सुखावणारी सार्वजनिक वाहतूक

लंडन हे शहर कधी आपलंसं करून घेतं, कळतच नाही. तुम्ही अगदी नवीन असाल किंवा आधीपासून राहत असाल तरीही प्रत्येकाला अजूनही येथे फिरायला मनापासून आवडतं.
Pleasant public transport
Pleasant public transportsakal

- विशाखा बाग

लंडन हे शहर कधी आपलंसं करून घेतं, कळतच नाही. तुम्ही अगदी नवीन असाल किंवा आधीपासून राहत असाल तरीही प्रत्येकाला अजूनही येथे फिरायला मनापासून आवडतं. कितीही फिरलं तरी थकवा येत नाही, मन भरत नाही आणि कंटाळासुद्द्धा येत नाही. लंडनमध्ये फिरायचं म्हटलं की जाणवत राहतो तो उत्साह, नावीन्य आणि वेगळेपण...

लंडनच्या प्रसिद्ध लाल बसमधून फिरताना आजूबाजूला दिसणाऱ्या विविध वास्तू बघत वेळ कसा जातो, ते कळतसुद्धा नाही. अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं, मोठमोठ्या बागा, त्यातले राजेशाही महाल किंवा अगदी संपूर्ण लंडनसह उपनगरांमध्ये पसरलेली हिंदू मंदिरं या कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर बस, ट्यूब आणि इतर सार्वजनिक वाहतुकीची साधनं अतिशय सोईस्कर आहेत. लंडनची प्रसिद्ध टीएफएल (ट्रान्सपोर्ट फॉर लंडन)ची सेवा अविरत मदतीला असते.

लंडन अंडरग्राउंड मेट्रो सेवा १० जानेवारी १८६३ ला सुरू झाली होती आणि पहिलं अंडरग्राउंड स्टेशन होतं बेकर्स स्ट्रीट. जगातील सर्वात पहिली आणि जुनी अशा दोन्ही प्रकारचा मान मिळवणारी ही मेट्रो सेवा आहे. मी लंडनमध्ये आल्यापासून म्हणजे चार-पाच वर्षांपासून या सेवेच्या प्रेमात आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) ही लंडन महापौरांच्या अंतर्गत येणारी सरकारी संस्था आहे.

त्याअंतर्गत संपूर्ण लंडन आणि त्या बाजूच्या उपनगरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा चालतात. यामध्ये लंडन अंडरग्राउंड, लंडन ओव्हर ग्राउंड, एलिझाबेथ लाइन, बसेस, डॉकलॅंड रेल्वे, लंडन ट्राम आणि रिव्हर सर्विसेस अंतर्भूत आहे. या सेवांद्वारे लंडनमध्ये जवळपास ५० ते ६० लाख लोक दररोज प्रवास करत असतात.

वर्किंग क्लासपासून ते अप्पर मिडल क्लासपर्यंत आणि शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी सीनियर सिटीझनपर्यंत सर्वजण या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये दिसतात. लंडन अंडरग्राउंड ट्यूब ही ४०२ किलोमीटरमध्ये पसरलेली आणि ११ लाइन्स असलेली आणि २७२ स्टेशन्समध्ये विभागलेली सेवा आहे. दोन ते तीन मिनिटाला ट्यूब येत असल्यामुळे, जास्त गर्दीसुद्धा नसते.

वेस्टमिनिस्टर, विक्टोरिया, ग्रीन पार्क, वॉटरलू, बॅटर्सिया यांसारखी अनेक मोठी आणि भव्य ट्यूब स्टेशन्स आहेत. या स्टेशनमधून जमिनीच्या जवळपास दोन ते तीन मजल्यांच्या खाली खोल ट्यूबचे प्लॅटफॉर्म्स आहेत. जमिनीखाली दोन-तीन मजल्यांच्या खोलीवर असलेल्या गोलाकार बोगद्यांमधून ही रेल्वे जात असते म्हणून याला ‘ट्यूब’ म्हणतात.

प्रत्येक स्टेशनवर काहीही मदत लागली तरी ‘टीएफएल’ची माणसं तिथे उपलब्ध असतात. अगदी तिकीट काढण्यापासून म्हणजेच ऑईस्टर कार्ड रिचार्ज करण्यापासून ते कोणत्या ट्यूबने, कुठपर्यंत, कसं जायचं हेसुद्धा सगळं ते नवीन माणसांना समजावून सांगतात.

