जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 19 ते 25 जानेवारी

श्रीराम भट
रविवार, 19 जानेवारी 2020

सध्या माणूस घरात स्वस्थ नाही आणि बाहेरच्या चंचल जगात तर त्याहूनही स्वस्थ नाही. घर असूनही घरघर लागलेला सध्याचा माणूस कुठं वाऱ्यासारखा भरकटत जातो ते त्याचं त्यालाच कळत नाही आणि मग घराची आठवण होऊन घरी परतलेला माणूस धुमसणारा धुँवा होऊन राहतो. 
 

चंचळचक्र हर्षलचे! 
=========== 
‘नाना प्रकारचे दगे। चंचळामध्ये’ असं संत रामदासस्वामी म्हणतात. कलियुग हे मुळातच चंचल आहे. सतत अस्वस्थ असणं हा कलियुगाचा धर्मच म्हणावा लागेल. 
हारवी सांडी पाडी फोडी। विसरे चुके नाना खोडी। 
भल्याचे संगतीची आवडी। कदापि नाही।। 
- संत रामदासस्वामी 

सध्या माणूस घरात स्वस्थ नाही आणि बाहेरच्या चंचल जगात तर त्याहूनही स्वस्थ नाही. घर असूनही घरघर लागलेला सध्याचा माणूस कुठं वाऱ्यासारखा भरकटत जातो ते त्याचं त्यालाच कळत नाही आणि मग घराची आठवण होऊन घरी परतलेला माणूस धुमसणारा धुँवा होऊन राहतो. 

विश्‍वाचा प्रपंच हा माणसांची घरं, पक्ष्यांची घरटी, हिंस्र श्‍वापदांच्या गुहा, सर्पांची बिळं, कृमी-कीटकांचा चिखल किंवा संधी, फटी, तसंच मत्स्यांचं जलाशय किंवा महासागर या सर्वांना पोटात घालून आकाशात एक प्रकारचं चंचळचक्र होऊन वावरतो आहे. असं हे घोंघावणारं कलियुगातलं चंचळचक्र माणसाच्या तथाकथित मनोमंदिराचा कळस सतत हलवत असतं. 

मनाला मनोमंदिराची उपमा देणारा माणूस जीवनातलं जे काही शाश्‍वत आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठीच तो कायिक, वाचिक आणि मानसिक तप करत असतो. सध्या माणूस चांचल्याची परिसीमा गाठत जणू काही मर्कटाचं भावंडच होऊ पाहत आहे असंच अनेक संतांनी म्हटलं आहे. 

