

कलाकारांचा भाग्योदय होईल
मेष : सप्ताहातील मंगळाचे होणारे राश्यांतर सप्ताह महत्त्वाच्या कामांतून गतिमानच करणारे. एकूणच आपल्या राशीस गुढीपाडव्याचा सप्ताह पर्वणीसारखाच. ता. १ ते ३ हे दिवस एप्रिल फूल करणारे नाहीतच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश देणारे. काहींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. भरणी नक्षत्रच्या व्यक्तींना अंगारक योगाचा मंगळवार बाजी मारून देणारा. कलाकारांचे भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा गुढीपाडवा तीर्थाटन घडवेल. विशिष्ट नवस पूर्ण कराल.
विवाहेच्छूंचे प्रश्न सुटतील
वृषभ : यंदाचा नवसंवत्सरारंभ शुभग्रहांच्या मांदियाळींतूनच बोलणारा. जीवनाविषयी सकारात्मकच राहा. घरातील परंपरा जपा. आजचा गुढीपाडवा या परंपरेचीच पावती देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात मोठे भावरम्य प्रसंग अनुभवतील आणि साठवतील. ता. ३ चा गुरुवार विशिष्ट हृदयशल्य घालवणारा. विवाहेच्छूंचे प्रश्न सुटतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह घरगुती पर्यावरण छानच ठेवेल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटींतून मन सतत प्रसन्न राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात चालताना भान ठेवावे. दुखापती जपाव्यात.
नोकरदारांची घुसमट थांबेल
मिथुन : सप्ताह आध्यात्मिक अनुभूती देणाराच ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाचा गुढीपाडवा संतसमागम घडवेल. सप्ताह नोकरदारांची घुसमट घालवेल. काहींना नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ चैनीवर खर्च करणारा. विशिष्ट सहली-करमणुकीचे योग. काहींचे महत्त्वाचे पत्रव्यवहार यशस्वी होतील. शिवाय विवाहेच्छूंनी सप्ताहात सतत ई-मेलचा पाठपुरावा करावा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अर्थातच नवसंवत्सरारंभ साधनेचे फळ पदरात टाकणारा.
तरुणांना अनुकूल कालखंड
कर्क : आजचा गुढीपाडवा शुभग्रहांच्या मांदियाळीतून बोलणारा. सप्ताहात सतत प्रिय व्यक्तींची भावस्पंदनेच अनुभवत राहाल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सरारंभाचा सप्ताह पूर्वसुकृत फळालाच आणणारा. ता. १ ते ३ हे दिवस शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून तरुणांना मोठे साथ देणारे. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पुत्रोत्कर्षातून धन्यता मिळेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सराचा सप्ताह जुन्या गुंतवणुकींतून फलदायी होईल. विशिष्ट मध्यस्थीचे व्यवहार यशस्वी होतील. वसुलीतून लाभ.
उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद मिळेल
सिंह : सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. प्रवासातील संसर्गापासून सांभाळा. अपरिचित व्यक्तींशी संवाद किंवा व्यवहार नकोतच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आचारसंहिता पाळावयासच लागेल. बाकी सप्ताहात शुभ ग्रहांचा एक विशिष्ट अंडरकरंट राहील. ता. २ ते ४ हे दिवस अर्थातच शुभ ग्रहांची उत्तम साथ देतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद मिळेल. नोकरीतील विशिष्ट नव्या घडामोडी नोकरीतील गुप्तचिंता घालवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वादविवादात मध्यस्थी टाळावी.
नोकरीत भरभक्कम पगारवाढ
कन्या : सप्ताहातील नवसंवत्सरारंभ शुभ ग्रहांच्या उत्तम पॅकेजमधूनच बोलेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनविषयक एक नवी दृष्टी मिळेल. वैवाहिक जीवनात एक नवी गुढी उभारली जाईल. आज सप्ताहात प्रिय व्यक्तींशी गैरसमज टाळा. विशेषतः प्रेमिकांनी दक्षता बाळगावी. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती ता. १ ते ३ या दिवसांत सतत विशिष्ट सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देतील. काहींना नोकरीत भरभक्कम पगारवाढ चकित करेल. चित्रा नक्षत्र व्यक्तींनी द्वाड मित्रसंगत टाळावी अर्थातच सहली-करमणुकीत.
