esakal | साप्ताहिक राशिभविष्य (२५ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१)

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य (२५ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१)
sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

विश्‍वाच्या पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीहनुमान!

या सृष्टीची एक घटना आहे आणि ही घटना निश्‍चितच एका सत्यावर आधारित आहे. यालाच अध्यात्मात आत्मसत्य म्हणतात! ज्याला ‘सत्य’ माहीत नाही त्याला आत्मसत्य हा शब्द समजायला अवघडच जाणार! माणसाचा आत्मा आहे तसाच सृष्टीचा एक आत्मा आहे. त्यालाच परमात्मा म्हणतात. सर्व पंचमहाभूते आणि त्यांच्या देवता या सृष्टीमध्ये अखंड एक अधियज्ञ चालू ठेवत असतात. त्यामुळेच या सृष्टीचा एक प्राण जपला जातो. यालाच तुम्ही प्राणवायू म्हटलंत तरी चालेल. कारण हा सध्याचा कोरोना सृष्टीतील प्राणवायूच्या दुर्भिक्षातून माणसाला कासावीस करत आहे.

चैत्री पौर्णिमा हनुमान जयंतीच्या अनुषंगानं साजरी केली जात असते. हृदयाचा आत्माराम जाणणारे हनुमान सत्यवचनी रामचंद्रांचे परमभक्त होते. किंबहुना आम्ही असं म्हणू, की सृष्टीतील परमसत्य जाणून कसे घ्यावे यासाठीच हनुमानाचा जन्म झाला. सृष्टीतील पंचमहाभूतांची घटना एका परम सत्यावर आधारित आहे आणि त्यामुळेच ही पंचमहाभूते पृथ्वीवर चैत्री पुनव हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत साजरी करत असतात! सत्याचा शोध घेणारा तोच माणूस म्हटला पाहिजे. तोच हनुमानासारखा रामभक्त होऊ शकतो. पंचमहाभूते आत्मनिष्ठ हनुमानाशी एकनिष्ठ असतात. कलियुगातला माणूस हा पंचमहाभूतांच्या देहाचा आश्रय घेऊन सतत सृष्टीचा घटनाद्रोह करत असतो. यालाच पाप किंवा प्रमाद म्हणतात. मित्रहो, पापविमोचनासाठी हनुमानाची भक्ती करतात हे आपणास माहीत असेलच. यंदाची ता. २७ एप्रिलची हनुमान जयंती अलौकिकच म्हणावी लागेल. या चैत्री पौर्णिमेला चंद्र पृथ्वीजवळ असेल. शिवाय वायूतत्त्वाशी संबंधित हर्षल ग्रह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात ग्रहयोगांतून शक्तिमान राहील. त्यामुळेच यंदाच्या हनुमान जयंतीला हनुमानाचे स्मरण करत आपल्याकडून झालेला निसर्गाचा घटनाद्रोह कळवळून प्रार्थना करून सत्यनिष्ठ हनुमानाकडून माफ करून घेऊन प्राणवायू घेऊन प्राण वाचवू या !

नाविन्यपूर्ण कालखंड, चमत्कारांचा अनुभव

मेष : चंद्रकलांचा मोठा उत्कर्ष राहील. ता. २६ व २७ हे पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील दिवस आपल्या राशीस नावीन्यपूर्णच! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी वा विवाह इत्यादी घटनांतून चमत्कार घडविणारे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात दुखापती जपाव्यात. ता. ३० चा शुक्रवार आपल्या राशीस एकूणच बेरंगाचा. अग्निभय.

नोकरीत बढती, मानसन्मानाचे दिवस

वृषभ : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात निश्‍चितच आचारसंहिता पाळावयास लावणारा. घरातील लहान मुलं सांभाळा. विद्युत उपकरणं जपा. बाकी सप्ताह रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घटनांतून प्रसन्न ठेवेल. वैवाहिक जीवनातून छानच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २९ व ता. ३० हे दिवस मानसन्मानाचे. शैक्षणिक उत्कर्ष. नोकरीत बढती.

स्थावरविषयक व्यवहार जपून करा

मिथुन : यंदाची हनुमानजयंती मोठ्या चंद्रबळाची. अनेकांना आध्यात्मिक प्रचिती देणारी. ध्यानमग्न राहाच. बाकी पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह एकूणच आत्मनिर्भर करणारा. नोकरी-व्यावसायिक मार्गनिश्‍चिती होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेजवळ विशिष्ट बाजी मारतील. मात्र सप्ताहात सट्टेबाजी किंवा जुगार टाळा. स्थावरविषयक व्यवहार जपून!

