येळवस

मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत एक अनोखा सण साजरा केला जातो. ‘येळवस’ त्याचं नाव.
yelvas festival celebration
yelvas festival celebrationsakal

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत एक अनोखा सण साजरा केला जातो. ‘येळवस’ त्याचं नाव. काळ्या आईविषयी ऋण व्यक्त करून माणुसकीचं दर्शन घडवणारा हा एक महत्त्वाचा सण. ‘येळवस’ हे ‘वेळ अमावस्ये’चं हे लघुरूप.

या सणाच्या निमित्तानं सर्व कुटुंब शेतात पूजा वगैरे करून रानजेवण करतात. शेताजवळून जाणाऱ्या कुणाही वाटसरूला मोठ्या सन्मानानं जेवू घालतात. आजवर पोटाची भूक भागवलेल्या काळ्या मातीची व शेताची पूजा करून भुकेलेल्या माणसांना पोटभर जेवू घालून माणुसकी जपण्याची ही परंपरा लातूरसह धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबात आजही सुरू आहे. मी अनुभवलेल्या अशाच एका येळवसची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे...

माझे ज्येष्ठ मित्र प्रा. विष्णू उतके सरांनी दिलेलं येळवसचं आमंत्रण अमलात आणण्यासाठी औसा तालुक्यातल्या तांबरवाडीच्या शिवारात मी मित्रांसह सकाळी लवकरच पोहोचलो. सरांनी आमची बडदास्त एखाद्या व्हीआयपीपेक्षाही चांगली राखली. लातूर ते तांबरवाडी या प्रवासादरम्यान अनेकानेक टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर शहराकडून शेताकडे जाताना दिसल्या.

दर्शवेळा अमावास्या हा लातूरचा वर्षातला प्रमुख सण असतो म्हणूनच वेळ अमावास्येच्या दिवशी जर लातूर कधी हेलिकॉप्टरमधून पाहिलं तर वारुळातून मुंग्या बाहेर पडल्यासारख्या गाड्या व माणसं गावाकडे जाताना दिसतील. इथला प्रत्येक माणूस येळवसचं महत्त्व विलासराव देशमुख यांचा किस्सा सांगूनच पूर्ण करतो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख वेळात वेळ काढून येळवसच्या दिवशी मात्र बाभळगावात यायचेच असं स्थानिक लोक सांगतात.

कुणी बैलगाडीतून तर कुणी डोक्यावर ठेवलेल्या मडक्यात आंबील घेऊन रानवाटेवरून चाललेलं पाहून मातीशी माणुसकी जोडणारी एक जुनी संस्कृती पाहून धन्य झालो. ठेप्यावर पोहोचलो. आणलेले सर्व नैवेद्य एका कोपीत ठेवून पूजा केली आणि नंतर संपूर्ण शेतात आंबील शिंपडत ‘हुलगे हुलगे-पावन पुलगे’, ‘होलग्या होलग्या-सालन पलग्या’, ‘हर हर महादेव’ असं म्हणत म्हणत कोपीला प्रदक्षिणा घालून मग जेवणासाठी एका झाडाखाली बसलो.

गप्पाटप्पा मारत आंबील, आंबट भात, भजी, खीर, कोंदीची भाकरी, बाजरीच्या भाकरी, पिठाच्या वड्या, वांग्याचं भरीत आणि उंडे असा दशपक्वान्नी आहार खाऊन तृप्त झालो. जेवणानंतर शिवारात फिरायला गेल्यावर ओढ्याच्या आळवनात मधाची दोन पोळी आढळली. रानातला शुद्ध मध खाऊन झाडाच्या गार सावलीत वामकुक्षी घेतली. यथेच्छ आहार, विहार आणि आरामानंतर सरांच्या कुटुंबीयांचा जिव्हाळा व प्रेम बरोबर घेऊन सायंकाळी उशिरा माझ्या गावाकडं - पांगरीकडं प्रयाण केलं.

गाडीत बसून प्रवासादरम्यान मी विचार करू लागलो... हल्ली माणूस एवढा व्यग्र होत चाललाय की हॉटेलमधलं जेवणसुद्धा तिथं जाऊन करण्याऐवजी तो घरी मागवून खायलाय. फूड डिलिव्हरीच्या अनेक कंपन्यांनी शहरात बस्तान बसवलंय. आपल्या खाद्यसंस्कृतीचा संबंध आपल्या आचारविचारांशी असतो, आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी असतो; पण हल्ली मोबाईलमधली ॲप्स जशी अपडेट होत आहेत तितक्याच जलद गतीनं हॉटेलात नवनवीन पदार्थांची मिश्रणंही तयार होत आहेत. पोटासाठी काय चांगलं यापेक्षा जिभेला जे रुचेल अन् डोळ्यांना जे भावेल त्यावरच आवडी-निवडी ठरायल्यात!

मग यात येळवससारखे सण आम्हाला आपली खाद्यसंस्कृती समजून सांगतात. वारसा जपण्यासाठीचं अन् तो पुढं चालवण्यासाठीचं कारण ठरतात. येळवस तर फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं; पण आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांत असे अनेक सण साजरे होत असतात. फास्ट फूडच्या जमान्यात आपण ते जेवढ्या फास्ट विसरत चाललो आहोत त्याच्याही पेक्षा सुपरफास्ट गरज सणासुदीनिमित्त घरात तयार होणाऱ्या पदार्थांची आपल्या निरोगी आरोग्यासाठी असते हे ध्यानात असू द्या.

येळवसच्या निमित्तानं शेतात गेलेले सगळे शेतकरी शेतावरून जाणाऱ्या कुण्याही अनोळखी माणसाला पोटभर जेवू घालूनच पाठवतात. ‘अतिथि देवो भव:’ ही संकल्पना अंगी मुरवलेली, समृद्ध जीवन जगण्याची त्यांची परंपराच भारी असते. मराठवाड्याच्या या परंपरेला माणुसकीचा पाया आहे.

चार भिंतींत स्वतःला बंदिस्त करून घेऊन आभासी आयुष्य जगणाऱ्या नव्या पिढीला रस्त्यानं जाणाऱ्या भुकेलेल्या वाटसराला जेवू घालायला आता वेळ नाही. शहरातल्या सोसायटीच्या गेटवरच बंदुका घेऊन गार्ड उभे आहेत...बंगल्यासमोर कुत्री बांधलेली आहेत...अशातही येळवससारखे सण आम्हाला माणुसकीची गोष्ट शिकवतात म्हणूनच या परंपरा जपल्या पाहिजेत. पैसा तर सर्वच जण कमावतात; पण माणुसकी कमावण्यासाठी माणसांतच जावं लागतं, राहावं लागतं हेही तितकंच खरं.

पोटात भरलेल्या येळवसच्या जेवणानं मेंदूला शब्दांचा भंडारा लावलाय तेव्हाच हे शब्द इथं अवतरलेत. तुम्हालाही शहरात बसून या लोकसंस्कृतीचा ठेवा अनुभवता यावा याचसाठी हा शब्दप्रपंच.

माणसाच्या हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग पोटावाटे जात असतो. उद्या आपल्या दारात आलेल्या भुकेलेल्या माणसाला, प्राण्यांना आणि पक्षांना अन्न देणं हीच आपली संस्कृती आहे. हे टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, इतकंच.

(सदराच्या नावाविषयी : धसुडी म्हणजे छोटीशीच गोष्ट; पण खूप सलणारी.)

(लेखक हे पीकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आणि व्याख्याते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com