शेअर बाजारात धाडस नको
तूळ : सप्ताहातील ग्रहसंगीत मोठे अपवादात्मकच वाटते. तरुणांनी अतिरेक टाळावा. घरातील वृद्ध मंडळींशी वाद टाळावेत. नवपरिणितांना आचारसंहिता पाळायला लागेलच. नोकरीत हाताखालची माणसे सांभाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून सप्ताह प्रदूषित वातावरणाचाच राहील. भागीदारीचे प्रश्न जपून हाताळा. उधार-उसनवारी जपूनच करा. शेअर बाजारात धाडस नको. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पुत्रचिंतेतून सोडवेल. विशाखा नक्षत्रच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सार्वजनिक जीवनात जपण्याचा.
व्यावसायिकांसाठी सुंदर पर्व
वृश्चिक : नवसंवत्सरारंभाचा सप्ताह एकप्रकारचे छानच संक्रमण करणारा ठरणार आहे. तरुणांना नोकरीत उत्तम स्थानापन्न करणारा सप्ताह. वैवाहिक जीवनात एक चांगली गुढी उभारली जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात ऐश्वर्यसंपन्नच होतील. स्वतंत्र व्यावसायिकांचे एक सुंदर पर्व सुरू होईल. काही व्यक्ती कर्जमुक्तीचा आनंद घेतील. ता. १ ते ३ हे दिवस वैयक्तिक मानसन्मानातून थक्क करतील. सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा एकप्रकारचा राज्याभिषेकच होईल. पुत्रपौत्रांचा भाग्योदय होईल.
वास्तूचे स्वप्न पूर्ण होईल
धनु : सप्ताहात आजच्या रविवारी होणारा संवत्सरारंभ बुध-शुक्राच्या सान्निध्यातून होत आहे. त्याची विशिष्ट शुभप्रद स्पंदने मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना जाणवतीलच. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट दैवी प्रचिती देणाराच. घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील. नवपरिणितांचे वास्तुस्वप्न पूर्ण होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या विवाहेच्छूंना ओळखींतून विवाहस्थळे येतील. काहींना जुन्या शेअर गुंतवणुकींतून लाभ होतीलच. सप्ताहातील संध्याकाळ मोठ्या रम्य आणि चैनी-करमणुकीच्या राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार प्रवासात जपण्याचाच.
नोकरीवर आलेले गंडांतर जाईल
मकर : नवसंवत्सरारंभाचा आजचा रविवार कलावंतांचे भाग्यच उदयास आणेल. थोरामोठ्यांच्या संपर्कातून भाग्योदय. उत्तराषाढा नक्षत्राची विवाहाची मुहूर्तमेढ होईल. काहींना छान ऑनलाइन कनेक्टिव्हिटी साधेल. सप्ताहातील ता. १ ते ३ हे दिवस एप्रिल फूल करून देणार नाहीत. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सराचा सप्ताह व्यावसायिक टार्गेट पूर्ण करून देईल. कर्जाचा ताण कमी होईल. विशिष्ट बदनामीचे भय जाईल. नोकरीवर आलेले गंडांतर जाईल. धनिष्ठा व्यक्तींना आजचा रविवार अग्निभयाचा.
सरकारी नियमांचे पालन करावे
कुंभ : नवसंवत्सरारंभाचा सप्ताह शुभ ग्रहांचा अंडरकरंट ठेवणाराच. होतकरू तरुणांची गुढी उभारली जाईल. सप्ताह वैवाहिक जीवनातून छान साजरा होईल. घरात उंची खरेदी होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट भेट वस्तूंतून लाभ. पती वा पत्नीचा एखादा कौतुक समारंभ होईल. ता. २ आणि ३ हे दिवस आपल्या राशीस भावरम्य राहतील. स्वतंत्र व्यावसायिकांना थोरामोठ्यांकडून लाभ होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून मनासारखी प्राप्ती. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सरकारी नियम सांभाळावेत.
शेजाऱ्यांशी बोलताना जपूनच वागा
मीन : शुभ ग्रहांची मांदियाळी सप्ताहात ऐनवेळी रसद पुरवेलच. सप्ताहात होतकरू तरुणांचे प्रश्न सुटतीलच. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या तरुणांचे नैराश्य जाईल. काहींना योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. आजचा रविवार विवाहेच्छूंच्या गाठीभेटींतून मुहूर्तमेढ करत गुढी उभारेल. सप्ताहातील ता. २ ते ४ हे दिवस साडेसातीची आठवण करून देणार नाहीतच. जन्मपत्रिका बाहेरच काढू नका ! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ एप्रिलचा गुरुवार संध्याकाळी दत्तमहाराजांची भावपूर्ण मंगल आरती करवेल. मात्र सप्ताहात शेजारीपाजारी शब्द जपून वापरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.