विश्वामित्र आणि त्यांचे पुत्र

विश्वामित्र नव्या देवांची निर्मिती करण्यास सुरुवात करतात, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील लेखात पाहिला. त्यांच्या या कृतीनं ऋषी आणि देव भयभीत झाले.
Vishwamitra and his sons
Vishwamitra and his sonssakal

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

विश्वामित्र नव्या देवांची निर्मिती करण्यास सुरुवात करतात, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील लेखात पाहिला. त्यांच्या या कृतीनं ऋषी आणि देव भयभीत झाले. त्यांनी विश्वामित्रांना तसं न करण्याची कळकळीची विनंती केली.

‘कुटुंबाच्या पुरोहितानंच शाप दिला असल्यानं हा राजा कलंकित झालेला आहे. (तुमच्या लक्षात असेल, वसिष्ठांनी त्रिशंकूला शाप दिला होता.) स्वर्गामध्ये सदेह प्रवेश करण्याची त्याची पात्रता नाही.’ त्यांचे हे शब्द ऐकून कौशिक (विश्वामित्रांचे मूळ नाव) म्हणाले, ‘‘सदेह स्वर्गात पाठवीन असं वचन मी राजा त्रिशंकूला दिलंय. ते कदापि असत्य ठरू शकणार नाही.

त्रिशंकूला त्याच्या शरीरासह अनंतकाळपर्यंत स्वर्गाचा उपभोग घेऊ द्या. मी निर्माण केलेले नक्षत्रही आहे तेथेच असू द्या. जोपर्यंत हे विश्‍व अस्तित्वात असेल, तोपर्यंत सर्व काही आहे तिथंच राहू द्या.’ देवांना हे मान्य करावं लागलं. ते उच्चारले, ‘तुमच्या इच्छेप्रमाणेच सर्व होईल. सर्व काही जागच्या जागी राहील. त्यातील बहुतांश गोष्टी भविष्यातही आहे तेथेच राहतील, पण सर्व काही वैश्‍वनर मार्गाच्या बाहेर असेल. हे महान ऋषिवर!

त्रिशंकूदेखील तिथंच, म्हणजे चमचमणाऱ्या नक्षत्रांच्या प्रभावळीतच एखाद्या चिरंजीवाप्रमाणे कायम राहील; त्याचे डोके मात्र जमिनीच्या दिशेनेच असेल.’ ( वैश्‍वनर या शब्दाला अनेक अर्थ आहेत. विश्वामित्रांनी जे काही नव्यानं निर्माण केले आहे, ते समांतर आकाशगंगा किंवा विश्‍वात राहील, असा त्याचा इथं अर्थ आहे.)

विश्वामित्रांनी हे मान्य केलं. यज्ञ अखेरीस पूर्ण झाला आणि ऋषी व देव स्वस्थानी निघून गेले. यानंतर विश्वामित्र वनात राहणाऱ्या नागरिकांना म्हणाले, ‘‘दक्षिण दिशेला (त्रिशंकू स्वर्गात गेला असल्याने) आता एक फारच मोठी अडचण निर्माण झाली आहे. आपण आता विरुद्ध दिशेला जाऊ आणि तिथं तपश्‍चर्या करू. पश्‍चिम दिशेला पुष्कर नावाचा विस्तीर्ण प्रदेश आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन अत्यंत समाधानानं तपश्‍चर्या करू शकतो.’’ विश्वामित्रांनी पुष्करक्षेत्री अत्यंत कठोर तपश्‍चर्या केली. या काळात त्यांनी केवळ कंदमुळं आणि फळांचंच सेवन केलं.

त्या काळात अयोध्येत अंबरीष नावाचा राजा राज्य करत होता. त्यानं एक यज्ञ करण्यास सुरुवात केली. मात्र इंद्रानं यज्ञात बळी देण्यासाठी आणलेला प्राणी पळवून नेला. ज्या वेळी हा प्राणी नष्ट झाला, तेव्हा उपस्थित ब्राह्मणवर्ग राजाला म्हणाला, ‘‘हे राजा ! तुझ्या निष्काळजीपणामुळे यज्ञपशूचं अपहरण होऊन तो नष्ट केला गेला. ज्या वेळी राजाच्याच घरी वस्तूंची चोरी होऊन त्या नष्ट केल्या जात असतील, तर त्याचं पाप राजाच्याच माथी लागतं.

त्याचं क्षालन करण्यासाठी तुला प्रायश्‍चित्त घ्यावंच लागेल. तातडीनं कोणी मानव किंवा प्राणी आण, जेणेकरून यज्ञविधी सुरू राहील.’’ त्यांचे हे शब्द ऐकताच राजानं यज्ञपशूच्या बदल्यात हजारो गाई देण्याचे जाहीर केलं. त्यानं विविध देश, वसतिस्थानं, शहरं, वनं पालथी घातली. अत्यंत पवित्र स्थानं असलेले आश्रमही त्यानं धुंडाळले. त्याला भृगुतुंगामध्ये आपल्या पत्नी व मुलासह बसलेले रिचिका ऋषी दिसले.

