Durgdurgeshwar-Raigad
Durgdurgeshwar-Raigad

दुर्गदुर्गेश्‍वर रायगड

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या किल्ल्यापेक्षाही बेलाग. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीनं स्वराज्याची राजधानी म्हणून त्याची निवड केली.

समुद्रसपाटीपासून रायगडाची उंची सुमारे २७०० फूट आहे. शिवकालात अत्यंत भरभराटीस आलेला हा गड मराठ्यांच्या पतनानंतर ब्रिटिशांनी जिंकला आणि नंतर लूट करून त्यांचा प्रचंड विध्वंस केला.

स्वराज्यात येण्यापूर्वी रायगड हा रायरी या नावानं ओळखला जात होता. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी रायरीला गडाचं स्वरूप आलेलं नव्हतं. कधी रासिवटा, तर कधी तणस या नावानं त्याचा उल्लेख इतिहासात आलेला आहे. त्याच्या उंचीमुळं नंदादीप असंही त्या काळचे लोक म्हणत. त्या काळात रायरीचा उपयोग कैद्यांना डांबण्यासाठीच होत असे. जावळीच्या मोरे घराण्याच्या हद्दीत हा डोंगर होता. फितुरी करणाऱ्या मोऱ्यांवर शिवाजी महाराजांनी हल्ला चढवल्यानंतर, यशवंतराव मोरे रायरीच्या आश्रयाला गेले आणि प्रतापराव विजापुरास पळून गेले. यशवंतरावांना पकडण्यासाठी महाराजांच्या सैन्यानं रायरीला वेढा घातला. ही तारीख होती ६ एप्रिल १६५६. महिनाभरातच रायरी महाराजांच्या ताब्यात आला.

रायरीची पाहणी करताना माथ्यावरची प्रशस्त जागा, जंगलांनी वेढलेल्या प्रदेशामुळं शत्रूला अवघड वाटणारा आणि सागरी दळणवळणाच्या दृष्टीनं जवळचा म्हणून महाराजांनी रायरीचा डोंगर राजधानी म्हणून निवडला. त्याच सुमारास कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरास निघाला होता. त्याच्यावर हल्ला करून महाराजांच्या सैन्यानं खजिना लुटला आणि त्याचा विनियोग रायरीच्या बांधकामासाठी केला. रायगड हा वेगवेगळ्या काळात रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशा वेगवेगळ्या १५ नावांनी ओळखला जात होता.

गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली वाट पायऱ्यांची असून, १ हजार ४३५ पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्यावर पोचता येतं. काही वर्षांपूर्वी रोप-वे झाल्यानं गडावर लवकर आणि विनाकष्ट पोचण्याची सोय झाली आहे.

गडाच्या पश्‍चिमेकडील हिरकणीचा बुरूज आणि उत्तरेला टकमक टोक आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात राजमाता जिजाऊसाहेबांसाठी वाडा बांधण्यात आला होता. वाड्याच्या व्यवस्थेसाठी शिबंदी ठेवण्यात आली होती. त्यांची निवासस्थानं वाड्यालगत होती. पायऱ्यांच्या वाटेनं चढताना मध्येच एक बुरूज लागतो. त्याचं नाव खूबलढा बुरूज. बुरुजाला लागून एक दरवाजा होता, त्याला चित्‌ दरवाजा म्हणत. मात्र आता त्याचे केवळ अवशेष उरले आहेत. नाना किंवा नाणे दरवाजातून महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तत्कालीन इंग्रज अधिकारी हेन्री ओख्झेंडन याच दरवाजातून आला होता. चित्‌ दरवाजाच्या पुढं सपाटी आहे. त्याच्या टोकाशी दोन इमारती आहेत. मदारमोर्चा किंवा मशिदमोर्चा असं भागाचं नाव आहे. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची आणि दुसरीत धान्याचं कोठार होतं. बाजूलाच मदनशहा नावाच्या एका फकीराचं थडगं आहे. जवळच खडकात खोदलेल्या तीन गुहा आहेत. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला महादरवाजा म्हणतात. दरवाजावर दोन कमलाकृती खोदलेल्या आहेत. दरवाजाला दोन भव्य बुरूज आहेत.

दरवाजाच्या आत देवड्या आणि पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. महादरवाजापासून उजवीकडं टकमक टोकापर्यंत आणि डावीकडं हिरकणी बुरुजापर्यंत तटबंदी आहे. टकमक टोकाजवळच्या बुरुजात एक चोरदिंडी आहे. दरवाजापासून सरळ पुढं गेल्यानंतर हत्ती तलाव दिसतो. तिथून जवळच गंगासागर तलाव दिसतो. राज्याभिषेकाच्या वेळी आणलेल्या सप्तनद्यांचं जल याच तलावात मिसळण्यात आलं होतं. गंगासागरात दोन उंच मनोरे दिसतात. त्याचं बांधकाम द्वादशकोनी आहे. पूर्वी ते पाच मजली होते. मनोऱ्यांच्या पश्‍चिमेस पायऱ्या चढून गेल्यानंतर पालखी दरवाजा आणि तिथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. याच मार्गावर मेणा दरवाजा आहे.

उजवीकडं राण्यांचे महाल आणि जवळच दास-दासींच्या निवासाची सोय होती. राणीवशासमोरच राजभवनात प्रवेश करता येतो. आता केवळ ८६ फूट लांब व ३३ फूट रुंदीचा दगडी चौथरा शिल्लक आहे. राजप्रासादाजवळच एका तळघरात खलबतखाना होता. महाराजांचा राज्याभिषेक झाला, ती राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. जिथं ३२ मणांचं सुवर्णतख्त होतं, तिथं आता महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे. समोरच नगारखाना आहे.

नगारखान्याच्या डावीकडून गेल्यानंतर आधी होळीचा माळ आणि नंतर गडावरची बाजारपेठ लागते. सुमारे ४० फूट रुंदीच्या रस्त्याच्या दोहोबाजूंना समसमान २२ दुकानांचे भग्नावशेष आहेत. या दुकानांमध्ये घोड्यावर बसून खरेदीची सोय होती. महाराजांच्या पुतळ्याजवळ शिरकाईदेवीचं मंदिर आहे. ही गडाची कुलस्वामिनी होती. गेल्या शतकात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.

बाजारपेठेच्या खालच्या बाजूला ब्राह्मण आळी, ब्राह्मणतळ्याचे अवशेष आहेत. तिथून पुढं गेल्यानंतर जगदीश्वर मंदिर लागतं. भगवान शंकराच्या मंदिरासमोर भव्य नंदी आहे. मंदिराचं सभागृह भव्य असून मधोमध कासवाचं शिल्प आहे. मंदिराजवळच शिवाजी महाराजांची अष्टकोनी बांधणीची समाधी आहे. याशिवाय गडावर कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरूज ही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

कसे जाल?
पुण्याहून वरंध घाटमार्गे सुमारे १३२ किलोमीटर आणि मुंबईहून गोवा महामार्गे १६९ किलोमीटर. गडावर निवास आणि भोजनाची सोय उपलब्ध आहे. पुणे आणि मुंबईहून राज्य परिवहन महामंडळाच्या बसही रायगडाच्या पायथ्यापर्यंत येतात. रायगड रिसॉर्टचं आरक्षण पुणे आणि रायगड पायथ्याशी असलेल्या रायगड रोपवेच्या कार्यालयात होऊ शकतं.

ऑनलाइन बुकिंगसाठी http://raigadropeway.com/Raigad%20ropeway.htm या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते. एसी/नॉन एसी आणि तंबूतही निवासाची सोय होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com