esakal | साप्ताहिक राशिभविष्य (६ जून २०२१ ते १२ जून २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (६ जून २०२१ ते १२ जून २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

हे ऑडिट पार करू या !

निसर्ग हीच मुळी एक नैसर्गिक सत्ता आहे. अशा या नैसर्गिक सत्तेच्या प्रभावात विश्‍वातील वस्तुसामर्थ्य नांदत असते. अर्थातच निसर्ग म्हणजे सहजपणे चाललेला सत्तेचा खेळ आहे. अशा या सत्तेच्या आकाशात विशिष्ट अवकाश पकडत श्‍वास घेणारे माणसाचे जीवन तथाकथित माणसाची सत्ता गाजवत असते !

निसर्गातील सहज सत्ता राबवणारी ईश्‍वराची ईश्‍वरी, परमसत्य असलेल्या ईश्‍वराचे अंग पकडून असते. अशी ही निसर्गातील सत्याची सत्ता, स्वाभाविकपणे कार्यरत असल्याने खोटं बोलणारा माणूस अर्थातच सत्य गुपचूप सांभाळूनच आपलं खोटेपणाचं जीवन जगू शकतो. कारण पूर्ण सत्य माहीत असलेला माणूसच पूर्ण खोटं बोलू शकतो! अशी ही माणसाच्या जगण्याची तऱ्हा आहे !

सत्याचे सत्तासामर्थ्य ओळखणारा शनी हा खरा रविपुत्र आहे. त्यामुळेच शनीची आनुवंशिकता सूर्यप्रकाशासारखी सत्य आहे. माणसाच्या जीवनाची यशस्विता ही सत्याच्या प्रकाशात नांदली तरच ती चिरस्थायी होऊ शकते. त्यामुळेच ज्यांच्या पत्रिकेत शनी बलवान असतो तोच यशसमृद्धीचा दीर्घकाल भोग घेऊ शकतो! माणसाचे जीवन हे एक कायिक, वाचिक आणि मानसिक तप असल्यासारखेच आहे आणि हे तप सत्याशी जवळीक साधणारे असले पाहिजे. तरच त्याचे जीवन तेजस्वी होऊन सूर्यप्रकाशासारखे तळपते. माणसाचे जीवन सध्याच्या कलियुगात सत्य आणि असत्य यांच्या सरमिसळीतून अर्थात विंडोड्रेसिंग करून आभास निर्माण करणारे झाले आहे. अशा या विंडोड्रेसिंगमधून अवतरलेल्या माणसाच्या कर्माचे ऑडिट शनीमहाराज करत असतात. त्यामुळेच शनीची महादशा आणि शनीची साडेसाती यांची हुकूमत माणसाच्या जीवनावर असते!

मित्रहो, ता. १० जून रोजी शनैश्‍चर जयंती आहे. अर्थातच ही वैशाखी अमावस्याच आहे. माणूस हा एक सत्य आणि असत्य यांचा एक टाळेबंदच आहे. माणसाच्या शरीरात सत्य आणि असत्य यांच्या अनुषंगाने एक पुण्यपुरुष आणि पापपुरुष जगत असतो. माणसाचं मन, बुद्धी आणि अहंकार ही सेना वरील कोणत्या पुरुषाची साथ करेल किंवा करत असेल याच्यावर शनीमहाराजांची बारीक नजर असते. माणूस नैसर्गिक सत्याच्या जितका जवळ जाईल तितका माणसातील पुण्यपुरुष जागा होऊन त्याला जगण्याचा प्राण किंवा प्राणवायू मिळत असतो. सध्या मकर राशीतील वक्री शनीचे ऑडिट चालू आहे. आपण या ऑडिटमधून पार होऊया ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

व्यावसायिक प्रलोभनं व वाद टाळा

मेष : सप्ताहात व्यावसायिक प्रलोभनं टाळा. नातेवाइकांशी वाद नकोच. सप्ताहात अनपेक्षित घटनांचा भर राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० जूनचे भारतात न दिसणारे सूर्यग्रहण काळोखी निर्माण करेलच. अकारण येणारे नैराश्‍य टाळा. बाकी ता. ११ व १२ हे दिवस शुभ ग्रहाच्या उत्तम साथसंगतीचे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्ता मिळतील.

मोठे लाभ व विजयाची परिस्थिती

वृषभ : राशीचा राहू सप्ताहात मळभ निर्माण करणारा. घरातील प्रिय व्यक्तीचे मूड सांभाळा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील वृद्धांशी वाद टाळावेत. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राची भ्रमणं हातात हात घालून सप्ताहाच्या शेवटी मोठे लाभ देतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एखादा विजय नोंदवतील.

मानसिक आरोग्य जपा

मिथुन : सप्ताह श्रद्धावंतांना मोठा सुंदरच. फक्त ता. १० च्या अमावस्येच्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाजवळ मानसिक आरोग्य जपा. अकारण संवाद टाळा. उद्याचा सोमवार आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी कलात्मक अभिव्यक्तीतून प्रकाशात आणणारा. नोकरीसाठी मुलाखती द्याच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेतच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येजवळ विस्मरणातून विचित्र धोका.