ट्यूबमध्ये किंवा बसमध्ये व्यवस्थित मॅप दिलेला असतो. पुढचे येणारे स्टेशन, स्टॉप, बस कुठपर्यंत चालली आहे हे सर्व व्यवस्थित दिलेले असते. जगातल्या अनेक प्रसिद्ध शहरांतील सार्वजनिक बस सेवा किंवा मेट्रोमध्ये असं कुठेही व्यवस्थितरीत्या दाखवलं गेलं नाही.

बहुतांशी पर्यटक आणि लोक हीथ्रो एअरपोर्टवरच येतात. तिथे उतरल्यानंतर टर्मिनलमधून कुठेही बाहेर न निघता लंडन अंडरग्राउंड ट्यूबने माफक दरात सेंट्रल लंडनला पोहोचता येतं. यासाठी लागणारं ऑईस्टर हे कार्डसुद्धा एअरपोर्टच्या खाली स्टेशनवर मिळतं. एअरपोर्टच्या बाहेर न येता सेंट्रल लंडनला जाता येतं.

लंडन सोडलं तर जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आहे. त्यासाठी लागणारी त्यांची तिकिटाची पद्धतसुद्धा सोपी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण न्यूयॉर्क, पॅरिस, मिलान किंवा बर्लिन अशी युरोपमधली किंवा अमेरिकेतल्या मोठ्या शहरांमध्येसुद्धा त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अजिबात एकवाक्यता नाही.

या सर्व शहरांमध्ये तुम्हाला बस, मेट्रो यांसारख्या वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळी तिकिटं काढावी लागतात. सिटी बसमध्ये चढल्यानंतर बँक कार्ड वापरून तिकीट काढता येत नाही. बसमध्ये चढल्यावर तिकीट काढायचं असेल तर त्यासाठी त्या देशाचं चलन वापरून एक्झॅक्टली तेवढेच पैसे देऊन तिकीट काढता येतं. जगातल्या अनेक प्रगत देशांमधल्या प्रसिद्ध शहरांमध्ये अजूनसुद्धा ही परिस्थिती आहे.

लंडनची आयकॉनिक लाल बससुद्धा लंडनमध्ये फिरण्यासाठी खूपच सोयीस्कर आहे. फक्त १८० रुपयांमध्ये एक तासात जेवढे पाहिजे तेवढे आपण फिरू शकतो. त्या एक तासात चार बस बदलल्या तरीही चालतात. वरच्या मजल्यावर बसमध्ये बसून लंडनचा बकिंगहम पॅलेस, ऑक्सफर्ड स्ट्रीट, सोहो, सेंट पॉल्स कॅथेड्रल, टॉवर ब्रिज, लंडन ब्रिज, हाईड पार्क, ग्रीन पार्क, रिजेंट स्ट्रीट, केसिंगटन पॅलेस, थेम्स नदी आणि अगदी कितीतरी अगणित ठिकाणं आणि गोष्टी अगदी डोळे भरून बघू शकतो.

कोणत्याही ट्यूब स्टेशनवरून आपण बाहेर पडलो की लगेचच बाहेर समोर बस स्टॉप असतो आणि तिथून इच्छितस्थळी जाता येतं. रूट किंवा बस नंबर ९, ११ आणि २४ हे लंडनमधील सिनीक बसरूट म्हणून ओळखले जातात. या तिन्ही बसमधून तुम्ही फिरलात तर बऱ्यापैकी सगळंच लंडन बघून होतं. खुद्द लंडनमधली बरीच लोकं कंटाळा आला तरीसुद्धा एक तिकीट काढून बसने लंडनभर एक चक्कर मारून येतात. फक्त वरच्या मजल्यावरची समोरची सीट मिळाली पाहिजे!

थेम्स नदीवरील बोटीवरून एकदातरी एक चक्कर मारलीच पाहिजे. बोटीमधूनसुद्धा तुम्हाला लंडनची स्कायलाईन, अनोख्या उंच बिल्डिंग आणि कलाकुसर असलेले मोठे ब्रिजेस हे सगळं खूप छान दिसतं. लंडनला आल्यानंतर इथे स्वस्तात फिरायचं असेल तर लंडनच्या या नावाजलेल्या शहरी वाहतूक सेवेचा नक्की अनुभव घ्या.

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com