चित्रांचा राजा राजा रविवर्मा!

एकाच चित्राच्या असंख्य प्रतिकृती तयार करण्याचा प्रयोग करून, ज्यांची चित्रं प्रत्येक घरात व देव्हाऱ्यात विराजमान झाली, ते जगविख्यात चित्रकार राजा रविवर्मा!
Raja Ravivarma
Raja Ravivarmasakal
Summary

एकाच चित्राच्या असंख्य प्रतिकृती तयार करण्याचा प्रयोग करून, ज्यांची चित्रं प्रत्येक घरात व देव्हाऱ्यात विराजमान झाली, ते जगविख्यात चित्रकार राजा रविवर्मा!

- प्रा. विश्‍वनाथ साबळे, sakal.avtaran@gmail.com

एकाच चित्राच्या असंख्य प्रतिकृती तयार करण्याचा प्रयोग करून, ज्यांची चित्रं प्रत्येक घरात व देव्हाऱ्यात विराजमान झाली, ते जगविख्यात चित्रकार राजा रविवर्मा! राजे महाराजे व संस्थानिक यांच्यापुरती मर्यादित असलेली ही चित्रं छापील प्रिंटच्या माध्यमामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचली. यातून राजा रविवर्मा यांना अमाप लोकप्रियता मिळाली. व्यावसायिक यशही मिळाले. त्यांचा आज (२९ एप्रिल) जन्मदिन, त्यानिमित्त हा चित्रांचा राजा, राजा रविवर्मा यांच्या जीवनप्रवासाची गोष्ट...

प्रभू रामचंद्र, कृष्ण, लक्ष्मी, सरस्वती, शंकर-पार्वती या हिंदू देवतांच्या मानवी रूपातील वास्तववादी पद्धतीने चित्रित केलेल्या प्रतिमा आपण आज प्रत्येक घरामध्ये पाहतो. देवादिकांची ही सुंदर रूपं चित्रित करणारे महान चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा! भारतामध्ये युरोपियन वास्तववादी पद्धतीने व्यक्तिचित्रण करणारे ते पहिले भारतीय चित्रकार होते.

केरळ राज्यातील किलीमानूर येथे राजा रविवर्मा यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. आई व वडिलांकडून त्यांना कला व संस्कृतीचा वारसा मिळाला. त्रावणकोर संस्थानच्या राजघराण्याशी त्यांचा निकटचा नातेसंबंध होता. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. त्यांचे काका राजा राजवर्मा यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आले. त्यांची चित्रकलेतील आवड बघून त्रिवेंद्रमच्या महाराजांनी रविवर्मा यांना प्रोत्साहन दिले. महाराजांच्या आदेशाने राजवाड्यात राहून दरबारी चित्रकार रामस्वामी नायडू यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 

भारताची चित्रकलेची स्वतंत्र परंपरा आहे. तिच्या सौंदर्याच्या स्वतंत्र संकल्पना असून, ती अलंकरणप्रधान आहे. युरोपीय चित्रकला ही भारतीय चित्रकलेपेक्षा वेगळी असून, ती वास्तवदर्शी असल्यामुळे निसर्गदृश्य अथवा व्यक्तीचे अत्यंत हुबेहूब चित्रण या पद्धतीमध्ये केले जाते. या पद्धतीची चित्रं रंगवून घेणे तत्कालीन भारतीय उच्चभ्रू वर्गामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जात असे. त्यासाठी ब्रिटिश चित्रकारांना एतद्देशीय राजे व संस्थानिक भारतात आमंत्रित करत असत. त्यांच्याकडून राजघराण्यातील व्यक्तींची व राजमहाल व परिसराची निसर्गदृश्य रंगवून घेतली जात असत. 

त्रिवेंद्रमच्या महाराजांनी इंग्रज चित्रकार थिओडोर जेन्सन यांना १८६८ मध्ये त्रिवेंद्रमच्या दरबारी व्यक्तिचित्र रंगविण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांनी राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्र तैल रंगामध्ये वास्तववादी पद्धतीने रंगविली. या काळामध्ये रविवर्मा यांनी थिओडोर जेन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तववादी पद्धतीने व्यक्तिचित्र कसे रेखाटायचे, तसेच तैल रंग या माध्यमामध्ये कॅन्व्हासवर व्यक्तिचित्र कसे रंगवायचे हे पाश्चात्त्य कलेतील अकॅडमिक तंत्र शिकून घेतले. तरुण रविवर्मा यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीयांसाठी नवीन असलेला हा कलाप्रकार व माध्यम आत्मसात करून, त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले. पुढे स्वतंत्रपणे राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्र रंगवू लागले. तैल रंगामध्ये व्यक्तिचित्र रंगविणारे भारतातील ते पहिले चित्रकार होते. 

त्रिवेंद्रमनंतर त्यांनी भारतातील विविध प्रदेशांमध्ये प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांनी अनेक अभ्यासचित्र रेखाटली. म्हैसूर, बडोदा या संस्थानांसाठी अनेक व्यक्तिचित्र व प्रसंगचित्र रंगविली. त्याचबरोबर भारतातील अनेक संस्थानिकांची व राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्र त्यांनी साकारली. 

