व्हायरल ! अन् आवश्यक !

थोडं बोला की पाहुणे...नाहीतरी हात हलवत निवांत चालला आहात.. तर थोडफार भका की.
Viral
Viralsakal
Updated on

मुलाखतकार : ‘अहो, अहो शुक शुक..!

पाहुणा : कोण मी?

मुका : थोडं बोला की पाहुणे...नाहीतरी हात हलवत निवांत चालला आहात.. तर थोडफार भका की.

पा : मी ? अहो पण मी तर साधा...

मुका : झक मारा पण थापा मारू नका !.. हॅ हॅ हॅ…!

आजकाल साधं कुणीच नसतं...

या बसा.. ! तुमची मुलाखत घ्यायची आहे.

पा : का?

मुका : उगाच! हॅहॅहॅ !

माझा पहिलाच प्रश्न एकदम भारी आहे. हॅहॅहॅ!

तर, बेसिकली तुम्ही हे आहात, ते आहात की “तेऽऽऽ” आहात ? प्रसिद्धही असाल किंवा नसाल पण त्याशिवाय आणखी काही आहात का?

थोडक्यात, तुम्ही नक्की कोण आहात?

पा : अं? अवघड आहे हो प्रश्न. शोध चालू आहे.

मुका : हॅहॅहॅ, आगावूपणानं बोलू नका शक्यतो. सुरुवातीलाच सांगतो. लाईके डिस्क्लेमर! हॅहॅहॅ!

पा : प्रामाणिकपणा आगावू वाटण्याचाच काळ आहे. तुमचा दोष नाही.

मुका : माझा? दोष? हॅहॅहॅ! माझा नाहीच्चे दोष. मी अभ्यास करून आलोय. तुम्ही नेहेमीच आगाऊ बोलता.

पा : होय. नको तेवढं बोलायची मलाही खोडच आहे. पण मी खरं बोलतो. खरोखरच मी कोण आहे याचा मी शोध घेत आहे.

मुका : खरं? ऑ? असं खरं बिरं काही नसतं. हॅहॅहॅ, पोस्ट ट्रुथ चालू असताना खऱ्याचं कशाला काय सांगताय मला?

पा : खोटंनाटं तुमच्यापाशी बक्कळ आहे. त्यात जरा बदल म्हणून सांगतोय समजा. आणि बरंका, मला आव आणून ‘खरं’ ‘खरं’ म्हणत राहायची नं सवय लावली आहे या सत्योत्तर काळानं. खरंच!

मुका : म्हणजे एकूण सगळी फेकाफेकीच होणार म्हणा की हॅहॅहॅ!

पा : तुम्हा माध्यमांना तेच तर हवं असतं ना?

मुका : च्यायला, काही झालं की माध्यमांवर घसरायचं. अहो माध्यमं केवळ माध्यमं आहेत! कर्ते करविते तर तुम्हीच ना? माध्यमांवर टीका करायची आणि तिथेच झक मारायची. हॅहॅहॅ कवळी काकडी सवळ्याची आणि लफडी सोळा… जाऊ द्या..! बोललो अस्तो.

पा : काय ही तुमची भाषा? असं बोललेलं चालतं तुमच्या प्रेक्षक, श्रोत्यांना?

मुका : प्रे क्ष क? हॅहॅहॅ शऽऽ रऽऽ ओऽऽ रोऽऽऽ ते? सोपेपणानं पब्लिक म्हणा ना राव. हॅहॅहॅ!, खून केलेले, रेप केलेले पुढारी पब्लिकला चालतात तर मग आम्ही तर फक्त त्यांची भाषा वापरतोय. नुसतं चालतं नाही तर हे असलं डबल तर्री आवडतं त्यांना. सत्ताधाऱ्यांबरोबर राहिलं की नागवंही पुजलं जातं. महामूर्खालाही मुकुट मिळतो.

पा : काय अवस्था केली हो तुम्ही आमची. चुकीची मूल्यं प्रस्थापित करून आमच्या माथी मारताय. मीही प्रेक्षक, श्रोता आहेच की. खरं सांगू? तुमच्या सततच्या सोबतीनं मी तरी हैराण झालो आहे. सुमारपणालाही काही मर्यादा असावी! तुम्ही काहीही दाखवता, ऐकवता. कशीही भाषा वापरता आणि वर आम्हालाच जबाबदार धरता. म्हणता की कर्ते करवते आम्हीच! तेही खरंच म्हणा ! तुम्ही दिलेली खरूज आम्हीच तर खाजवित राहतो.

मुका : च्यायला खरूज? हॅहॅहॅ, भारी. बोला, बोला! सनसनाटी बोला. वाट्टेल ते बोला! त्यातूनच आपण शोधू तुम्ही कोण आहात ते. माणूस बोलतो म्हणून ओळखता येतो. तेव्हा बोला! मरण जिंकल्यागत बोलत सुटा! हॅहॅहॅ!