नोकरी मिळण्याची शक्यता

कर्क : ग्रहांचे फिल्ड अपवादात्मक राहणारच आहे. बेसावधपणा टाळा. उद्याचा सोमवार नोकरीत वादंगाचा. काहींना बदलीचे सावट सतावेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील राजकारणातून त्रास. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सोमवार नोकरी देणारा.

प्रसन्न वातावरण राहील

सिंह : सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० च्या अमावस्येचं मळभ अस्वस्थ करेल. एखादं संशयपिशाच्च त्रास देईल. व्यावसायिकांना यंत्र, वाहनं आणि कामगार इत्यादी घटकांतून विचित्र त्रास. बाकी शुक्रवारचा दिवस एकूण आपल्या राशीस आणि मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ घटनांतून अतिशय प्रसन्न ठेवेल.

ओळखी-मध्यस्थीतून लाभ

कन्या : वक्री बुधाची एक विशिष्ट स्थिती राहील. तरुणांनी भावनाविवश होऊ नये. ता. १० च्या अमावस्येजवळ मानसिक आरोग्य जपावं. हस्त नक्षत्रव्यक्तींनी नोकरीत गैरसमज टाळावेत. बाकी ता. ११ व १२ हे दिवस मोठी गमतीदार फळं देतील. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. कर्जमंजुरी होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीची चाहूल !

व्यावसायिक व सरकारी लाभ

तूळ : सप्ताहात चंद्रबळ कमी राहील. कोणतेही अवसानघातकी निर्णय टाळा. नवपरिणीत स्त्रीवर्गानं जपलंच पाहिजे. उद्याचा सोमवार स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विचित्र मानसिक गोंधळाचा. बाकी ता. ११ व १२ हे दिवस मोठी नावीन्यपूर्ण शुभ फळं देतील. कलाकारांचे मोठे भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. सरकारी लाभही होतील!

व्यावसायिकांना धनाची चिंता जाईल

वृश्‍चिक : ता. १० च्या अमावस्येचं मळभ मोठे विचित्र राहील. ज्येष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्व बाबतीत संयम पाळावा. उद्याचा सोमवार तरुणांना विचित्र दुखापतींचा ठरू शकतो. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नेत्रविकारातून त्रास. बाकी ता. ११ व १२ हे दिवस व्यावसायिकांची धनचिंता घालवतील.

शुक्र भ्रमणाच्या सुगंधी झुळका

धनु : सप्ताहात शुक्र भ्रमणाच्या मंद-मंद सुगंधी झुळका येतच राहतील. व्यावसायिकांचे मार्केटिंग सप्ताहाच्या शेवटी यशस्वी होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ या दिवसांत मोठे लाभ. वक्री बुधाची स्थिती उत्तराषाढा नक्षत्रास अमावस्येजवळ विचित्र संसर्गाची. गर्दीची ठिकाणं टाळा. स्त्रीशी सोशल डिस्टन्सिंग ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडेतून त्रास. कोरोना नव्हे !

व्यावसायिकांना चांगला कालखंड

मकर : आपल्या बाबतीत ग्रहांची फिल्डिंग टाईटच राहील. उद्याच्या सोमवारी धावबाद होऊ नका ! ता. १० च्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाजवळ आपले वागण्याचे विचित्र पैलू दाखवू नका ! धनिष्ठा व्यक्तींनी सर्वप्रकारची आचारसंहिता पाळावी. श्रवण नक्षत्रव्यक्तींनी अमावस्येजवळ प्रेमरोग जपावा. ता. ११ च्या शुक्रवारी व्यावसायिकांचे खुल जा सिम सिम!

भाग्यबीजं पेरणारा काळ

कुंभ : सप्ताहाच्या फिल्डवर स्वैर फटकेबाजी नॉट अलाऊड. सप्ताहात घरातील प्रिय व्यक्तींचे मूड जपा. ता. १० च्या अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात घरातील लष्करशाही टाळा. बाकी ता. ११ व १२ हे दिवस शततारका नक्षत्रास भाग्यबीजं पेरणारे. अमावस्या पूर्वाभाद्रपदास अग्निभयाची.

जीवनातला सूर गवसेल

मीन : सप्ताहात चंद्रबळ नसल्याने भावनाप्रधान व्यक्तींचा कोंडमारा होईल. सहवासातील एखाद्या व्यक्तीची दहशत राहील. तरुणींना ता. १० ची अमावस्या सोशल मीडियातून विचित्र त्रास देणारी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी जपलंच पाहिजे. ता. ११ व १२ या दिवसांत उत्तराभाद्रपदा व्यक्तींना जीवनातील सूर गवसेल ! अर्थातच गीत गाता चल