युरोपमध्ये बायबलमधील विविध प्रसंगांची अनेक प्रसंगचित्र युरोपियन चित्रकारांनी रंगविली आहेत. त्याच पद्धतीने रविवर्मा यांनी भारतीय जनमानसात प्रचलित व प्रसिद्ध असलेली रामायण व महाभारत या महाकाव्यातील अनेक प्रसंगांवर आधारित प्रसंगचित्र व अनेक देवी-देवतांची चित्र तैल रंगामध्ये वास्तववादी पद्धतीने रंगविली. यामध्ये लक्ष्मी, सरस्वती, कृष्ण, शिव-पार्वती, शकुंतला-पत्रलेखन, हरिश्चंद्र-तारामती, नल-दमयंती, रावण-जटायू, कृष्णशिष्टाई, विश्वामित्र-मेनका, अर्जुन व सुभद्रा याबरोबरच संगीत सभा, फळे घेऊन जाणारी स्त्री व नायर जातीतील स्त्री यांसारखी अनेक चित्रं प्रसिद्ध आहेत. 

राजा रविवर्मा यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे रेखाटन कौशल्य व मानवी शरीर रचना शास्त्राचा अभ्यास उत्कृष्ट होता. छाया प्रकाश व यथार्थ दर्शनाचा प्रभावीपणे वापर करून प्रसंग चित्रामध्ये त्यांनी नाट्यमयता निर्माण केलेली आहे. विषयाची रचना, चित्रातील व्यक्तींचे प्रसंगानुरूप हावभाव, त्यांचा पोशाख व सभोवतालचे वातावरण सूक्ष्म तपशिलासह चित्रित केले आहेत. भारतीय विषय व पाश्‍चात्त्य तंत्र व त्यातील वास्तववादीपणा यामुळे जनमानसात ही चित्रं खूप लोकप्रिय होती. या पद्धतीच्या चित्रणाला खूप मागणी होती. त्यामुळे या पद्धतीच्या चित्रांच्या अनेक रंगीत प्रती छापण्यासाठी खास जर्मनी येथून लिथो प्रेस आणण्यात आला.

१८९४ मध्ये मुंबईतील भांडुप येथे हा पहिला छापखाना सुरू करण्यात आला. या पद्धतीमध्ये लिथोच्या दगडावर चित्र काढून, त्याच्यावर रंग लावून त्याचा कागदावर छाप घेतला जातो. जितक्या रंगाच्या छटा असतील तितके लिथो स्टोन यासाठी वापरले जात असत. चित्रामध्ये अपेक्षित रंग व परिणाम साध्य करण्यासाठी १५ पेक्षा जास्त लिथो स्टोनचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीने तयार होणाऱ्या तैल रंगातील छापील चित्रांना ओलिओग्राफ म्हणतात. १८९६-९७ मध्ये मुंबईमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे व मुंबईतील दमट वातावरणामुळे छापखाना अडचणीत यायला लागला. त्यामुळे १८९९ मध्ये हा तैल चित्र छापण्याचा छापखाना लोणावळ्यानजीक मळवली येथे हलविण्यात आला. तेथून त्यांनी चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्या. या पद्धतीने एकाच चित्राच्या अनेक प्रती तयार झाल्या.

साहजिकच चित्राच्या किमती कमी झाल्या, चित्रांचा खप वाढला. त्यामुळे रविवर्मा यांची चित्रं प्रत्येक घरात व देव्हाऱ्यात विराजमान झाली. राजे-महाराजे व संस्थानिक यांच्यापुरती मर्यादित असलेली ही चित्रं छापील प्रिंटच्या माध्यमामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचली. यातून राजा रविवर्मा यांना अमाप लोकप्रियता मिळाली. तसेच व्यावसायिक यशही मिळाले. त्यामुळे रविवर्मा यांना आदर्श मानून अनेक उदयोन्मुख चित्रकार व्यक्तिचित्रण कलेकडे वळले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जे. जे. कलाशाळेमधून शिक्षण घेतलेले पेस्तनजी बोमनजी, आबालाल रहिमान, रावबहादूर धुरंधर, त्रिनदाद, पिठावाला, तसेच मुल्लर यांसारखे वास्तववादी पद्धतीने व्यक्तिचित्र रंगविणारे चित्रकार निर्माण झाले.

रविवर्मा यांच्या चित्रांच्या प्रिंटपासूनच पुढे कॅलेंडर आर्टचा जन्म झाला. त्यांच्या चित्रांतील विषय व शैली प्रिंटमुळे भारतीय समाजातील सामान्य लोकांचा ललित कला व कलात्मक अभिरुचीमध्ये सहभाग वाढला.

रविवर्मा यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १८७३ मध्ये मद्रास येथे भरलेल्या प्रदर्शनात त्यांच्या शकुंतला पत्रलेखन या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले; तर १८८० मध्ये पुणे येथे आणि १८९२ मध्ये व्हिएन्ना व शिकागो येथील प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली व त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.  

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर पोहचविणाऱ्या या चित्रकाराची चित्रं भारतातील अनेक संग्रहालयांमध्ये संग्रहित आहेत. त्यामध्ये औंध संग्रहालय, लक्ष्मीविलास पॅलेस, बडोदा; उदयपूर पॅलेस, सालारजंग म्युझियम, हैदराबाद; श्री चित्रालयम, त्रावणकोर; चित्रशाळा, म्हैसूर; नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली इत्यादीचा समावेश आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी आणि शैलींनी ज्यांची चित्रं अजरामर झाली आहेत, अशा राजा रविवर्मा यांनी २ ऑक्टोबर १९०६ मध्ये किलीमानूर येथे जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या कलाकृतींच्या रूपाने ते आजही अजरामरच आहेत.

(लेखक मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com