोलण्यात येतात.

मुलांचं लहाणपणी ब्रेनवॉश केलं जातं. त्यामुळे निधी देशभरातील बालसुधार केंद्रांत जाऊन आपली कथा सांगतात. मुलांमध्ये द्वेष वा शत्रुत्वाची भावना असेल तर त्यांचे विचार तिथेच थांबवण्याचा प्रयत्न त्या करतात. त्या शाळा-कॉलेजात जातात. ‘टेड टॉक’मध्ये बोलतात. मी जे भोगले ते दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये एवढाच माझा प्रयत्न आहे, असं त्या सांगतात. आज धर्म, जात, भाषा आणि इतर क्षुल्लक कारणावरून वादावादी होते. त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे माफ करण्याची वृत्ती आणि सहनशीलता माणसात आली तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात, असे निधी चाफेकर यांचे म्हणणे आहे.

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com