esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य!

पंचांग 15 मार्च 2020 

रविवार : फाल्गुन कृष्ण 7, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.45, सूर्यास्त 6.44, चंद्रोदय रात्री 11.56, चंद्रास्त सकाळी 11.13, भानुसप्तमी, भारतीय सौर फाल्गुन 25, शके 1941. 

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य!

sakal_logo
By
श्रीराम भट

माणूस : एक जितीजागती कला!

माणसाचं जीवन हे कलाकलानं वाढत असतं आणि माणूस या जीवनाचा कलाकलानं आनंद घेत असतो! माणसाच्या जीवनात दिवस कलतो आणि रात्र उगवत असते आणि मग रात्र कलते आणि दिवस उजाडतो. असं हे काळाची ‘कलना’ जोपासणारं माणसाचं अवकाश या अनंत आकाशात आपला कल सांभाळत आपली जीवनकला सादर करत असतं. माणूस हा एक कलावंतच होय. सतत जिवंतपणाचा अनुभव घेणारा कलावंत. असा कलावंतच माणूस या पदाला पात्र होतो.

माणूस हे एक सौंदर्य आहे. माणूस ही एक परिपूर्ण जीवनकला आहे. अशा या माणसाच्या परिपूर्ण जीवनकलेला चंद्र आणि शुक्र यांच्या कलांतून आणखीच उधाण येत असतं! खरं पाहायला गेलं तर ज्योतिष हीसुद्धा एक कलाच आहे. कारण, हे ज्योतिष चंद्रकलांचा अभ्यास करतं किंवा ते चंद्रकला उपभोगतं असंच म्हणावं लागेल.

माणसातील कलावंत नाहीसा होत चालला आहे. माणसाच्या जीवनातील प्रत्येक दिवस ही एक कला आहे, त्यामुळेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा अनोखा असतो. अशी ही अनोखी कला जगणारा माणूस मृत्यू हीसुद्धा एक कलाच समजत असतो. जीवनाला नाट्य समजून एक अनोखी भूमिका जगणारा माणूस नावाचा कलावंत जीवनातील भूमिका साक्षित्वानं जगत आपल्या जीवनाच्या चित्रपटाची ज्युबिली साजरी करत असतो. 
मित्र हो, या सप्ताहात शुक्रवारी शुक्र हा पृथ्वीच्या जवळ येऊ पाहत आहे. असा हा आगामी काळात पृथ्वीच्या जवळ येणारा शुक्र यंदाची चैत्री पुनवही साजरी करेल. त्यामुळेच यंदाचा वसंतोत्सव चंद्र-शुक्रांच्या कलांमधून अतिशय धमाल उडवेल. अनेक प्रेमिक आपल्या जीवनचित्रपटाची सिल्व्हर किंवा गोल्डन ज्युबिली साजरी 
करणार आहेत!

परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय

मेष  : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रकलांचा लाभ होईल. शुक्रवार शुभलक्षणी. मंगळ-गुरू सहयोगातून तरुणांना मोठं मानांकन लाभेल. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना कलात्मक अभिव्यक्तीची संधी. काहींना परदेशगमनाचा योग. गुंतवणुकीतून लाभ.

उष्णतेच्या विकारांपासून जपा

वृषभ : मंगळ-गुरू सहयोग विशिष्ट कायदेशीर मुद्द्यांसंदर्भात त्रास देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उष्णताजन्य विकारांची शक्यता. ता. १९ व २० हे दिवस मौजमजेचे. पतीचा वा पत्नीचा मोठा भाग्योदय. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा लाभ. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ चिंतेची 
जाण्याची शक्यता.

व्यावसायिकांना मोठे लाभ

मिथुन  : मंगळ-गुरू योगाची संमिश्र फळं मिळतील. 
स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ व १७ हे दिवस शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून अकल्पित लाभ देणारे.  कलाकारांचा भाग्योदय. वास्तुविषयक व्यवहार. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस सरकारी कामांतून फलदायी.

