साप्ताहिक राशिभविष्य ((ता. ०७ फेब्रुवारी २०२१ ते १३ फेब्रुवारी २०२१)

श्रीराम भट saptrang@esakal.com
Sunday, 7 February 2021

‘गज-केसरी’ होऊ या!
माणूस आणि माणसाचा देह हे एक हार्डवेअरच आहे असं म्हणावं लागेल! या हार्डवेअरमध्ये मन, बुद्धी आणि अहंकार यांचं एक सॉफ्टवेअर नांदत असतं! स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण यांच्या स्वरूपातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रितरीत्या धारण करणारा मनुष्य हा देहरूपी संगणकविश्र्वातील एक कनेक्‍टिव्हिटी साधत असतो.

‘गज-केसरी’ होऊ या!
माणूस आणि माणसाचा देह हे एक हार्डवेअरच आहे असं म्हणावं लागेल! या हार्डवेअरमध्ये मन, बुद्धी आणि अहंकार यांचं एक सॉफ्टवेअर नांदत असतं! स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण यांच्या स्वरूपातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रितरीत्या धारण करणारा मनुष्य हा देहरूपी संगणकविश्र्वातील एक कनेक्‍टिव्हिटी साधत असतो. माणसाचं विशिष्ट सॉफ्टवेअर जन्म-मृत्यूच्या स्थित्यंतरातूनही वेगवेगळ्या प्रकारांच्या हार्डवेअरमध्ये निसर्गाकडून आपोआप लोड केलं जातं! असं हे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातूनही स्थित्यंतरित होणारं मनुष्यरूपी सॉफ्टवेअर किंवा ॲप मोठं अजब आहे आणि हे ॲप अनंतजन्मीच्या स्मृती जपत मृत्यूनंतर विशिष्ट हार्डवेअरची अपेक्षा धरून राहतं!

मित्रहो, मकर हे एक असं जीवरूपी सॉफ्टवेअर आहे की, हा जीवमत्स्य कर्मजाळात अडकून अक्षरशः तडफडत असतो! सध्या मकर राशीतून मोठे ग्रहयोग होत आहेत. कर्मजाळात अडकलेल्या जीवमत्स्याचा विचार करणारं ज्योतिषशास्त्र हे एक आध्यात्मिक तत्त्वच आहे! माणसानं कर्मजाळातून सुटण्यासाठी मकरेच्या पृथ्वीतत्त्वातून कुंभेतील वायुतत्त्वाकडे जाणं आवश्‍यक असतं. शनी ही कर्मदेवता आहे. मकरेतील कर्मजडत्व सोडून अर्थातच कारणदेहातून महाकारणदेहात जाण्यासाठी वायुतत्त्व स्वीकारावंच लागतं, तरच आपण महाकारणाच्या अंबरात प्रवेश करून ‘चिदंबर’ होत महाशिवाजवळ जाऊ शकतो. गुरुवारी येणारी यंदाची पौषी अमावास्या गुरूच्या सान्निध्यात होत आहे. यंदाच्या या पौषी अमावास्येच्या गुरुवारी होणाऱ्या ‘गज-केसरी’योगातून प्रत्येक मनुष्यानं संसारात ‘गज-केसरी’ होऊन कर्मजाळातून मुक्त होण्यासाठी गुरुस्मरण किंवा विष्णुस्मरण करणं अतिशय आवश्‍यक आहे!

गॉडफादर भेटेल!
मेष :
या सप्ताहात शुभ ग्रहांची पलटण तुम्हाला मदत करायला सरसावणार आहे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना या परिस्थितीचा उत्तमरीत्या लाभ होईल. अमावास्येचं प्रभावक्षेत्र काही जणांना घबाडयोगाचं! अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल.

प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता
वृषभ :
या सप्ताहात अनेकांना फोटोफिनिश यश मिळणार आहे! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात रवी-बुध योगाचा मोठा लाभ होईल. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. बुधवार भाग्याचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता सुखावतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार दैवी चमत्काराचा.

