दक्षिणेचं प्रवेशद्वार - देवगिरीचा किल्ला

Devgiri-Fort
Devgiri-Fort

वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा किल्ला सुरगिरी, देवगड, धारगिरी या नावानंही ओळखला जातो. राष्ट्रकूट वंशातील श्रीवल्लभ या राजानं ७५६ ते ७७२ या काळात तो बांधून काढला. दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेला हा ६०० फूट उंचीचा किल्ला बेलाग आहे. किल्ल्याच्या भोवती सुमारे ५० फूट रुंदीचा पाण्यानं भरलेला खंदक आहे.

खंदकाच्या तळापासून दीड-दोनशे फूट उंचीचा ताशीव कडा, कोणत्याही मनुष्य अथवा प्राण्यास चढून जाण्यास दुष्कर मानला जात होता. बाराव्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांत खान्देशात यादवांचा उदय झाला. या वंशातील राजपुत्र भिल्लम-२ यानं देवगिरीला आपली राजधानी स्थापन केली.

त्याच्या नंतर सिंधण आणि कृष्ण यांनी राज्याचा विस्तार करून विशाल साम्राज्य स्थापन केलं. त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडं परमार, वायव्येकडं सोळंकी, दक्षिणेकडं होयसळ, पश्‍चिमेकडं शिलाहार आणि कदंब, ईशान्येकडं चंदेल आणि पूर्वेकडं कलाचुरी आणि काकतीयांच्या राज्यांना भिडल्या होत्या. कृष्णाचा भाऊ महादेव यानं उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला आणि गादी आमण्णाकडं सोपवली. कालांतरानं कृष्णाचा पुत्र रामचंद्र यानं बंड करून गादी मिळवली. हाच इतिहासप्रसिद्ध रामदेवराय. त्यानं युद्ध करून साम्राज्य आणखी वाढवलं. तथापि, १२९६मध्ये अल्लाउद्दिन खिलजी यानं देवगिरीवर हल्ला केला आणि रामचंद्राचा पराभव केला. या पराभवाबरोबरच दख्खनमध्ये इस्लामी सुलतानांचा प्रवेश सुकर झाला.

अल्लाउद्दीननंतर त्याचा सेनापती मलिक कफूर यानं दक्षिणेत हल्ले चढवले. हरपालदेवाला १३१७मध्ये ठार मारल्यानंतर यादवांची सत्ता संपुष्टात आली. पुढं महंमद बिन तुघलक या सुलतानानं १३२६मध्ये आपली राजधानी दक्षिणेत आणली आणि देवगिरीचं नामकरण दौलताबाद असं केलं. 

औरंगाबादपासून अवघ्या १७ किलोमीटरवर हा किल्ला आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समोरच दिसतो गुलाबी रंगाचा चांदमिनार. त्याची उंची २१० फूट आणि घेर ७० फूट आहे. याच परिसरात किल्ले शिकन नावाची पंचधातूची तोफ आहे. या तोफेला मेंढा तोफ असंही म्हणतात. जवळच कालाकोट द्वाराजवळ १८० स्तंभांचं एक हेमाडपंती मंदिर आहे. या मंदिरात भारतमातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा सुमारे १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि २३ फूट खोल, असा विस्तीर्ण तलाव आहे. 

शत्रूला सहजी प्रवेश करता येऊ नये, अशा पद्धतीनं या किल्ल्याची रचना केली आहे. वळणा-वळणांचे अरुंद रस्ते, शत्रूसैन्याला अडकवून ठेवू शकत. उंच भिंतींमुळं शिड्या लावूनही किल्ल्यात प्रवेश करता येऊ शकत नव्हता. बालेकिल्ल्यापर्यंत पोचणं, त्या काळात फारच अवघड गोष्ट होती. दुर्गम, अतिसुरक्षित अंधारे बोगदे, शत्रूची नकळत दिशाभूल करत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अनेक द्वारं ओलांडावी लागत. 