मित्र हो, सध्या माणसाच्या डोक्‍याशी संबंधित मेष राशीतून हर्षलचं भ्रमण होत आहे, म्हणूनच सध्या माणसाच्या डोक्‍यात हर्षलचं वादळ घोंघावत आहे. ता. २४ जानेवारीची पौष अमावास्या हर्षलच्या केंद्रयोगातून होईल. आणि गंमतीचा भाग म्हणजे, हा अमावास्येचा शुभमुहूर्त साधत शनी आपल्या मकर राशीच्या घरात प्रवेश करत आहे! त्यामुळेच चिंता करणारा पोशिंदा शनिअमावास्येजवळच्या हर्षलच्या चंचळचक्रातल्या आवर्तात आपल्या गृहचिंतेमुळे जागरण करेल! 
========== 
मुला-बाळांचं भाग्य उलगडेल 
मेष :
राशीचा हर्षल अमावास्येच्या आसपासच्या काळात विचित्र घटना घडवू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वादग्रस्त ठरू नका. काळजी घ्या. बाकी, भरणी नक्षत्राच्या व्यक्ती गुरुभ्रमणाचा एक सुंदर टप्पा अनुभवतील. मुला-बाळांचं भाग्य उलगडेल. तपस्येला फळ येईल. बाकी, अमावास्येच्या आसपासच्या काळात ओव्हरटेक करणं टाळा. वाहन चालवताना उगाच कुणाशी स्पर्धा नको. 
=========== 
ओळखी-मध्यस्थींतून लाभ 
वृषभ :
हा सप्ताह तरुणांना उत्तमच. शुक्रभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर काही अपवादात्मक यश मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींना यश. ओळखी-मध्यस्थींतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. घरातल्या वृद्धांची काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपासच्या काळात प्रवासात काळजी घ्यावी. 
=========== 
व्यावसायिक येणी येतील 
मिथुन :
गुरुभ्रमणाचा प्रभाव वाढेल. ता. २२ व २३ रोजी नववर्षाची भेट मिळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ घेतील. काहींना परदेशगमनाची संधी. व्यावसायिक येणी येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात स्त्रीहट्टाला सामोरं जावं लागेल. अन्न-पाण्यातल्या संसर्गाविषयी काळजी घ्या. 
=========== 
आर्थिक व्यवहार जपून करा 
कर्क :
शनीचं राश्‍यंतर अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होत आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कोणताही जुगार नको. पत्नीशी गोड बोला. कोणतीही संशयग्रस्तता टाळा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना भाऊबंदकीतून त्रास होण्याची शक्यता. विद्युत-उपकरणांपासून जपा. 
=========== 
विवाहस्थळांकडे लक्ष द्या 
सिंह :
सध्या तुम्हाला शुभग्रहांची उत्तम साथ मिळत आहे, त्यामुळे सप्ताहाची सुरवात छानच राहील. तरुणांनो, विवाहस्थळांकडे लक्ष द्या. नोकरीच्या उत्तम संधी येतील. ता. २२ व २३ हे दिवस भाग्योदयाचे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं सौंदर्य उठून दिसेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या शनीच्या राश्‍यंतरामुळे विशिष्ट गुप्त चिंतेची. 
=========== 
नोकरीत प्रशंसा होईल 
कन्या :
या सप्ताहाची सुरवात तरुणांसाठी उत्तमच. विशिष्ट मुलाखती यशस्वी होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठी प्राप्ती. वादग्रस्त खटली मिटतील. गुरुवार गुरुकृपेचा. नोकरीत प्रशंसा होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घबाडयोगाची. हरवलेलं सापडेल! 
=========== 
नोकरीत वरिष्ठांशी जपून 
तूळ :
शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट लाभ मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ ते २३ या काळात शुभ ग्रहांचं बळ मिळेल. वैयक्तिक महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अमावास्येच्या आसपासचा काळ तुमच्या राशीला प्रतिकूल. वादविवाद टाळा. नोकरीत वरिष्ठांशी जपून. 
=========== 
अडचणी दूर होतील 
वृश्‍चिक :
शनीच्या राश्‍यंतरातून शुभ ग्रहांना वाव दिला जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या अडचणी या सप्ताहाच्या प्रारंभी दूर होतील. ता. २० रोजीची एकादशी अतिशय शुभलक्षणी. नोकरीत भाग्योदय. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा गुरुवारी भाग्योदय. अमावास्येच्या आसपासच्या काळात वाहनं जपा. 
=========== 
घरात वादविवाद नकोत 
धनू :
या सप्ताहात राशीचा गुरू चमत्कार घडवेल. ता. २२ व २३ हे दिवस संकटविमोचनाचे. तरुणांना मोठं यश मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी वा विवाह यासंदर्भात विशेष संधी. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपासच्या काळात घरात वादविवाद टाळावेत. काहींना अग्निभय. विद्युत उपकरणांपासून काळजी घ्या. 
=========== 
जुन्या गुंतवणुकींतून लाभ 
मकर :
सप्ताहाचा आरंभ वैयक्तिक सुवार्तांचाच. तरुणांना ता. २० ची एकादशी अतिशय शुभलक्षणी. नोकरीचे कॉल येतील. व्यावसायिक येणी येतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीचा लाभ घेतील. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. अमावास्येच्या आसपासच्या काळात शनीचं प्रशासन सुरू होईल. गर्दीत काळजी घ्या. 
=========== 
जिवलगांचे प्रश्न सुटतील 
कुंभ :
राशीचं शुक्रभ्रमण आणि गुरूची स्थिती यांचा या सप्ताहावर मोठा प्रभाव राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती या स्थितीचा पूर्णपणे लाभ घेतील. घरातल्या प्रिय व्यक्तींचे प्रश्‍न मार्गी लागतील. ता. २२ व २३ हे दिवस सर्वार्थानं शुभदायी. शनीच्या राश्‍यंतरामुळे अमावास्येच्या आसपासच्या काळात गुप्त चिंता सतावेल. 
=========== 
नोकरीतली अस्वस्थता जाईल 
मीन :
हा सप्ताह गुरुभ्रमणातून फलदायी होणारा. नोकरीतली अस्वस्थता जाईल. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पतप्रतिष्ठा वाढेल. ता. २२ व २३ रोजी पूर्वसंचित फळाला येईल. अमावास्येच्या आसपासच्या काळात अचानक 
पाहुणे येतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 19 January to 25 January 2020