esakal | जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 25 ते 31 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

भगवद्गीतेत संसाराचा एक अश्‍वत्थवृक्ष कल्पिलेला आहे. माणूस नावाचा पंचभौतिक बुडबुडा या ‘ऊर्ध्वमूल’ असलेल्या अश्‍वत्थाचा आधार घेत वर किंवा खाली या वृक्षावरच पालवत किंवा सुकत असतो. देव, मनुष्य किंवा राक्षस या परिपक्व जाणिवा या वृक्षावर सतत वर किंवा खाली - पृथ्वी हा मध्य धरूनच - अवतरत असतात. एकूण काय तर, देव आणि राक्षस यांचे जन्म या पृथ्वीवरच जगलेले, जगवलेले आपण पाहिले आहेत. यावरून माणसाचा जन्म किती थोर आहे हे आपल्या लक्षात येईल.

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 25 ते 31 ऑगस्ट

sakal_logo
By
श्रीराम भट

बैलपोळ्याचा सूचक संदेश! 
स्वर्ग, पृथ्वी (मृत्यू), पाताळ अशा लोकांतून जाणिवांचा एक खेळ या विश्‍वात अखंडपणे सुरू असतो. अर्थातच हा खेळ एका कल्पनेच्या विश्‍वात दंग असतो आणि या खेळालाच माया असं म्हटलं जातं. विशिष्ट भूमिकेची कल्पना घेऊन पृथ्वीवर अवतरलेली जीवनात्मक जाणीव चैतन्याचा फक्त आधार घेत आपली एक भूमिका या पृथ्वीनामक भूमीवर रुजवत असते किंवा निभावत असते म्हणा! जडत्वाला जगवणारी पृथ्वीमाता ही एक अजब जन्मभूमी आहे. या जननी असलेल्या जन्मभूमीला स्वर्गाहून श्रेष्ठ मानलं जातं. जडत्वाला चेतवणारी ही चैत्यभूमी पृथ्वीमाता सगुणाचा अलंकार धारण करत निर्गुणाचं ध्यानमंदिर बांधते! किंवा मूर्ताकडून अमूर्ताला आळवते! 

भगवद्गीतेत संसाराचा एक अश्‍वत्थवृक्ष कल्पिलेला आहे. माणूस नावाचा पंचभौतिक बुडबुडा या ‘ऊर्ध्वमूल’ असलेल्या अश्‍वत्थाचा आधार घेत वर किंवा खाली या वृक्षावरच पालवत किंवा सुकत असतो. देव, मनुष्य किंवा राक्षस या परिपक्व जाणिवा या वृक्षावर सतत वर किंवा खाली - पृथ्वी हा मध्य धरूनच - अवतरत असतात. एकूण काय तर, देव आणि राक्षस यांचे जन्म या पृथ्वीवरच जगलेले, जगवलेले आपण पाहिले आहेत. यावरून माणसाचा जन्म किती थोर आहे हे आपल्या लक्षात येईल. शाप, शपथ आणि वरदान पूर्णत्वाला नेण्यासाठी पृथ्वी हाच आधार आहे. त्यामुळेच देव-दानवांची युद्धं पृथ्वीवर खेळली जातात. 

पृथ्वी हे असं एक क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये जीव हा इंद्रियरूपी बैलाकडून नांगरट करवून घेऊन सत्त्व-रज-तमात्मक वृत्ती पेरत फळाची अपेक्षा करतो! बल आणि बैल यांचा अगदी जवळचा संबंध आहे. आपली इंद्रियरूपी बैलांची जोडी सात्त्विक वृत्तीच्या लागवडीसाठी जुंपली पाहिजे. तरच आपल्याला तेजसंपदेचा अर्थातच गायत्रीचा लाभ होऊ शकतो, असंच काही दिव्याची अमावास्या सांगत असते!  मित्र हो, त्यामुळेच या सप्ताहात तेजसंपदेच्या प्राप्तीसाठीच बैलपोळा साजरा करा! 

