Saptrang : व्रतस्थ अभ्यासक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्रतस्थ अभ्यासक

व्रतस्थ अभ्यासक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्थी, शके १८४४ म्हणजेच २९ जुलै १९२२ रोजी झाला होता. नुकतेच त्यांनी १०० व्या वर्षात प्रदार्पण केले होते. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण प्लेगच्या साथीमुळे त्यांना पुण्यात स्थलांतर करावे लागले होते. त्यांचे वडील मोरेश्वर पुरंदरे हे पुण्यात भावे शाळेत चित्रकला शिक्षक होते. त्याच शाळेत बाबासाहेबांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये त्यांनी ज्युनिअर बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले होते.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत. ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी एकत्र भटकंती करत. पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला. त्यांच्याबद्दल एकदा पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘देशस्थी रंगाचा, कायस्थी अंगाचा, लेंगा व शर्ट घालणारा, हसतमुख माणूस इतिहासकार आहे. यावर माझा प्रथमदर्शनी विश्वासच बसला नाही. बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे भारदस्त, साक्षात कुठल्याही ऐतिहासिक अष्टप्रधान मंडळात सहजी खपून जाईल ऐसे नाव धारण करणारे हे इतिहासकार प्रथमदर्शनी इतिहासकार वाटतच नाहीत.’’

इतिहास माजघरापर्यंत गेला..

‘इतिहास’ माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे बाबासाहेब म्हणत.

‘ठिणग्या’ : छत्रपतींवरील पहिले पुस्तक

बाबासाहेबांनी वयाच्या १२ व्या वर्षी नारायणराव पेशवे यांच्या जीवनावर एक कादंबरी लिहिली होती. ती प्रसिद्ध झाली नाही. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही कविताही लिहिल्या होत्या. अगदी लहान वयातच बाबासाहेबांनी शिवाजी महाराजाच्या आयुष्यावर कथा लिहिल्या. त्या सर्व एकत्रित करूण १९४६ मध्ये ‘जळत्या ठिणग्या’ या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. राजा शिवछत्रपती हे त्यांचे सर्वांत प्रसिद्ध पुस्तक आहे.

जाणता राजा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेले ‘जाणता राजा’ हे १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेले नाटक सर्वांत प्रसिद्ध व लोकप्रिय ठरले. तेव्हापासून हे नाटक महाराष्ट्रासह आग्रा, दिल्ली, भोपाळ तसेच अमेरिकेतही गेले. या नाटकाचे हजारावर प्रयोग झाले आहेत. मूळ प्रत मराठी व नंतर हिंदी मध्येही याचे भाषांतर करण्यात आले. हे नाटक २०० पेक्षा जास्त कलाकारांकारून रंगवले गेले आहे, तसेच यात हत्ती, उंट व घोड्यांचाही समावेश असतो. नाटक क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना मध्य प्रदेश सरकार कडून २००७-०८ साली ‘कालिदास सन्मान’ हा पुरस्कार दिला गेला होता.

दिग्गजांचा सहवास..

सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, इतिहास संशोधक न. र. फाटक आणि सेतुमाधवराव पगडी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रसिद्ध वक्ते शिवाजीराव भोसले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरूंदकर, कवी कुसुमाग्रज, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकर यांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.

मिळालेले पुरस्कार

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठातर्फे डी.लिट. (२०१३)

महाराष्ट्रभूषण (१९ ऑगस्ट २०१५ )

गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६)

पद्मविभूषण (२०१९)

साहित्य संपदा

आग्रा

कलावंतिणीचा सज्जा

जाणता राजा

पन्हाळगड

पुरंदर

पुरंदरच्या बुरुजावरून

पुरंदऱ्यांची नौबत

पुरंदऱ्यांचा सरकारवाडा

प्रतापगड

फुलवंती

महाराज

मुजऱ्याचे मानकरी

राजगड

राजा शिवछत्रपती

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध

लालमहाल

शिलंगणाचं सोनं

शेलारखिंड

सावित्री

सिंहगड

पद्मविभूषण..

बाबासाहेबांनी शिवरायांसोबतच पुण्याच्या पेशव्यांचाही गहन अभ्यास केला आहे. बाबासाहेबांनी १९७० च्या काळात माधव देशपांडे व माधव मेहेरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेत मार्गदर्शन केले. १९ ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. पुरंदरे यांच्या अव्याहत आणि अथक अशा ‘ऐतिहासिक’ कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून २०१९ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केले होते.

loading image
go to top