जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 24 ते 30 नोव्हेंबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 24 ते 30 नोव्हेंबर

कमलनयन व्हा! 
सृष्टी हे एक निखळ असं सौंदर्य आहे. अर्थात हे सौंदर्य ईश्वरीयच म्हणावं लागेल. माणसाचं पाहणं आणि ऐकणं ज्या वेळी जन्मतं, त्या वेळी ते सृष्टीच्या सौंदर्याकडे कुतूहलानं पाहतच उमलतं असं म्हणावं लागेल. सहजता हेच सृष्टीमधलं सौंदर्य होय. सृष्टीला सौंदर्यासाठी अलंकार घालावे लागत नाहीत! माणूसच ज्या वेळी अलंकारांचं ओझं घेऊन वावरायला लागतो त्या वेळी तो आपल्या अंगावरचे अलंकार तेवढे सांभाळायला लागतो आणि मग तो आपल्यातलं खरं सौंदर्य गमावून बसतो. वस्तुतः माणसाच्या सौंदर्यामुळे अलंकार शोभून दिसत असतात. उलटपक्षी, अलंकारांचं सौंदर्य माणसाच्या सौंदर्यावर अवलंबून असतं. 

देव आणि देवत्व एकच असतं. देवाचं सौंदर्य हेच देवत्व होऊन श्रृंगार करत असतं. सृष्ट, दृष्ट आणि अदृष्ट हे एकच असतं. सृष्टीचं सृजन करणारा द्रष्टा हा सृष्टीच्या सौंदर्याच्या अनुभूतीचंच दर्शन घेऊन तृप्ती अनुभवतो. असा सृष्टीच्या सौंदर्याची अनुभूती घेणारा माणूसच खरी देवदीपावली साजरी करू शकतो! 

ज्योतिष हे ईश्‍वराचं सौंदर्य आहे, त्यामुळेच त्याला ज्योतिष असं म्हणतात. माणूस ज्या वेळी सृष्टीचं सौंदर्य अव्हेरतो त्या वेळीच तो कमलनयन न होता चिखलातला बेडूक होतो! माणसाचे नयन संसाराच्या भोगासक्त दलदलीतून ज्या वेळी कमळासारखे बाहेर डोकावतात म्हणा किंवा उमलतात म्हणा, त्याच वेळी ते नयन सृष्टीच्या खऱ्या सौंदर्यानं दिपतात आणि तो माणूस कमलनयन होतो. 

