इटलीतील फॅशन नगरी

मिलान ही फॅशनची नगरी आहे. अनेक जगप्रसिद्ध फॅशनच्या कपड्यांचे, घड्याळांचे, पर्सेसचे आणि दागिन्यांची ब्रँड इथेच जन्माला आले आणि इथूनच जगभर पसरले.
Milan City
Milan Citysakal

- विशाखा बाग

मिलान ही फॅशनची नगरी आहे. अनेक जगप्रसिद्ध फॅशनच्या कपड्यांचे, घड्याळांचे, पर्सेसचे आणि दागिन्यांची ब्रँड इथेच जन्माला आले आणि इथूनच जगभर पसरले. मिलानला असे कितीतरी रस्ते, गल्ल्या, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे सर्व ठिकाण ब्रँडच्या दुकानांनी सजलेली आहेत. काय बघावे, काय नाही, किती घ्यावे असे असंख्य प्रश्न दुकाने बघत असताना मनात येतात.

मागच्या वर्षी जून महिन्यात मिलानला जाण्याचा योग आला. खरेतर इटलीला तशी याआधी एकदा धावती भेट दिली होती. फक्त रोम शहरात अगदीच एका दिवसासाठी गेले होते. त्यामुळे या भेटीत कमीत कमी वेळात इटली हा देश जेवढा जाणून घेता येईल, तेवढा घ्यावा असे ठरवले होते.

इटलीतले महत्त्वाचे आणि आर्थिक राजधानी असलेले मिलान शहर. आपण मिलान म्हणतो; पण इटालियन भाषेत या शब्दाचा उच्चार ‘मिलानो’ असा आहे. हे शहर तसे सुटसुटीत आहे. कोणत्याही युरोपियन मोठ्या शहरासारखेच पर्यटनासाठी योग्य असे शहर.

लोम्बार्डी या राज्यामध्ये मिलान वसले आहे. हे राज्य मुख्यतः तिथे पिकवल्या जाणाऱ्या भातासाठी आणि तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स आणि चीजसाठी प्रसिद्ध आहे. मिलानमध्ये फिरण्यासाठी दोन ते तीन दिवस पुरेसे आहेत; परंतु जर इथे वेगवेगळ्या वस्तूंची, फॅशनेबल कपड्यांची, निरनिराळ्या तऱ्हेच्या पर्सेसची, आकर्षक रंगाच्या आणि अनोख्या डिझाईनच्या हॅटची, अद्ययावत तंत्रज्ञान असलेली उंची घड्याळे, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने खरेदी करायची असेल तर मात्र तीन दिवससुद्धा पुरणार नाहीत.

मिलान ही फॅशनची नगरी आहे. अनेक जगप्रसिद्ध फॅशनच्या कपड्यांचे, घड्याळांचे, पर्सेसचे आणि दागिन्यांची ब्रँड इथेच जन्माला आले आणि इथूनच जगभर पसरले. मिलानला असे कितीतरी रस्ते, गल्ल्या, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे सर्व ठिकाण ब्रँडच्या दुकानांनी सजलेली आहेत. मिलानच्या अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या कॅथेड्रलच्याच बाजूला एक खूप मोठे आणि आकर्षक असे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, विटारियो इमॅन्युअल नावाचे.

या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बरोबर मध्ये एका बैलाचे म्युरल पेंटिंग आहे. त्यावर पाय ठेवून गोल फिरले की आपले नशीब फळफळते, असे म्हणतात. करून बघायला हरकत नाही; पण मी गेले तेव्हा मात्र तिथे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे या गोष्टीच्या फंदातच पडले नाही. तुम्ही मात्र गेले की मनोरंजन म्हणून करून बघायला हरकत नाही.

मिलानचे कॅथेड्रल हे गोथिक आर्किटेक्चरचा आणि वास्तुकलेचा एक अतिशय उत्तम नमुना आहे. त्या कॅथेड्रलच्या प्रचंड मोठ्या प्रांगणात गेल्यानंतरच ती भव्य आणि सुंदर कॅथेड्रलची वास्तू दिसते. अतिशय नाजूक आणि सुंदर कलाकुसरीने संपूर्ण कॅथेड्रल उभे केले आहे. पाहताक्षणी तुमच्या मनात ती भव्य वास्तू घर करून जाते.

कॅथेड्रलमधील चर्च तर आतून भव्य आहेच; परंतु चर्चच्या गच्चीवर मात्र आवर्जून जायला हवं. चर्चच्या मागच्या बाजूने लिफ्टने तुम्ही गच्चीवर जाऊ शकता. त्यासाठी मात्र वेगळे तिकीट काढावे लागते. गच्चीवर गेल्यानंतर तिथून मिलान शहराचे अप्रतिम दृश्य दिसते. त्याचबरोबर चर्चची गच्ची आणि वरच्या भिंती खूपच सुंदर, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि शिल्पाच्या कलाकृतींनी सजलेल्या आहेत.

