‘क्रूज व्हेकेशन’ची अद्‍भुत सफर

अथांग समुद्रात क्रूजवरून फिरण्यासारखी मजा नाही. क्रूज व्हेकेशन करणं जणू सगळ्यांचंच स्वप्न असतं. इंग्लंडमध्ये असल्यामुळे मलाही त्याचे वेध लागले होते.
wonderful cruise vacation
wonderful cruise vacationsakal

- विशाखा बाग

अथांग समुद्रात क्रूजवरून फिरण्यासारखी मजा नाही. क्रूज व्हेकेशन करणं जणू सगळ्यांचंच स्वप्न असतं. इंग्लंडमध्ये असल्यामुळे मलाही त्याचे वेध लागले होते. मग सुट्टी आणि खर्च यांचा ताळमेळ बांधत मी सात दिवसांची क्रूज बुक करून जीवाचं इंग्लंड केलं... दुसरीकडे आपल्याकडे २०२४ मध्येही एकही मोठं क्रूज शिप येत नाही याची खंत वाटली...

आज आपण सगळे जाणार आहोत क्रूजवरून फिरायला. मला वाटतं, सगळ्यांचंच ड्रीम व्हेकेशन हे क्रूज व्हेकेशन असतं. लहानपणापासून प्रत्येकालाच आपल्या गावातील नदीत किंवा तलावात छोट्या होडीमधून किंवा बोटीमधून फिरण्याचं खूप कुतूहल अन् हौसही असते.

अगदी भारतातसुद्धा आपण कोणत्याही पर्यटनस्थळी सुट्टीवर गेलो की तिथेसुद्धा बोटीमधून किंवा होडीमधून फिरण्याचा आनंद घेतोच. अगदी त्याप्रमाणे मलाही सध्या इंग्लंडमध्ये राहत असल्यामुळे क्रूज व्हेकेशनचे वेध लागले होते. तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या क्रूजच्या जाहिराती बघून तर मन अजूनच चाळवलं जात होतं.

असंख्य वेगवेगळ्या क्रूज, असंख्य पर्यटनस्थळं आणि विविध गावं. कुठे जायचं आणि कुठे नाही हा विचार करूनच मनावर दडपण येतं. अर्थातच मिळणारी सुट्टी आणि होणारा खर्च याचा विचार सर्वात आधी असतो; तरीही या जगात अजून कितीतरी ठिकाणं आणि प्रदेश जे अद्‍भुत निसर्गसौंदर्यांनी अन् अनोख्या संस्कृतींनी समृद्ध आहेत ती सर्वच ठिकाणं, गावं बघण्याची उत्सुकता आणि ओढ आहे. हीच उत्सुकता मला शांत बसू देत नाही.

त्यामधूनच मग मी रॉयल कॅरेबियन या कंपनीची सात दिवसांची इंग्लंडहून नॉर्वेला जाण्याची क्रूज बुक केली. युरोपियन देशांमध्ये क्रूज व्हेकेशन हे प्रगत टप्प्यात आहे. दर वर्षी जवळजवळ ५० लाख पर्यटक या क्रूज व्हेकेशनने पर्यटन करत असतात. क्रूज व्हेकेशनमध्ये उत्तर अमेरिकेपाठोपाठ युरोपचा दुसरा क्रमांक आहे.

१५ ते २० डेकची प्रचंड मोठी पॅसेंजर क्रूज म्हणजेच पर्यटनासाठी असणारे जहाज जेव्हा एखाद्या पोर्टवरून म्हणजेच धक्क्यावरून निघते, तेव्हा त्या पोर्टवर असणाऱ्या सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चरची ती एक परीक्षाच असते. साधारण कमीत कमी तीन हजार ते जास्तीत जास्त दहा हजारपर्यंत पर्यटक घेऊन जाणाऱ्या या क्रूज शिपसाठी लागणारं पोर्ट (समुद्री धक्का)सुद्धा अतिशय सुसज्ज लागतं. हे जहाज, एक छोटं गावच आपल्या पाठीवर घेऊन समुद्रात फिरत असतं.

पोर्ट असणाऱ्या गावाची अर्थव्यवस्थासुद्धा बऱ्याचअंशी या क्रूज शिपवर अवलंबून असते. प्रचंड, भव्यदिव्य अशा एक लाख ६८ हजार टन वजन असणाऱ्या या क्रूजला किनाऱ्यावर लागण्यासाठीसुद्धा समुद्राची खोली, पोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर, पर्यटकांसाठी असणाऱ्या सुविधा हे सर्व लक्षात घ्यावं लागतं.

इंग्लंड आणि युरोपमध्ये अशी अनेक गावं पोर्ट म्हणून सुसज्ज करण्यात आलेली आहेत आणि त्यामधूनच रिव्हर क्रूज आणि सी क्रूज पर्यटकांना ने-आण करत असतात. अर्थव्यवस्थेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात चलन-वलनसुद्धा या गावांमध्ये दिसून येतं. पोर्टजवळ असणाऱ्या गावाचं अर्थकारण बऱ्याच अंशी या क्रूजवरच अवलंबून असतं.

