‘साधना’त अवतरली डिजिटल क्रांती...!

साधनाचे सत्तरावे वर्ष संपले तोपर्यंत साप्ताहिकाची एक साधी वेबसाइट होती, तिच्यावर आधीच्या दहा वर्षांचे अंक फक्त पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते.
Digital revolution
Digital revolutionsakal
Summary

साधनाचे सत्तरावे वर्ष संपले तोपर्यंत साप्ताहिकाची एक साधी वेबसाइट होती, तिच्यावर आधीच्या दहा वर्षांचे अंक फक्त पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते.

- विनोद शिरसाठ, saptrang@esakal.com

साधनाचे सत्तरावे वर्ष संपले तोपर्यंत साप्ताहिकाची एक साधी वेबसाइट होती, तिच्यावर आधीच्या दहा वर्षांचे अंक फक्त पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते. मात्र २०१८ या वर्षी बंगलोर येथील आय.पी.एस.एम.एफ. या संस्थेने साधना साप्ताहिकाचे डिजिटल अर्काइव्ह तयार करण्यासाठी ग्रँट देऊ केली. प्रस्ताव त्यांच्याकडूनच आला आणि नंतरच्या चार वर्षांत आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हे काम आम्हाला सोपे गेले, याचे कारण या अर्काइव्हचा पाया डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी २००७ मध्येच रचून ठेवला होता. तेव्हा त्यांनी साधनाचे साठ वर्षांचे सर्व अंक स्कॅन करून ठेवले होते.

किशोर ओंबळे या डॉक्टरांच्या इंजिनियर कार्यकर्त्याने अवघ्या सहा महिन्यांच्या काळात जवळपास तीन हजार अंकांचे स्कॅनिंग फक्त दीड लाख रुपयांत करून दिले होते. गंमत अशी की, तेव्हा डॉक्टरांना स्वतःला ई-मेल सुद्धा करता येत नव्हता, मात्र येऊ घातलेली डिजिटल क्रांती आणि साधनाचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी तो दूरदृष्टीचा निर्णय घेतला होता.

जानेवारी २०१९ पासून आम्ही साधनाच्या डिजिटल अर्काइव्हसाठी जणू काही ''वॉर रूम''च सुरू केली. अलीकडच्या १५ वर्षांचे अंक, मग त्याआधीच्या ४५ वर्षांचे अंक आणि त्यानंतर सुरुवातीचे १५ वर्षांचे अंक असे तीन टप्पे ठरवले. ओसीआर तंत्राने अंक युनिकोड मध्ये रूपांतरित करणे, नंतर त्या सर्व अंकांची प्रुफे तपासून घेणे आणि मग ते अंक वेबसाइटवर लेखक- विषय-उपविषय अशा वर्गीकरणासह अपलोड करणे, असे त्रिस्तरीय काम सुरू केले.

या कामासाठी सुदाम सानप, सुहास पाटील, हिना खान, मृदगंधा दीक्षित व समीर शेख या पाच तरुणांची कार्यालयीन टीम पूर्ण वेळ काम करू लागली. शिवाय, त्या त्रिस्तरीय कामासाठी २५ ते ३० तरुण-तरुणी आपापल्या घरी राहून अर्धवेळ काम करत राहिले.

आतापर्यंत या अर्काइव्हचे दोन टप्पे (१९६३ ते २०२३) पूर्ण झाले आहेत, तिसरा टप्पा आणखी सहा महिन्यांत पूर्ण होईल. म्हणजे साधनाचे ७५ वर्षांचे अर्काइव्ह पूर्ण झालेले असेल. या सर्व प्रक्रियेसाठी आम्ही इवोनिक्स टेक्नॉलॉजी कडून सॉफ्टवेअर प्रणाली तयार करून घेतली. एम.के.सी.एल. ने तांत्रिक साह्य, सल्लामसलत व मनुष्यबळ अशी बरीच मदत विनामूल्य केली. शिवाय, सॉफ्टवेअर क्षेत्रांतील काही मित्र- हितचिंतक यांचे सहाय्य मिळाले ते वेगळेच.

डिजिटल अर्काइव्हने छापील पुस्तके, ई बुक्स व ऑडिओ बुक्स या तिन्ही आघाड्यांवर प्रचंड शक्यता निर्माण केल्या. उदाहरणार्थ अनिल अवचट यांनी संपादित केलेला १५ ऑगस्ट १९७२ चा ‘पंचवीस वर्षातील दलितांचे स्वातंत्र्य’ हा विशेषांक , राजा ढाले यांच्या वादग्रस्त लेखामुळे प्रचंड गाजला होता, त्यावर घणाघाती वादसंवाद झाला होता. तो संपूर्ण अंक आणि तो सर्व वादसंवाद यांचे मिळून दोनशे पानांचे पुस्तक गेल्या वर्षी आम्ही सहजतेने आणू शकलो, ते केवळ या अर्काइव्हमुळेच !

