तेजोनिधी : एस. एम. जोशी

आजच्या राजकारणात सत्तेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठीची केविलवाणी धडपड पाहिली की, १९७७ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत एस. एम. जोशी यांना एकमताने देऊ केलेलं या देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतिपद त्यांनी विनम्रतेनं नाकारलं होतं, याची आठवण येते.
SM joshi
SM joshiSakal
Summary

आजच्या राजकारणात सत्तेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठीची केविलवाणी धडपड पाहिली की, १९७७ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत एस. एम. जोशी यांना एकमताने देऊ केलेलं या देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतिपद त्यांनी विनम्रतेनं नाकारलं होतं, याची आठवण येते.

- विवेक पंडित

आजच्या राजकारणात सत्तेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठीची केविलवाणी धडपड पाहिली की, १९७७ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत एस. एम. जोशी यांना एकमताने देऊ केलेलं या देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतिपद त्यांनी विनम्रतेनं नाकारलं होतं, याची आठवण येते. अण्णा अर्थात एस. एम. जोशी यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र...

प्रिय अण्णा,

आज बऱ्याच वर्षांनी पत्र लिहायला बसलोय. तसं अण्णा, संघटनाबांधणीपासून ते संघटनेच्या सर्व संघर्षात पावलोपावली विचारांनी तुम्ही माझ्यासोबत आहातच. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी आजवर चालत आलोय. तुम्ही दाखवलेल्या आदर्शांवर ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’ अशी डोळस, लख्ख निष्ठा ठेवून मार्गक्रमण करताना पदोपदी तुमचे आदर्श ध्येयपथावर प्रकाश दाखवित आहेत. तुमच्या स्मृती वाटेवर कायम रुंजी घालताहेत; पण तरीही आज तुमच्याशी थेट संवाद साधावा वाटला; कारण अण्णा, आता जेव्हा मी समाजकारणातून त्यासोबतच राजकारणात आलो आणि इथलं निष्ठाहीन, दिशाहीन राजकारण पाहिलं आणि अस्वस्थ झालो... व्यथित झालो आणि वाटलं की ही अस्वस्थता कुठंतरी उत्सर्जित करावी आणि त्यासाठी इतकी योग्य जागा तुमच्याशिवाय अन्य कोणतीच नसावी.

आजच्या राजकारणातील सत्तेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठीची केविलवाणी धडपड पाहिली ना की अण्णा, १९७७ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत तुम्हाला एकमताने देऊ केलेलं या देशाचं सर्वोच्च असं राष्ट्रपतिपद तुम्ही विनम्रतेनं नाकारलं होतं, त्याची आठवण येते. आजच्या संधीसाधू राजकारणात हा तुमच्यातला बाणेदारपणा, टोकदार निष्ठा आता शोधूनही सापडत नाही हो अण्णा!

अण्णा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील तुमच्या संघर्षाच्या अनेक कथा ऐकत आम्ही घडलो. त्यानंतर मीही संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर आजवर संघर्ष केला. वसईतल्या गावांचा लढा लढताना तुमची विशेषत्वाने आठवण होतेय. अण्णा, जड अंतःकरणाने तुम्हाला सांगतोय खरं; पण अण्णा, तुम्ही ज्या चळवळीचं बाळकडू पाजलंत त्या चळवळी आता अभावानेही दिसत नाहीत हो. आजची सोकॉल्ड नव-आधुनिक पिढी म्हणते की, चळवळी आता कालबाह्य झाल्यात. चळवळी कालबाह्य झाल्यात की समाजाची विचार प्रक्रियाच गोठलीय? की आमची पिढीच कुठंतरी तोकडी पडली चळवळींची जनुकं पुढल्या पिढीकडे संक्रमित करायला?... अण्णा, खरंच याचं उत्तर शोधू गेलं की नुसती तगमग हाती लागते.

अण्णा, आम्ही गेले वर्षभर वसईच्या मातीत गावमुक्तीच्या लढ्याचं रान पेटवलं. जनआंदोलनाच्या निमित्ताने सर्व विचारधारा बाजूला ठेवून सर्वसामान्यांची एक व्यापक चळवळ वसईत उभी राहिली. आंदोलनाची सर्व माध्यमं आजमावित सर्वसामान्य जनता एकदिलाने आपल्या मूलभूत हक्कांसाठी गेले वर्षभर लढतेय. कोणत्याही दडपशाहीला न जुमानता वसईत प्रस्थापितांविरोधात आजही विधायक आंदोलन सुरूच आहे. पण अण्णा, खंत इतकीच आहे की, सर्वच क्षेत्रात इतकी संवेदनशून्यता आणि बोथटता आलीय की आंदोलनातील न्याय्य हक्कांसाठी मी आणि माझ्यासोबत सारी वसईची जनता वर्ष-दीड वर्ष सातत्याने लढूनही आजही हा लढा संपलेला नाही. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करी तयाचे’ हा तुमच्या पिढीचा जाज्वल काळ, या कोडग्या व्यवस्थेत आता लोप पावत चाललाय. अण्णा! तरीही मी साने गुरुजी आणि तुम्ही छेडलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा अविरत लढतोच आहे.

अण्णा, साने गुरुजींसोबत तुम्ही पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी राज्यभर प्रचार केला होता. सारा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. गुरुजींच्या मृत्यूनंतर वर्षभर सेवापथक घेऊन तुम्ही राज्यभर दौरे काढले होते. आताशा असे चळवळींचे, वैचारिकतेचे अमृतमंथन करणारी व्यापकता आणि त्यातली ऊर्मी कुठल्या कुठं पार हरवलीय अण्णा!

