राशिभविष्य (ता. ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर)

weekly horoscope
weekly horoscope

काळावर मात करणारी एकादशीची ‘वन डे’! 
रवी हा पृथ्वीवरील माणसांच्या तथाकथित ‘वन डे’चा साक्षीदारच म्हणावा लागेल! या पृथ्वीच्या धावपट्टीवर जवळपासच असलेले बुध आणि शुक्र हे ग्रह जणू फॉर्वर्ड लेगला असल्यासारखेच आहेत आणि माणसाचं मन असलेला चंद्र हा या फील्डवरील खेळाडू असल्यासारखा आहे! असा हा रात्र आणि दिवस यांच्या सावल्यांचा खेळ असलेलं माणसाचं जीवन. दिवस-रात्रीच्या ‘वन डे’ खेळत महाकाळाच्या तोंडात पडत असतं! हेच श्रीकृष्णाच्या विश्र्वरूपदर्शनाचं आध्यात्मिक तत्त्वदर्शन आहे! 

काळ आणि काळाचं पंचांग हातात धरणारा ज्योतिषी हा एक माणूसच आहे. माणसांच्या ‘वन डे’चं रेकॉर्ड ठेवणारा हा ज्योतिषी-माणूस या माणसांच्या ग्रहांच्या फील्डवर एक प्रकारची पंचाची भूमिकाच निभावत असल्यासारखा भासतो किंवा वाटतो. देश, काल आणि परिस्थिती आणि माणसाच्या संदर्भातील काल, कर्म आणि कारण यांच्या गुंफणीतून या विश्र्वप्रपंचाचा एक अद्भुत खेळ सुरू असतो. 

माणूस जीवनाच्या फील्डवर धावत असतो किंवा धावा काढत असतो. या जीवनाच्या धावपट्टीवर नियतीची गोलंदाजी आणि तिच्या बरोबरीला ग्रहांचं फील्डिंग माणसाला धावा काढू देतं (लूज फील्डिंग) किंवा हे फील्डिंग धावा रोखतं किंवा माणसाला धावबादसुद्धा करत असतं! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मित्र हो, या सप्ताहात ता. सात डिसेंबर रोजी भैरवजयंती आहे आणि ता.११ रोजी रोजी उत्पत्तीएकादशी आहे. सध्या कर्मकारक शनीच्या मकर राशीतून गुरू-शनीचा सहयोग सुरू आहे. काळाचा आधार घेत अहंकार जगत असतो. कालरुद्राग्नीत कालरूपी देह-अहंकार जळून कालातीत झाल्यावर अखंड असा न मावळणारा दिवस उगवत असतो! असं हे एकं, नित्यं आणि विमलमचलमं असं गुरुतत्व जाणू घेण्यासाठी यंदाच्या काळभैरवजयंतीनंतर उगवणाऱ्या एकादशीच्या दिवशी गुरुतत्वाशी एकरूप होत खरी एकदिवसीय ‘वन डे’ साजरी करू या! अर्थात्, कधीच धावबाद न होता! अर्थातच अखंड ज्ञानप्रकाशात चालत राहू या, ‘ॐ नमः शिवाय’ म्हणत! 

व्यवसायात मोठी तेजी
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह चढत्या क्रमानं शुभ. व्यवसायात मोठी तेजी. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. मंगळवार शुभ ग्रहांच्या ताब्यातला! अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात त्वचाविकार सांभाळावेत. अतिविचार टाळावेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे दिवस ‘छप्पर फाड के’ देणारे. 

वास्तुविषयक व्यवहार होतील
वृषभ : हा सप्ताह ग्रहस्थितीतून नावीन्यपूर्णच! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल! ता. नऊ व १० हे दिवस तुमच्या राशीला भन्नाटच फळं देतील! वास्तुविषयक व्यवहार क्‍लिक होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट गुप्त चिंता जाईल. शनिवारी वैवाहिक जीवनातील सुवार्ता कळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान. 

नातेवाइकांशी जपून वागा
मिथुन : या सप्ताहात घरात मौन पाळा! नातेवाइकांशी जपून वागा. बाकी, हा सप्ताह कलाकारांना अप्रतिमच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी शुक्रकलांच्या वैभवामुळे तरुणांना छान मित्र-मैत्रिणी भेटतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधाची स्थिती राजकीय हितशत्रुपीडेची. पोलिसांशी हुज्जत नको. खरेदी करताना काळजी घ्या. 

विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल 
कर्क : या सप्ताहातील अतिशय शुभदायी रास! सप्ताहात शुभग्रहांचं ग्रासकोर्ट राहील. शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीचा आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम लाभ होईल. घरातील विवाहाचा प्रश्नी मार्गी लागेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्वसंचितातून लाभ! अर्थातच, संचिताचे ट्रॅव्हलर चेक वटवाल! एकूणच, सप्ताहाचा शेवट तुमच्या राशीला जल्लोषाचा! 

नसत्या उठाठेवी नकोत!
सिंह : या सप्ताहातील ग्रहांचं फील्ड फलंदाजीचं नाहीच! नसत्या उठाठेवी नकोत! मात्र, तरुणांना व कलाकारांना घरबसल्या लाभ! विशिष्ट शैक्षणिक संधी! व्यावसायिकांना सप्ताहाचा शेवट तेजीचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना  उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ची एकादशी दैवी चमत्कारांची! पुत्रोत्कर्ष होईल. 

वैभवसंपन्न वाटचाल
कन्या : शुक्रकलांचं वैभव या सप्ताहात प्रदर्शित होणार आहे. अर्थातच, या शुक्रकलांच्या माध्यमातून तुमची वैभवसंपन्न वाटचाल सुरू होईल. आगामी काळात गुरू, शनी या महासत्तांचा समेट तुमचे पूर्वसंचितांतील ट्रॅव्हलर चेक वटवून देईल! ...और क्‍या! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती एकादशीच्या दिवशी वैभवसंपन्न होतील. 

सरकारी कामं होतील
तूळ : राशीच्या शुक्रभ्रमणाच्या अंतिम टप्प्यात तरुणांचं ‘आ गले लग जा’ होणार आहे! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात दुर्मिळ संधींचा लाभ उठवतील. ता. १० ते १२ हे दिवस तुमच्या राशीला अतिशय शुभ आहेत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची सरकारी कामं होतील.  

प्रत्येक सूर्योदय नवा! 
वृश्‍चिक : या सप्ताहात शुक्राच्या राश्यंतरातून ता. ११ च्या एकादशीचं पुण्य पदरात पडेल! विशिष्ट गुप्त चिंता दूर होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी या सप्ताहातील प्रत्येक सूर्योदय नवा असेल. व्यवसायातली धनचिंता जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाच्या शेवटी जीवनातील मोठ्या भाग्योदयाची चाहूल! 

हुज्जत घालू नका! 
धनू : हा सप्ताह सार्वजनिक जीवनात दक्षता पाळण्याचा. क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालणं टाळा. बाकी, सप्ताहातील चंद्र-शुक्रांच्या विशिष्ट स्थितीचा तरुणांना लाभ होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती याचा उत्तम लाभ घेतील. मुलाखती आयोजित कराच. ता. १० ते १२ हे दिवस एकूणच निर्धोक आणि प्रसन्न ठेवणारे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीत यशस्वी वाटचाल. 

गुलाबी थंडी अनुभवाल!
मकर :
ग्रहांच्या फील्डवर शुभ ग्रह तुम्हाला धावा काढून देणार आहेत! सकाळी उठून कामालाच लागा. सप्ताहाच्या शेवटी चंद्र-शुक्राच्या कलांची स्थिती अतिशय ऐतिहासिक स्वरूपाची असेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांमुळे झळकतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे दिवस मोठे भाग्याचे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती गुलाबी थंडी अनुभवतील! 

नोकरीत वरिष्ठांचा मर्जी
कुंभ :
ग्रहांच्या टाइट फील्डिंगमधूनही फॉर्वर्ड शॉर्टलेगचे बुध, शुक्र तुम्हाला लूज फील्डिंगमधून मस्त धावा काढून देतील! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा लाभ होईल. व्यावसायिक कौशल्य लाभदायक ठरेल. या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शततारकी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रकाशात आणेल. विशिष्ट सन्मान होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील! 

शैक्षणिक मार्ग सापडेल
मीन :
हा सप्ताह तरुणांना छानच राहील. विशिष्ट शैक्षणिक मार्ग सापडेल. व्यावसायिकांना सरकारी धोरणातून लाभ होतील. विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न मार्गी लागेल. गुरू-शनी यांच्या विशिष्ट स्थितीतून पूर्वाभाद्रपदा आणि रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता शनिवारी दूर होईल. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com