मराठा साम्राज्याच्या शोकांतिकेचे जिवंत चित्रण

अंकुर चौधरी यांच्या ‘असॅसिनेशन आॅफ द पेशवा’ पुस्तकाची कथा मराठा इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिकेभोवती फिरते.
assassination of the peshwa book
assassination of the peshwa booksakal

- अभिजित भालेराव

अंकुर चौधरी यांच्या ‘असॅसिनेशन आॅफ द पेशवा’ पुस्तकाची कथा मराठा इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिकेभोवती फिरते. नारायणराव पेशव्यांच्या निर्घृण हत्येवर लेखकाने भाष्य केले आहे. एका दशकाहून अधिक काळ न सुटलेल्या कौटुंबिक वादाचा भयानक अंत कसा झाला ते ठळकपणे पुस्तकात मांडण्यात आले आहे. पुस्तकात प्रत्येक घटनेचा, पात्राचा आणि कट-प्रतिकटांचा तपशीलवार समावेश केला गेला आहे.

गेल्या काही शतकांचा भारतीय इतिहास अतिशय समृद्ध आणि मनोरंजक आहे. गेल्या पाच शतकांत विविध साम्राज्यांमधून अनेक घटना घडल्या. ज्यांनी केवळ त्या साम्राज्यांचे भविष्यच बदलले नाही, तर भारतीय उपखंडातील राजकीय परिदृश्यही बदलले आहे. अशीच एक घटना १७७३ मध्ये पुण्यातील मराठा राजधानीच्या शनिवारवाड्याच्या बंद भिंतीमागे घडली होती, जेव्हा एका पेशव्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

पानिपतची तिसरी लढाई १७६१ मध्ये लढली गेली. ती भारतीय भूमीवर लढलेली सर्वात रक्तरंजित लढाई बनली. मराठ्यांनी केवळ लढाई गमावली नाही; तर त्यांचे वारस विश्वासराव, सदाशिवराव आणि समशेर बहादूरदेखील गमावले. नानासाहेब पेशवे यांना त्यांचा मोठा मुलगा आणि प्रियजन गमावल्याचे दुःख सहन झाले नाही आणि काही महिन्यांतच त्यांचे निधन झाले.

नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर पेशव्यांच्या गादीचा प्रश्न उभा राहिला. त्या गादीवर बसण्यासाठी दोन दावेदार पुढे आले. एका बाजूला बाजीराव पेशवे यांचे धाकटे चिरंजीव रघुनाथराव, जे एक सक्षम आणि अनुभवी योद्धा होते; तर दुसऱ्या बाजूला दुसरे दावेदार नानासाहेब पेशवे यांचे पुत्र माधवराव होते, ज्यांना लष्करी व प्रशासकीय अनुभव नव्हता. शेवटी रघुनाथरावांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, माधवरावांना पुढील पेशवे म्हणून गादीवर बसविण्यात आले. इथे भट कुटुंबात भाऊबंदकीची ठिणगी पडली. ज्याचा शेवट एका दशकानंतर नारायणराव पेशव्यांच्या हत्येने झाला.

भट कुटुंबात वाद

१७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हे भट घराण्यातील पेशवाईचा कारभार स्वीकारणारे पहिले सदस्य होते आणि तेव्हापासून वंशपरंपरागत सत्ता हस्तांतरणाच्या परंपरेनुसार पेशवाई दीर्घकाळ कुटुंबात राहिले. माधवराव पेशवे यांनी एक दशकाहून अधिक काळ राज्य केले आणि या काळात त्यांचे काका रघुनाथराव यांच्याशी त्यांचे सतत भांडण होत होते.

नशिबाने पेशवाईची क्रूर थट्टा केली अन् अचानक कर्तबगार माधवराव पेशवे १७७२ मध्ये आजारपणामुळे मरण पावले. रघुनाथराव महत्त्वाकांक्षी होते आणि त्यांना पुन्हा साम्राज्याची जबाबदारी घेण्याची संधी मिळाली; परंतु या वेळीसुद्धा सर्वसंमतीने त्यांना डावलून, नानासाहेबांच्या धाकट्या मुलाला म्हणजे नारायणराव यांना नवीन पेशवे म्हणून घोषित करण्यात आले. हे रघुनाथरावांना खूप अपमानास्पद वाटले आणि त्यांनी आता वाट्टेल त्या मार्गाने पेशवाई मिळवण्याचा निर्धार केला.

