esakal | जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 5 एप्रिल ते 11 एप्रिल
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 5 एप्रिल ते 11 एप्रिल

माणसं हल्ली खरा एकांत अनुभवतच नाहीत. सध्या लाभलेल्या एकांतात माणसानं अनंताचं स्मरण करावं आणि आत्मानुभूतीचा, अनंत आकाशातल्या आत्मिक उड्डाणाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असंच यंदाची हनुमानजयंती सांगत आहे. 

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 5 एप्रिल ते 11 एप्रिल

sakal_logo
By
श्रीराम भट

असं करा उड्डाण! 
संवत्सरातील प्रत्येक पौर्णिमा म्हणजे ईश्‍वराचा परमभावच म्हणावा लागेल. या सप्ताहात येणारी ता. आठ एप्रिलची श्रीहनुमानजयंती हासुद्धा एक परमभावच आहे. श्रीमद्‌हनुमान हे अनंत आकाशात झेपावलेलं एक उड्डाणच होय. माणसाच्या मनाला, खरं पाहायला गेलं तर, कधीच संचारबंदी लागू होत नसते, लॉकडॉऊन किंवा संचारबंदी लागू होत असते ती माणसाच्या देहाला. माणसाचा देह म्हणजे प्रारब्धाचं एक डबकं आहे आणि या प्रारब्धाच्या डबक्‍यात हा देहरूपी बेडूक डरांव डरांव करत असतो. ‘मन ही माझी विभूती आहे,’ असं श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, त्यामुळे हनुमानही अर्थातच भगवंतांचीच विभूती आहेत. हनुमान हे भगवंतांचं मन:स्पंदनच होय. त्यामुळे या चिरंजीव हनुमानांनी जन्मतःच ब्रह्मांडाला गवसणी घालणारं उड्डाण केलं यात आश्‍चर्य वाटण्याच कारण नाही. यंदाची हनुमानजयंती हा मानवी समूहाला एक प्रकारचा बोधच ठरणार आहे. माणूस हा एक बंध आहे; किंबहुना माणूस हा प्रारब्धाच्या धुळीत अडकलेला एक लॉकडॉऊन आहे! किंवा विक्षेपांच्या शेवाळात एका डबक्‍यात अडकलेली एक गहन अशी कर्मगतीच आहे! अशा या कर्मगतीला मोकळं करण्यासाठी आपण हनुमानभक्त किंवा हृदयीचे रामभक्त होणं आवश्‍यक आहे, तरच आपण आत्मिक उन्नयन करून घेऊ शकतो, आत्मिक उड्डाण करू शकतो. 

माणसं हल्ली खरा एकांत अनुभवतच नाहीत. सध्या लाभलेल्या एकांतात माणसानं अनंताचं स्मरण करावं आणि आत्मानुभूतीचा, अनंत आकाशातल्या आत्मिक उड्डाणाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असंच यंदाची हनुमानजयंती सांगत आहे. 

