esakal | साप्ताहिक राशिभविष्य (१० ऑक्टोबर २०२१ ते १६ ऑक्टोबर २०२१) Weekly Horoscope
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य (१० ऑक्टोबर २०२१ ते १६ ऑक्टोबर २०२१)

साप्ताहिक राशिभविष्य (१० ऑक्टोबर २०२१ ते १६ ऑक्टोबर २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

असा हा प्रणव-प्रणोतीचा खेळ

दैवी प्रकृतीचं दैव या स्वरूपातच हे अखिल विश्‍व नांदत असतं. विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्था या दैवी प्रकृतीचं प्राकृत या सदरात मोडतात आणि या दैवी प्रकृतीच्या प्राकृतातील प्राकृत किंवा प्राक्तन म्हणजेच जीवदशा होय! उदा. विशिष्ट शहरात राहणारा माणूस हा त्या शहराच्या प्राक्तनाशी जडलेला असतो. ते अख्खं शहर ज्या वेळी काळाच्या उदरात जातं, त्या वेळी त्या शहरात राहणारा माणूस आणि त्याचं तथाकथित ज्योतिष सांगणारा त्या शहरातील ज्योतिषी आपल्या तथाकथित मानवी बेटासारखा काळाच्या उदरात जात असतो! मग त्याच्या तथाकथित पत्रिकेतील ग्रहगोचर कितीही चांगलं असलं तरी!

मित्र हो, भगवद्‌गीतेतील प्रकृतिपुरुषयोगाचं तत्त्व नवरात्रोत्सवात दडलं आहे. ज्ञानदेव एका ठिकाणी म्हणतात, ''घट हे मातीचं लेकरू आहे! आणि वस्त्र हे कापसाचं नातवंड आहे!'' यात प्रकृतिपुरुषयोगाचं रहस्य दडलं आहे. माणूस प्रकृतीच्या पोटात वाढतो आणि प्रकृतीशी जोडलेली नाळ तोडून देहभावावर येत एक घट बनतो!

या घटातील वायुस्पंदन हे आदिप्रकृतीचंच असतं! घागरी फुंकणं म्हणजे त्या आदिमायेला किंवा आदिमातेला साद घालण्यासारखंच आहे. प्रणवाचा हुंकार हा आदिमायेचा संकल्प किंवा आदिमातेच्या हृदयातील मनोगत किंवा हृदगतच म्हणावं लागेल!

आदिमातेच्या हृदयाच्या कुशीत विसावण्यासाठी घागरी फुंकतात! अशी ही अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ या नक्षत्रांतून होणारी प्रणवोपासनेची वाटचाल कोजागरी पौर्णिमेला शिवतत्त्वात लीन होते! असं हे आदिप्रकृतीचं नवरात्र म्हणजे विश्‍वाच्या प्रांगणातील दांडिया किंवा प्रणव-प्रणोतीचा खेळच होय!

नोकरी-व्यवसायात लाभदायी काळ

मेष : सप्ताह मंगळ-बुध यांच्या सान्निध्यातून आरोग्यविषयक पथ्यं पाळण्याचाच. बाकी नवरात्राचा सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना रवी-गुरू शुभयोगातून नोकरीत विशिष्ट जडणघडणींतून लाभच करून देणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजची पंचमी आणि ता. १३ ची दुर्गाष्टमी व्यावसायिक प्राप्तीची.

संकल्प सिद्धीस जातील, प्रगती होईल

वृषभ : सप्ताह मोठा नावीन्यपूर्ण फळं देणारा. शुक्राचं नक्षत्रगत भ्रमण आजपासून चढत्या क्रमानं शुभ राहील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींवर सप्ताहात नक्षत्रलोकांतून पुष्पवृष्टी! संकल्प सिद्धीस जातील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचं एक प्रगतीचं पर्व सुरू होत आहे. आजचा रविवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी भाग्यबीजं पेरणारा.

वैवाहिक जीवनात सुवार्ता

मिथुन : नवरात्रात शुभ ग्रहांचं अतिशय गुप्त सहकार्य राहील. कोणाशी काहीही न बोलता प्रचिती घ्या. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक उपक्रम गाजतील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखतींतून नोकरीची निश्‍चिती होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन सुवार्तांतून फुलेल.

