स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना...

स्वतःला स्वतःविरु उभं करण्याची कृती काही एका क्षणात होणारी नाही. तो प्रवास आहे, क्षणोक्षणी स्वतःला सत्याच्या, न्यायाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी प्रवृत्त करणारा.
Justice
JusticeSakal
Updated on

- विशाखा विश्वनाथ

स्वतःला स्वतःविरु उभं करण्याची कृती काही एका क्षणात होणारी नाही. तो प्रवास आहे, क्षणोक्षणी स्वतःला सत्याच्या, न्यायाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी प्रवृत्त करणारा. भानात आणणारा आणि म्हणूनच ही कृती कायम चालू वर्तमानकाळात घडत राहणारी आहे. ती भूतकाळ नाही आणि पूर्ण वर्तमानकाळही आहे.

आपण आरशासमोर उभं राहतो, पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहतो, या आणि अशा अनेक कृतींतून आपण स्वतःसमोर येत राहतो. असं असलं तरीसुद्धा या समोर येण्यात स्वतःला सामोरं जाणं क्वचितच असतं. आपल्या विरोधात बोललं जातं तेव्हा, आपल्या चुका सांगितल्या जातात तेव्हाही आपण आपली पाठराखणच अधिक करतो. आपल्याविषयी बरं बोललं जात नसेल तर समोरच्याचं बोलणं साधं ऐकून घेण्याचं धैर्यही आपल्यात नसतं. आपली बाजू घेणारीच माणसं जिथे असतील तिथे आपण जातो, रमतो. स्वतःला सामोरे जाण्याचे प्रसंग वारंवार टाळत राहतो. म्हणून स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करणं ही जाणीवपूर्वक करावी लागणारी कृती आहे, असं मला कायम वाटतं.

माझ्या या वाटण्याला दुजोरा देणारा एक प्रसंग अगदी परवाच घडला. एका मुलाखतीदरम्यान मला प्रश्न विचारला, तू स्वतःला स्वतःसोबत उभं करतेस तेव्हा तुला स्वतःला काय सांगावं वाटतं? माझ्या कवितासंग्रहाचं नाव ‘स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना’ हे असून मुलाखतकाराने उपरोक्त प्रश्न विचारला, तोच मुळात विरुद्ध उभं करणं आणि सोबत उभं करणं यातला मूळ फरक लक्षात घेऊनच.

त्याचे उत्तर क्षणार्धात द्यायचं होतं. मी उत्तर दिलं होतं, ‘मला मी आवडते.’ मी तेव्हा हे उत्तर का दिलं, हा नवा प्रश्न तेव्हापासून माझा पिच्छा पुरवतो आहे. ‘स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना’ हे कवितासंग्रहाचं नाव का, हा प्रश्न इतरांना पडतो तसाच मलाही अगदी नव्याने पडला आहे.

या दोघांच्या उत्तराचा शोध घेताना एक गमतीशीर प्रश्न आणि त्याचं दिलासा देणारं उत्तरही सापडलं. या उत्तराने धीरही दिला. हे धीर देणारं उत्तर होतं, ‘वेळ लागतो; पण स्वतःत समजुतीचा स्वर जन्माला येतो.’ या दोन मीच लिहिलेल्या कवितेच्या ओळींमध्ये मन, दोलायमान होत राहिलं; पण स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्याची कृती जाणीवपूर्वकच करावी लागते, हे मात्र नव्याने पटत गेलं. जिथे स्वसंवाद आहे, स्वतःशी घातलेला वाद आहे, स्वतःपाशी येऊन विसावणं आहे,

तिथे तिथे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करणं आहे. स्वतःला स्वतःसोबत उभं करताना आणि स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या दोन्ही कृती स्वतःपुरत्या मर्यादित असल्या तरी सोबत करताना स्वतःसाठी वाहिलेले सहानुभूतीचे पाट स्वतःची पुरती वाट लावतात. उलटपक्षी स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना माणूस अधिक काटक होत जातो.