भारतालासुद्धा प्रचंड मोठा म्हणजेच जवळपास सहा हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभूनसुद्धा आपल्याकडे अजूनही अनेक विविध कारणांमुळे एकही पोर्ट किंवा समुद्र धक्का आपण एवढ्या मोठ्या पॅसेंजर क्रूजसाठी निर्माण करू शकलो नाही. आपल्याकडे अगदी २०२४ मध्येसुद्धा एकही मोठं आणि जगभरातील नामांकित असं क्रूज शिप येत नाही. या गोष्टीने आणि विचाराने प्रचंड निराशा होत असते.

‘एंथम ऑफ सीज’ या रॉयल कॅरेबियन कंपनीच्या क्रूजने आम्ही साऊथ हेम्पटन या गावामधून नॉर्वेला जाण्यासाठी निघालो. १६ डेक असलेल्या आमच्या क्रूजवर जवळपास साडेपाच हजार पर्यटक होते. त्यामध्ये चार हजार पर्यटक आणि दीड हजार क्रू मेंबर्स होते. या क्रू मेंबर्समध्ये अगदी पोर्ट बॉयपासून ते जहाजाच्या कॅप्टनपर्यंत सर्व जण येतात.

महत्त्वाची आणि आमच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या क्रू मेंबर्समध्ये जवळपास २५ टक्के लोक भारतीय होते आणि मेन शेफ हासुद्धा मुंबईचा होता. त्यामुळेच सातही दिवस आम्हाला अनेक देशांच्या कॉन्टिनेन्टल खाण्याबरोबरच भारतीय पदार्थही खायला मिळत होते.

क्रूजच्या पहिल्या दिवशी मनात प्रचंड उत्सुकता आणि एक सुखद जाणीवसुद्धा होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्रूजमध्ये जाणार म्हणून एक दडपणही होतं की समुद्रामध्ये कोणतंही अघटित होऊ नये, अशा अनेक विचारांची मनात सरमिसळ होऊनही आम्ही क्रूजवर इमिग्रेशनसाठी येऊन पोहोचलो. एअरपोर्टसारखेच इथेसुद्धा इमिग्रेशन होतं. आपल्याला पासपोर्ट दाखवावा लागतो आणि योग्य तो व्हिसा आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं.

या क्रूजवर जाण्यासाठी आम्हाला युरोपियन देशांचा शेंजेन व्हिसा लागला होता. इंग्लंडमधून निघाल्यानंतर या क्रूजसाठी पहिलं पोर्ट लागतं ते नॉर्वेमध्येच. म्हणजे नॉर्वेपर्यंत क्रूज मध्ये कुठेही थांबत नाही; तरीसुद्धा फक्त इंग्लंड आणि नॉर्वेचा व्हिसा आपल्याला लागत नाही; तर संपूर्ण युरोपियन कंट्रीचा शेंजेन व्हिसा आपल्याला लागतो. कारण, आपण युरोपियन वॉटर्समधून म्हणजेच इंग्लिश चॅनल आणि नॉर्थ सीमधून जात असतो. ही एक संपूर्ण नवीन माहिती आम्हाला या प्रवासात समजली.

इमिग्रेशन झाल्यानंतर चौथ्या डेकवरून आपण क्रूजमध्ये शिरतो आणि आत गेल्या गेल्या प्रचंड मोठी सुसज्ज आकर्षक अन् अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त बोट तुम्हाला दिसते. काय बघू आणि किती बघू, असं मला पहिल्या दहा मिनिटांत झालं होतं. संपूर्ण १६ डेकची क्रूज बघण्यासाठी सात दिवससुद्धा कमी पडतील, असं वाटत होतं आणि तसं झालंसुद्धा. चौथ्या डेकपासून ते सोळाव्या डेकपर्यंत पर्यटकांसाठी अनेक प्रकारची आकर्षणं तयार करून ठेवली आहेत.

त्यामध्ये दुकान, रेस्टॉरंट, मोठ्या शोरूम, गेम झोन, कॅसिनो, चार मोठे जवळजवळ दीड हजार पर्यटक बसू शकतील, असे म्युझिकल थिएटर, स्पोर्टस् सेंटर, ऑर्केस्ट्रा स्टेज, दोन प्रचंड मोठ्या डायनिंग रूम, स्वीमिंग पूल, जाकुझी, जिम, योगा आणि स्पा सेंटर, जॉगिंग ट्रॅक, ओपन डेक, बास्केटबॉल स्टेडियम, टेबल टेनिस सेंटर, रॉक क्लाइंबिंग वॉल, सी सर्फिंग सिम्युलेटर या आणि अशा असंख्य सुविधा पर्यटकांना गुंतवून ठेवण्यासाठी केलेल्या आहेत.

आपली ‘एंथम ऑफ सीज’ जहाजाची सफर पुढील भागातही सुरू राहणार आहे. या सात दिवसांत जहाजातील आकर्षणांची मौजमजा घेतल्यापासून ते नॉर्वेमध्ये कुठे कुठे या जहाजाने आम्हाला फिरवलं हे सर्व बघूया, येणाऱ्या पुढच्या भागात.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com