द ग्रेट मराठा ट्रॅजेडी

अंकुर चौधरी लिखित ‘असॅसिनेशन आॅफ द पेशवा’ (Assassination of the Peshwa) या इंग्रजी पुस्तकाची कथा मराठा इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिकेभोवती फिरते, ज्या घटनेमुळे बहुधा पेशवाईचे पतन झाले. रघुनाथराव यांची पत्नी आनंदीबाईचा राजगादी हुकल्याने जळफळाट होत होता.

त्या धूर्त आणि हुशार स्त्रीला रघुनाथराव यांना नानासाहेबांनंतरच साम्राज्याचा पेशवा म्हणून पाहायचे होते; परंतु एका दशकाहून अधिक काळ जाऊनसुद्धा त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. नारायणराव पेशवा झाल्यावर मात्र, तिने आपला संयम गमावला. आनंदीबाईने गारद्यांसोबत शनिवारवाड्यात नारायणराव यांना पकडून ठार मारण्याचा कट रचला.

गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर शनिवारवाड्यात गारद्यांनी भयंकर नियोजित गोंधळ घातला आणि त्यात आनंदीबाईच्या आदेशानुसार नारायणराव पेशव्यांचा निर्घृण खून करण्यात आला. त्या दिवशी एकूण अकरा जणांची थंड डोक्याने हत्या करण्यात आली.

रामशास्त्री प्रभुणे हे साम्राज्याचे मुख्य न्यायमूर्ती होते आणि त्यांनी नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. रामशास्त्री प्रभुणे यांनी चालवलेल्या या खटल्याकडे पूर्ण हिंदुस्थानचे लक्ष होते. हा मराठा इतिहासातील एक अध्याय बनला आणि त्यातून बारभाई परिषदेचा उदय झाला.

अंकुर चौधरी यांनी या अविस्मरणीय घटनेला आपल्या पुस्तकात जिवंत केले आहे. या पुस्तकात प्रत्येक घटनेचा, पात्राचा, कट-प्रतिकटांचा तपशीलवार समावेश केला गेला आहे. एखाद्या कोर्ट रूम ड्रामाप्रमाणे लिहिलेल्या या पुस्तकाचे रामशास्त्री प्रभुणे हे नायक आहेत. एका दशकाहून अधिक काळ न सुटलेल्या कौटुंबिक वादाचा भयानक अंत कसा झाला, हे पुस्तकात ठळकपणे अधोरेखित केले आहे.

कथा भूतकाळ आणि वर्तमान (खटला) यांच्यात बदलत राहते आणि येऊ घातलेल्या विनाशाचे वातावरण निर्माण करते. अंकुर चौधरी यांनी पात्रांना जिवंत करताना अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. कथेत प्रतिबिंबित होणाऱ्या विषयावर लेखकाने सखोल संशोधन केले आहे आणि पुस्तकातील सर्व प्रमुख पात्रांना अनेक छटा अन् स्तर जोडले आहेत.

हे पुस्तक वाचायला सुरुवात केली, की तुम्ही आपोआप अठराव्या शतकातील पुणे गाठाल याबद्दल शंकाच नाही. अंकुर यांचे पुस्तक तटस्थ दृष्टिकोनातून या दुःखद घटनेचे एकेक पदर उलगडून दाखवते आणि त्याचे नकारात्मक व सकारात्मक परिणाम स्पष्टपणे नमूद करते. या घटनेने एकीकडे पेशवाईच्या शेवटाची सुरुवात झाली; तर दुसऱ्या बाजूला त्यानंतर मराठ्यांच्या विविध सरदार घराण्यांच्या (गायकवाड, शिंदे, होळकर इत्यादी) स्वतंत्र राज्यांचा उदय झाला.

मध्ययुगीन काळात एखाद्या न्यायाधीशाकडे इतकी शक्ती असू शकते, की तो आपल्याच राजावर खटला चालवू शकतो, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते; परंतु रामशास्त्री प्रभुणे यांनी १७७४ मध्ये पुण्यात न्यायदान करून सत्याची महती सिद्ध केली.

या घटनेने न्यायाची पुनर्व्याख्या करणारे आणि मराठा इतिहासात अजरामर झालेले न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांना अंकुर यांनी आपले पुस्तक समर्पित केले आहे. तुम्हाला मराठा इतिहासातील एका असामान्य घटनेबद्दल वाचायचे असेल, तर ‘असॅसिनेशन आॅफ द पेशवा’ तुम्हाला नक्की भुरळ पाडेल.

(लेखक इतिहास अभ्यासक असून त्यांची शहीद भगतसिंग यांच्यावरील दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com