जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 3 ते 9 नोव्हेंबर

श्रीराम भट
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

माणसाचं मन, बुद्धी आणि त्यांना धरून असलेला अहंकार हे त्रिकूट किंवा मेतकूट मोठं अजब आहे! बुद्धीचं जाणणं असतं, त्यावर मनाचं देणं-घेणं असतं. इंद्रियांचा विषयरूप पेठा चव्हाट्यावर आणणारं मन सुख-दुःखाच्या कल्पनांचा चिवडा करतं आणि या चिवड्याची चव चाखणारा अहंकार सुखावत किंवा दुखावत असतो! 

गोवत्स होऊ या! 
माणसाच्या जीवनात पौर्णिमा-अमावास्या जशा अवतरतात तशीच एकादशीही अवतरते किंवा ती तशी अवतरली पाहिजे. अवतार आणि अवतरणं यांचा ईश्‍वरी संकेताशीच संबंध असतो. अष्टमी हा योगगर्भ आहे आणि एकादशी ही या योगगर्भाचं अवतरणं आहे. दिवाळीनंतरची अष्टमी आणि त्यानंतर येणारी प्रबोधिनी एकादशी हा माणसाच्या जीवनाचा योगमार्गच म्हणावा लागेल! 

माणसाचं मन, बुद्धी आणि त्यांना धरून असलेला अहंकार हे त्रिकूट किंवा मेतकूट मोठं अजब आहे! बुद्धीचं जाणणं असतं, त्यावर मनाचं देणं-घेणं असतं. इंद्रियांचा विषयरूप पेठा चव्हाट्यावर आणणारं मन सुख-दुःखाच्या कल्पनांचा चिवडा करतं आणि या चिवड्याची चव चाखणारा अहंकार सुखावत किंवा दुखावत असतो! 

कलियुगात माणूस आत आणि बाहेर पूर्णपणे वेगळा होऊन वावरत असतो आणि ही विसंगती हाच मोठा कलिदाह होय. हा दाह माणसाला क्षणोक्षणी पोळत-जाळत असतो. 
माणसाचं जग आणि माणसाचं जगणं यांच्यात असलेली ही विसंगती माणसाला सद्गती देऊ शकत नाही. माणसाला सद्गती मिळते ती अंतर्यामी प्रबोध झाल्यावरच. माणूस नावाच्या प्राण्याचा प्राणस्पंद आणि त्याला जाणणारी बुद्धी ज्या वेळी एकनिष्ठ होते त्या वेळीच माणसाचा प्राणस्पंद त्या एकच परमात्म्याचं एकायतन स्वीकारतो. अशी ही प्रबोध देणारी प्रबोधिनी एकादशी माणसाच्या जीवनात अवतरावी लागते. 

सुख-दुःखरूपी किचकट कर्मांचं जाळं विणणारं कलियुगातलं माणसाचं जीवन म्हणजे कर्मठांचं एक भयंकर मोठं कारागृह आहे. या कारागृहालाच फाईव्ह स्टार हॉटेल समजत सुखासीनतेचा आव आणत या कारागृहातलं आपलं कॉर्पोरेट लाईफ उपभोगणारा कलियुगातला माणूस जीवनातला योगगर्भ जाणणार तरी कसा! 

मित्र हो, गोमातेच्या मागून चालणारी आपली संस्कृती गायत्रीच्या तेजसंपदेचं अनुसरण करते. गाईचा श्‍वास किंवा प्राणस्पंद अतिशय शुद्ध असतो. तसाच तुळशीचाही! गायत्रीचा प्राणस्पंद गोवत्सांनाच जवळ करून आपली प्राणशक्ती देत यथेच्छ गोरसपान करू देतो. यंदाच्या गोपाष्टमीचा मुहूर्त साधत गुरू त्याच्या स्वराशीत अर्थातच धनू राशीत येत आहे. यंदाच्या गोपाष्टमीला आपण आपल्या गुरुमाउलीचं गोवत्स होऊ या आणि प्रबोधामृताचं गोरसपान करू या! 
।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।। 
========== 
वादग्रस्त येणं येईल 

मेष : या सप्ताहात भाग्यात येणारा गुरू अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना तत्काळ फलदायी होईल. ‘झाले मोकळे आकाश’ असा अनुभव येईल. ता. सहा व सात नोव्हेंबर हे दिवस भाग्य घेऊन येणारे. एखादं वादग्रस्त येणं येईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन. प्रेमविवाह होईल. 
========== 
मानसिक ऊर्जा मिळेल 

वृषभ : या सप्ताहात शुक्रभ्रमणाची विलक्षण अशी तेजस्विता राहील. मानसिक ऊर्जा मिळेल. भावविश्र्वातली माणसं भेटतील. व्यावसायिक तेजी अनुभवाल. ता. पाच ते सात हे दिवस अतिशय प्रवाही. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांमुळे लक्ष वेधून घेतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठे लाभ. 
========== 
आहार-विहारादी पथ्यं पाळा 

