esakal | जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 29 मार्च ते 4 एप्रिल
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 29 मार्च ते 4 एप्रिल

शनी ही एक चिंता आहे आणि मंगळ हा मन, बुद्धी, अहंकार यांच्या प्रक्षोभातून बाहेर पडणारा एक अंगार आहे. माणसाचं जीवन म्हणजे वरील त्रिविध तापांना सांभाळत केलेला अस्तित्वाचा लढाच होय.

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 29 मार्च ते 4 एप्रिल

sakal_logo
By
श्रीराम भट

पराधीन आहे  जगती पुत्र मानवाचा!
शनी आणि मंगळ हे ग्रह आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध तापांशी संबंधित आहेत.

नाना चिंतेची काळजी। नाना दुःखे चित्त पोळी।।
व्याधीवाचून तळमळी। या नाव आध्यात्मिक।।
बुडत बुडत वाचता। या नाव आधिभूतिक।।
पृथ्वीमध्ये भार नाना। त्याहून कठिण येमयातना।।
मरिता उसंतचि असेना। या नाव आधिदैविक।।
- संत रामदासस्वामी

शनी ही एक चिंता आहे आणि मंगळ हा मन, बुद्धी, अहंकार यांच्या प्रक्षोभातून बाहेर पडणारा एक अंगार आहे. माणसाचं जीवन म्हणजे वरील त्रिविध तापांना सांभाळत केलेला अस्तित्वाचा लढाच होय. असे हे माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित असलेले शनी-मंगळ भारताच्या मकर राशीत एकत्र येत आहेत. ता. ३१ मार्च २०२०च्या आर्थिक वर्षअखेरीस या शनी-मंगळाची युती होत आहे. असा हा आर्थिक वर्षअखेरीस जाहीर होणारा या शनी-मंगळाचा ताळेबंद काही वेगळाच आहे असं म्हणावं लागेल. माणूस आपलं मानसिक-शारीरिक आणि बाह्य व्यावहारिक अस्तित्व टिकवून ठेवण्याचा, जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं मन आणि शरीर सांभाळत बाह्य वातावरणाशी ताळमेळ साधत माणूस आपलं जीवन अक्षरशः कंठत असतो असंच म्हणावं लागेल. यंदाची गुरुपुष्यामृत योगावरची ता. दोन एप्रिल रोजी होणारी रामनवमी एक गूढ संदेश देत आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरं!

दिसेल तितुके नासेल। उपजेल तितुके मरेल।। 
रचेल तितुके खचेल। वाढेल तितुके मोडेल।। 
येईल तितुके जाईल। भूतांस भूत खाईल।।
कल्पान्तकाळी ।।
- संत रामदासस्वामी

प्रवास करू नका!
मेष :
या सप्ताहात गुरूचं राश्यांतर शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तारकच राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींवरचं संकट टळेल. घरातल्या सदस्यांविषयीच्या सुवार्ता प्रसन्नतेचा अनुभव देतील. सध्या कुठंही प्रवास वगैरे करू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीच्या आसपास मोठे लाभ. व्यावसायिक वसुली होईल.

व्यवसायात मोठे लाभ
वृषभ :
भाग्यातील गुरूचं आज होणारं आगमन रामनवमीचा सप्ताह गाजवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट यश मिळवून लक्ष वेधून घेतील. हा सप्ताह तुम्हाला ऑनलाईनच क्लिक होणारा! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठे लाभ. मोठी उलाढाल. प्रेमप्रकरण बहरेल. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय.

खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन :
शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर एखादी गुप्त चिंता सतावेल. व्याधीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना हाता-पायाची दुखापत शक्य. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्राकडून विचित्र त्रासाची शक्यता. काहींना भागीदारीच्या प्रश्नातून त्रास. ता. तीन एप्रिलला विचित्र खर्च शक्य. पैशाचं पाकीट जपा.

नोकरीत राजकारण नको
कर्क :
शनी-मंगळ युतीयोगाचं फील्ड तुम्हाला निरनिराळ्या सापळ्यांत अडकवू शकतं. प्रलोभनं टाळा. नोकरीत गैरसमज होऊ देऊ नका. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येत आहेत. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडा. बाकी, शुक्रभ्रमण तरुणांना उत्तमच. ओळखीतून नोकरी. व्यावसायिकांना मोठा लाभ. 

नोकरीत नवं पद मिळेल
सिंह :
सप्ताहातील शनी-मंगळाचं फील्ड स्पीडब्रेकर लावणारं. विचित्र अडथळे येतील. काहींना कायदेशीर त्रुटीमुळे त्रास शक्य. बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्ती दशमस्थ शुक्रभ्रमणाचा उत्तम लाभ घेणार आहेत. नोकरीत एखादं पद चालून येईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमप्रकरणातील घोळ अस्वस्थ करेल.

ओळखी-मध्यस्थीतून लाभ
कन्या :
 आज गुरूचं राश्यांतर तरुणांना मानांकन देणारं. नोकरीत स्थिर व्हाल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांच्या ओळखी-मध्यस्थीतून अपूर्व लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस जल्लोषाचा. मोठे व्यावसायिक लाभ होतील. प्रेमात पडाल!

शंकास्पद व्यवहार करू नका!
तूळ :
हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर कडक फील्डिंगचा. शंकास्पद व्यवहार करू नका. चोरट्या धावा काढू नका! शनी-मंगळ युतीमुळे चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य ठरू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी नमतं घ्या. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी चीजवस्तू जपाव्यात.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ
वृश्चिक :
रामनवमीचा हा सप्ताह शुभ ग्रहांच्या सुरावटीचा आणि तरुणांना ऑनलाईन क्लिक होणारा! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. घरातील तरुणांचा उत्कर्ष. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. सरकारी अनुदान मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमी हृद्य क्षणांची.

घरातील वृद्धांची काळजी घ्या
धनू :
 हा सप्ताह शनी-मंगळ युतीयोगाच्या राजवटीचा. संभाव्य गोष्टींचं भान ठेवून वागा. घरातील वृद्धांची काळजी घ्या. स्त्रीवर्गाचा गैरसमज होऊ देऊ नका. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तूविषयक कटकटींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीची संध्याकाळ सुवार्तांची. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.

शॉर्टसर्किट होऊ देऊ नका!
मकर :
आज गुरू तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. या गुरुभ्रमणाच्या आगामी काळात शुक्रभ्रमण उत्तम साथ देईल. शनी-मंगळ युतीचं फील्ड घरगुती वादासंदर्भात हाय होल्टेजचं! शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक तेजीचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

विषारी स्पर्धा टाळा
कुंभ :
सर्व मोठ्या ग्रहांचं व्होल्टेज तुमच्याबाबतीत वाढणार आहे. विषारी स्पर्धा टाळा. सर्जिकल स्ट्राईक ओढवून घेऊ नका! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी युद्धखोर प्रवृत्ती टाळावी. शुक्रभ्रमणाच्या तेजस्वितेमुळे घरात काही भावनिक अनुभव येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय प्रसन्नतेचा.

सरकारी बहुमान मिळेल
मीन :
या सप्ताहातील ही गुरुकृपांकित होणारी रास. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वलय प्राप्त होईल. थोरा-मोठ्यांबरोबर ऊठ-बस. पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवाल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना रामनवमीचा दिवस अतिशय शुभ. तरुणांना मोठ्या संधी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी बहुमान मिळेल. व्यवसायातील येणं वसूल होईल.