

The Great Kanchana Circus Book Review
esakal
रोहित वाळिंबे
दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ; तत्कालीन मुंबई प्रांतातील एक सर्कस ही आपल्या संपूर्ण संचासह रंगूनला सादरीकरणासाठी जाते, पण एक दिवस अचानक जपानी सैन्य ब्रह्मदेशाच्या या राजधानीसह त्या अवघ्या मुलुखावरच बाँम्बहल्ला सुरू करते. युद्धाच्या या आगीत स्थानिकांसह मुंबईहून गेलेले सर्कशीतील कलाकार, प्राणीही होरपळून निघतात. आयुष्यभर सर्कशीच्या रिंगणात चित्तथरारक खेळ करणाऱ्या या कलाकारांना आणि प्राण्यांना या युद्धाच्या झळा सोसत मायदेशी येण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग सुरू होतो एक चित्तथरारक प्रवास. या साहसी प्रवासाचे रोमांचकारी वर्णन म्हणजे सिद्धहस्त लेखक विश्वास पाटीललिखित ‘द ग्रेट कांचना सर्कस’ ही कादंबरी.
छोट्या छोट्या तपशिलांसह नेमक्या शब्दांच्या आधारे वाचकांसमोर प्रत्यक्ष प्रसंग उभा करणारी विश्वास पाटील यांची लेखनशैली कादंबरीच्या पहिल्या प्रकरणापासूनच वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते. एकीकडे सर्कशीच्या संचातले टिपलेले बारीकसारीक तपशील आणि दुसरीकडे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे कथेच्या अनुषंगाने उलगड जाणारे स्वभावचित्र आणि त्या जोडीला त्या सर्कशीतील मुक्या जनावरांचे बोलके अस्तित्व यांची लेखकाने कथेत केलेली गुंफण ही वाचकांसाठी मेजवानीच आहे.