पुस्तकांमधून जगाचं दर्शन

Books
Books

माझं नेहमी म्हणणं असतं की, सगळं जग आपण एका अनुभवातून स्वतः शिकू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे विचार, ज्ञान, अनुभूती हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तकं. वाचन ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमचे मनोविश्व खूप वाढवता येते. कित्येक पुस्तकं, कादंबऱ्या, कथा, कविता आहेत ज्या आपल्याला संवेदनशील बनवत असतात, आपल्यात समाजभान निर्माण करत असतात. त्याचबरोबर माणसांच्या स्वभावाचा जो गुंता आहे तो आपल्या जगण्यावर कसा परिणाम करत असतो, याचं दर्शन आपल्याला पुस्तकातून मिळत असतं. यापलीकडे जाऊन एक समृद्ध जगणं म्हणजे काय याची दृष्टी निर्माण करण्याचं काम पुस्तकं करत असतात आणि जगताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करता कामा नये हे आपल्याला पुस्तकं शिकवत असतात. 

कोणत्याही लेखकानं प्रामाणिकपणानं लिहिलेलं पुस्तकं आपल्या मनाला भिडल्याशिवाय रहात नाही. मी शेतकरी कुटुंबात अगदी छोट्या गावात जन्माला आलेला मुलगा. शाळेसाठी किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागायचं. अशा परिस्थितीत जग समजून घ्यायला आमच्याकडं पुस्तकांव्यतिरिक्त दुसरा मार्गच नव्हता. मला अभ्यास आवडत असे, त्याचप्रमाणे मला अवांतर वाचन करायलाही खूप आवडत असे. शाळेत असताना सुंदर गव्हाणे आणि जनार्दन मुंडे या शिक्षकांनी आम्हाला वाचनासाठी खूप प्रेरणा दिली. इयत्ता पाचवीत असताना मला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि तेव्हापासून माझ्यातली वाचनाची आवड आणखी वाढली.

यासोबतच माझ्या मित्रांनाही वाचनाची आवड होती. ते मला काही चांगली पुस्तकं वाचायला सांगायचे, मी त्यांना काही पुस्तकं वाचनासाठी सुचवायचो. त्यामुळं शिकत असताना माझी भरपूर पुस्तकं वाचून झाली.

शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी, पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं, मंगेश पाडगांवकर, आरती प्रभू, बहीणाबाईंच्या कविता, रशियन लेखक फ्योदोर दस्तोवस्कीची ‘द इडियट’ ही कादंबरी, आयन रँड यांचं द फाऊंटनहेड हे पुस्तकं, यांसारखी अनेक पुस्तकं मी शाळा - कॉलेजमध्ये असताना वाचली. पुढे जाऊन जसजसे आपण नवनवीन अनुभव घेत जातो तसतसे आपल्याला नवीन लेखकही सापडत जातात. एनएसडीमध्ये असताना काही पुस्तकं ही अभ्यासाचा भाग म्हणून वाचली. शेक्सपियर, चेकहोव, भरतमुनी यांनी लिहिलेलं नाट्यशास्त्र, विजय तेंडुलकर, राम गणेश गडकरी, महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर अशा अनेक दिग्गज नाटककारांनी लिहिलेली पुस्तकं हा माझ्या आवडीचा विषय. पु. ल. देशपांडे हे तर माझे गुरूचं होते; हे सगळं झालं नाटकांचं. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय ही कादंबरी, विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’, भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’, श्री. ना. पेंडसे यांचं `तुंबाडचे खोत’ या कादंबऱ्या मी वाचल्या. बहीणाबाई, बा. भ. बोरकर, बालकवी, कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर आदींच्या कविता मी वाचल्या.

इंग्रजी आणि हिंदीमध्ये रस असल्याने प्रेमचंद, कमलेश्वर, हरीशंकर परसाई यांसारख्या लेखकांची पुस्तकं वाचता आली. हा सगळा त्यांचा त्यांचा संसार आहे, तो आपल्याला आपला करून आत्मसात करता येतो आणि त्यातलं जे भलं आहे  ते संचित म्हणून आपल्या जवळ ठेवता येतं आणि पुढं जाता येतं असं माझं मत आहे. हे माझे आवडते लेखक किंवा ही मी वाचलेली आणि मला आवडलेली पुस्तकं असा एका गोष्टीला चिकटून बसण्याचा माझा स्वभाव नाही. याशिवाय पुस्तक वाचल्यावर ते पुस्तक पुन्हा आपल्या कपाटात बंद करून ठेवण्याचाही माझा स्वभाव नाही. वाचलेली पुस्तकं, वाचन झाल्यानंतर मी नेहमी कोणा ना कोणाला भेट म्हणून देत असतो. 

चित्रपट आणि वेबसिरीज ही माध्यमंही आपल्याला आपण न अनुभवलेल्या विश्वात घेऊन जातात. त्यात लेखक, दिग्दर्शक आपल्याला जे दाखवतात ते आपण बघतो. परंतु पुस्तकांच्या रूपाने लेखन आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपलं विश्व आपल्या पद्धतीने शोधण्यास दिशा दाखवतो. त्यामुळे असं वाचनाचं आणि पुस्तकांचं प्रचंड मोठं योगदान आपल्या आयुष्यात असतंच असतं.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com