सकारात्मक मानसिक आरोग्य - काळाची गरज 

विवेक विठ्ठल कोतेकर 
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सर्वसाधारणपणे संपत्ती, यश, आरोग्य आणि आनंद या चार ध्येयांनीच मानवी जीवन प्रेरित झालेले असते. समाजामध्ये आपण पाहिले तर सर्वांनाच या चार गोष्टी मुबलक मिळतात का? तर तसं होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे ध्येय न ठरविणे, आंतरिक शक्तीची जाणीव नसणे, बदलाला सामोरे न जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विचारांच्या बाबतीत जागे नसणे, कारण जसा विचार आपण करत असतो तसेच आपण घडत असतो. म्हणून विचारांच्या बाबतीत जागे असणे महत्त्वाचे आहे. 
 

एखाद्याला जर आपण तुझ्या जीवनाचं उद्दीष्ट काय? असे जर विचारलं किंवा हाच प्रश्न आपण स्वत:च स्वत:ला विचारुन बघितला तर काय उत्तर येईल ? प्रश्न वरवर सोपा आहे, पण आपल्याला निश्‍चितच अंतर्मुख करणारा आहे. कारण जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्यासमोर एखादे उद्दीष्ट आहे का? की केवळ आपण जगायला लागलो आहोत. आपल्या सभोवताली जर आपण नजर टाकली, तर बहुतांशी व्यक्ती ह्या जीवन एखाद्या ध्येयाविना जगताना दिसतात. कारण जगण्यातला अर्थ शोधायला आज कुणालाच वेळ नाही. पण ज्या व्यक्ती जगण्यामध्ये धडपडतात, काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात त्यांना नक्कीच काहीतरी वेगळे मिळते.

ध्येयाविना न जगता एखादे उद्दीष्टसमोर ठेवून जीवन अधिकाधिक समृध्द आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचे जीवन वेगळ्याच उंचीवर जावून पोहचतं. जगण्यात आनंद वाटू लागतो, मजा येवू लागते आणि जीवन संघर्षमय न बनता सहज आणि आनंदी होवू लागतं आणि हाच तर मुख्य उद्देश आहे ना. आपला आनंद ! येन केन प्रकारे आनंद मिळवणे हेच तर आपले मुख्य उद्दीष्ट आहे. निसर्गाच्या सर्वांगिण समृध्दीचा मला आनंद मिळाला पाहिजे, याच ध्येयासाठी आपण जीवन जगत असतो. 

सर्वसाधारणपणे संपत्ती, यश, आरोग्य आणि आनंद या चार ध्येयांनीच मानवी जीवन प्रेरित झालेले असते. समाजामध्ये आपण पाहिलं तर सर्वांनाच या चार गोष्टी मुबलक मिळतात का? तर तसं होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे ध्येय न ठरविणे, आंतरिक शक्तीची जाणीव नसणे, बदलाला सामोरे न जाणे आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे विचारांच्या बाबतीत जागं नसणे, कारण जसा विचार आपण करत असतो तसेच आपण घडत असतो. म्हणून विचारांच्या बाबतीत जागे असणे महत्त्वाचे आहे. 

साधारपणपणे 2000 च्या दशकात जगामध्ये विचारांवर भरपूर संशोधने झालीत. विचार कसा निर्माण होतो आणि त्याचा शरीर मनावर कसा परिणाम होतो यावर संशोधन करीत असताना संशोधकांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या मेंदूमध्ये 24 तासांत 70,000 च्या वर विचार येतात आणि या 70,000 विचारांपैकी सरासरी 90 टक्केच्यावर विचार हे नकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ रोज 90 टक्के विचार नकारात्मक असतात का? तर नाही, भूतकाळ, भविष्यकाळा संबंधीचे, चिंतेचे, भीतीचे, काळजीचे असतात. 

या सर्वांत अगदी महत्त्वाची बाब म्हणजे या विचाराबाबत आपण जागृत नसतो. आपण स्वत: आणि आपले विचार यांच्यामध्ये जोपर्यंत आपण वेगळेपण जाणवू देत नाही, तोपर्यंत आपल्यावर आपल्या विचारांचे नियंत्रण असते. आपणच आपल्या विचारांचे गुलाम बनतो. पण ज्यावेळेस आपण वेगळे आणि आपण करत असलेले विचार वेगळे, असे ज्या वेळेला होत असते. त्या वेळेस आपले आपल्या विचारांवर नियंत्रण येते. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा रिमोट आपण आपल्या हातात ठेवू शकतो. पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण व्यक्तींना स्वत:च्या विचारांपासून वेगळे होता येत नाही. ते वेगळे करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. याचे कारण म्हणजे आपले विचार किती प्रभावी असतात याची जाणीवच नसते.