पा : खरं म्हणजे गप्प राहावं अशी इच्छा असते पण तुम्ही डिवचून बोलायला लावता. आता ही मुलाखत! काय अर्थ आहे या फुकाच्या बडबडीत? मी कोण आहे हे देखील ठाऊक नाही आपल्याला. अशानं नुसत्या शब्दांच्या वावटळी उठत राहतात. त्यात गरगरणारे शब्द पाठीवरचं अर्थाचं ओझं सांडून टाकतात. मांद्यत्वाची छानशी गुंगी येते. भले भले गुंगतात.

मग अशा भान हरवलेल्या फॅालोअरांच्या संख्येच्या आकड्यांनी तुम्ही प्रस्थापित होता. प्रस्थापित होणं ही नवविचाराच्या, प्रयोगशीलतेच्या दृष्टीनं एरवी हानीच असली तरी नव्या काळात पैसा देणारी दुभती म्हैस आहे. पण तुम्ही पाताळ शोधतच निघाला आहात. मेरूदंड मोडून माणूस चतुष्पाद होईस्तोवर तुम्ही थांबू नका.

मुका : बेश्ट बेश्ट! असंच वाट्टेल ते बेलगाम भकत राहा. चॅनलला ट्रॅक्शन वाढेल. आमचं हे व्यासपीठ जरा सांस्कृतिक पडतं. हॅहॅहॅ. त्यामुळे थोडं अवघड जातं सब्सक्रिप्शन वाढवणं. सगळेच बीभत्स रसात न्हायला नागडे झालेत. हॅहॅहॅ! तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, इतिहास, राजकारण वगैरेवर बोलणारे जब्री कमावतात. राजकारण कसं ट्वेंटीफोर सेवन डिमांडमध्ये असतं.

पुढाऱ्यांची थेट मनेच वाचणारे वाचाळ तिथे येतात. पुढारी काही न काही राडा करतच असतात. मग हे घडाघडा आतल्या आतल्या घडामोडी सांगतात. तसंच इतिहासाचं! कुणाच्या बापालाही खरा इतिहास माहीत नसतो. देतात ठोकून. त्यात पुन्हा इकडचे आणि तिकडचे असतात. दोघं एकमेकांना खोटं पाडतात. जाम खुळी होते पब्लिक. हॅहॅहॅ. लगेच टपाटप लाइक आणि सबस्क्राइब! विश्वास बसायला, खप वाढायला सोपं, खोटं आणि भुक्कड बोलता यायला हवं.

प्रत्येक माणूस जन्मजात भुक्कड असतोच. त्याला आपलं वाटतं. तुम्ही कोण हे माहीत नसेल पण तुम्ही असंबद्ध बोलता हे तर ठाऊक आहे ना आम्हाला. म्हणून बोलावलं तुम्हाला. आणि फॉलोअर्स वाढवणे हे नित्यकर्मच आहे. तुमचं तसंच आमचंही. प्रत्येकाचं. धर्मकार्यच ते. त्याची शुचिता ठेवा. ते करत असलेल्यांबद्दल आदरानं उल्लेख करा. देवादिकांनीही आपापल्या युगात, अवतारात फॉलोअरांच्या जीवावरच तर विजय मिळवले. च्यायला, नास्तिक बिस्तिक तर नाही ना तुम्ही? हॅहॅहॅ!

पा : छे! छे! बोलण्यावर माझी श्रद्धा आहेच. मी नेहमी बोलतो आणि कशावरही बोलतो. बोलतच राहतो मी. अभिव्यक्तीचा विरेचक अतिसार मलाही झाला आहेच की. तुम्ही माझा विचार विखंडित केलात आणि मला असंबद्ध केलंत. मला जाणवतं ते वॅाटस्प वर कधीमधी लिहितो तेव्हां.

मुका : ओ, तुम्ही स्वतःला सेलिब्रिटी बीटी समजत नाही ना? हॅहॅहॅ. सेलिब्रिट्यांना बोलावच लागतं. कशावरही. बोलले तर घोडे, न बोलले तर गाढवं ! हॅहॅहॅ! उलटसुलट आणि विरोधाभासी बोलतात मग! बिचारे! आणि पाचक अतिसार झालाय …

पा : विरेचक …

मुका : तेच ते हो! हॅहॅहॅ! तर, ते लफडं झालंय हे कळत असूनही तुम्ही थांबत नाही हे तर भारीच ! हॅहॅहॅ! लिहीतही असता?