प्रमुख महाद्वारातून प्रवेश करणंही दुरापास्त ठरत असे. पूर्वीच्या काळी दार तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे. महाद्वारावर मोठ्या आकाराचे खिळे ठोकण्यात आले होते. कालाकोटातून आत प्रवेश केल्यानंतर डोंगराच्या एका बाजूला चिनी महाल आहे. तिथपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. तिथं तीन दरवाजे आहेत. शत्रूसैन्यावर तीनही बाजूनं मारा करण्यासाठी त्यांची रचना केली असावी. चिनी महालात सजावटीसाठी चिनी मातीच्या टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. गोवळकोंड्याचा शेवटचा सुलतान अबुल हुसेन तानाशाह आणि विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर यांना मुगल सम्राट औरंगजेब यानं इथंच कैदेत ठेवलं होतं. 

इथून डावीकडच्या एका लहान प्रवेशद्वारातून गेल्यानंतर रंगमहालाचे भग्नावशेष दिसतात. या महालात अनेक खोल्या आहेत. छताला आधार देण्यासाठी बसवलेल्या लाकडी खांबांवरचं नक्षीकाम अप्रतिम आहे.

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दरी महालातून जावं लागतं. या महालाच्या सभोवताली डोंगर तासून कृत्रिम दरी तयार करण्यात आली आहे. ही दरी सुमारे शंभर फूट खोल असावी. किल्ल्याच्या वरच्या भागात जाण्यासाठी इथूनच एकमेव रस्ता आहे. सध्या या महालात जाण्यासाठी लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. इथंच दगड-विटांच्या साह्यानं बांधलेला प्राचीन पूलही आहे. दरीतली पाणीपातळी दोन्ही बाजूंना असलेल्या बंधाऱ्यांवरून नियंत्रित करता येत असे. धोक्याच्या काळात हा पूल पाण्याखाली जात असे. 
किल्ल्यात जागोजागी भुयारी मार्ग आहेत. दिशाभूल करणाऱ्या वाटा आहेत.

गुप्त कोठड्या आहेत. शत्रूनं किल्ल्यात प्रवेश मिळवलाच, तर त्यांच्या सैनिकांना थोपवण्यासाठी त्यांच्या अंगावर उकळतं तेल टाकण्याची व्यवस्था आहे. चुकीच्या मार्गानं जाणारा सैनिक थेट दरीत कोसळत असे. भुयारांतून शत्रूला फास बसेल, अशी व्यवस्थाही करण्यात आली होती. किल्ल्यात बारा कमानी असलेला बारादरी नावाचा महाल लागतो. इथल्या खोल्या अष्टकोनी आणि घुमट गोलाकार आहेत. बारादरीचं बांधकाम दगड आणि चुन्यात करण्यात आलं आहे. तिथून पुढं शिखर बुरूज आहे. शिखराकडं जाताना डोंगर पोखरून केलेली एक गुहा दिसते. समर्थ एकनाथ महाराजांचे गुरू आणि किल्ल्याचे किल्लेदार जनार्दनस्वामींचा त्यात निवास होता, असं सांगितलं जातं. या गुहेचे दोन भाग आहेत. एकात अखंड प्रवाहित जलधारा आहे. त्याचं पाणी मोतीटाक्यात साठवलं जातं. 

बाला हिसार हा शिखराचा सर्वांत उंच भाग. इथंच श्री दुर्गा नावाची तोफ आहे. शेजारीच विजयध्वज लावण्याची व्यवस्था आहे. यादवांच्या काळात हा किल्ला आणि संपूर्ण यादवांचं राज्य भरभराटीस आलं होतं. साहित्य आणि कलांना राजाश्रय मिळाला होता. यादवांच्या पराभवानंतर प्रचंड प्रमाणात लूटमार झाली. यादवांच्या खजिन्यासह सरदार, श्रीमंत व्यापारी, शेतकऱ्यांकडून हल्लेखोरांनी प्रचंड लूट मिळवली. ही लूट ६०० मण सोनं, ७ मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि लक्षावधी रुपये, अशी प्रचंड होती. अजिंठा-वेरूळसह या किल्ल्याला प्रत्येक भारतीयानं आवर्जून भेट द्यायला हवी.

कसे जाल?
पुणे ते औरंगाबाद सुमारे २३५ किलोमीटर. मुंबईहून कल्याण-नाशिकमार्गे सुमारे ३५० किलोमीटर. औरंगाबादहून १७ किलोमीटर. औरंगाबादमध्ये निवास आणि भोजनाची उत्तम सोय आहे. देवगिरीच्या मार्गावरही काही रिसॉर्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com