esakal | जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 23 ते 29 फेब्रुवारी
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 23 ते 29 फेब्रुवारी

मित्र हो, सप्ताहात उद्या, सोमवारी, फाल्गुन महिना सुरू होत आहे. बारा महिन्यांपैकी फाल्गुन या महिन्याचा रंग हा अगदी वेगळा आहे. शब्दांच्या शिमग्यात आपले भावस्पर्श हरवू न देता या फाल्गुनात आपण आपल्या जीवनातील रंग एकमेकांत मिसळू या! 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 23 ते 29 फेब्रुवारी

sakal_logo
By
श्रीराम भट

फागुन आयो रे... 
भगवंतांच्या या सृष्टीत बारा आदित्य (सूर्य) आपापले भाव जपत असतात. संवत्सरातील बारा महिने आणि बारा राशींतून होणारं सूर्याचं भ्रमण हे एक प्रकारे या भवसागरातील किंवा भावसमुद्रातील म्हणा, भावकल्लोळच म्हणावे लागतील. सृष्टीत भाव निर्माणच झाले नसते तर आपल्या आईनं आपल्यावर वात्सल्याचा प्रेमवर्षाव केलाच नसता! 

मनुष्य म्हणवणाऱ्या आणि मानसपुत्र ही संकल्पना जोपासणाऱ्या मानवानं सृष्टीतील ‘आदित्य आणि आदिती’ हा परमार्थविषयक तत्त्वविचार समजून घेणं अतिशय आवश्‍यक आहे. सृष्टी ही भावमयी आहे आणि ‘भाव’ जपणारी ही आदिती या सृष्टीत बारा राशींचे भाव जपणाऱ्या जिवांना जन्म देत असते. ‘आदिती’ ही विश्वातील सर्व मातांची आदिती आहे आणि आदित्य हा जगातील सर्व पित्यांचा पिता आहे! 

बारा महिने आणि बारा राशी या विश्र्वमंचावर कालवस्त्र पांघरत आपलं जीवनातलं नटनाट्य सादर करत असतात. फाल्गुन महिन्यात या नटनाट्याची परिसीमा होत हुताशनी पौर्णिमेचे रंग उधळले जात असतात! अंग, संग आणि रंग अशी अंगडाई सादर करणारा सध्याचा कलियुगातील माणूस बेभान होऊ पाहत आहे. 

अंगस्पर्श आणि भावस्पर्श यातील अंतर ओळखणारा तोच माणूस म्हणावा लागेल; परंतु सध्या हा मानव्याचा दिव्य स्पर्श हरवून बसलेला मनुष्यप्राणी फक्त अंगस्पर्शच जाणतो. त्याच्यातील भावस्पर्श पूर्णपणे संपल्यात जमा आहे. अशा या रखरखीत झालेल्या जीवनाच्या वाळवंटात सध्याचा माणूस आपल्या कोरड्या कातडीला भावसलीलाचा ओलावा मिळण्यासाठी वणवण फिरत असतो. अर्थातच मृगजळाच्या पाठीमागे धावत असतो!  माणसाच्या जीवनात शब्द अवतरले आणि निःशब्दांनासुद्धा भावस्पर्श लाभले. अर्थातच माणसामुळे मौन बोलकं झालं आणि मुक्‍या प्राण्यांच्या भावना समजण्याची शक्ती माणसात आली. 

मित्र हो, सप्ताहात उद्या, सोमवारी, फाल्गुन महिना सुरू होत आहे. बारा महिन्यांपैकी फाल्गुन या महिन्याचा रंग हा अगदी वेगळा आहे. शब्दांच्या शिमग्यात आपले भावस्पर्श हरवू न देता या फाल्गुनात आपण आपल्या जीवनातील रंग एकमेकांत मिसळू या! 