मित्र हो, या सप्ताहात देवदीपावली सुरू होत आहे. मूळ नक्षत्र हे सुलोचन नक्षत्र आहे. अशा या सुलोचन नक्षत्रात सप्ताहात गुरू-शुक्र युतियोग होत आहे, त्यामुळेच या देवदीपावलीला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. ‘सृष्ट, दृष्ट आणि अदृष्ट मीच आहे,’ याचा दाखला भगवंत भगवद्‌गीतेत सतत देत असतात म्हणा किंवा दाखवत असतात म्हणा, थोडक्यात, आपली दृष्टी सुधारली की आपला उपनयनसंस्कार होऊन आपण कमलनयन होत, भगवंतांचं सौंदर्य अंतर्यामी अनुभवत असतो आणि हीच ती खरी देवदीपावली होय! 
=========== 
पंचमहाभूतांशी खेळू नका! 
मेष :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात मंगळ-हर्षल योगाची दहशत राहू शकते! पंचमहाभूतांशी खेळू नका. खलनायकांशी हुज्जत नको. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र शुभयोगांतून संकटकालीन रसद पुरवली जाईल. तुमच्या राशीसाठी गुरुवार ‘द बेस्ट’! प्रसन्न राहाल. 
=========== 
धावपळीचा प्रवास टाळावा 
वृषभ :
कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात मंहळ-हर्षल योगाच्या झळा पोचतील. कोणतंही निमित्त होऊ देऊ नका. हा सप्ताह म्हणजे ‘नो स्मोकिंग झोन’ आहे असंच समजा! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी धावपळीचा प्रवास टाळावा. घरातल्या व्रात्य मुलांना सांभाळा! 
=========== 
गॉसिपिंग अजिबात नको 
मिथुन :
गुरू-शुक्र योगातून यंदाची देवदीपावली तुम्हाला आत्मप्रचीती देणार आहे. तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात राज्याभिषेक होईल. मात्र, सतत सतसंग ठेवा. नका करू गॉसिपिंग. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात टवाळखोरांपासून काळजी घ्या. प्रेमाचे चाळे नकोत! 
=========== 
सरकारी कामं मार्गी लागतील 
कर्क :
मंगळ-हर्षल योगामुळे तुमची रास लक्ष्य होऊ शकते. अमावास्येच्या आसपासच्या काळात भाव-भावनांवर ताबा ठेवा. त्या कल्लोळांतून सावरा. ता. २४ ते २६ या दिवसांवर आजूबाजूच्या नतद्रष्ट व्यक्तींचं नियंत्रण राहील. काळजी घ्या. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी नोकरीसंदर्भात भाग्यसंकेत मिळतील. सरकारी कामं मार्गी लागतील. 
=========== 
एकतर्फी प्रेमात अडकू नका! 
सिंह :
गुरू-शुक्र शुभयोगाच्या पार्श्‍वभूमीवर देवदीपावली साजरी करणारी रास. अतिशय प्रसन्न राहाल. घरातल्या तरुणांची विवाहकार्यं ठरतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ या दिवशी अद्वितीय शुभफळं मिळतील. मार्गशीर्ष जीवनात उत्तमरीत्या मार्गस्थ करणारा. मात्र, एकतर्फी प्रेमात अडकू नका. चॅटिंग टाळा! 
=========== 
प्रिय व्यक्तींशी वाद टाळा 
कन्या :
अमावास्येचं प्रभावक्षेत्र तुम्हाला जागरण करायला लावेल. काहींची अनपेक्षित घटनांमुळे धावपळ होईल. मंगळ-हर्षल योगामुळे प्रिय व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. संयम बाळगा. बाकी, ता. २८ व २९ हे दिवस उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभदायी. नोकरीतला भाग्योदय तुम्हाला थक्क करून जाईल! बलवत्तर विवाहयोग. 
=========== 
नोकरीत आनंददायक घटना 
तूळ :
अमावास्येचं प्रभावक्षेत्र मंगळ-हर्षल योगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्रच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींवर विशिष्ट नुकसानीचं सावट राहील. घरातल्या विवाहेच्छूंच्या प्रश्नातून त्रास होण्याची शक्यता. ता. २८ व २९ या दिवशी गुरू-शुक्र शुभयोगाची सुरावट राहील. नोकरीतल्या घटना नैराश्‍य घालवतील. 
=========== 
व्यवसायात मोठे लाभ 
वृश्‍चिक :
राशीतली अमावास्या अतिशय दखलपात्र. एकूणच, ता. २४ ते २६ हे दिवस हर्षल ग्रहाच्या द्रुत गोलंदाजीचे! नका मारू फटके. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे दिवस गुरू-शुक्र योगातून अतिशय शुभलक्षणी. व्यवसायात मोठे लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी खलनायकाकडून त्रास शक्य! 
=========== 
वृद्धांची काळजी घ्या 
धनू :
हा सप्ताह अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्रहमानाचा. अमावास्या तीर्थाटनाची. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात घरातल्या वृद्धांची काळजी घ्या. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ या दिवशी शुभग्रहांच्या पार्श्वभूमीवर विलक्षण अनुभव येतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी विचित्र अस्वस्थतेला सामोरं जावं लागण्याची शक्यता. 
=========== 
मित्रांशी वाद घालू नका 
मकर :
हा सप्ताह अतिशय संमिश्र स्वरूपाचा. मंगळ-हर्षल योगाचं समीकरण मोठं विचित्र राहील. असंगाशी संग नको. आई-वडिलांची मनं सांभाळा. अमावास्येच्या आसपासच्या काळात मित्रांशी मोठे वाद होऊ शकतात. भावनांवर ताबा ठेवा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची अपत्यचिंता ता. २८ व २९ रोजी दूर होईल. धनचिंता जाईल. 
=========== 
वादग्रस्त मुद्दे हाताळू नका 
कुंभ :
गुरू-शुक्र योगाचं पर्व देवदीपावली साजरी करणारं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे दिवस मोठ्या यशाचे. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात वादग्रस्त मुद्दे हाताळू नका. नोकरीत वरिष्ठांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार कटकटींचा जाण्याची शक्यता. वृद्धांशी मतभेद होऊ शकतात. 
=========== 
गैरसमज होऊ देऊ नका 
मीन :
गुरू-शुक्र योगाची पार्श्‍वभूमी साह्यकारक राहील. मात्र, अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातले वादविवाद टाळावेत. नवपरिणितांनी गैरसमज होऊ देऊ नयेत. बाकी, ता. २८ व २९ हे दिवस अतिशय शुभलक्षणी. संकट दूर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com