'आयटी'त जगण्याची मजा

व्यंकटेश कल्याणकर
मंगळवार, 4 एप्रिल 2017

'बाकी टाईम मॅनेजमेंट केलं की फॅमिलीला वेळ देता येतो आणि कोणत्याही ऑफिसमध्ये पॉलिटिक्‍स वगैरे असतच रे. जगात कोठेही गेलास तरीही. अपडेटस ठेवणं ही आपल्या प्रोफेशनची गरज आहे. बॅंकेचे प्रिमिअम्स काय फक्त "आयटी'तल्यांनाच आहेत का? आणि जॉब सिक्‍युरिटी म्हणशील तर या क्षणाला भूकंप झाला आणि ही इमारत कोसळली तर... काय गॅरंटी माणसाच्या जगण्याची. मग जॉबची गॅरंटी कशाला हवी?', याने एका दमात खुलासा केला.

मिटिंग संपली. पण तरीही तो ऑफिसच्या बाराव्या मजल्यावरील मिटिंग हॉलच्या खिडकीजवळ उभा होता. खिडकीतून दिसणाऱ्या निळाशार समुद्राकडे पाहत. काहीच विचार न करता शांतपणे. "साहब कोई मिलने को आया है आपको', सिक्‍युरिटी गार्डने हॉलमध्ये येऊन सांगितले. याला पुढचा कार्यक्रम आठवला. "यही भेज दो', याने ऑर्डर दिली. "मे आय कम इन सर', एका कोवळ्या तरुणाने अत्यंत नम्रपणे विचारणा केली. "येस. कम.' याने त्याला परवानगी दिली. नजरानजर झाली. याने तरुणाला बसण्याचा इशारा केला. दोघेही समोरासमोर बसले. "सो धिस इज युअर फर्स्ट डे इन धीस कंपनी', याने सुरुवात केली. "येस सर. ऍक्‍च्युली धीस इज माय व्हेरी फर्स्ट जॉब', त्याने खुलासा केला. पुढे काही क्षण शांततेत गेले. काही टेक्‍निकल प्रश्‍न विचारल्यावर नाव, गाव, घर आदींची विचारणा झाली. दोघेही एकाच जिल्ह्यातील निघाले. मग मराठीतच गप्पा सुरू झाल्या.

हा बोलू लागला. "काही वर्षांपूर्वी मी ही असाच तुझ्यासारखा एका कंपनीत इंटर्नशिपला गेलो होतो. तुझ्या मनात आता जे प्रश्‍न असतील तेच त्यावेळी माझ्या मनात होते', खिडकीतील समुद्राकडे पाहत तो सांगू लागला. "बट सर. माझ्या मनात काय प्रश्‍न आहेत हे तुम्हाला कसे समजले?', तरुणाने प्रश्‍न केला. "गुड क्वच्शन. अरे भावा, "आयटी'त पाच वर्षांपासून आहे. पण फक्त मशिनमध्ये नाही तर माणसांच्या मनामध्येही शिरायला शिकलो आहे', हा आता चांगलाच खुलला होता. "ओह! रिअली. सर, मला ना असं वाटायचं की "आयटी' काम करणारे इतर काही विचारच करू शकत नसतील', याने मनातील शंका बोलून दाखवली. त्यानंतर काही काळ शांतता पसरली. "आजपासून काम सुरू करण्याआधी एक लक्षात ठेव तू आयुष्यात कोणत्याही एरियात काम करत असशील तरीही तुझी विचार करण्याची नॅचरल पद्धत कधीही थांबवू नकोस. अर्थात ती थांबत नसतेच. अगदी कोणाचीही ती थांबत नसते. एखादा गुलामही त्याला हवा तसा विचार करू शकतो. पण बहुतेक जण स्वत:च्या विचारांना, भावनांना मनातल्या मनात दाबून ठेवत असतात आणि त्रास करून घेतात. कोठं तरी व्यक्त व्हायला हवं. कधी कधी आपण स्वत:जवळही व्यक्त झालं पाहिजे.', याने उत्तर दिले.