वास्तुविषयक प्रश्‍न सुटतील

कर्क : यंदाचं नवरात्र मोठी दिव्य अनुभूती देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची साधना फलदायी होईल. आजचा ललिता पंचमीचा रविवार याचीच प्रचिती देईल. एकूणच कोरोनाची संचारबंदी उठेल. पुष्य नक्षत्राच्या तरुणांना शुक्रकलांचा सप्ताहात मोठा आविष्कार पाहायला मिळेल. वास्तुविषयक प्रश्‍न सुटतील. दसऱ्यास मोठं सीमोल्लंघन!

बाजी मारून जाल, उत्कर्षाचा कालखंड

सिंह : शुक्रकलांचा दसऱ्यापर्यंत मोठा उत्कर्ष राहील. मोठे व्यावसायिक पर्याय पुढे होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती बाजी मारतील. यंदाची विजयादशमी मोठा विजय नोंदवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची पंचमी नक्षत्रलोकांतून लाभ देईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा दसऱ्याजवळ मोठा नैतिक विजय!

‘मॅन ऑफ द मॅच’ सन्मानाचे दिवस

कन्या : सप्ताहात मॅन ऑफ द मॅच होणारी रास. रवी-गुरूंच्या विशिष्ट स्थितीतून आणि शुक्रकलांतून सप्ताहात ऐश्‍वर्यसंपन्न होणारी रास. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींवर मोठा धनवर्षाव. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील सुवार्तांतून नवरात्रात सतत आनंदाश्रू येतील. तरुणांना उत्तम नोकरी.

संतविभूतींच्या दर्शनाचा योग

तूळ : आपली शुक्राची रास नवरात्रात शुक्रकलांचा मोठा आस्वाद घेईल. सप्ताहात मोठ्या संतविभूतींचं दर्शन होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींवर व्यावसायिक धनवर्षाव होईल. आजची ललिता पंचमी मोठी शुभशकुनाची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना दसरा पुत्रोत्कर्षाचा.

गाठीभेटींतून भाग्य उजळेल

वृश्‍चिक : नवरात्र हे आपल्या राशीचंच असतं. सप्ताहातील शुक्रकलांचं ऐश्‍वर्य उपभोगणार आहात. सप्ताहात सतत संतसज्जन भेटतील. अर्थातच, सप्ताहात गाठीभेटींतून भाग्य उजळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचं गाऱ्हाणं देवता ऐकतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचं मोठं सीमोल्लंघन होईल.

परदेशगमनाची संधी

धनू : मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पूर्वसंचित फळाला आणेल. अर्थातच, सप्ताहात नवस फेडाल. मंगळवारचं महालक्ष्मीचं पूजन दैवी प्रचिती देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी यंदाचा दसरा मोठ्या उत्कर्षाचा. ता. १५ व १६ हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण. घरात कार्यं ठरतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन!

स्त्रीवर्गाची प्रसन्नता राहील

मकर : श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठं सुंदर ग्रहमान. यंदाचा दसरा खऱ्या अर्थानं एक शुभमुहूर्त ठरेल. श्रद्धा बळकट होतील. कोरोनाचा फास किंवा मास्क जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नवरात्रात देवतांचा अनुग्रह लाभेल. अर्थातच, घरातील स्त्रीवर्ग आपणावर प्रसन्न राहील. सप्ताहात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती धनसंपन्न होतील.

व्यावसायिक समृद्धीचं पर्व

कुंभ : आजची ललिता पंचमी एक अद्वितीय दिवस राहील. आजूबाजूस देवतांचा वास राहील. सतत आदिमायेचं स्मरण ठेवा. सप्ताहात धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणसंपन्न होतील. व्यावसायिक समृद्धीचं पर्व सुरू होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी नोकरीतील एक सुंदर अध्याय सुरू होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशगमनातून सीमोल्लंघन!

व्यावसायिक पतप्रतिष्ठेचा कालखंड

मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी यंदाचं नवरात्र आत्मसिद्धी देणारं. और क्या! भाग्यातील शुक्रभ्रमण आजच्या पंचमीला मोठा दृष्टांत देणारं. पूर्णपणे चित्तशुद्धी होईल. व्यावसायिक पतप्रतिष्ठेचं एक पर्व सुरू होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोग.

loading image
go to top