का? तुम्हाला टायपिंग येतं म्हणून? हॅहॅहॅ

पा : हं ! तसंच काहीसं. डब्याला डबे जोडत राहतो. शब्दांचे! त्यासारखा विरंगुळा नाही. लांबलचक मालगाड्या ! आत माल काहीच नाही. आपला माल इतरांना कचरा वाटू शकतो किंवा प्रत्यक्षात कचराच असू शकतो. मग कधीकधी बदल म्हणून माणसं भरायची, की झाली प्रवाशांची यातायात सुरू! निरनिराळ्या पात्रांची आयुष्य साकारायची आणि चिवडायची.

मुका : म्हणजे सोशल मीडिया ॲडिक्ट का? हॅहॅहॅ तिथेही असाच एकमेकांच्या लाइफचा चिवडा चालू असतो. एक मिंटं ! च्यायला ऽऽ तुम्ही काय ॲक्टर बिक्टर नाही ना? आहात का? नाही ना. वाटत बिलकूलच नाही. पण ते पात्र साकारायंचं वगैरे बोललात ना हॅहॅहॅ मी लगेच पकडला तो कॅच. हॅहॅहॅ!

पा : मी नाहीए अभिनेता. बाकी, एरवी सगळे अभिनयच तर करत असतात. त्यात उगाच आपली भर नको असं वाटतं मला.

मुका : परत व्हेग! चांगलं असंबद्ध बोलता. म्हणजे लग्न वगैरे झालं असणार! हॅहॅहॅ ! प्रेम विवाह की आडनाव, घराणं, पैसा, जमीन तपासून आई, वडील, काका, मामा लावून देतात तो प्रकार? चालू लग्न आहे का एक्स?

पा : काय फरक पडतो हो त्यानं? स्वतःच ओझं वाहत जोडीदाराचं सहन करायचं. ते सारखंच सगळीकडे. लग्न होणं न होणं दुय्यम आहे तरी लग्न चालूच राहणार.

मुका : तसं नाही, जरा सहजीवनातले किस्से बिस्से आले असते. पब्लिकला रॉंची आवडतं. उगाच जड मराठी बोलू नका. मग छापताना आमच्या व्याकरणाच्या चुका वगैरे होतात. व्हिडीओ ला सबटायटल गंडतात. दरवेळी ती डिक्शनरी बघून भाषा समजून घ्यावी लागते. सोपं करा सगळं.

पा : अहो, सोपं सोपं करत सगळं सपक झालंय. संपत आलं आहे. मजाच हरवली आहे.

मुका : असं? का हो, कसली मजा हवी आहे तुम्हाला? विरोधी पार्टीचे आहात का? चांगलं सहन न होणारे? सतत साली किरकिर !

पा : झालं! आणलंत राजकारण? अहो, एकुणात पार्टी टाळायचीच तर धडपड आहे. ना इकडचा ना तिकडचा असं मध्येच लटकायचं आहे. पण वास येतोच बोलण्याला. तुम्ही तर असताच वासावर. अनावश्यक ते सगळं तुम्ही प्रचारात आणता. विचारात घालता. मग सगळे एकसारखं इकडचं नाहीतर तिकडचं माहितीपर बोलत राहतात. सतत ती माहिती आणि राजकारण! गावोगाव बेगुमान दंडेली करणाऱ्या टोळ्या आणि त्यांचे म्होरके यांच्याच कहाण्या कानी कपाळी. खरंतर हे असलं राजकारण अगदीच असंबद्ध आहे जगण्यासाठी.

मुका : हो का? अहो, सरकार गरिबांना फुकट पैसे देतं आहे. अन्नधान्य वाटतं आहे. श्रीमंतांसाठी गुळगुळीत रस्ते बांधतं आहे. मोठाल्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. बाजार विविध वस्तूंनी भरलेला आहे. छंद, शौक पुरे करण्यासाठी अकलेपेक्षा जास्त पैसा मिळतो आहे. गावोगावी हास्यक्लब आहेत. कोणालाही कथा, कविता पाडता येते आहे. हागलं मुतलं सादर करायला समाज माध्यमं आहेत. घरच्या घरी खेळायला आणि पाहायला गेम आहेत. वाटेल ते फाॅरवर्ड करून पुढे राहता येतंय. काहीही जमलं नाही तर गेलाबाजार स्वतःची नागवी चित्रं डकवून पैसा मिळवता येतो आहे. काहीही विकता आणि विकत घेता

येणारा अहोरात्र खुला बाजार आहे. ग्राहक त्याचा राजा आहे. राजकारण्यांमुळेच तर सगळं कसं सोपं आहे. ऱ्हा ना पावरबरोबर! घुसा ना रॉंग साइड! अजून कसली मुक्ती पाहिजे? इथंच एवढा हेवन करतोय आपण, तरी काय दुखतंय? तुम्हाला सुख बोचतंय का? तुम्ही सुडो का फिडो इंटलेक्चुअल … नाही नाही. असूच शकत नाही. ते पण आमच्या सारखेच कट्टर असतात. तुमचं कळतंच नाही आं काही? हॅहॅहॅ!