तरुण बोलू लागला, "सर ऍक्‍चुअली न कॉलेजमध्ये आणि घरी असताना मी आतापर्यंत खूप ठिकाणी ऐकलं आहे की "आयटी'त काम करणारे स्वत:ला ओव्हर स्मार्ट समजतात. ते सेल्फ ओरिएंटेड असतात. कोणाशी फार बोलत नाहीत. पण तुम्ही तर एवढे...', तरुणाला थांबवत तो म्हणाला, "कसं आहे की काहीही केलं तरीही हे जग नाव ठेवणारच. मी जगाला काय वाटतयं, त्यापेक्षा स्वत:ला काय वाटतयं; याचा जास्त विचार करतो.' "सॉरी सर, थोडं पर्सनल सांगतो तुमच्याबद्दल. तुमच्याकडे पाहून मला खूप प्राऊड फिल होत आहे. "आयटी'त खूप कटकटी असताना तुम्ही एवढे फ्रेश कसे?', याने पुन्हा प्रश्‍न केला. त्यानंतर काही काळ कोणीच काही बोललं नाही. "कटकटी म्हणजे काय?', त्याने प्रश्‍न विचारला. तरुण बावरला. "सॉरी सर', म्हणत त्याने चर्चा थांबवायचा प्रयत्न केला. "अरे, बोल रे बिनधास्त बोल. उद्यापासून आपली कधी भेट होईल काही सांगता येत नाही. तुला टीम असाईन केली की माझं काम संपलं...', तो आता चांगलाच खुलला होता. "ओके. म्हणजे सर, फॅमिलीला वेळ देणे, ऑफिसमधले पॉलिटिक्‍स, अपडेटस ठेवणे शिवाय बॅंकेचे प्रिमिअम्स, जॉब सिक्‍युरिटी वगैरे वगैरे', तरुणाने "कटकटी' सांगितल्या.

"सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या कटकटी आहेत हे म्हणणं सोडून दे. दुसरी गोष्ट हे सगळे प्रकार फक्त "आयटी'तील लोकांनाच फेस करावे लागतात हा भ्रमही काढून टाक. तुला एक सांगतो. मी इंटर्नशिपला एका कंपनीत गेलो, तिथं पहिल्याच दिवशी तिथल्या एकाने मला छान मेसेज दिला होता. आयटीत नक्की नोकरी कर. पण काही वर्षांसाठी. कर्जाच्या चक्रात अडकून राहून एसीमध्ये पिझ्झा खाण्यापेक्षा गावाकडे आईच्या हातची चुलीवरची भाकरी आयुष्यभर खाऊ शकशील एवढेच पैसे कमव. आयुष्य जगायला शिक, असं त्यानं मला सांगितलं होतं. बाकी टाईम मॅनेजमेंट केलं की फॅमिलीला वेळ देता येतो आणि कोणत्याही ऑफिसमध्ये पॉलिटिक्‍स वगैरे असतच रे. जगात कोठेही गेलास तरीही. अपडेटस ठेवणं ही आपल्या प्रोफेशनची गरज आहे. बॅंकेचे प्रिमिअम्स काय फक्त "आयटी'तल्यांनाच आहेत का? आणि जॉब सिक्‍युरिटी म्हणशील तर या क्षणाला भूकंप झाला आणि ही इमारत कोसळली तर... काय गॅरंटी माणसाच्या जगण्याची. मग जॉबची गॅरंटी कशाला हवी?', याने एका दमात खुलासा केला.

"सर, यु आर ग्रेट. सॅल्युट सर. बट सर, "आयटी'तल्यांना फॉरेनला जाण्याची संधी असते. पण...', तरुणाला पुन्हा थांबवत तो बोलू लागला, "पॉलिटिक्‍स वगैरे सोडून दे रे. इफ यू हॅव क्वालिटी, डेडिकेशन देन यू कॅन डू एनिथिंग. मी फक्त गेल्या सहा वर्षांपासून आयटीत नोकरी करतोय. ठरवलचं आहे की फक्त बारा वर्षे यात घालवायची. मग या काळात जे करता येईल, ते करायचं. क्वालिटी मेंटेन केली आणि पॉलिटिक्‍स वगैरे म्हणतात नं ते सुद्धा थोडं फार केलं. म्हणजे कोणाचं वाईट नाही केलं पण स्वत:ला संधी निर्माण व्हाव्यात असं वातावरण निर्माण केलं.' "म्हणजे', तरुणाला काही उमगलं नाही.

