ख्रिसमसचे प्रकाशपर्व

लहानपणापासूनच पाश्चिमात्य देशांमध्ये क्रिसमस कसा साजरा केला जातो, हे बघण्याचे आकर्षण होते आणि लंडनचा ख्रिसमस अनुभवणं हा एक आनंददायी सोहळाच होता माझ्यासाठी.
Christmas
Christmassakal

- विशाखा बाग

लहानपणापासूनच पाश्चिमात्य देशांमध्ये क्रिसमस कसा साजरा केला जातो, हे बघण्याचे आकर्षण होते आणि लंडनचा ख्रिसमस अनुभवणं हा एक आनंददायी सोहळाच होता माझ्यासाठी. लंडनला आल्यानंतर पहिल्या वर्षी ख्रिसमस बघण्याचा जेवढा आनंद आणि ओढ मला होती तेवढीच यावर्षीसुद्धा अजूनही टिकून आहे. मला वाटतं यातच लंडनच्या ख्रिसमसचं गमक आहे.

बऱ्याच वर्षांपासून भारतासह जगातल्या अनेक देशांत ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. बहुतांशी पश्चिमेकडच्या देशात ख्रिश्चन धर्मीयांचा हा सण जीजस या त्यांच्या देवाचा जन्म सोहळा म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारतीयांसाठी दिवाळी हा सण जितका महत्त्वाचा, आनंद देणारा आहे आणि निकटवर्तीयांसह कुटुंबीयांना एकत्र आणणारा आहे तेच स्वरूप पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमसचे आहे. एकमेकांना शुभेच्छा आणि गिफ्ट देऊन ख्रिसमस साजरा करतात.

लहानपणापासूनच पाश्चिमात्य देशांमध्ये क्रिसमस कसा साजरा केला जातो, हे बघण्याचे आकर्षण होते आणि लंडनचा ख्रिसमस अनुभवणं हा एक आनंददायी सोहळाच होता माझ्यासाठी. लंडनला आल्यानंतर पहिल्या वर्षी ख्रिसमस बघण्याचा जेवढा आनंद आणि ओढ मला होती तेवढीच यावर्षीसुद्धा अजूनही टिकून आहे. मला वाटतं यातच लंडनच्या ख्रिसमसचं गमक आहे.

संपूर्ण जगभरातून आणि युनायटेड किंग्डममधल्याच अनेक वेगवेगळ्या गावातून आणि शहरातून लोक लंडनचा ख्रिसमस, त्यानिमित्त केलेले लायटिंग आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि ठिकाणं बघण्यासाठी गर्दी करतात. पाश्चिमात्य देशांमधल्या प्रत्येक लहान-मोठ्या गावांत ख्रिसमस हा तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो; पण लंडनचा ख्रिसमस बघण्याची आणि अनुभवण्याची ओढ ही प्रत्येकालाच असते. एकदा तरी आयुष्यात हा अनुभव घ्यावा, असंही बऱ्याच जणांना वाटतं.

खरंतर ख्रिसमस कसा साजरा करायचा, या प्लॅनिंगची सुरुवात ही हॅलोवीन या सणापासूनच सुरू होऊन जाते. हा सण साधारण आपल्या दिवाळीच्या सुमारास येतो आणि तेव्हापासूनच दुकानांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची रेलचेल व्हायला सुरुवात होते. लंडनच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरचे लाइटिंग हे साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतात.

पिकॅडली सर्कस, रिजंट स्ट्रीट, कारनाबाय स्ट्रीट, ऑक्सफर्ड सर्कस, ऑक्सफर्ड स्ट्रीट, बोर्ड स्ट्रीट हे सगळे महत्त्वाचे सेंट्रल लंडनमधले रस्ते वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक लाइटिंगने उजळून निघतात. दुपारी तीननंतरच आता इथे अंधार पडत असल्यामुळे तेव्हापासूनच लाइटिंग बघायला आणि वेगवेगळ्या आकर्षक दुकानांमध्ये ख्रिसमसची शॉपिंग करायला गर्दी होऊन जाते, ती अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत कायम असते.

सेंट्रल लंडनमधले वेगवेगळे डिपार्टमेंटल स्टोअर आणि ब्रँडेड वस्तूंची आणि कपड्यांची दुकानं ही ख्रिसमसच्या शॉपिंगसाठी नानाविध आकर्षक वस्तूंनी भरलेली तर असतातच; पण लोकांना आकर्षित करण्यासाठी बाहेरून आणि आतूनसुद्धा ख्रिसमसचे वेगवेगळे आकर्षक लाइटिंग लावून ती सजवली जातात. सेलफ्रिजेस, जॉन लुईस, हॅम्लीज, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, फोर्टनम अँड मेसन, हेरोड्स, लुई वितॉन, टिफनी अँड कंपनी अशा अनेक मोठ्या दुकानांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी असते.