सप्ताह एक पर्वणी ठरेल

कर्क : राशीच्या दशमस्थ ग्रहांची मांदियाळी पौर्णिमेजवळ अतिशय प्रभावी राहील. राजकारणी मंडळींनी वक्तव्यातून जपावं. एखादा पतप्रतिष्ठेचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. बाकी होतकरू तरुणांना सप्ताह एक पर्वणी राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती बाजी मारतील. ता. २८ व २९ हे दिवस मोठे सुवार्तांचे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुक्रवार धडपडण्याचा. संध्याकाळी वाद टाळा.

संधीची वाट पहा, लाभ होईल

सिंह : पौर्णिमेचं उधाण आपणास काही भव्यदिव्य लाभ करून देईल. संधींवर दबा धरून बसाच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा राज्याभिषेक होईल. ता. २६ ते २८ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी डोक्‍याच्या दुखापती जपाव्यात. बाकी सप्ताहात लोकांवर जरब बसवाल. मात्र वैवाहिक जीवनात नव्हे!

सरकारी कामे होतील

कन्या : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र हाय व्होल्टेजचेच! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी वेंधळेपणा टाळावा. स्त्रीवर्गाने रागावर कंट्रोल ठेवावा. अर्थातच शॉर्ट सर्किटपासून सावध. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ व २९ हे दिवस व्यावसायिक लाभ देतील. चित्रा नक्षत्रास वसुलीतून लाभ. सरकारी कामे होतील . पुत्रचिंता जाईल.

आर्थिक कोंडी फुटेल

तूळ : यंदाची हनुमान जयंती ग्रहयोगांतर्गत ऐतिहासिकच ! स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं फिल्ड वैयक्तिक उपक्रमांना वा विशिष्ट प्रयत्नांना प्रतिसाद देईल. आर्थिक कोंडी फुटेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोगाची संधी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोर्टप्रकरणं उद्‌भवू देऊ नयेत. राजकारण्यांशी संपर्क नको.

दैवी चमत्काराचा अनुभव येईल

वृश्‍चिक : पौर्णिमेचं फिल्ड उच्च दाबाचेच ! सावध राहा. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक आचारसंहिता पाळा. बाकी पौर्णिमेचा सप्ताह तरुणांना विशिष्ट ओळखी-मध्यस्थींतून लाभ देणारा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दैवी चमत्कार थक्क करतील. ता. २८ व २९ हे दिवस भाग्यबीजं पेरणारे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून सुवार्ता.

कार्यक्षेत्रात दबदबा वाढणार

धनु : आपली गुरूची रास पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात वर्चस्व गाजवेल. सप्ताहातील रवी-हर्षल योग परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय करेल. पौर्णिमेच्या प्रभावात म्हणजेच ता. २६ ते २८ हे दिवस हुकमी सीक्वेन्स लावतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना बोनस शेअर मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना राज्याभिषेक योग! एकूणच दबदबा वाढेल.

व्यावसायिक तेजीतून लाभ

मकर : बुध-शुक्र सहयोग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात चांगलाच सुगंध पसरवेल. अर्थातच मास्क लावूनही वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ ओळखीतून विवाहयोग. ज्योतिष बाजूला ठेवा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळातून सप्ताह व्यावसायिक तेजीतून लाभ देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी हातापायाच्या दुखापती जपाव्या.

नोकरीच्या ठिकाणी प्रभाव वाढेल

कुंभ : राशीच्या गुरूच्या अधिष्ठानातून होणारी पौर्णिमा चंद्रकलांचा परमोत्कर्ष करणारी. सद्‌भक्तांनी अवश्‍य लाभ करून घ्यावा. शततारका नक्षत्राच्या तरुणांना ही पर्वणीच राहील. पौर्णिमेजवळ होतकरू तरुणांचे भाग्योदय. प्रेमिकांनो घ्या धाडसी निर्णय ! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २९ चा गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. नोकरीतील वर्चस्व वाढेल.

दाम्पत्यास भाग्योदयाचा कालखंड

मीन : बुध-शुक्राचा सहयोग आणि चंद्रबळ आपले सहजीवन कोरोनाच्या काळातही आनंदी ठेवेल. मात्र सप्ताहात पौर्णिमेजवळ स्त्रीवर्गानं भाजण्या-कापण्यापासून जपावं. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ व ३० हे दिवस पती वा पत्नीच्या भाग्योदयाचे. रेवती नक्षत्रास सप्ताहाचा शेवट छप्पर फाडके देणारा