३५०० च्या वर वेगवेगळे पुतळे, कलाकृती, प्राण्यांचे चेहरे आणि संतांचे पुतळे अशी बरीच शिल्पे तिथे आहेत. कॅथेड्रलमध्येच एक म्युझियम आणि लायब्ररीसुद्धा आहे.

नॅवीगली हा मिलानमधला एक रोमँटिक भाग. एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर किंवा अगदी नवरा-बायकोनेसुद्धा एखादी संध्याकाळ रोमँटिक पद्धतीने घालवायला ही एक रम्य जागा. पाण्याचा कालवा, त्यामधून जाणाऱ्या युरोपियन जुन्या पद्धतीच्या बोटी आणि दोन्ही बाजूला असलेले कॅफेज, रेस्टॉरंट्स, बार आणि मधूनच दिसणारे अँटिक शॉप, आर्ट स्टुडिओ आणि वेगवेगळ्या पद्धतीची दुकाने. या सर्व भागामध्ये केलेले वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग. नक्की जावेसे वाटते या भागात संध्याकाळ घालवायला. मला तरी खूपच छान आणि रोमँटिक वाटत होते.

मिलान शहर आहेच असे की तुम्हाला कुठेही थांबण्याची आणि बसण्याची इच्छा होईल. शहरात कुठेही फिरायचे असेल तर अर्थातच पर्यटकांसाठी तरी वाहतूक सेवा ही अतिशय उत्तमरीत्या चालणारी हवी. मिलानमध्ये बसेस, मेट्रो, ट्राम असे सर्व पर्याय मिळतात. मी तीन दिवसांचा पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास घेतला होता, ज्यामध्ये या सर्व वाहतूक सेवा उपलब्ध होत्या.

बसेस आणि जमिनीखालून जाणारी मेट्रो, याशिवाय रस्त्यावर चालणारी ट्राम इथे प्रसिद्ध आहे. १९२० पासून सुरू असलेल्या ऐतिहासिक, जुन्या लाकडी ट्राम अजूनही इथे सुरू आहेत. अशाच ट्राममधून फिरत जात असताना शहराच्या मध्यवर्ती भागात मला स्फोर्झेस्को कासल दिसला. मिलान शहराच्या मध्यवर्ती भागात हा कासल आणि बाजूचा विस्तीर्ण पार्क आहे. भव्य अशा या राजमहालात अनेक दालने आणि बागा आहेत.

पंधराव्या शतकात खरेतर हा किल्ला म्हणून बांधला गेला होता; परंतु त्यानंतर त्याचे राजाच्या महालात रूपांतर झाले. फ्रान्सच्या आक्रमणानंतर १८ व्या शतकामध्ये या महालाचंचे रूपांतर युद्ध कैदी बंदिवान करण्यासाठी करण्यात आले. आता या कासलमध्ये वेगवेगळे म्युझियम्स आणि एक्झिबिशन्स चालू असतात.

पोर्ट नुवा या भागातसुद्धा आवर्जून बघण्यासारख्या दोन उंच इमारती आहेत. शहराचा नवीन भाग असलेले हे ठिकाण वेगवेगळ्या ऑफिसेस आणि बागा यांनी वेढलेले आहे. अडीचशे फुटांपेक्षा उंच असलेल्या या दोन इमारती त्यावर असलेल्या झाडांसाठी खरेतर प्रसिद्ध आहेत. शहरीकरण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या इमारतींमध्ये २००० पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती आणि प्रजातींच्या वेली आणि झाडं चढवण्यात आलेली आहेत.

याशिवाय अनेक वेगवेगळे चर्चेस, म्युझियम्स, त्याचबरोबर शहरातून फिरण्याच्या सायकलवरच्या टूर्स आणि आजूबाजूच्या प्रदेशात नेऊन वायनरी दाखवणाऱ्या वाईन टूर्ससुद्धा आवर्जून करण्यासारखे पर्याय आहेत. युरोपमध्ये उन्हाळ्यात जायचे म्हटले तरी जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये शक्यतो जाण्याचे टाळावे.

कारण मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये मी गेले तेव्हा मिलानमध्ये प्रचंड ऊन होते. रणरणते ऊन आणि शहरांमध्ये असलेले वेगवेगळे कालवे यामुळे प्रचंड घाम मला सहन करावा लागला. तेव्हा शक्यतो मिलानला भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी खूपच चांगला आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com