मिथुन : विलक्षण मानसिक अनुभूती देणारा कालखंड सुरू होत आहे. फक्त अनुभव घ्या! आहार-विहारादी पथ्यं पाळा. संतसंग ठेवाच. या सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच ते सात या कालावधीत मोठे व्यावसायिक लाभ अपेक्षित आहेत. सरकारी कामांचा पाठपुरावा कराच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या अपत्यांचा उत्कर्ष. 
========== 
प्रवासात काळजी घ्या 

कर्क : या सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचं चांगलंच पोषण होणार आहे. नवपरिणितांना कार्तिकी एकादशी मोठी भाग्यलक्षणी. पती-पत्नीचा भाग्योदय. काहींचे कौतुकसोहळे साजरे होतील. आश्र्ले‍षा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवास करताना काळजी घ्यावी. तरुणांना विवाहयोग आहे. नका घालू घोळ. 
========== 
गुणवत्ता सिद्ध होईल 

सिंह : या सप्ताहात तुमचं सौंदर्य खुलून दिसणार आहे. वैवाहिक जीवनात मांगल्य येईल. सहली-करमणुकीतून आनंद घ्याल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती दिवाळीतली राहिलेली मौज-मजा ता. पाच ते सात या कालावधीत पूर्ण करून घेतील. या सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा अश्‍वमेध यज्ञ सुरू होईल! तरुणांची गुणवत्ता सिद्ध होईल. 
========== 
गुंतवणुकींतून मोठे लाभ 

कन्या : या सप्ताहात एक प्रकारचं ग्रासकोर्ट राहीलच. कलाकारांना ग्लॅमर प्राप्त होईल. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांचा. विवाहस्थळांकडे लक्ष द्याच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं यशस्वी होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून मोठे लाभ. कोर्टप्रकरण जिंकाल. 
========== 
व्यवसायासाठीची कर्जमंजुरी 

तूळ : सध्या तुम्हाला ग्रह या ना त्या प्रकारे चांगलंच झुकतं माप देत आहेत. हा सप्ताह व्यावसायिकांची अपेक्षापूर्ती करणारा. व्यवसायासाठीचं कर्ज मंजूर होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ. ता. पाच ते सात हे दिवस अतिशय शुभदायी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांच्या मध्यस्थीतून लाभ. राजकारणात प्रवेश! 
========== 
कायदेशीर प्रश्‍न सुटतील 

वृश्र्चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात भावभक्तीचं आणि प्रेमाचं मोठं उबदार वातावरण राहील. ओळखी-मध्यस्थीतून मोठी कामं मार्गी लागतील. विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट, अर्थातच कार्तिकी एकादशीचा शुक्रवार, अपत्यांच्या उत्कर्षाचा. धनचिंता जाईल. 
========== 
नोकरीतला ताण संपेल 

धनू : राशीतल्या गुरूचं आगमन मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना तत्काळ फलदायी होणारं. तरुणांचं विशिष्ट स्वरूपाचं नैराश्‍य जाईल. नोकरीतला ताण संपेल. ता. पाच ते सात हे दिवस प्रत्येक वन डे जिंकून देणारे. मुलाखती, गाठी-भेटी वा करारमदार कराच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची एकादशी सूर्योदयी सुवार्तेची. 
========== 
व्यूहात्मक यश मिळेल 

मकर : हा सप्ताह श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय सुसंगत आणि प्रवाही राहील. राजकारणी व्यक्तींना व्यूहात्मक यश मिळेल. तरुणांनी हा सप्ताह वाया दवडू नये. विवाहस्थळं हेरावीत आणि फील्डिंग लावावी! धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची अपत्यचिंता जाईल. शनिवारी रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. 
========== 
नोकरीतलं वर्चस्व वाढेल 

कुंभ : या सप्ताहात तुमचा आवाका मोठा राहील. ता. पाच ते सात हे दिवस सतत यश देतील. सप्ताहात नोकरीतलं वर्चस्व वाढेल. घ्या फायदा करून! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती प्रकाशात येतील. हा सप्ताह प्रेमिकांनी निश्र्चितच प्रेमात पडण्याचा! लाजू नका. 
========== 
ग्रीन सिग्नल मिळतील! 

मीन : हा सप्ताह सुसंगत असा ट्रॅक पकडेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत ग्रीन सिग्नल मिळतील. सप्ताहाची सुरवात आणि शेवट उत्तमच. होतकरू तरुणांचे नोकरीचे प्रश्‍न सुटतील. कार्तिकी एकादशीला विजयोत्सव साजरा कराल. शनिवारी प्रवासात काळजी घ्या. 
========== 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekly horoscope 3 November to 9 November 2019