आम्ही चालवू हा पुढे वारसा...

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी संतविचाराचा वारसा आपल्या जीवनात तंतोतंत अमलात आणला.
dr ramchandra dekhane
dr ramchandra dekhanesakal

- डॉ. भावार्थ देखणे, saptrang@esakal.com

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी संतविचाराचा वारसा आपल्या जीवनात तंतोतंत अमलात आणला. कृतार्थ, सात्त्विक, संयत जीवन ते जगले. संत विचार प्रबोधिनीतर्फे रविवारी (ता. ७) डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराचे वितरण पुण्यात केले जाणार आहे. त्या निमित्ताने डॉ. देखणे यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचं स्थान अनन्यसाधारण आहे. जे देव देऊ शकत नाही ते गुरूच्या रूपात तो आपल्याला देतो. देवाची खरी ओळख गुरूच करून देतो. जीवन परिवर्तनाची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला ‘गुरुतत्त्व’ म्हणतात. अशा गुरुतत्त्वाचा परीसस्पर्श माझ्या आयुष्यात झाला तो माझ्या वडिलांच्या, म्हणजेच डॉ. रामचंद्र देखणे यांच्या माध्यमातून.

हे गुरुतत्त्व नेहमीच मला जीवन सिद्धी आणि जीवन समृद्धी देत आलं. कसं जगावं, कसं मरावं आणि कसं उरावं याचा वस्तुपाठ म्हणजे देखणे सर. गगनासारखं व्यापक जगणं, ढगासारखं सर्वस्व देऊन जाणं आणि तीरावरच्या हरिततृणातून मनाला हळुवार आनंद देत उरणं किती आल्हादकारक असतं याची प्रचिती त्यांच्या आयुष्याकडं पाहिल्यावर येते.

देखणे सरांचं जगणं खूप साधं, समाधानी होतं. चौतीस वर्षे सरकारी सेवेत वर्ग-१ अधिकारी असूनही त्यांनी कधीही साहेबी बूट घातले नाहीत. माझे जुने झालेले शर्ट अल्टर करून वापरले. नवीन शर्ट शिवायचाच झाला तर अतिशय आनंदाने लोकांनी दिलेल्या कापडाचेच शर्ट त्यांनी शिवले.

शरीरधर्माचे चोचले विशिष्ट मर्यादेपर्यंतच पुरवावेत, या विचारानं सरकारी गाडी असतानाही सत्तावीस वर्षे ते पुणे-पिंपरी चिंचवड ‘पीएमटी’च्या बसनं ऑफिसला जात. भौतिक सुखापेक्षाही मानवता आणि तिच्याशी आपले नाते त्यांनी आयुष्यभर जपलं.

देखणे सरांनी तीन हजार व्याख्यानं दिली, कीर्तन-प्रवचनाचे दोन हजार कार्यक्रम केले; पण कुठलाही कार्यक्रम मानधन ठरवून केला, असं मला आठवत नाही. देतील ती दक्षिणा आणि न देतील ती आपल्याकडून सेवा, हे तत्त्व आयुष्यभर जपलं. त्यांची ५२ पुस्तकं व्यवहार म्हणून प्रकाशकांना कधीही दिली नाहीत. त्यामुळंच कदाचित चाळीस वर्षांच्या लेखन कारकिर्दीमध्ये त्यांचं प्रकाशकांबरोबर कधीही बिनसलं नाही. उलट नवीन प्रकाशकांना ते नेहमीच स्वत:ची पुस्तके देऊन प्रोत्साहित करत.

शब्द आणि विचार हे सरस्वतीचं प्रतीक आहे. ते पैशाच्या बाजारात त्यांनी कधीही विकायला आणलं नाही. अतिशय गरीब पुस्तक विक्रेता प्रत्येक कार्यक्रमस्थळी सरांची पुस्तके विकायचा. देखणे सर लेखकाला मिळते तेवढे कमिशन प्रकाशकाकडून त्याला मिळवून द्यायचे. एक दिवस कार्यक्रम झाल्यानंतर तो विक्रेता त्यांच्यापाशी आला आणि डोळ्यांमध्ये पाणी आणून म्हणाला, ‘‘सर, आजच मी माझं घर बुक केलं आहे; ते फक्त आणि फक्त तुमच्या पुस्तकांची विक्री करून.’’ लाखो शब्दांचा मनोरा पुस्तकांच्या माध्यमातून उभा करून स्वत:साठी कसलीही आर्थिक अपेक्षा न करता इतरांची घरं उभी करून देणारा हा अवलिया निराळाच.

आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबाचा भाग झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी कधीही कुणा माणसाचं पद, प्रतिष्ठा, पैसा पहिला नाही. म्हणूनच कदाचित एखादा वारीत भेटलेला होमगार्ड तीस वर्षे त्यांचा जवळचा स्नेही होतो. चौकातला पेपरवाला दररोज त्यांच्या बातम्या पेपरमध्ये आहेत का, हे नित्यनेमाने पाहतो आणि न मागता वृत्तपत्रे सरांपर्यंत पोहोचवतो.