स्वतःकडे वेगवेळ्या कोनातून पाहू लागतो. विशेष म्हणजे हे तो बळजबरी वा कुणाच्याच दबावाला बळी न पडता, आत्मपरीक्षणाच्या तटस्थ कृतीतून करत असतो. स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करणं म्हणजे आत्मसंघर्षाचा वणवा स्वतःत पेटवून घेणं असं नव्हे, उलट स्वतःच्या प्रत्येक कृतीचा, बोलण्याचा तार्किक विचार करणं. स्वतःची बाजू घेणं थांबून, स्वीकाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणं. आपल्या माणसातले आपण, जगरहाटीतले आपण, स्वतःजवळचे आपण या सगळ्या स्वप्रतिमांकडे डोळसपणे पाहणं.

घरातले संस्कार घेऊन जेव्हा आपण समाजात वावरू लागतो तेव्हा क्षणोक्षणी आपण स्वतःला स्वतःविरुद्धच उभं करत असतो. जगात वावरताना मूळचे भावनिक असणारे आपण, हळवे होऊ लागतो तेव्हा, व्यवहार वागण्यात मुरवण्यावाचून पर्याय नाही हे देखील हळूहळू आकळू लागतं आणि पुन्हा स्वतःविरुद्ध उभं राहणं सुरू होतं. स्वतःला सोबत करताना हितगुज आणि स्वतःविरुद्ध उभं राहताना चिंतन होते.

हे अधिक समजून घ्यायचं झालं तर नात्यांचं उदाहरण घेता येईल. मावशी आणि आई या दोघी आपल्यावर माया करतात, आपल्याला जीव लावतात आणि वळणही लावत असतातच; पण या दोघींच्या वळण लावण्यात जो फरक आहे तोच स्वतःला स्वतःसोबत आणि विरुद्ध उभं करण्यातला फरक. मावशी कधीतरी भेटते म्हणून तिच्या प्रत्येक शब्दांत माया अधिक असते, आपणही तिच्याकडे अधिक लाडिकपणेच अघळपघळ बोलतो.

आईने डोळे वटारले की मावशी आपल्या वतीनेच आईला परस्पर काळजीभरल्या स्वरात नको गं म्हणत असते. आई माया करताना ही कठोरतेची झूल कित्येकदा पांघरून घेते. चूक-बरोबर यातला फरक शिकवते, चांगलं-वाईट याची जाण करून देते. नियमांत सूट देते तशी धाकातही ठेवते.

म्हणूनच स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करणं म्हणजे स्वतःची आई होणं. स्वतःला विश्वासात घेऊन चांगलं-वाईट याची जाण करून देणं. कारण घराबाहेर वावरताना प्रत्येक वेळी आपल्यासोबत आई येतेच असं नाही. तेव्हा आईपणाच्या मायेनं, समजुतीनं स्वतःकडे साक्षीभावाने पाहायचं असेल तर स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्यावाचून पर्याय नाही.

स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्याची ही कृती काही एका क्षणात होणारी नाही. तो प्रवास आहे, क्षणोक्षणी स्वतःला सत्याच्या, न्यायाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी प्रवृत्त करणारा. भानात आणणारा आणि म्हणूनच ही कृती कायम चालू वर्तमानकाळात घडत राहणारी आहे. ती भूतकाळ नाही आणि पूर्ण वर्तमानकाळही आहे.

जसं प्रेमात प्रियकर आणि प्रेयसी एकदा निवडली जाते आणि संसारात मात्र रोज एकमेकांना निवडावं लागतं, अगदी तसंच स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करतानाही करावं लागतं. निकडीने, नेटाने आणि निश्चयाने, हे जमतं तेव्हा कुठे स्वतःत समजुतीचे स्वर जन्माला येतात आणि अर्थात संयमही हळूहळू आपल्यात रुजू लागतो.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath11@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.