"म्हणजे, समजा तुझ्या टीम लीडरचं किंवा बॉसचं किंवा बॉसच्या बॉसचं दररोज कौतुक केल्यानं त्याला बरं वाटत असेल तर त्यात बिघडलं कुठं? कधी कधी समजा बॉसनं एखादं एक्‍स्ट्रा काम सांगितलं तर बिघडलं कुठं? मी तेच केलं. झालं माझी प्रगती होत गेली. गेल्या पाच वर्षातील माझी ही तिसरी कंपनी आहे. अर्धा डझन देशात जाऊन आलो आतापर्यंत. स्वत:चं घर, गाडी स्वप्न साकार झाली. मलाही फार फार तर सहा महिने झाले असतील या कंपनीत येऊन. पण एक केलं. कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी कोणाशी मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. थोडं फार ऍडजस्ट केलं. गॉसिपींग कधी केलं नाहीच पण गॉसिपींग करणाऱ्यांपासून दूर राहिलो', याने खुलासा केलं.

"मला आजही आठवतयं. माझ्या पहिल्या पगारात मी एका मंदिरात बोललेला नवस फेडायला गेलो होतो. पण तिथं याचना करणारे हात दिसले. दगडाच्या हातांपेक्षा माणसांच्या हातात नवसाचे पैसे दिले. काय आनंद झाला. त्याच दिवशी मी पहिल्यांदा माझ्या गावी बाबांच्या नावाने पाच आकड्यातील मनीऑर्डर पाठवली होती. मनीऑर्डर लिहिताना माझा हात थरथरत होता. तिकडं मनीऑर्डर घेताना आई-बापाचा हात थरथरत होता. मी दुसऱ्या एखाद्या फिल्डमध्ये गेलो असतो तर मी पहिल्याच पगारात कधीच पाच आकडी मनीऑर्डर नसतो पाठवू शकलो. शेवटी पैसा महत्त्वाचा आहे', याच्या डोळ्याच्या कडा एव्हाना पाणावल्या होत्या.

"मंदिरातील याचना करणारे हात आठवले किंवा कधी दिसले की स्वत:चा खूप अभिमान वाटतो. कधी कधी मित्र-मैत्रिणींना फायनान्शिअल अडचणी आल्या की ते माझ्याकडे येतात. जर मी "आयटी'त नसतो; तर मी त्या मित्र-मैत्रिणींच्या जागी असतो असा विचार करून मी त्यांना अगदी शक्‍य तेवढी मदत करतो. जगायला पैसा लागतोच. फक्त तो मिळवताना स्वत:तला "माणूस' जपायला हवा. माझे खूप मित्र वेगवेगळ्या फिल्डमध्ये काम करतात. पण सतत फिल्डला शिव्या घालतात. फिल्ड कोणतंही असो. "आयटी' किंवा अन्य कोणतंही ते आपल्या पोटापाण्याचं साधन असतं. एखाद्या ठिकाणी आपण किती वर्षे काम केलं; त्याही पेक्षा तिथं काम केल्याने आपण किती वर्षे स्वत:चा निर्वाह करू शकलो हे महत्त्वाचं असतं. आपल्या फिल्डवर आपली निष्ठा असावी. मी माझ्या फिल्डचा फुल रिस्पेक्‍ट करतो. म्हणून तर मला "आयटी'त जगायला मजा वाटते. प्रत्येकाने स्वत:च्या फिल्डमध्ये जगत असल्याची मजा घ्यायला हवी', त्याने डोळे पुसले.

"ग्रेट, ग्रेट, ग्रेट सर..', तरुण निशब्द झाला होता. "चल, तुझ्या पहिल्या टीमशी तुझी ओळख करून देतो', दोघेही मिटिंग हॉलच्या बाहेर पडले.

Web Title: Vyankatesh Kalyankar blog on IT life