वादग्रस्त मुद्द्यांपासून दूर राहा

कर्क  : दशमस्थ शुक्रभ्रमण पुष्य आणि आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अनुकूल राहील. आजचा रविवार व्यावसायिकांना छानच. काहींचे वास्तुविषयक व्यवहार होतील. ता. १८ ते २० हे दिवस शुभग्रहांच्या सुरावटीचे. वादग्रस्त मुद्द्यांना हात घालू नका. राजकारण्यांची संगत टाळा.

शेअर चांगलाच वधारेल!

सिंह  : तुमचा शेअर चांगलाच वधारेल. राशींच्या एक्स्चेंजमध्ये उत्तम अशी ग्रहसमीकरणं तयार होत आहेत. ता. १६ ते १८ हे दिवस खणखणीतपणे शुभ बोलतील. घ्या झटका करून! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा साखरपुडा! मघा नक्षत्राच्या व्यक्तींची कोर्टातील कामं 
मार्गी लागतील.

कायदेशीर प्रश्न सुटतील

कन्या  : उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या संधी येतील. काहींचं परदेशी व्हिसाचं काम होईल. ता. १६ ते १८ हे दिवस एकूणच भाग्यबीजं पेरणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे काही कायदेशीर प्रश्‍न सुटतील. गुरुवार गुरुकृपेचा! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र खर्चाचा. वाहनं सांभाळा.

शिक्षणक्षेत्रात बाजी माराल

तूळ : शुक्रभ्रमणाची तेजस्विता अप्रतिम राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दणदणीत फळं मिळतील. प्रत्येक बाबतीत यश मिळेल. थोरा-मोठ्यांच्या सहकार्यातून कामं होतील. काहींना दुर्मिळ विवाहयोग. पत्रिकेचं स्तोम नको! विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती शैक्षणिक संदर्भातून बाजी मारतील. स्वतंत्र व्यावसायिकांना विक्रमी लाभ.

नोकरीत भाग्योदयाचा सप्ताह

वृश्‍चिक  : सप्ताहात चंद्र-शुक्राच्या कला गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर रंगांची उधळण करतील. हा सप्ताह अनेकांना नोकरीत भाग्योदयाचा. काहींना सरकारी नोकरीचा लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अत्यंत शुभदायक काळ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक येणी वसूल होतील.

जे म्हणाल ते होईल!

धनू : राशीत होणारा गुरू-मंगळ योग शुक्रभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खणखणीतपणे शुभ बोलेल! जे म्हणाल ते होईल! विशिष्ट गुंतागुंतीचे प्रश्‍न सामोपचारानं सोडवावेत. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी संपदेचा लाभ होईल. ता. १६ ते १८  हे दिवस तुमच्या राशीला एकूणच चढत्या क्रमानं शुभ. पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवाल.

सरकारदरबारी वर्चस्व!

मकर  : हा सप्ताह शुक्रभ्रमणाच्या तेजस्वितेतून बोलणारा. कौटुंबिक सुवार्ता मिळतील. घरातील विवाहेच्छूंचा लांबलेला विवाहयोग जुळून येईल. ता. १८ ते १९ या दिवसांत श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती लाभसंपन्न होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक कार्यात यश. सरकारदरबारी वर्चस्व वाढेल. घ्या कामं करून!

नोकरीत वरिष्ठांची कृपा

कुंभ  : सप्ताहातील गुरू-मंगळ योगाची पार्श्‍वभूमी महत्त्वाचे करारमदार घडवून आणेल. काहींना नोकरीत वरिष्ठांची कृपा लाभून विशिष्ट लाभ होतील. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी. ता. १६ ते १८ हे दिवस शुभग्रहांच्या जबरदस्त कनेक्‍टिव्हिटीचे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना राजाश्रय. पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवाल.

श्रद्धावंतांना मोठे लाभ

मीन : सप्ताहात मंगळ-गुरू योगाची एक घटना अस्तित्वात येईल. या सप्ताहात श्रद्धावंतांना मोठे लाभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती संकटाच्या छायेतून दूर होतील. नोकरीत सूर गवसेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार मोठ्या जल्लोषाचा. तरुणांचा  भाग्योदय. एखादं कोर्टप्रकरण मार्गी लागेल.