पाणवैभव

water.jpg
water.jpg

आठवणींचं गाव मनात गलबलून आलं की, पावलं आपसुकच गावाच्या दिशेनं वळतात. गावाची ओढ अलगद पावलांना खेचून नेते. गावमनाची भूक शमविण्यासाठी मी गावाच्या दिशेनं लागलो. काही अंतरावरूनच मला गावाचं बाह्यरूप दिसू लागलं होतं. गावाच्या शेजारी पोहोचताच, मला अरुंद रस्त्यावर पाण्याचा लोट भोकांड पसरून विचरण करताना दिसला. पाऊस जाऊन कित्येक दिवस झाले होते. मग पाणी कुठून बरे आले असेल?... म्हणून माझी पावलं शोधाच्या दिशेनं वळली. तर बघतो काय? जवळच्या शेतावर मोटारपंप सुरू... एकर दोन एकर वावर भिजवून पाण्याने आपला मोर्चा रस्त्यावर वळवला होता. आजूबाजूला बघितले तर कोणाचाही मागमूस नव्हता. मी शेतातील मोटारपंप बंद केला आणि माझ्या मनातील गावाचे पाणी पाणी झाले.
ठिबक, तुषार सिंचनाच्या सोयी उपलब्ध असणाऱ्या काळातही आपण पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो. शेतात चिखल केल्याने उत्पादनात वाढ होते, ही भ्रामक समजूत कालबाह्यच म्हणावी लागेल. पंचतारांकित हॉटेलमध्ये होणारा पाण्याचा अतिवापर आणि मर्यादेपेक्षा जास्त शेतात पाणी वाया घालवण्याचा उद्योग, मानवी जीवनाच्या दृष्टीने अहिताचेच. हंडाभर पाण्यासाठी आयुष्याचं पाणी करून डोंगरकपारीत घोटभर पाणी शोधणारी माय बघितली की गहिवरून येते. उन्हाळ्याच्या दिवसात पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी होरपळ मानवी जाणिवेपेक्षा वेगळी असूच शकत नाही. स्वतःच्या कामाचे वेळापत्रक बदलवून टॅंकरची वाट बघणाऱ्या सर्वसामान्यांचे चेहरे भेगाळल्या भुईगत ग्रीष्म झळा सोसताना आपण प्रासंगिक रूपाने बघतच असतो.
मला आठवते, आमची एकदिवसीय सहल त्याला आम्ही डबापार्टी म्हणायचो, गावालगतच्या नाल्यावर (ओहोळावर) जायची. तेव्हा आतासारखी पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत नेण्याची संस्कृती नव्हती. शेतशिवारात पाणी सहज उपलब्ध व्हायचं. आम्ही नाल्यातली माती बाजूला सारून हिरा (झरा) करायचो. त्यातून निर्मळ पाणी तुरुतुरु धावत वर यायचं. त्या पाण्याला मातीचा सुगंध आणि तृप्तीची अनुभूती असायची. दीडशे-दोनशे मुलं एकाच हिऱ्यातलं पाणी प्यालो तरी हिरा काठोकाठ भरूनच असायचा. आता मात्र चित्र पार बदललं. पावसाचा लहरीपणा, पाण्याचा अव्याहत उपसा नाल्यांचा कर्दनकाळ ठरला. जे काही थोडेफार नाले शिल्लक आहेत ते प्रदूषणाच्या विळख्यात अडकून मरणघटका मोजत आहेत.
पाणी हा प्रश्‍न केवळ व्यक्‍तीपुरता मर्यादित नाही तर समूहाची नाळ त्याच्या जाणिवेशी जुळली आहे. पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या गावात पाणी माफिया तयार झाले आहेत. जागोजागचे वॉटर प्लांट तहानेची अतृप्तता अधिक गडद करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या गावात हसतखेळत वॉटर फिल्टरचे जार घेऊन वाकुल्या दाखवत जाणारी गाडी आर्थिक ऐपत असणाऱ्या माणसांच्या उंबरठ्यावर थिरावते. एकीकडे टीडीएस, मिनरल तपासून पाणी प्राशन करणारा समाजाचा एक घटक तर दुसरीकडे क्षारयुक्‍त पाण्यात आयुष्य बुडवून पाणी पचवून घेणारा दुसरा घटक. असे दोन घटक समाजाच्या दोन ध्रुवावर वावरताना दिसतात. गावात आजही एखाद्या पुढाऱ्याचा कार्यक्रम अथवा सत्संग असला म्हणजे गावभर सडा घालण्याची प्रथा अस्तित्वात आहे. हजारो लिटर पाणी वाया घालवून उत्सवाला चैतन्य प्राप्त होत असेल का? ग्रामीण भागात शासनाने शौचालये बांधून दिलीत; पण पाण्याअभावी ओस पडली आहेत. कोरड्याठण्ण विहिरी कचराकुंड्या झाल्या आहेत. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाने, नाल्यांचे व नद्यांचे पात्र अरुंद झालेत. मातीचे ढिगारे निसर्गदत्त प्रवाहांना अडसर ठरत आहेत. कृत्रिम पूरस्थिती ही आमच्या अफलातून व्यवहाराची प्रचितीच म्हणावी लागेल.
पाणी कधीही धर्म-जात विचारत नाही. प्रत्येकाच्या हृदयात निष्ठेनं जागा करून सृष्टीला सजीव ठेवण्याचं कार्य करीत असते. आपल्या पूर्वजांनी जमिनीतील पाण्याचा माठ शाबूत ठेवला म्हणूनच आजचं पाणवैभव दिसते आहे. जलयुक्‍त शिवार, वॉटर हार्वेस्टिगंच्या माध्यमातून शासन लोककल्याणकारी जबाबदारी बजावते आहे. पण व्यक्‍ती म्हणून आपली भूमिकाही तितकीच सकारात्मक असणे गरजेचे.
पाणी पेरले भुईत
आणि उगवले पाणी
असे पाणी पीक दे जो
भुई गाईन मी गाणी...
या ओळींचा लक्ष्यार्थाने विचार केल्यास भुईत पाणी मुरवणेच गरजेचे आहे. तेव्हाच पाणवैभवाची गाणी गाता येतील. भुई आणि झऱ्याचा संवाद सुस्थितीत आहे म्हणून मातीतून अंकुर अलगद वर येतो आणि वाऱ्यावर डुलतो. ज्या दिवशी भुईतील पाणी संपून जाईल तेव्हा मानवी युद्धानेही हा प्रश्‍न सुटणे अशक्‍यप्राय आहे. व्यक्‍ती तिथे जलक्रांती हाच पर्याय अपेक्षित आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन काळाची गरज झाली आहे. प्रत्येकाने स्वत्वाच्या पलीकडे जाऊन निसर्ग नावाची व्यवस्था समजून घेतली तर असाध्य ते साध्य व्हायला वेळ लागणार नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com