चमत्कार घडून येतील! 
मेष : या सप्ताहाचा सूर अतिशय सुसंगत असेल. राशीचा हर्षल मंगळ-शुक्र सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे चमत्कार घडवून आणेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठं पॅकेज मिळणार आहे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र व्यावसायिक संदर्भातून उत्तम क्‍लिक होईल. परदेशी व्यापाराची संधी. 
======= 
विवाहप्रस्तावांकडं लक्ष द्या 
वृषभ : अतिशय उत्तम सप्ताह. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २६ व २७ हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. विवाहप्रस्तावांकडं लक्ष द्या. ज्योतिष बाजूला सारा! मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा या सप्ताहात पूर्ण होतील. गॉडफादर भेटेल! 
======= 
संधींच्या श्रावणसरींचा सप्ताह 
मिथुन : या सप्ताहात संधींच्या श्रावणसरी बरसणार आहेत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवनातले सिक्वेन्स लागतील. ता. २६ व २७ हे दिवस मंगळ-शुक्र या ग्रहांच्या पॅकेजचे. जीवनातले शॉर्टकट्स‌ यशस्वी होतील. गुंतवणुकीतून लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुवारी गुरुकृपा होईल. मुला-बाळांचा भाग्योदय. 
======= 
नोकरीतली अडचण संपेल 
कर्क : सप्ताहात गुरुभ्रमणाचा उत्तम प्रभाव दिसून येईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या सुरवातीला मोठे भाग्यसंकेत मिळतील. नोकरीतली अडचणीची परिस्थिती जाईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना पिठोरी अमावास्या शुभदायक. श्रीगणेशाच्या आगमनाच्या काळात एखादा वैयक्तिक भाग्योदय होईल. गणेशोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात कराल. 
======= 
संधीसाठी दबा धरून बसा! 
सिंह : या सप्ताहात जीवनातले प्युअर सीक्वेन्स लागतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर वधारेल. स्त्रीवर्गाकडून लाभ होतील. अर्थात, देवता तुमच्यावर प्रसन्न राहतील. ता. २६ व २७ हे दिवस प्रचंड उसळी घेणारे. संधीसाठी दबा धरून बसा...कारण, तुम्ही सिंह आहात! अमावास्येच्या आसपासच्या काळात प्रिय व्यक्तींचा सहवास. 
======= 
नोकरीत भाग्ययोगाचे संकेत 
कन्या : शुभ ग्रहांच्या श्रावणसरी तुमच्यावर बरसतीलच; परंतु सार्वजनिक ठिकाणी सावधान! पर्स सांभाळा. बाकी, चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस अतिशय प्रसन्नतेचे. नोकरीत भाग्ययोगाचे संकेत. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती चैनीवर उधळण करतील. प्रेमिकांच्या गुप्त भेटी-गाठी होतील! 
======= 
व्यवसायात तेजी येईल 
तूळ : या सप्ताहात अनेक शुभ लाभ होतील. व्यावसायिक करारमदार होतील. व्यावसायिक तेजी उसळी घेईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी व विवाह आदी घटकांसंदर्भात हा सप्ताह अतिशय शुभदायी. सतत ऑनलाईन राहा! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग. दृष्टान्त होतील! 
======= 
नोकरीचं बोलावणं येईल 
वृश्‍चिक : हा सप्ताह विशिष्ट ऐतिहासिक फळं देईल. अनेकांचं ‘खुल जा सिम् सिम्‌’ होईल! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासचा काळ घबाडयोगासारखी फळं देईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारचा सूर्योदय गुरुकृपेचा. नोकरीचं बोलावणं येईल. संतकृपा होईल. 
======= 
हितशत्रूंच्या कारवाया थांबतील 
धनू : सप्ताहातलं ग्रहमान मोठी अजब फळं देईल. ता. २६ व २७ हे दिवस विशिष्ट हुकमी यश देणारे! व्यावसायिक कौशल्य यशस्वी होईल. राजकारणी व्यक्तीला वश कराल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र नोकरीतल्या शुभ लक्षणांचं. हितशत्रूंच्या कारवाया बंद होतील. 
======= 
महिलांनी पर्स सांभाळाव्यात 
मकर : हा सप्ताह अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात संमिश्र स्वरूपाची फळं देऊ शकतो. महिलांनी पर्स सांभाळाव्यात. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायासंदर्भात हा सप्ताह अत्युत्तम. गुरुवार वैयक्तिक सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा चैनीवर मोठा खर्च होईल. मुला-बाळांचे विवाह ठरतील. 
======= 
परीसस्पर्श अनुभवाल! 
कुंभ : शुभ ग्रहांची स्पंदनं खेचणारी रास! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती परीसस्पर्श अनुभवतील. ता. २६ व २७ या दिवशी व्यावसायिक भाग्यबीजं पेरली जातील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मोठ्या संधी. चॅटिंगमधून स्वप्नं रंगवाल! अमावास्येचं प्रभावक्षेत्र मदनबाणातून घायाळ करणारं! 
======= 
अचानक धनलाभ होईल 
मीन : सप्ताहाची सुरवात प्रसन्न, उबदार वातावरणात होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. विवाहेच्छूंचं मंगल होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचा योग! गुरुवारचा सूर्योदय पुत्रोत्कर्षाचा. अमावास्येच्या आसपासच्या काळात पाकीट सांभाळा. स्त्रीचं संमोहन टाळा.