शेती पाहिजे, पण मुलगा शेतकरी नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाह
शेती पाहिजे, पण मुलगा शेतकरी नको !

शेती पाहिजे, पण मुलगा शेतकरी नको !

दिवाळी सणापासून वधू-वर शोधाकरिता मुली व मुलाच्या पालकांची धावपळ सुरू होत असते. लग्नात मध्यस्थी मुला-मुलींचा शोध घेण्याकरिता ग्रामीण व शहरी भागात गावोगावी भटकत असतात. मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी असल्याने मुलांच्या तुलनेत उपवर मुली कमी झाल्या आहेत. मुली मुलांपेक्षा शैक्षणिक पात्रतेतही सरस आहेत. मुलींच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलास मुली मिळणे दुरापास्त झाले असल्याचे चित्र आहे. शेती तर पाहिजेच, पण मुलगा शेतकरी नको!, अशी सध्या सर्व मुलींच्या पालकांची अपेक्षा आहे. दुसरीकडे हुंडा नको मुलगी मिळाली तरी पुरे, अशी मुलाच्या पालकांची अपेक्षा आहे. पण जे मुलं फक्त शेतीच करतात त्यांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुलीच्या लायकीचा मुलगा मिळत नाही, तर शेतकरी मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नसल्याने मुला मुलीचे वयही वाढत जात आहे.

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळविण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांचे वास्तव्य ग्रामीण भागात असल्याने वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून शेतकऱ्याचा मुलगा शेती करीत असतो. परंतु शेती करणाऱ्या सुशिक्षित मुलांना मुलीकडून नापसंती मिळत आहे. तसेच खासगी कमी पगाराची नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती असली तरच त्याला लग्नाकरिता मुलगी मिळण्याची शक्यता असते. शेती नसलेल्या शेतमजुरी करणाऱ्या मुलाला तर मुली मिळणे कठीण झाले आहे. मुलाकडे शेती पाहिजे पण शेतकरी नको परिणामी मुलाच्या पालकांकडून फक्त मुलगी द्या लग्न आम्ही करू, अशी विनवणी केली जात आहे. हे चित्र ग्रामीणसह शहरी भागातही दिसून येत आहे.

काही वर्षापूर्वी हुंडा मिळाला नाही मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी मुलाच्या शोधाकरिता मुलींचे पालक महिनोमहिने मुलाकडे, मुलाच्या पालक नातेवाईकांकडे मध्यस्थीमार्फत खेटे घालत होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय नुकसानीचा झाला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुलींच्या पालकांना वाटते की सरकारी नोकरदार किंवा शहरी भागात वास्तव्य असलेला गलेलठ्ठ पगाराचा खासगी नोकरदार जावई म्हणून मिळावा. त्यामुळे ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या उपवर मुलांची परिस्थिती बिकट दिसत आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहे. हल्ली मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुली उच्च शिक्षित असून नोकरी करीत आहेत. विवाहोत्सुक मुलीसह त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. ग्रामीण भागातील मुलींची ओढ नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई अशा मोठ्या शहराकडे आहे. नोकरी असलेल्या तसेच शहरात राहणारा चांगल्या पगाराच्या मुलांना अधिक पसंती दिली जात आहे. उच्च शिक्षित मुली त्यांच्याएवढेच शिक्षण तसेच पगारही भरपूर असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. तसेच खासगी व्यवसाय व त्याला शेतीची जोड असेल तर त्यांना दुय्यम पसंती दिली जाते.

लग्नाचे वय कधीच झाले, पण हात पिवळे कधी होणार? काही वर्षांपूर्वी उपवर मुलामुलींचा विवाह जुळवताना फारशा अडचणी येत नव्हत्या. पालकच सर्व निर्णय घेऊन मुलामुलीवर पसंतीचा निर्णय सोपवित होते. मुलाची कौटुंबिक परिस्थिती, कुटुंबाचा नावलौकिक, नातेवाईक, मुलाचे चालचलन, नोकरी, व्यवसाय शेती आदी बाबींचा प्राधान्याने विचार केला जात होता. हुंडा व मानापानाचा पगडा असल्याने ठराविक वयातच विवाहासाठी पुढाकार घेतला जात होता. आता परिस्थिती बदलली आहे. वयाच्या २५ ते २७ वर्षापर्यंत मुलांचे शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर नोकरी शोधण्यात त्याची तीनचार वर्षे जातात. त्यामुळे वयाच्या तिशी ओलांडली तरी हात पिवळे होत नाही. अगोदर कुटुंबाची सामाजिक स्थिती बघून लग्नकार्य व्हायचे. आता परिस्थिती बदलली आहे. झोपडीपासून महालात राहणाऱ्या सगळ्याच घरच्या मुली शिक्षणात अग्रेसर आहे. त्या तुलनेत मुले कमी शिकलेली आहेत.

loading image
go to top