या अर्काइव्हचे काम चालू असतानाच, ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल सुरू केले. त्यावर साप्ताहिकाच्या व्यतिरिक्त पूर्णतः नवा मजकूर (लेख) प्रसिध्द करायला सुरुवात केली. शिवाय इंग्रजी लेख व ऑडिओ / व्हिडिओ हे विभागही सुरू केले. कर्तव्य स्थिरावत नाही तोच, साधना प्रकाशनाची पुस्तके ई-बुक स्वरूपात किंडलवर आणायला सुरुवात केली. पुढील दीड वर्षांत पावणेदोनशे पुस्तके ई-बुक स्वरूपात तर आणलीच, पण साप्ताहिकाचे गेल्या दशकभरातील पन्नासहून अधिक विशेषांकही ई बुक स्वरूपात आणले. हिना व समीर या दोघांनी ते काम पूर्णतः मार्गी लावले.

हे करत असतानाच आम्ही ऑडिओ बुक्स तयार करण्यासाठी आघाडी उघडली. ते काम अधिक वेळ, ऊर्जा व पैसा घेणारे असल्याने त्याची गती कमी राहिली, परंतु जी ऑडिओ बुक्स केली ती सर्वार्थाने उत्तम दर्जाची आहेत. आतापर्यंत ३० पुस्तके आणि ४० कॅप्सुल्स असा एकूण सव्वादोनशे तासांचा ऐवज स्टोरीटेलवर आला आहे. मृदगंधा दीक्षित व मयूर पठारे या दोघांनी ही आघाडी सांभाळली.

काही ऑडिओ बुक्स त्या त्या लेखकांच्या आवाजात करून घेतली, उदा. मिलिंद बोकील यांच्या आवाजात ''कहाणी पाचगावची'' आणि ''मेळघाट शोध स्वराज्याचा''. काही पुस्तके कलाक्षेत्रातील लोकांच्या आवाजात करून घेतली, उदा. गोविंद तळवलकर यांचे ''वाचता वाचता'' हे पुस्तक गजानन परांजपे यांच्या आवाजात, तर नवी क्षितिजेकार विश्वास पाटील यांचे ''झुंडीचे मानसशास्त्र'' हे पुस्तक ओंकार गोवर्धन यांच्या आवाजात. काही पुस्तके उत्कृष्ट निवेदकांच्या आवाजात करून घेतली, उदा. सुरेश द्वादशीवार यांची ''मन्वंतर '' व ''युगांतर '' ही पुस्तके गौरी लागू यांच्या आवाजात.

याशिवाय, विभूतीभूषण बंद्योपाध्याय लिखित व विजय पाडळकर अनुवादित ''मुलांसाठी पथेर पांचाली'' या कादंबरीचे ऑडिओ बुक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दिपाली अवकाळे यांच्या आवाजात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ''लढे अंधश्रद्धेचे'' हे पुस्तक हर्षल लवंगारे या तरुण मित्राच्या आवाजात, तर गो.ना. मुनघाटे लिखित ''माझी काटेमुंढरीची शाळा'' हे पुस्तक राजकुमार तांगडे यांच्या आवाजात केले; ही दोन्ही ऑडिओ बुक्स मागील पावणेदोन वर्षे सर्व अर्थानी अव्वल स्थानी राहिली आहेत.

चार वर्षांपूर्वी फक्त साधना साप्ताहिकाची वेबसाईट होती, तिला दरमहा भेट देणाऱ्यांची संख्या तीन हजार दरम्यान होती. आता साप्ताहिक, कर्तव्य व प्रकाशन या तिन्ही विभागांच्या स्वतंत्र वेबसाईट आहेत, मात्र त्या परस्परांना जोडलेल्या आहेत. या तिन्ही वेबसाईटला भेट देणाऱ्यांची एकूण संख्या आता दरमहा साठ हजारांपेक्षा जास्त आहे. चार वर्षांपूर्वीपर्यंत साप्ताहिकाचा एकही लेख युनिकोडमध्ये उपलब्ध नव्हता, आता त्या वेबसाईटवर तीस हजारांपेक्षापेक्षा अधिक लेख शेअर करण्याच्या सुविधेसह उपलब्ध आहेत.

सारांश, साधनाच्या सर्व विभागांना जोडणारा व पुढे घेऊन जाणारा डिजिटल हा चौथा विभाग चांगलाच आकाराला आला आहे. प्रिंट व डिजिटल ही माध्यमे परस्परांना पूरक ठरत आहेत, असाच आमचा अभ्यास व अनुभव आहे. मात्र अर्थकारण, वितरण व व्यवस्थापन हे आव्हान पूर्वीपेक्षा अधिक मोठे झाले आहे. अर्थातच, ते पेलवण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत संधीही जास्त आहेत. त्या संधी कशा उपयोगात आणायच्या यासाठी आम्ही सक्षम राहणार आहोत की नाही, इतकाच काय तो प्रश्न आहे !

(लेखक, साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन या दोहोंचे संपादक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com