सातत्य ही दैवी संपत्ती आहे, असं माझं मत आहे. या संपत्तीची खाणच देखणे सरांना प्राप्त झाली होती. दररोज ऑफिसला जाताना बसमध्ये ते ज्ञानेश्वरीची एक ओवी पाठ करायचे, हा नेम कधीही चुकला नाही. निवृत्तीचं भाषण करताना सरांनी म्हटले होते, की आता बसचा प्रवास नसणार, त्यामुळं ज्ञानेश्वरीची ओवी पाठ करण्यामध्ये खंड पडू नये, हीच माउली चरणी प्रार्थना करतो. दररोज झोपताना गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचन, सोमवारी शिवामूठ, महिन्यातल्या दोन एकादशा आणि प्रत्येक एकादशीचे सांप्रदायिक भजन अखंडितपणानं त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवलं. अगदी विमानात, परदेशात असले तरीही.

सरांचा कार्तिकी वारीला आळंदीला जायचा नेम होता. हृदयाचं मोठं ऑपरेशन नुकतंच झालं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवचन सेवा रद्द केली, पण परंपरेचा नेम स्वस्थ बसू देईना. सर एकादशीच्या दिवशी पहाटेच नेहमीच्या रिक्षावाल्याला घेऊन आळंदीला गेले, आळंदीच्या वेशीपाशी रिक्षातून खाली उतरले. आळंदीकडं जाणाऱ्या रस्त्याला नमस्कार केला आणि माउलींची ओवी म्हणून पुन्हा घरी आले. वारीचा नेम चुकला नाही, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

हा कडाका विवेकाचा...

अशा दैवी गुणांनी संपन्न व्यक्तीला मरणही तसंच आलं. सर्वस्व देऊन देखणे सर इहलोकीची यात्रा संपवून भगवंत तत्त्वात लीन झाले. सरांनी भारुडाचे अडीच हजार प्रयोग केले. भारुडाच्या कार्यक्रमात त्यांची ‘बये दार उघड’ असा टाहो फोडणारी कडकलक्ष्मी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेई. आयुष्यभर अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने नाथांचे हे प्रबोधनपर भारूड त्यांनी सादर केले.

त्याचाच प्रसाद असेल कदाचित, की नवरात्रीच्या पहिल्या माळेला सायंकाळी देवीपुढे महिषासुर मर्दिनी स्तोत्र म्हणताना त्यांनी मनातून ठोकलेली ‘बये दार उघड...’ची हाक आदिशक्तीपर्यंत पोहोचली अणि त्यांच्यासाठी तिनं दार उघडलं. त्या क्षणाला कदाचित सरांच्या लक्षातही आलं नसेल, की आपण लौकिक जीवनविश्वातून अलौकिक अशा आदिशक्तीच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय. मरण असावं तर ते असे शांत, संयमी आणि योगी प्रवृत्तीला अनुसरून.

सर आजसुद्धा आपल्यामध्ये आहेत, हे आम्हाला जाणवतं. व्याख्याते त्यांची वाक्ये व्याख्यानांमध्ये वापरतात, लेखक त्यांच्या लेखांमध्ये सरांच्या पुस्तकांचा संदर्भ देतात. कीर्तनकार आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या संकल्पना सरांच्या कीर्तनाच्या पाठातून घेतात. त्यांनी लिहून दिलेली कीर्तने तशीच्यातशी पाठ करून सादर करतात.

अनेकांना दिलेली प्रेरणा, आज त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रूपात मूर्तरूपात आलेली दिसते. ही सगळी उदाहरणे सर कुठे कुठे उरून राहिले आहेत, हेच नाही का दर्शवितात. त्यांचा वावर हा अमूर्त रूपाने असला तरी तो नक्कीच प्रेरणादायी आहे.

भारुडाच्या कार्यक्रमात कडकलक्ष्मीच्या रूपात हातामध्ये आदिशक्तीचा कडाका घेऊन सर अंगावर फटके मारायचे. कडाका मारण्याची खुबी असते. मारताना जर कडाका वाजला तर तो लागत नाही; पण नाही वाजला तर चांगलेच रक्त काढतो. देखणे सरांच्या मते हा कडाका विवेकाचा आहे. समाजजीवन संतुलित ठेवण्यासाठी नाथांनी विकृतींवर कडाक्याने फटके मारले.

मला वाटते, की जीवन जगताना सरांचा हा नैतिकतेचा आणि विवेकाचा कडाका आम्हाला फटके मारून कसे जगावे, कसे मरावे आणि कसे उरावे, हेच शिकवतो. हा कडाका जेव्हा जोरात वाजेल तेव्हाच आम्ही म्हणू शकतो, ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा...’

(लेखक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com