ख्रिसमस आणि विंटर मार्केट ही अजून काही आकर्षक ठिकाणं, जिथे लहान मुलांनासुद्धा फिरायला आवडतं. हाईड पार्कमधील विंटर वंडरलँड आणि विंटर मार्केट, साउथ बँक विंटर मार्केट, कॉव्हेंट गार्डन, सेव्हनडायल्स, चेल्सी आणि बेलग्राविया स्ट्रीट, बॅटरीसिया पॉवर स्टेशन मार्केट, लीडन हॉल मार्केट, बर्लिन्टन ऑकेड अशी अनेक नामांकित ठिकाणं जिथे आवर्जून भेटी द्यायलाच हव्यात.

या ठिकाणी नानाविध वस्तूंची दुकानं असतात. त्याबरोबरच बुक स्टॉल्स, कॅफेज आणि स्थानिक युरोपियन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर उभे राहून थंडीत स्वाद घेणे ही एक वेगळीच मजा आहे. गरम चॉकलेटमध्ये बुडवलेली वेगवेगळी फळं, मार्शमेलोज, चॉकलेट पॅन केक, गरमागरम फिश आणि चिप्स, वेगवेगळे स्टफिंग असलेले हॉट डॉग आणि बर्गर, रंगीबेरंगी आणि अनोख्या चवीचे चीज, वेगवेगळे चॉकलेट्स, पुडिंग, खास ख्रिसमससाठी तयार करण्यात आलेले केक्स, बिस्किट्स आणि मल्ड वाइन असे असंख्य पदार्थ चाखण्यासाठी तरी इथे एकदा भेट द्यायलाच हवी. लंडन ब्रिज स्टेशनच्या मागे असलेले बरो मार्केट ही अशीच एक न चुकवता येण्यासारखी जागा. जगभरातल्या अनेक विविध खाद्यपदार्थांचे, चीजचे, फळांचे, मांसाहारी पदार्थांचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईनचे स्टॉल तुम्हाला इथे दिसतील.

लंडन येथील ख्रिसमसचे अजून एक आकर्षण म्हणजे मोठे उभे असलेले ख्रिसमस ट्री, त्यावरचे लायटिंग आणि त्याखाली असलेल्या आईस रिंक. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच ओपन आईस रिंक इथे सुरू होतात. ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतात. कुणीही येऊन इथे आईस स्केट घालून आईस स्केटिंग करू शकतात. कॅनरी वार्फ, ग्रीनिच, समरसेट हाऊस, सायन्स म्युझियम यांसारख्या अनेक ठिकाणी आईस स्केटिंग सुरू असते.

रिचमंड भागात असलेल्या ५०० एकर मध्ये पसरलेल्या क्यू गार्डनमध्ये ख्रिसमसचे लायटिंग बघण्यासाठी अवश्य भेट द्यायलाच हवी. इथे तिकीट काढून जावं लागतं, मात्र एक-दोन तासांत तुम्ही इथे जी ख्रिसमस लाइटिंग आणि लाईट म्युझिक अँड वॉटर शोचा अनुभव घेता, तो कुठेही मिळणार नाही. इथे अनेक ठिकाणी लेझर ऑब्जेक्ट लाइटिंगसुद्धा सुरू असतं. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे जण हे लेझर शो पाहण्यात मग्न असतात. खाण्या-पिण्याचे स्टॉल्स, सांताक्लॉजबरोबर फोटो काढणे अनेक गोष्टी तुम्ही इथे करू शकता.

ट्रॅफलगार स्क्वेअरमध्येसुद्धा ख्रिसमस ट्री उभा केला जातो. दरवर्षी नॉर्वेच्या पंतप्रधानांकडून हा ख्रिसमस ट्री भेट म्हणून लंडनला दिला जातो. वर्ल्ड वॉर टूमध्ये युनायटेड किंगडमने नॉर्वे या देशाला मदत केली होती, त्याबद्दलचाच आनंद म्हणून गेल्या ७६ वर्षांपासून हा ख्रिसमस ट्री नॉर्वेकडून पाठवला जातो. इथेसुद्धा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा दाखवला जातो. ख्रिसमस कॅरोल्स म्हणजेच ख्रिसमसची गाणी म्हटली जातात. ख्रिसमस मार्केटसुद्धा इथे सुरू असते. एकंदरीतच अत्यंत उत्साही आनंदाचे वातावरण इथे सगळीकडे आपल्याला बघायला मिळते.

चर्चमध्ये, कॅथेड्रॉलमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी ख्रिसमस कॅरोल या काळात म्हटले जातात. कॅथेड्रॉलमध्ये जाऊन क्रिसमस कॅरोल ऐकणे हा सुद्धा एक नवीन अनुभव असतो.

२४ डिसेंबरला अर्थात ख्रिसमसची पूर्वसंध्या साजरी केली जाते. कॅथलिक पंथीय लोक मध्यरात्री चर्चमध्ये जमून प्रार्थना करतात. ख्रिस्ताचा जन्म हा मध्यरात्री बारा वाजता झाला, असं समजलं जातं म्हणून ही प्रार्थना केली जाते. दुसरा दिवस म्हणजेच २५ डिसेंबर हा ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो.

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com