पोरवयात असताना ‘एस. एम, एस. एम. अण्णाजी, साने हमारे बड़े गुरुजी’ म्हणत सेवादलाच्या शिबिरात अण्णा, आम्ही फक्त तुम्हाला ऐकायला, पाहायला यायचो. आम्हा मुलांना जवळ कवटाळून गोष्टी सांगतानाच्या तुमच्या त्या मायेच्या स्पर्शासाठी आम्ही आसुसलेलो असायचो. तुम्ही सांगितलेल्या कथांनी ओथंबून जायचो. शिबिरात येताना रिते असलेले आम्ही शिबिरातून परतताना मात्र संपन्न, समृद्ध होऊन घरी परतायचो. अण्णा, आता अशी उत्तुंगता, अथांगता शोधूनही सापडत नाही हो!

अण्णा, तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी आणि विद्युत महाराष्ट्रभर वेठबिगार मुक्त करीत होतो. तेव्हा आम्हाला वसईत काही लोकांचा विरोध झाला होता. आमच्यावर प्राणघातक हल्लेही झाले. त्या वेळी अण्णा, आम्हाला बळ द्यायला तुम्ही वसईत आला होता. त्या वेळी कारवीने बनवलेल्या पानाफुलांनी सजवलेल्या छोटेखानी अगदी साध्यासुध्या व्यासपीठावर आम्ही घातलेल्या कण्हेरीच्या रानफुलांचा हार आनंदाने वागवत तुम्ही आमच्या कामाचं कौतुक केलंत, कोणाच्याही विरोधाला न जुमानता आमच्या वेठबिगारमुक्तीच्या लढ्याला ताकद दिलीत. अण्णा, संघटनेचा पाया खरंतर तेव्हाच बळकट झाला. १९८३ला जेव्हा सरकारनं मला आणि विद्युतला नक्षलवादी ठरवलं, तेव्हा अण्णा, तुम्ही आमची जाहीर बाजू घेतली होती, नाहीतर आमचा लढा तिथेच संपुष्टात आला असता.

अण्णा, तुम्ही आम्हाला संघर्ष, आंदोलने, चळवळी या सोबतीनेच जीवनातला प्रत्येक क्षण उत्कटतेनं कसा जगावा हे दाखवून दिलंय. अण्णा, तुम्ही शिबिरातल्या छोट्या मुलांसोबत अगदी सहजतेने ‘लहान मूल’ होऊन जात. टी.व्ही.वर क्रिकेटचे सामने बघताना सारं विसरून प्रत्येक खेळीला मनापासून दाद देताना, समरस होऊन क्रिकेटचे सामने पाहताना मी तुम्हाला पाहिलंय. समाजात वावरताना, समाज जवळून पाहताना, समाजातील विदारक वास्तवाला भिडताना तुम्ही तुमच्यातली हीच उत्कटता, उत्स्फूर्तता जिवंत ठेवली होती. अण्णा, तुमच्या जीवनाच्या मावळतीतही तुमच्यातल्या त्या उत्स्फूर्ततेला, निखळतेला मी मनापासून सलाम करतो.

‘आपलं म्हणणं सत्याचं असून केवळ उपयोगाचं नाही, त्यामागे संघटनेचं बळ लागतं’ ही तुमची शिकवण अनुसरत आज श्रमजीवी संघटना वयाची ३० वर्षे पूर्ण करतेय आणि तेही सातत्याने व व्यापक पातळीवर, संघटित लढे, विधायक उपक्रम, वैचारिक चळवळी करीत; पण अण्णा, आजच्या समाजातील चळवळींची, वैचारिकतेची, व्यवस्थेची बदलती परिमाणं जवळून पाहताना आत्मकेंद्री, अर्थाधिष्ठित राजकारण प्रत्यक्ष अनुभवताना, विचारांचं कोणतंही अधिष्ठान नसलेली भरकटलेली आधुनिक मानसिकता पाहिली की, दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी अजून किती करायचं राहून गेलंय या तोकडेपणाची वेदना ठसठसत राहाते, अस्वस्थ करते आणि मग या कोडग्या व्यवस्थेत साने गुरुजींसारखं हळवं, उत्कट विश्वात्मक मन का व्यथित झालं असेल? अन् गुरुजींनी कोणत्या तगमगीत या जगाचा निरोप घेतला असेल? या प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा अस्वस्थ करतो.

अण्णा, वेठबिगार मुक्तीवेळी जसं वसईत येऊन तुम्ही माझ्या हातांना बळ दिलंत, तसंच अण्णा, आताही तुम्ही या आणि मला सामर्थ्य द्या... या कोडग्या व्यवस्थेशी दोन हात करण्याचं न्याय्य हक्कांसाठी लढण्याचं... आणि या तगमगीतही स्वत:च्या मनाची उत्कटता कायम ठेवण्याचं...

‘आसवांना रोखण्याचे सामर्थ्य नेत्रांतूनी दे

भंगली जी हृदये त्यांना सांधण्याची जाण दे

त्या क्रूर श्वापदांशी, नि:शस्त्र झुंजण्याचे सामर्थ्य दे

हे तेजोनिधी तू, तव तेजाचा अंशमात्र दे

(लेखक सामाजिक कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे नेते आणि माजी आमदार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com