मित्र हो, सध्या शनी हा मकर राशीत आला आहे. या मकर राशीत ग्रहांचा गोलयोग होत आहे. जलाशय आणि भूमी यांना घट्ट पकडून ठेवणारी या मकर राशीतील ही मगरमिठी सुटल्याशिवाय आपण आपल्या कर्मगतीला मागं टाकून दिगंबराला, चिदंबराला किंवा कैलासपतीला आलिंगन देऊ शकत नाही! 
जय हनुमान! 
============ 
मनाची काळजी घ्या! 
मेष :
अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सध्या ऐतिहासिक स्वरूपाचं ग्रहमान. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मानसिक संतुलन सांभाळा. बाकी, पौर्णिमेनंतर शुक्रभ्रमणामुळे व्यावसायिक मंदी हटेल. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजण्या-कापण्यासंदर्भात दक्षता घ्यावी. गुरुवार शनी-मंगळाच्या व्यूहरचनेचा. पोलिसांशी हुज्जत घालू नका. 
============ 
नोकरीतील सावट हटेल 
वृषभ :
लॉकडॉऊनच्या या काळात तरुणवर्गानं अंतर्मुख व्हावं, राशीच्या भाग्यातील गोलयोग त्याला लाभदायक ठरेल. राशीतील शुक्रभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभ. वातावरणातील देवतासमूह तुमच्या पाठीशी राहील. नका करू संभाव्य आजाराची चिंता; काळजी मात्र सर्वतोपरी घ्या! कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींवर लॉकडॉऊनच्या काळात गुरुकृपेचा वरदहस्त. नोकरीतील सावट जाईल. 
============ 
स्वतःचेच शत्रू होऊ नका! 
मिथुन :
सध्या तुम्हाला त्रिविध तापांना सामोरं जावं लागत आहे. तुम्हीच तुमचे शत्रू होऊ नका! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनात संयम बाळगावा. एकमेकांपासून डिस्टन्स ठेवावं! एकांतातलं आत्मिक चिंतन अनुभवावं. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची चिंता ता. पाच व सहा या दिवशी दूर होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुड फ्रायडे सुवार्तांचा 
============ 
वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा 
कर्क :
अपवादात्मक ग्रहमान आहे. काहींचा मोठा उत्कर्ष होईल. हनुमानजयंतीचं प्रभावक्षेत्र तरुणांना सुवार्ता देईल. सतत ऑनलाईन राहाच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. गुंतवणुकींतून लाभ. गृहिणींनी दुखापतीसंदर्भात काळजी घ्यावी . वैवाहिक जीवनात गैरसमज टाळावेत. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. 
============ 
सोशल डिस्टन्सिंग पाळाच! 
सिंह :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुक्रभ्रमण स्वतंत्र व्यावसायिकांना लॉकडॉऊनमध्येही लाभ देईल, ऑनलाईन गॉडफादर भेटेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावं. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुड फ्रायडे लाभदायक. वैवाहिक जीवनात जोडीदारांनी एकमेकांची काळजी घ्यावी. 
============ 
काही अलौकिक घडेल! 
कन्या :
या सप्ताहातली हनुमानजयंती काहींना पूर्वसंचितातून लाभ देणारी. काही अलौकिक घडेल. मात्र, पौर्णिमेच्या आसपासच्या काळात पंचमहाभूतांपासून सांभाळा. निसर्गाशी खेळ नको! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांकडून मोठी रसद पुरवली जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा लाभदायक. 
============ 
फील्डवर टिकून राहा 
तूळ :
सध्या तुमच्या बाबतीत खरी संचारबंदी लागू आहे! फक्त फील्डवर टिकून राहा. नंतर लाभच लाभ. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी घात-अपघातांपासून जपावं. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. बाकी, गुड फ्रायडेचा दिवस तुमच्या शुक्राच्या राशीला उत्तमच. लॉकडॉऊनमध्ये दिलासा! संकष्टी चतुर्थी पुत्रोत्कर्षाची. 
============ 
सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल 
वृश्‍चिक :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रहांची उत्तम रसद पुरवली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमानजयंती आणि संकष्टी चतुर्थी ‘खुल जा सिम्‌ सिम्‌’चा अनुभव देईल. मोठे चमत्कार घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. परदेशस्थ मुलांना लाभ. 
============ 
गुप्त चिंता दूर होईल 
धनू :
हा सप्ताह विशिष्ट अपवादात्मक ग्रहस्थितीचाच; परंतु जे श्रद्धावंत आहेत त्यांना श्रीहनुमान प्रसन्न होतील! अर्थातच शुभ ग्रहांकडून रसद पुरवली जाईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. एखाद्या राजकीय व्यक्तीकडून लाभ होईल. गुड फ्रायडेचा दिवस सूर्योदयी सुवार्तेचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. 
============ 
मोठे लाभ अपेक्षित 
मकर :
चित्ताचं चातुर्य हे फक्त माणसाकडेच असतं! सध्या तुमच्या बाबतीतही अपवादात्मक ग्रहमान आहेच. फक्त चतुर मंडळीच या अपवादात्मक ग्रहमानाचा लाभ घेतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात मोठे लाभ अपेक्षित आहेत. पौर्णिमेनंतर येणारा गुड फ्रायडे तुमचं गुडविल वाढवेल. शनिवार तुमच्या राशीला अतिशय शुभ! 
============ 
लाभदायक एकांतवास 
कुंभ :
शुक्रभ्रमणामुळे पौर्णिमेच्या आसपासच्या काळात तुमचा आशावाद आणखी वाढेल! लॉकडॉऊनमधील एकांतवास तुम्हाला खूप काही देऊन जाईल. पौर्णिमेनंतर गुड फ्रायडे आणि त्यानंतरची संकष्टी चतुर्थी तुमचं आकाश मोकळं करेल. चंद्रोदयानंतर भाग्योदय. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा दिलासा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी लागेल. 
============ 
व्यावसायिक विसंवाद संपेल 
मीन :
या सप्ताहात ग्रहांच्या राज्यसभेत तुमची मोठी विधेयकं मंजूर होतील! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जगण्याला वेग येईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेच्या आसपासचा काळ अतिशय अद्भुत राहील. व्यावसायिक विसंवाद संपेल. गुड फ्रायडे सुखनिद्रा देणारा. शनिवारचा चंद्रोदय आत्मसाक्षात्काराचा!