मनोचित्रण

विवेक विठ्ठल कोतेकर 
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

क्रिएटिव्ह व्हिझ्युएलायझेशन यालाच मनोचित्रण म्हणतात. एखादी हवी असलेली गोष्ट प्रत्यक्षात येण्यापूर्वी तिची आपल्या मनात कल्पना करणे म्हणजे मनोचित्रण. 

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी फार मोठी जागृती झाली. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. स्पर्धा परीक्षा कशी असते, तिचं नेमकं स्वरूप काय? अभ्यासक्रम काय आहे? अभ्यास कसा करावा? याबाबतची इत्थंभूत माहिती प्रत्येक परीक्षार्थी घेतच असतो; पण यशस्वी होण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज असते. तशी मानसिकताही आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपण स्वतः करायला हवा. अशा सकारात्मक विचारांतून यश सोपे होते. 

स्पर्धा परीक्षा यशस्वीतांची, अधिकाऱ्यांची मनोगते आपण ऐकत असतो. हे ऐकणं खूप गरजेचे असतेच. थोडक्‍यात आपण पाहिले तर या सर्वांतून काही गोष्टी समोर येतात. त्या म्हणजे यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, सातत्य ठेवावे लागते आणि हे सर्व बरोबरच आहे असे मला वाटते. पण मंडळी, हे जरी खरे असले तरी या पलीकडे जाऊन असा एक प्रभावी मार्ग आहे की, जो यशाच्या मुक्कामाला आपल्याला लवकर पोहोचवतो. असा कोणता मार्ग आहे? समजा, मला मुंबईहून दिल्लीला जायचे आहे, तर माझ्याकडे तीन पर्याय आहेत. बाय रोड, बाय ट्रेन आणि बाय फ्लाईट. तर निश्‍चितच मी विमानाने जाईन. आता हा शॉर्टकट झाला का? नाही. तर हा एक ध्येय गाठण्यासाठी वापरलेला स्मार्ट मार्ग आहे.  असाच एक प्रभावी स्मार्ट मार्ग म्हणजे क्रिएटिव्ह व्हिझ्युएलायझेशन, यालाच मनोचित्रण म्हणतात. एखादी हवी असलेली गोष्ट प्रत्यक्षात येण्यापूर्वी तिची आपल्या मनात कल्पना करणे म्हणजे मनोचित्रण. 

मनोचित्रण हे तंत्र नेमके आहे तरी काय? 
मन आपल्यासाठी जादुई पद्धतीने काम करत असते. आपण त्याला जे सांगू तेच ते ऐकते. अलाउद्दीन आणि जिनीची गोष्ट आठवते का? जादूचा दिवा घासल्यावर जिनी बाहेर येतो आणि म्हणतो, ‘हुकूम मेरे आका...’ अगदी तसेच आहे. मन म्हणजे जिनी आहे. आपल्या मनाला चित्राची भाषा समजत असते. 

आपण आपल्याला जे हवे आहे, ते जर चित्ररूपाने त्याला दाखवले म्हणजेच आपल्या यशाचे चित्र मनात अगोदरच पाहिले, तर ते प्रत्यक्षात येण्याची दाट शक्‍यता निर्माण होते. उसेन बोल्ट, मायकेल फेल्प्स यांसारख्या मंडळींनी आपण जिंकलो आहे, हे स्पर्धेपूर्वी मनात पाहिले आणि म्हणून त्यांना यश मिळाले. त्यांनी याचा वापर केला. मग आपण का नाही? आणि काही कारणाने अपयश आलेच, तर निराश होण्याचे काहीच कारण नाही. कारण मनाला चित्ररूपाने यश दाखवायला कुठेतरी कमी पडलेलो असतो. हेच यश मिळविण्याचा पुन्हा प्रयत्न करू, चुकीचे जे झाले ते सुधारून पुन्हा तयारी करत राहिलो तर यश आपलेच आहे.

kotekar.vivek37@gmail.com

Web Title: Vivek Kotekar article