जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 1 ते 7 डिसेंबर

असं उत्थान करा! 
राहू ही एक छाया आहे. राहू हा एक कर्मविपाक आहे. राहू ही एक गर्भबीजांना गोठवून ठेवणारी वर्ल्ड बॅंकच होय. असा हा गर्भबीजांचं एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंज असलेला राहू गर्भबीजांचे जन्मजन्मांतरीच्या कर्मफलांचे रिटर्न्स साठवून ठेवतो; किंबहुना या कर्मफलांचं कॅरी फॉर्वर्ड करणाऱ्या नाळेशी राहूचा संबंध असतो आणि ही नाळ जन्मजन्मांतरीच्या ऋणात अडकवते किंवा त्यातून जीवाला मुक्तसुद्धा करते. 

काळभैरव आणि राहू यांचा अगदी निकटचा संबंध आहे. नियतीचं वस्त्र विणणारा राहू काळभैरवांची मदत घेत काल, कर्म आणि कारण यांची गुंफण करत फलद्रूप होत असतो. पृथ्वी हा एक मोठा भूखंड आहे आणि या पृथ्वीनामक भूखंडाचा जणू सातबाराच राहू या ग्रहाजवळ आहे. या पृथ्वीनामक भूखंडावर मालकी हक्क गाजवणारे पृथक्‌ पृथक्‌ जीव जणू काही सर्प होऊन अशा पृथक्‌ पृथक्‌ भूखंडावर वासनारूपी बिळात किंवा वारुळात राहत असतात आणि हे सर्प म्हणजेच राहू! ज्योतिष ही माणसांशी संबंधित विद्या आहे आणि ही विद्या कर्मसिद्धान्ताच्या खोलात शिरू पाहते! त्यामुळेच ज्योतिषशास्त्र हे राहूशीच संबंधित आहे; किंबहुना ते राहूचं एक प्रकारचं छायाशास्त्रच होय! 

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीवर देहरूपानं जन्माला आलेल्या जीवाच्या देहाची सावली ही पृथ्वीवर पडतच असते. ज्या माणसाची सावली (छाया) सूर्योदय-सूर्यास्ताप्रमाणे लांब किंवा रुंद होत असते त्या प्रत्येक माणसाचा किंवा जीवाचा किंवा त्याच्या देहखंडाचा सातबाराच राहूच्या तहसीलदार कार्यालयात कायमस्वरूपी नोंदला जात असतो! किंवा त्याच्या भोगासक्तीनुसार त्याच्यात फेरफार केले जातात. ज्या जीवाची किंवा मनुष्याची पृथ्वीवर छायाच पडत नसते तो जीवनमुक्त असा महायोगी असतो! 

माणूस आणि माणसाच्या कर्मच्छायेचा प्रवास हा अत्यंत गूढ विषय आहे. मार्तंडभैरवांचा नागदेवतेशी फार जवळचा संबंध आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्‍य घडवणाऱ्या कुंडलिनीला सर्पाची उपमा दिली जाते. आसक्तीला कवटाळून बसलेली कुंडलिनी ज्या वेळी आसक्तीचा विळखा सोडून फणा काढते त्या वेळी तिला 
सहस्र रुद्रगणांची शक्ती प्राप्त होऊन ती शिवाशी लीन होते आणि हीच ती चंपाषष्ठी किंवा हेच ते भैरवोत्थापन होय! 
=========== 
व्यावसायिक प्राप्ती वाढेल 
मेष :
या सप्ताहात चंद्रबळ वाढतं राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरवात शुभ ग्रहांच्या माध्यमातून आश्‍वासकच. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवारचा दिवस घरातल्या हृद्य प्रसंगांचा. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील. 
=========== 
वास्तुव्यवहारांतून लाभ 
वृषभ :
या सप्ताहात तरुणांनी कुसंगतीपासून सावध राहावं. प्रवासात प्रकृती जपा. ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या मोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील. बॅंकेची कर्जमंजुरी मिळेल. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेलं गवसेल! 
=========== 
नोकरीतील विरोध मावळेल 
मिथुन :
पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट अतिशय अप्रतिम. अवघड कामं फत्ते होतील. नोकरीतला विरोध मावळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह शुक्रभ्रमणातून जबरदस्त फलदायी होणारा. व्यावसायिक समेट होतील. वैवाहिक जीवनातले प्रश्‍न संपतील. पतीला वा पत्नीला नोकरीचा लाभ. 
=========== 
हेव्यादाव्यांपासून सावध! 
कर्क :
सप्ताहाची सुरवात जरा कटकटीची. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. काहींचे व्यावसायिक हेवेदावे डोकं वर काढतील. सावध राहा. बाकी, ता. पाच व सहा डिसेंबर हे दिवस एकूणच शुभलक्षणी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक लाभ. 
=========== 
कौटुंबिक विसंवाद संपतील 
सिंह :
नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह उत्तमच! शुभ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर जिथं जाल तिथं आगतस्वागत होईल. काहींचे कौटुंबिक विसंवाद संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार सुवार्तांचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा राहील. 
=========== 
नोकरीच्या मुलाखतींना यश 
कन्या :
सप्ताहाचा एक फास्ट ट्रॅक राहील. प्रवासातील कामं होतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना फॉर्म गवसेल. ता. पाच व सहा हे दिवस तरुणांच्या संदर्भातून विजयी चौकार-षटकारांचे. नोकरीच्या मुलाखतींना यश. वास्तुविषयक कर्ज मिळेल. 
=========== 
तरुणांना प्रेरक ग्रहमान 
तूळ :
या सप्ताहात चंद्रबळातून शुभग्रहांचं आधिपत्य वाढेल. तरुणांना अतिशय प्रेरक ग्रहमान. परदेशी व्हिसाचे प्रश्‍न सुटतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात शुभ घटनांद्वारे चर्चेत राहतील. ता. चार व पाच हे दिवस तुमच्या राशीसाठी एकूणच लयबद्ध. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार वेदनायुक्त. 
=========== 
महत्त्वाची कामं होतील 
वृश्‍चिक :
हा सप्ताह अतिशय प्रवाही राहील. महत्त्वाच्या कामाला हात घालाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं प्रेरक ग्रहमान. विवाहेच्छूंनी आपले अँटिने रोखून ठेवावेत. ता. पाच व सहा हे दिवस तुमच्या राशीला शुभघटनांद्वारे सद्गदित करणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
=========== 
ओळखीतून नोकरीचा लाभ 
धनू :
हा सप्ताह तरुणांना अनुकूलच. सतत ऑनलाईन राहा! विवाहासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. ओळखी-मध्यस्थींतून नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न साकारेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार विचित्र वेदनेचा. 
=========== 
परदेशगमनाची संधी 
मकर :
हा सप्ताह चंद्रबळातून फलदायी होईल. घरात धार्मिक कार्यांमुळे वातावरण प्रसन्न राहील. काहींना तीर्थाटनाचा योग. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक प्राप्ती होईल. नोकरीसाठीच्या मुलाखतींना यश. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग. 
=========== 
जीवनसाधना सफल होईल 
कुंभ :
सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी व तरुणांना प्रकाशात आणणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान लाभेल. जीवनातली साधना सफल होईल. काहींना सामाजिक बहुमान मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सावध राहावं. फसवणुकीची शक्यता. 
=========== 
नवी स्थिती लाभदायक 
मीन :
सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गोड बातम्यांचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोकळं आकाश लाभेल. घ्या टेक ऑफ! नोकरीतल्या नव्या जडणघडणीचा तरुणांना लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी वाहतूककोंडीचा त्रास शक्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com