पा : खरं म्हणजे मी अज्ञानी होतोच पण आताशा बिनडोक होतोय असं वाटतं. सुख बोचण्याचं म्हणालात तर ते एकापरीनं खरंच म्हणायला हवं. पण सगळीकडे एक अदृश्य भीती भरून राहिली आहे असं वाटतं खरं. भोगत असलेल्या सुखाच्या क्षणभंगुरतेची साक्ष देणारी भीती. सोपेपणानं घडणारं सारं बरं सोपेपणानं कोसळून पडतं आहे. मोठमोठी युद्धं आणि स्थलांतरं दुरून पाहत असताना आत पडझड होत राहते. पैसा सगळं गिळतो आहे. शहरांची जंगलं होत आहेत, जंगली श्वापदं गावात घुसत आहेत. गर्दीत हरवून…

मुका : बास बास बास! कळलं. काही नाही, तुम्ही नॅार्मल सायकिक आहात. एक काम करा. सोपं करा. सायकिॲट्रिस्टला भेटा. तुम्हाला कुठलातरी क्रायसिस झाला असेल किंवा एखादा सिंड्रोम बिंड्रोम! नाहीतर असं करा, एकदा टॅरो कार्ड वाचून घ्या किंवा मग पूर्वेकडच्या एखाद्या देशात जाऊन मज्जा करून या. मोकळ्ळे व्हा! हॅहॅहॅ! सेक्स डिलिवर्स बरंका! किंवा मग घरात थोडी वास्तुशास्त्रीय पाडापाडी करून बघा. नाहीतर बेश्ट म्हणजे एक फेक अकाउंट काढून कॉमेंटांच्या ओकाऱ्या काढा. बरं वाटेल. हॅहॅहॅ!

पा : धन्यवाद. मला माझी ओळख दिल्याबद्दल. मी एक स्वविचार गमावलेला निराधार व्यसनी मनोरुग्ण ग्राहक मात्र आहे असंच ना?

मुका : हॅहॅहॅ! स्वविचार? निराधार ? मनोरुग्ण! हॅहॅहॅ ! भारी बोलताय. कळत नाही काही पण लाइक्स येतील बहुतेक.

व्हायरलही होईल. मी चातुर्यानं कॉंट्रोवर्शियल व्हल्गॅरिटी टाकलीय बोलण्यात. हॅहॅहॅ. बाकी तुमच्या लक्षात आलं नसेल म्हणून सांगतो की तुम्ही केवळ माध्यम आहात आणि तुमच्या माध्यमातून पब्लिकला सांगतो की स्वविचार वगैरेची गरज नाहीये आता. कंप्लिट एआय वर शिफ्ट होतोय आपण. नो स्ट्रेस! फुल टू रिलॅक्स! विचार करू नका एन्जॉय करा.

पाहुणे, तुम्ही जाऊ शकता. एकदा का ही मुलाखत व्हायरल झाली की तुम्ही हात हलवत बाहेर फिरूच शकणार नाही. तेव्हा लवकर कटा. हॅहॅहॅ. तुम्ही निमित्तमात्र आहात हे लक्षातच ठेवा. कार्ड छापून घ्या हवंतर. चला, आता मला जप करू द्या.

पा : अहो पण माझं बोलणं अर्धवट राहिलं… अहो… अहो… ढकलू नका...

याला काहीच अर्थ नाही…

मुका : अर्थ? हॅहॅहॅ ! बक्कळ छपाई होते असल्या वायफळातनं. टाइमच तसा आहे. बाऽऽऽय! तर मित्रहो, जास्तीत जास्त लाइट कन्वरसेशनचा हा आमचा प्रयत्न कसा वाटला ते जरूर कळवा. आणि मी पुढचा बोलका पोपट पकडेस्तोवर

आमच्या चॅनेलला लाइक करा, सबस्क्राइब करा, फॅालो करा, मनावरचे ताण हलके होण्यासाठी आमचे स्पॅान्सर “पीस द योगा” यांच्या चॅनलला तेच करा आणि मिळवा आमचे दुसरे स्पॅान्सर गॅंजीज लॉजरीज् या ठेवणीतली उन्मादक आंतर्वस्त्रे तयार करणाऱ्या पूर्ण देशी ब्रॅंडकडून तीन महिन्यांच्या माइंड रिलॅक्संट गोळ्यांचा डोस मोफत!!

अहो ऽऽऽऽऽ अहो ऽऽऽ शुक...शुक …!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com