दुसरी एक समजूत म्हणजे आपण करत असलेले विचार केवळ आपल्या डोक्‍यापुरते मर्यादित नसतात, तर ते आपल्या अस्वस्थता आणि ताणतणाव याचे प्रमुख कारण असतात. संशोधनावरुन हे सिध्दच झाले आहे की, आपले विचारच आपल्या स्वास्थाशी आणि अस्वास्थाशी निगडीत असतात आणि असेही सिध्द झाले आहे की माणसाच्या मेंदूमध्ये निर्माण होणारे विचारच 90 टक्के विकारांना कारणीभूत ठरतात. म्हणजेच 90 टक्के मनोकायिक विकार हे आपल्या विचारांमुळे होत असतात. इतकंच नव्हे तर, आपल्या विचारांचा प्रभाव वनस्पतींवर होतो, प्राण्यांवर होतो. हे ही जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पतींवरील प्रयोगातून सिध्द झालेले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार कंपनाच्या स्वरुपात विश्वामध्ये जावून आपला प्रभाव पाडत असतात आणि एखाद्या ठिकाणचं सकारात्मक किंवा नकारात्मक वातावरण त्या विचारांमुळेच होते. हे महान योगी महर्षी महेशयोगी यांनी आपल्या अनेक प्रयोगांतून सिध्द केले आहे. 

लुईस या जगप्रसिध्द लेखिकेने आपल्या "यु कन हील युवर लाईफ' या पुस्तकात हे स्पष्ट केले आहे की, आपण करत असलेले मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पना त्यामुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. याचाच अभ्यास करुन शारिरीक अस्वस्थता व ताणतणाव याची कारणे समजावून घेण्याची गुरुकिल्ली दिलेले आहे. 

महान मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतो की, एखादी घटना किंवा प्रसंग आपल्याला अस्वस्थ करत नाही तर त्याबद्दलचा आपला विचारच आपल्याला अस्वस्थ करतो, म्हणून विचार बदलला की परिस्थिती बदलते. हे त्याने त्याच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पध्दतीच्या थेरेपीमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणून आपण आपल्या विचारांवर फार जागरुक असले पाहिजे. 

ओ कार्ल सिमंटन नावाच्या एका मेडिकल डॉक्‍टरने 1970 च्या दशकांत एक प्रयोग करुन सिध्द केले की, शरीर-मनाचा संबंध हा थेट आपल्या आरोग्याशी असतो. 1984 मध्ये त्याने सिमंटन कन्सर सेंटर नावाची संस्था स्थापन केली व जे लोक कन्सरच्या आजाराने आता मरणाच्या तोंडावर येवून ठेपले आहेत अशांसाठी ही संस्था होती. कार्ल सिमंटनने मनोदोषविज्ञान म्हणजेच मेडिकलची अशी शाखा की जी एखादा आजार झाल्यानंतर किंवा तो होत असताना व्यक्तीच्या भावनिक अवस्थेचा चेतासंस्थेवर व रोगप्रतिकार शक्तीच्या कार्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करते. याचा वापर करुन अनेक कन्सर रोग्यांना पूर्णपणे बरे केले. याचा सक्‍सेस रेट 55 टक्के इतका असल्याचा दिसून आला. हे त्याने गेटींग वेल अगेन या पुस्तकामध्ये अधिक विस्तृतपणे सांगितलेले आहे. 

एकूणच मानवी जीवनावर विचारांचा, भावनांचा प्रभाव पडतो असे दिसून आल्यावर आणि एक महत्वाचा शोध म्हणजे क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन की ज्या तंत्राने स्पोर्टस सायकोलॉजीमध्ये क्रांती घडवून आणली. चार्ल्स गारफिल्ड, ब्रुसली, मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट, मेजर ध्यानचंद, ईव्यांडर हॉलीफील्ड, मोहमद अली, अरनॉल्ड श्वारझेनेगर इत्यादी महान खेळाडूंनी क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजेच मनोचित्रणाचा वापर करुन प्रचंड यश मिळवले. तसेच डॉ. जोसेफ मर्फी, ब्रायन टऐसी, रॉन्डा बर्न आणि भारतामध्ये डॉ. जितेंद्र आढिया यांनी या ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. मनोचित्रण म्हणजे एखादी हवी असलेली गोष्ट ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी आपल्या मनात त्याची कल्पना करणे होय. स्पोर्टस सायकोलॉजी बरोबरच आज व्यावसायिक, उद्योजक, राजकारणी, मेडिकल या क्षेत्रात या तंत्राचा फार मोठा प्रभाव पडत चालला आहे. अशाच प्रकारच्या ज्ञानाचा, संशोधनाचा आपल्या जीवनात आपण वापर करत राहिलो तर जगणं खूपच सहज होणार आहे.

सकारात्मक मानसिक आरोग्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी क्रिएटीव्ह व्हिज्युअलायझेशन, माईंड पॉवर, स्टऐस मॅनेजमेंट यासारख्या विषयाची समाजाला जाणीव करुन देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हा विषय समजावून घेवून त्याची रोजच्या जीवनात अंमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण व्यक्ती, समाज निश्‍चित मानसिक आरोग्य सकारात्मक ठेवू शकणार आहे. 

Web Title: Vivek Kotekar article