कामं मार्गी लागतील
मिथुन :
सप्ताहातील रवी-बुध युतीयोगामुळे व्यावसायिकांची विशिष्ट सरकारी कामं मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता दूर होईल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. सप्ताहाच्या शेवटी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठी धनप्राप्ती होईल. बॅंकेची कामं मार्गी लागतील.

भाग्योदयाची चाहूल
कर्क :
या सप्ताहात विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीचा तुम्हाला लाभ होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हा अमावास्येचा काळ घबाडयोगाचा! नोकरीत लाभ. मात्र, पती-पत्नीमधील संशय टाळा. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या भाग्योदयाची चाहूल देईल. विवाहयोग.

उत्तम पॅकेजची नोकरी
सिंह :
या सप्ताहात संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. सप्ताहाचा शेवट व्यावसायिकांना छानच. विशिष्ट उद्‌घाटनं होतील. वास्तुविषयक निर्णय घ्याल. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांच्या गुप्त चिंता गुरू-शुक्र युतीयोगामुळे दूर होतील. काहींना उत्तम पॅकेजच्या नोकरीचे कॉल! शुक्रवार विवाहविषयक गाठी-भेटींचा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान.

‘मॅन ऑफ द मॅच’ व्हाल
कन्या :
 गुरू-शुक्र शुभ योगाच्या पॅकेजचा या सप्ताहावर प्रभाव राहील. हा सप्ताह मोठ्या दैवी चमत्कारांचा असेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतली नवी रचना लाभदायी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात यंत्रपीडेची शक्यता.

सुवार्ता मिळतील
तूळ :
राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये या सप्ताहात मानांकन घेणारी रास! शुभ ग्रहांची लॉबी अतिशय क्रियाशील राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष वेधून घेतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात वैयक्तिक सुवार्ता मिळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहन-यंत्र हाताळताना काळजी घ्यावी.

मुलाखतींना यश
वृश्र्चिक :
गुरू-शुक्र शुभ योगाची या सप्ताहावर मोठी पकड राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अफलातून लाभ होतील. तरुणांना विवाहयोग. नोकरीत प्रशंसा होईल. ता. १० व ११ हे अमावास्येचं प्रभावक्षेत्र अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचं. नोकरीच्या मुलाखतींना यश.

नोकरीत मानसन्मान 
धनू :
 गुरू-शुक्र शुभ योगाची शुभ फळं तुम्ही अक्षरशः खेचून घ्याल. सप्ताहाच्या शेवटी मोठ्या चिंता दूर होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती संचितातील ट्रॅव्हलर चेक्‍स वटवतील. दत्तकृपा होईल! बुध-शुक्र सहयोगामुळे सप्ताहाच्या शेवटी नोकरीत मानसन्मान मिळेल.

‘टेक ऑफ’ घ्याल!
मकर :
या सप्ताहात काहींना राज्याभिषेक घडेल! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींबाबत शुभ ग्रहांची पलटण अमावास्येच्या प्रभावक्षेत्रातही आपलं वर्चस्व दाखवून देईल. तरुणांनो, टेक ऑफ घेण्याच्या तयारीत राहा! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात धनवर्षावाची. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात प्रिय व्यक्तींचा रुसवा-फुगवा काढावा लागेल.

कलाकारांचा भाग्योदय
कुंभ :
हा सप्ताह तरुणांना अनुकूलच! शुभ ग्रहांचं पाठबळ राहील. गुरू-शुक्र शुभ योगाचा शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ. वैयक्तिक मानसन्मान. विशिष्ट देवतांचं दर्शन घडेल! पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासचा काळ स्त्रीचिंतेचा. बाकी, शुक्रवारी कलाकारांचा सूर लागेल! भाग्योदय होईल.

दैवी प्रचीती येईल
मीन :
या सप्ताहात शुभ ग्रहांच्या मंत्रालयांची तुम्हाला सतत कनेक्‍टिव्हिटी राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरी-व्यवसायात भाग्योदय. गुरू-शुक्र शुभ योग. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात दैवी प्रचीती देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या यंत्रपीडेची. घरातील व्रात्य, लहान मुलांकडे लक्ष द्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly horoscope 7st February to 13th February 2021