अत्यंत तेजस्वी अशा त्या राजाने प्रचंड ऊर्जावान असलेल्या आणि आपल्या तप:सामर्थ्याने प्रकाशमान भासणाऱ्या त्या ब्राह्मण ऋषींसमोर अत्यंत नम्र होत नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. रिचिका ऋषींची ख्यालीखुशाली विचारल्यानंतर राजा म्हणाला, ‘‘हे भृगुकुलोत्पन्ना!

एक हजार गोधनाच्या बदल्यात तुम्ही तुमचा पुत्र दान दिल्यास मला यज्ञबळीसाठी आवश्‍यक असलेला प्राणी मिळेल आणि यज्ञ संपन्न होईल. मी सर्व देश फिरलो, मात्र यज्ञबळीसाठी योग्य असलेला प्राणी मला मिळाला नाही. त्यामुळे तुम्ही मला तुमचा एक पुत्र दान करावा.’

तेज:पुंज असलेले रिचिका उत्तरले, ‘हे मानवेंद्रा ! मी माझा सर्वांत मोठा पुत्र दान म्हणून देऊ शकत नाही.’ ऋषीपुत्रांची साध्वी माताही अंबरीषाला म्हणाली, ‘हे राजा, सर्वांत धाकटा पुत्र माझा लाडका असल्याचे तू लक्षात असू दे. पित्याला ज्येष्ठ पुत्र, तर मातेला कनिष्ठ पुत्र लाडका असतो, असंच सहसा दिसून येतं. त्यामुळं मी धाकट्याचं रक्षण करत आहे.’

ऋषींनी असं म्हणताच आणि ऋषीपत्नीनंही तशीच भूमिका मांडताच, मधला पुत्र शुन:शेप हा स्वत:हून पुढं आला आणि म्हणाला, ‘ज्येष्ठ पुत्र देता येणार नाही असे माझे वडील म्हणतात, तर धाकट्याचं दान करता येणार नाही असे मातेचे म्हणणे आहे. मला वाटते, मधल्या पुत्राचा व्यवहार करता येण्यासारखा आहे. तुम्ही मलाच घेऊन जा.’ त्याच्या या भूमिकेमुळे अत्यंत आनंदित झालेल्या राजाने एक हजार गाई देत शुन:शेपाचा स्वीकार केला आणि तो तेथून निघाला.

शुन:शेपाला घेऊन प्रवास करत असताना दुपार झाल्यानं राजानं पुष्करक्षेत्री विश्राम केला. राजा आराम करत असतानाच विश्वामित्र येत असल्याचं शुन:शेपानं पाहिलं. शुन:शेपाचा चेहरा त्रासलेला होता. तहान आणि थकवा यामुळं तो प्रचंड हैराण झाला होता. त्यामुळे विश्वामित्र येताच तो त्यांच्या मांडीवर कोसळला आणि म्हणाला, ‘मला माता नाही, पिताही नाही.

भाऊ आणि नातेवाईकही कोठे दिसत नाहीत. त्यामुळं धर्माचे पालन करत तुम्ही माझं रक्षण करावं. तुम्हीच एकमेव सर्व विश्‍वाचे संरक्षक आहात. राजाला यश मिळू दे, त्याबरोबरच माझाही जीव वाचायला हवा. शारीरिक कष्टाची तमा न बाळगता मला अत्यंत कठोर तप करत स्वर्गप्राप्ती करण्याची परवानगी द्या. तुमच्या बुद्धिसामर्थ्याचा वापर करा आणि निराश्रिताला संरक्षण द्या. पित्याप्रमाणं तुम्ही मला सर्व संकटातून बाहेर काढावं.’

त्याची ही विनंती ऐकल्यानंतर विश्वामित्रांनी त्याचं विविध प्रकारे सांत्वन केले. नंतर ते आपल्या पुत्रांना म्हणाले, ‘भविष्यात जगाचं कल्याण व्हावे या उद्देशाने पिता हा पुत्रांना जन्म देत असतो. मात्र, असं मानण्याचा काळ आता संपत आहे. हा बालक ऋषिपुत्र असून माझ्याकडं त्यानं आश्रय मागितला आहे. पुत्रांनो, जीवनदान देत आपण त्याच्या आयुष्यात आपण आनंद निर्माण करायला हवा.

तुम्ही सर्व जण अनेक सत्कृत्यांचे धनी आहात. तुम्ही कायम धर्माच्याच मार्गावरून चालले आहात. त्यामुळं, सर्व राजांमध्ये सर्वोत्तम असणाऱ्या राजानं आयोजित केलेल्या यज्ञामध्ये यज्ञबळी म्हणून तुमच्यापैकी एकानं स्वत:ला पुढं करावं. त्यामुळं शुन:शेपाला आश्रय मिळेल आणि यज्ञातही कोणता अडथळा येणार नाही. यामुळं देवही संतुष्ट होतील आणि माझी प्रतिज्ञाही कायम राहील.’

विश्वामित्रांचे हे शब्द ऐकताच त्यांच्या पुत्रांनी मर्यादा सोडली. ते म्हणाले, ‘आपल्या पुत्रांचा त्याग करून इतरांच्या पुत्राचं संरक्षण तुम्ही कसं करू शकता ? तुम्ही हे करणं योग्य नाही. हे म्हणजे कुत्र्याचं मांस भक्षण करण्यासारखंच आहे.’

अनुवाद : सारंग खानापूरकर

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत, तसंच पुराणं आणि वेद व भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com