esakal | साप्ताहिक राशिभविष्य (५ सप्टेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (५ सप्टेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

‘हॅं’ हे आकाश बीज आहे आणि ‘गॅं ’ हे गती बीज आहे. आकाश आणि गती यांचे शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. ‘रवं’ म्हणजे आकाश आणि त्यात ग्रहगोलांची गतीचा अनुरोध घेत फलज्योतिष बेतलं गेलं आहे. हॅं या आकाश बीजात ग्रह आपापल्या गतींतून जीवग्रंथींच्या जन्मगाठी वीणत असतात. ग्रहग्रंथींच्या गाठी असलेले जीव अनंत जन्म घेत ग्रहगतीचा खेळ अनुभवत पत्रिकेतल्या आणि प्रपंचातल्या लग्नगाठी बांधत असतात. सुरगाठ आणि निरगाठ असे दोन गाठींचे प्रकार असतात.

मी आणि माझे असे म्हणत घट्ट निरगाठ बांधलेल्या जीवग्रंथी ग्रहगतीच्या फेऱ्यातून कधीच सुटत नाहीत ! जीवग्रंथी सुटण्यासाठी श्रीगणेशांची उपासना करावी लागते. गणेशविद्येचा बोध झाल्यावर जीव जडत्व सोडून निर्गुणाच्या प्रांतात प्रवेश करत आकाशतत्त्वाचा अनुभव घेऊ लागतो. जडत्वाच्या पूर्वग्रहाच्या किंवा पूर्वग्रहांच्या मी आणि माझे म्हणणाऱ्या निरगाठी सोडविण्यास गणेशविद्या उपयोगी पडते. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन मिळून एकंदर अकरा रूद्र आहेत आणि या रूद्रांचेच पुढे तेहेतीस कोटी रूद्रगण झाले आहेत. या रूद्रांचे अधिपती श्रीगणेश आहेत.

माणसाच्या देहात रूद्रग्रंथी, विष्णुग्रंथी आणि ब्रह्मग्रंथी विद्यमान असतात. श्रीगणेशविद्या प्राप्त करून रूद्रग्रंथी सोडवल्यानंतर अर्थातच रूद्रगणांचे सहाय्य घेतल्यानंतरच जीवग्रंथींच्या मी मी, माझे माझे म्हणणाऱ्या निरगाठी सोडवता येतात आणि मगच परमशिवाचे, ज्योतिर्मय दर्शन घडून जीव पूर्वग्रह बंधनातून मुक्त होतो. यंदा चित्रा या योगताऱ्याजवळ शुक्र असताना शिवाय त्याचा गुरूशी शुभयोग होत असताना शुक्रवारी श्रीगणेशांचे आगमन होत आहे. त्यामुळेच यंदा गुरूच्या दृष्टीतून गणेशविद्येच्या प्रभावात आपण आपल्या मोहपाशांच्या किंवा विषयव्याळांच्या घट्ट निरगाठी सोडवूयाच!

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा!

नमू शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।

- संत रामदास

सुवार्ता मिळतील, प्रवासात जपावे

मेष : आज होणारे शुक्राचे राश्‍यांतर गुरूशी शुभयोग करत अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गणेशोत्सवात एक पर्वणीसारखे बोलेल. शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून प्युअर सीक्वेन्स लागतील. नवपरिणितांचे प्रश्‍न सुटतील. मात्र भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ प्रवासात जपा. बाकी ता. ९ चा गुरुवार मोठ्या सुवार्तेचा.

नोकरीत नव्या जडणघडणीत लाभ

वृषभ : रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. ६ व ७ हे अमावस्येचं प्रभावक्षेत्र सांभाळावे. प्रिय व्यक्तींशी वाद नकोत. बाकी ता. ९ चा गुरुवार एखादे हुकमी यश देणारा. नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात शुक्रकलांतून प्रसन्न गाठीभेटींची. वास्तुयोग. महत्वाची कामे होतील.

परदेशात भाग्योदय होईल

मिथुन : सप्ताहातील एक नशीबवान रास राहील. शुक्रभ्रमणातून यंदाचा गणेशोत्सव एक पर्वणी राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रेटी बनतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ९ व १० हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरणारे. काहींचा परदेशात भाग्योदय. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या विचित्र गाठीभेटींची.

