राशिभविष्य (४ ते १० एप्रिल २०२१)

राशिभविष्य (४ ते १० एप्रिल २०२१)

आपले नेटवर्क सुगंधित करूया !
भूमी आणि या भूमीवरील भवोद्‍भव आणि या भवोद्‍भवाला चिकटून असलेलं भुताचं भविष्य एक ‘भाव’ पकडून एक प्रकारच्या भवनात राहत असतं. माणसाचा भाव पकडणारं भविष्य त्याच्या भावाचं फलितच असतं आणि हेच फलित फलज्योतिष या सदरात मोडतं ! जसा भाव तसा देव आणि त्या देवाप्रमाणे माणसाचं दैव फळाला येत असतं!

भूमी (पृथ्वी) हा भाव आहे. त्यामुळेच तो एक भावबंध आहे आणि हा भावबंध एक गंध आहे आणि हा गंध वाहून नेणारा वायूच आहे आणि या वायूवरचं मन स्वार होऊन एकप्रकारचा भावगंध वाहून नेतं आणि हेच मन आपल्या भावस्पर्शाचं नेटवर्क विणतं किंवा आपल्या भवप्रपंचाचे बाहेरच्या जगात प्रसारण करतं !

माणूस आणि माणसाचा भाव आणि त्याप्रमाणे होणारे त्याचं कर्म स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात परिणामस्वरूप होत असतं आणि यालाच कायिक, वाचिक आणि मानसिक परिणाम म्हणतात. असे हे कायिक, वाचिक आणि मानसिक परिणाम अर्थातच स्वतःवरचे आणि आपल्यामुळे होणारे दुसऱ्यावरचे परिणाम पाप-पुण्य या सदरात मोडतात.

सध्याच्या कलियुगात माणसाची भावशुद्धी म्हणा किंवा चित्तशुद्धी म्हणा, टिकून राहणं फार अवघड झालं आहे. त्यामुळेच माणूस अतिशय अशांत झाला आहे. कलियुगात माणूस प्रथम आपला घात करून घेतो आणि मग दुसऱ्याचा घात करण्यासाठी बाहेरच्या जगात नेटवर्क विणतो ! मित्रहो, ५ एप्रिलला गुरू कुंभ राशीत प्रवेश करत आहे. कुंभ ही बौद्धिक रास असून, ती नेटवर्कशी संबंधित रास आहे. ७ एप्रिलच्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी कुंभ राशीत चंद्र-गुरू युतियोग होत आहे. अशा या एकादशीच्या दिवशी गुरुस्मरण करून आपण आपली भावशुद्धी करूया आणि आपल्या कायिक, वाचिक आणि मानसिक स्पंदनातून आपले नेटवर्क सुगंधित करूया !

ओळखी-मध्यस्थींतून लाभ
मेष :
सप्ताह गुरू-शनी ग्रहांच्या अधिपत्याखालीच बोलणारा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ७ व ८ हे दिवस कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही जीवनात मार्गस्थ करणारे. ओळखी-मध्यस्थींतून लाभ. आजचा रविवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा भाग्यसूचक. मात्र सप्ताहाचा शेवट अग्निभयाचा. आश्‍विनी नक्षत्रास चोरीचे भय.

सुवार्तांचा काळ व गुरुकृपा होईल
वृषभ :
भाग्यातील गुरू-शनीचे एक उत्तम संधान राहील. काहींवर पूर्ण गुरुकृपा होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ऐनवेळी त्याची प्रचिती येईल. ता. ६ व ७ हे दिवस सुवार्तांतून फ्लॅशन्यूजचे. मात्र सप्ताहाचा शेवट विचित्र संमोहनातून अडचणीचा. प्रेमाचे चाळे नकोत. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना बालहट्टातून त्रास.

नोकरीसाठीच्या मुलाखतीत यश
मिथुन :
गुरूचे राश्‍यांतर आणि शुक्राची विशिष्ट स्थिती चमत्कार घडवेल. मृग आणि पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती या स्थितीचा लाभ घेतील. ता. ७ आणि ८ हे दिवस एकूणच आपल्या राशीस महत्त्वाच्या कामांतून साथ देणारे. नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये यश. मात्र सप्ताहाचा शेवट विचित्र खर्चाचा. पाकीट जपा.