घरात जिभेवर ताबा ठेवा 
मेष :
अमावास्येच्या स्पर्शानं सुरू होणारा हा सप्ताह वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर प्रतिकूल. बाकी, तरुणांना परदेशगमनाच्या संधी आहेत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक वादाला सामोरं जावं लागू शकेल. संयम बाळगा. राजकीय दहशत शक्‍य. 
============ 
खरेदी-विक्रीचे व्यवहार 
वृषभ :
मृग नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह पर्वणीसारखा. ता. २५ ते ता. २७ हे दिवस विलक्षणच. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. नोकरीच्या मुलाखतींना यश. गुरुवार भाग्योदयाचा. शनिवारी चीजवस्तू हरवण्याची शक्यता. घराच्या किल्ल्या जपा. 
============ 
नोकरीत बढतीचा योग 
मिथुन :
हा सप्ताह शुभ नक्षत्रातील शुक्रभ्रमणातून अतिशय शुभलक्षणी. नोकरीत प्रशंसा होईल. बढतीचा मार्ग मोकळा होईल. ता. २६ व २७ हे दिवस पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना भावमधुर क्षणांचं पॅकेज घेऊन येणारे. पुत्रोत्कर्ष होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची अमावास्या शारीरिक वेदनेतून बेरंगाची. अंधारात काळजी घ्या. 
============ 
कोर्टप्रकरणात यश येईल 
कर्क :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा हा सप्ताह तुम्हाला ठिकठिकाणी अडखळायला लावणारा. एखादं नुकसानीचं भय सतावेल. सतत विचित्र माणसं भेटतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना प्रकृतिअस्वास्थ्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार वैयक्तिक सुवार्तांचा. एखादं कोर्टप्रकरण जिंकाल. 
============ 
विदेशव्यापारात यश 
सिंह :
आजच्या अमावास्येजवळचा वक्री बुध अनपेक्षित घटनांतून दिनक्रम विस्कटवणारा. काहींना वेदनायुक्त व्याधीतून त्रास शक्य. दंतव्यथा सतावू शकते. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभग्रहांच्या माध्यमातून क्‍लिक होणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीद्वारे परदेशगमनाचा योग. व्यावसायिकांना 
विदेशव्यापारात यश. कर्जवसुली होईल. 
============ 
मनासारखी कामं होतील 
कन्या :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात वक्री बुध खेळी करू शकतो. व्रात्यपणा टाळा. मित्रांशी गैरसमज होऊ देऊ नका. बाकी, चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २७ हे दिवस शुक्रभ्रमणातून ग्रास कोर्टचे! गाठी-भेटी प्रसन्न करतील आणि मनासारखी कामं होतील. मनाचे अँटिने स्वच्छ ठेवून प्रेमस्पंदनं खेचून घ्या! 
============ 
आरोग्याची काळजी घ्या 
तूळ :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा हा सप्ताह स्त्रीवर्गाला प्रतिकूलच. आरोग्यविषयक तक्रारींचा भर राहील. बाकी, सप्ताहाचा शेवट मोठ्या दिलखेचक यशस्वितेचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश लाभेल. नोकरीत बढतीचे योग. 
============ 
कौटुंबिक वाद टाळावेत 
वृश्र्चिक :
आजच्या अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात व्याधिग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी कौटुंबिक वाद टाळावेत. बाकी, ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस शुभग्रहांच्या मंत्रालयांतून कनेक्‍टिव्हिटीचे! व्यवसायात मोठे करारमदार होतील. गुरुवार विवाहयोगांचा. शनिवारी मोठी चैन-चंगळ आणि मौजमजा! 
============ 
नैराश्य दूर होईल 
धनू :
आजची अमावास्या दुखापतींची. रस्त्यांवर वावरताना काळजी घ्यावी. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येनंतर मोठे लाभ. कौटुंबिक सुवार्ता. खूप दिवसांपासूनचं नैराश्‍य जाईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शिक्षण, नोकरी वा विवाह इत्यादी संदर्भात ऑनलाईन क्‍लिक होणारा! शनिवारी श्‍वानांपासून जपा. 
============ 
संशयास्पद व्यवहार टाळा 
मकर :
आजच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र काहींच्या मानसिक गोंधळात वाढ करणारं. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात वैद्यकीय खर्चाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, सप्ताहाचा शेवट शुक्राच्या राश्यंतरातून तात्काळ फलदायी होणारा. शुक्रवारी मोठ्या सुवार्ता मिळतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
============ 
कामं मार्गी लागतील 
कुंभ :
राशीतील अमावास्या शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना उपद्रवकारक ठरू शकते. माणसांच्या सहवासातून त्रास होण्याची शक्यता. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येनंतर मोठे लाभ. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. कामं मार्गी लागतील. परदेशी व्हिसा मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात बेरंगाचा. सूर्योदयी काळजी घ्या. 
============ 
व्यावसायिक प्राप्तीचा काळ 
मीन :
आजच्या अमावास्येनंतर रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची घोडदौड सुरू होईल. ता. २५ व २६ हे दिवस व्यावसायिक प्राप्तीचे. प्रवासातील कामं होतील. घरात मंगलकार्यं ठरतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उत्सव-समारंभाचा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची अमावास्या चोरी-नुकसानीची.