तुझं आहे तुजपाशी...

विवेक विठ्ठल कोतेकर
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

एक व्यक्ती तिच्या व्यवसायात अलौकिक आहे, तर दुसरी आयुष्यभर राबराब राबते; तरी तिच्या पदरात काही खास पडत नाही. सुखी समृद्ध होण्यासाठीच तर निसर्गाने प्रत्येकाला दोन हात, दोन पाय, कान, नाक, घसा, मेंदू इत्यादी सर्व देऊन पाठविले आहे; मग खाली आल्यावर विषमता का निर्माण होते? याचं कारण एकच आहे- आपण स्वतःच स्वतःच्या इच्छेने यशस्वी होण्याला अडथळा निर्माण करणाऱ्या मान्यता आणि नकारात्मक विचार करून येणाऱ्या समृद्धीला थांबविण्याचा प्रयत्न करत असतो.

आपण ज्या गोष्टीला हात लावू, तीत यश मिळाले पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. माझे आरोग्य ठणठणीत असावे, मला प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळावा इत्यादी अनेक उद्दिष्टपूर्तीसाठी जगातील सर्वच माणसांची धडपड सुरू आहे. बारकाईने विचार केला, तर एक गोष्ट समोर येते ती म्हणजे, काहीच लोक यशस्वी होतात, बहुतांशी लोक धडपड करत असतात.

सर्वच विद्यार्थी ९० टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळवितात का ? सर्वच आयएएस किंवा आयपीएस होतात का? सर्वच व्यवसायांत यशस्वी होतात का? सर्वच लोक यशस्वी, आनंदी जीवन जगतात का ? याचं उत्तर ‘नाही’ असेच आहे ना? धडपड तर आपण सर्वजण करतो, मग मूठभर लोकांना यश येण्याचं कारण काय?

एक व्यक्ती सदैव आनंदी, तर दुसरी व्यक्ती सदैव दुःखी, एक व्यक्ती भयभीत आहे; तर दुसरी व्यक्ती आत्मविश्वासाने भरपूर आहे. एकाजवळ राहायला वैभवशाली घर आहे, तर दुसरा थोड्या जागेत कसाबसा श्वास घेत आहे. एक व्यक्ती यशाच्या शिखरावर आहे, तर दुसरी खोल दरीत चाचपडत आहे.

एक व्यक्ती व्यवसायात अलौकिक आहे, तर दुसरी आयुष्यभर राबराब राबते; तरी त्याच्या पदरात काही खास पडत नाही. सुखीसमृद्ध होण्यासाठीच तर निसर्गाने प्रत्येकाला दोन हात, दोन पाय, कान, नाक, घसा, मेंदू इत्यादी सर्व देऊन पाठविले आहे; मग खाली आल्यावर विषमता का निर्माण होते? याचं कारण एकच आहे- आपण स्वतःच स्वतःच्या इच्छेने यशस्वी होण्याला अडथळा निर्माण करणाऱ्या मान्यता आणि नकारात्मक विचार करून येणाऱ्या समृद्धीला थांबविण्याचा प्रयत्न करत असतो; पण आता तुमच्या मनात ‘आम्ही कधी नकारात्मक विचार केला? कोणत्या मान्यता?’ वगैरे प्रश्न उठले असणार. थोडंसं चिंतन करून दिवसभरातल्या आपल्या बोलण्यावर जर लक्ष दिले, तर आपल्याला समजून येईल, की आपल्या बोलण्यातून तशा प्रकारचे बोलणे जास्त वेळेला आलेले असते. सर्व काही आपल्या आतमध्येच आहे; पण विनाकारण आपण बाहेर शोधत आहोत.

कबीर म्हणतात,
‘घटा का परदा खोलकर, सन्मुख दे दीदार 
बाला तने तक साईया, आवा अंत का यार’

तुमच्या हृदयात, आतमध्ये डोकावून पहा, ज्याला तुम्ही बाहेर शोधत आहात, प्रश्नांच्या उत्तरांसाठी बाहेर जात आहात, तेच सर्व आतमध्येच आहे. केव्हापासून ? तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. फक्त आत पाहा. ती अगाध शक्ती तेथेच विराजमान आहे.

अनादी काळापासून आपण पाहतो, ऋषी-मुनी, साधू, संत, विचारवंत, तत्त्वज्ञ,  संशोधक या मंडळींनी बहुतांशी वेळ अंतर्मुख होऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या मंडळींना त्यांच्या आंतरिक शक्तीद्वारा त्यांना हवे असलेले यश, प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. तेव्हा आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या आतमध्ये डोकावण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शेवटी तुकोबा म्हणतात, 
‘तुझं आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी’

Web Title: Vivek Kotekar article