भांडणं टाळा, यंत्रांपासून जपा
कर्क :
सप्ताहावर मंगळ-नेपच्यून योगाचा एक व्हायरस अंमल करेल. मित्रांशी भांडणं नकोत. यंत्र, विद्युत आणि वाफ इत्यादींपासून जपा. ता. ९ चा शुक्रवार मोठा घातक. आश्‍लेषा व्यक्ती टार्गेट होऊ शकतात. बाकी ता. ५ व ६ हे दिवस अतिशय छानच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवरचे संकट दूर होईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची सरकारी कामे होतील.

असंगाशी संग नकोच, काळजी घ्या
सिंह :
सप्ताहात मंगळ-नेपच्यून योगाच्या अदृश्‍य दहशतीखाली राहणारी रास. कोणताही असंगाशी संग टाळाच. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज वा मतभेद टाळा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी या संदर्भातील आचारसंहिता पाळावी. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरूच्या राश्‍यांतरातून चांगलीच इम्युनिटी मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार बॅड डे.

प्रेमप्रकरणात यश, प्रसन्न कालखंड
कन्या :
आजचा रविवार विशिष्ट भाग्य घेऊन येणारा. गाठीभेटींतून भाग्यसूचक. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात दिलखेचक यशाचीच. प्रेमप्रकरणातून रंगबरसे होईल. परंतु आचारसंहिता पाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ चा शुक्रवार अतिशय प्रसन्न. विवाहयोग. शनिवार आदर-सत्काराचा. मात्र कामगार जपा.

गुप्त चिंता जातील, दिलासा मिळेल
तूळ :
गुरूचे पंचमस्थानातील आगमन तत्काळ दिलासा देणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रचिती येईल. ता. ५ व ६ हे दिवस विशिष्ट गुप्तचिंता घालवतील. नोकरीतील बदलीचा प्रश्‍न सुटेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार विशिष्ट सुवार्ताचा. घरात मौजमजा. शनिवारी वादविवाद नकोत. नवपरिणितांनी जपावं.

धनलाभ व नोकरीत प्रगती
वृश्‍चिक :
सप्ताहाची सुरुवात धनलाभांनीच होईल. मात्र तरुणांनी सप्ताहात कोणतीही अरेरावी करू नये. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट जरा विचित्रच वाटतो. घरातील उपकरणे जपा. काहींना अग्निभय. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस धक्कादायक सुवार्तांचे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभदायी कालखंड.

व्यावसायिकांना चांगला कालखंड
धनू :
सप्ताहात गुरू-शुक्राचेच फिल्ड राहील. आजचा रविवार याचीच प्रचिती देईल. स्वतंत्र व्यावसायिकांना ता. ५ ते ७ पर्यंतचे दिवस कोरोनाच्या काळातही अतिशय प्रवाही राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ ची एकादशी गुरुकृपेचा लाभ देईल. सुवार्तांची परंपरा राहील. शनिवारी वाहनांपासून जपा.

सावध रहा, प्रेमप्रकरण सांभाळा
मकर :
सप्ताह तरुणांना कुसंगतीतून त्रासदायक. सावध राहा. प्रेमप्रकरणं सांभाळा. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती धनिष्ठा नक्षत्रास जबरदस्त क्‍लिक होईल. ता. ५ ते ७ पर्यंतचे दिवस सर्वांगाने शुभ. श्रवण नक्षत्रास नोकरीत लाभ. आजचा रविवार रस्त्यावर भांडणाचा.

प्रिय व्यक्तींची मनं सांभाळा
कुंभ :
मंगळ-नेपच्यून योगाचा व्हायरस कामक्रोधांचे आवेग आणणारा. घरातील प्रिय व्यक्तींची मनं सांभाळा. व्यावसायिकांना सप्ताहात विचित्र कामगारपीडा होऊ शकते. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी दक्षता घ्यावी. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरूचे राश्‍यांतर ता. ८ च्या गुरुवारी आपले अस्तित्व दाखवेल. शततारका नक्षत्रास शनिवार संध्याकाळ मोठी प्रसन्न राहील.

कोर्टप्रकरणातून सुटका होईल
मीन :
आजचा रविवार मोठी भाग्यबीजे पेरणारा. व्यावसायिकांना मोठा शुभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींकरिता सप्ताहाची सुरुवात आर्थिक ओघ प्राप्त करून देणारी. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणांतून सुटका होईल. सप्ताहाचा शेवट भातृचिंता देणारा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना दंतव्यथा जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com