विवाहविषयक घडामोडींचा कालखंड

कर्क : शुक्राचे सुखस्थानातील आगमन तात्काळ सुगंधीत झुळका देईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ होतील. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. मुलाबाळांचे विवाह ठरतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ खरेदी करताना जपा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार विवाहविषयक घडामोडींचा.

व्यवसायात मोठी वसुली होईल

सिंह : सप्ताह गुरू-शुक्र आणि रवी-हर्षल यांच्या शुभयोगातून मोठे चमत्कार करणारा. तरुणांना एखादे ऐतिहासिक यश मिळेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे भाग्योदय अपेक्षित आहेत. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. व्यावसायिकांना आजचा रविवार मोठ्या धनवर्षावाचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी व्यावसायिक वसुली होईल.

व्यावसायिकांना अर्थसहाय्य मिळेल

कन्या : चित्रा नक्षत्रास सप्ताह एकूणच वैशिष्ट्यपूर्ण. सप्ताहाची सुरुवात शुक्राच्या नक्षत्रगत स्थितीतून देवतांचा अनुग्रह करणारी. ज्ञानसंपन्न व्हाल. घरात उंची खरेदी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ९ चा गुरुवार विजयोत्सवाचा. व्यावसायिकांना अर्थसहाय्य मिळेल. अर्थातच व्हिटॅमिन एम मिळेल. उत्तरा नक्षत्राची पुत्रचिंता जाईल.

चौकार- षटकार ठोकाल

तूळ : राशीतील शुक्राचे आगमन ग्रहांचा पट ताब्यात घेईल. सप्ताहातील गुरू-शुक्र, बुध-शनी आणि रवी-हर्षल यांचे योग स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या संधी देतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती चौकार-षटकार ठोकतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितींतून लाभच होतील. मात्र विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी गर्दीत सांभाळावे.

रेंगाळलेले करारमदार होतील

वृश्‍चिक : आजचा रविवार ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटींतून फलदायी होणारा. विशिष्ट मानसन्मान मिळेल. व्यावसायिकांना सप्ताह रेंगाळलेले करारमदार करवून देईल. ता. ९ चा गुरुवार मोठा शुभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह वसुलीचा.

तरुणांची स्वप्न साकारतील

धनु : सप्ताहातील ग्रहांची फिल्ड ऍरेंजमेंट मोठी धावसंख्या रचेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राचा योग सतत आगत स्वागत करणारा. तरुणांची स्वप्नं साकारतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा श्रीमंतांच्या यादीत प्रवेश. तरुणांना ता.९ व १० हे दिवस श्रीगणेशाच्या कृपेचे. मुलाखतींतून यश. विवाह ठरवाच. नका घालू घोळ.

आर्थिक कोंडी फुटेल, बॅंकेची रसद मिळेल

मकर : शुक्राचे राश्‍यंतर जबरदस्त क्‍लिक होणारे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गणेशोत्सव प्रगतिपथावर नेणारा. ता. ९ व १० हे दिवस मोठे सीक्वेन्स लावणारे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी फुटेल. बॅंकेची रसद मिळेल. पुत्रोत्कर्ष होईल. धनिष्ठा व्यक्तींनी अमावस्या सांभाळावी.

देवतांचा अनुग्रह राहिल

कुंभ : तरुणांना सप्ताह उमेद वाढवणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह एकूणच गुरू-शुक्र योगाच्या पार्श्‍वभूमीवर देवतांच्या अनुग्रहाचा राहील. शुक्रवारी होणारे श्रीगणेशांचे आगमन शुभसूचकच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून लाभ. पती वा पत्नीचा उत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ.

वादग्रस्त प्रकरण मिटतील

मीन : आजचा रविवार मोठ्या सुवार्तांच्या पार्श्‍वभूमीचा. व्यावसायिक मोठी प्राप्ती. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशिष्ट मानसन्मान. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ९ चा गुरुवार मोठा शुभलक्षणी. वादग्रस्त प्रकरणं मिटतील. सप्ताह विवाहेच्छूंना ग्रीन सिग्नल देणाराच. शनिवारी स्त्रीशी गैरसमज टाळा.

loading image
go to top