आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 30 जून ते सहा जुलै

bhavishya
bhavishya

कलियुग हे कल्मषपूरित असं युग आहे. कल्पष म्हणजे अशुद्धता, कल्पष म्हणजे डाग; किंबहुना कल्मष म्हणजे चक्क पापाचा ठसाच. असं हे कल्मषांचं आगर, भ्रांतीचा सागर आणि व्यामोहाचा महा, महाडोंगर असलेलं कलियुग माणसाच्या मन, बुद्धी आणि त्यानंतर शरीरावर सतत एक प्रकारचा ठसा उमटवत असतं. माणसाचं अंग आणि त्याला धरून असलेला त्याचा अंगठा माणसाच्या अभिव्यक्तीचा ठसा उमटवत त्याला एक प्रकारच्या कर्मबंधनात अडकवत असतो. जन्म-मृत्युपत्राच्या स्वरूपात असलेला हा माणसाच्या अंगठ्याचा ठसा पूर्वसंचिताचं आधारकार्ड घेत या जन्म-मरणरूपी संसारात मोठी भूमिका निभावत असतो. 

माणूस जीवनात काळ्यावर पांढरं तरी करत असतो किंवा पांढऱ्यावर काळं तरी उमटवत असतो. एकूण काय, माणसाची अभिव्यक्ती ही काळी किंवा गोरी या स्वरूपाचीच असते. माणसामध्ये एक पुण्यपुरुष आणि एक पापपुरुष वास करून असतो. असे हे काळे-गोरे पुरुष आपल्या प्रत्येक कृतीवर ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात. पापपुरुषाची साथ घ्यायची की पुण्यपुरुषाची साध घ्यायची हे माणसाच्या हातात असतं. काळ्यावर पांढरं करायचं की पांढऱ्यावर काळं करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. माणसानं आपल्या कर्मबंधनाची गडद छाया किंवा छटा चैतन्याच्या धवल प्रकाशात पुसून टाकली पाहिजे. 

ग्रहण हा एक ठसा आहे आणि ग्रहणं चंद्र-सूर्याला लागत असतात. प्रकाश आणि अंधार हे आकाशातले ठसे आहेत. हे ठसे मृत्युलोकात उदय आणि अस्त या रूपात अवतरत असतात. ग्रहण हा काळपुरुषाचा एक काळाकुट्ट ठसा आहे. ग्रहणं म्हणजे कर्मबंधनाची एक घट्ट वीण होय किंवा ते एक काळपुरुषानं विणलेलं कर्मबंधनाचं कोळिष्टकच होय आणि या कोळिष्टकात अडकलेला जीव काळरूपी फास लावून घेतो. राहू-केतू ग्रहणं लावतात. असे हे काळपुरुषाचे अंडरसेक्रेटरी राहू-केतू ठसे उमटवून काळपुरुषाचं मॅनेजमेंट सांभाळत असतात! यंदाच्या जुलै महिन्यात चंद्र-सूर्याची ग्रहणं होत आहेत. ता. 2 जुलै रोजी न दिसणारं सूर्यग्रहण होईल. ता. 16 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचं चंद्रग्रहण भारतात दिसेल. आगामी काळ हेच सांगतो की आपल्यातला पुण्यपुरुष जागा ठेवण्यासाठी आपली गुरुभक्ती आपण वाढवली पाहिजे. 
================== 
भावनिक शॉर्ट सर्किट टाळा! 
मेष ः
राशीच्या चतुर्थातलं मंगळ-बुध साहचर्य मोठा उच्च दाब निर्माण करेल. भावनिक शॉर्ट सर्किट टाळाच. वाहन चालवताना काळजी घ्या. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती कुयोगांतून सीसी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येतील! कोणताही उन्माद करू नका. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाच्या शेवटी सीमापार फटकेबाजी. 
================== 
अपरिचितांशी वाद नकोत 
वृषभ ः
या सप्ताहात प्रवासात नैसर्गिक साथ राहणार नाही. सप्ताहातलं मंगळ- बुध योगाचं पॅकेज शत्रुत्वजन्य पार्श्‍वभूमीवर खराब. अपरिचित व्यक्तींशी वाद नकोत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृचिंता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार नावीन्यपूर्ण पद्धतीनं फलदायी. मान-सन्मान लाभेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
================== 
वैयक्तिक सुवार्ता मिळतील 
मिथुन ः
हा सप्ताह ग्रहांच्या प्रदूषणातून ढगाळलेलाच राहील. मात्र, मृग नक्षत्राच्या व्यक्तींना राशीचं शुक्रभ्रमण वैयक्तिक सुवार्तांचं. शैक्षणिक संधी येतील. परदेशी व्हिसा मिळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन जुलैच्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची विचित्र फळं अनुभवावी लागण्याची शक्‍यता. व्याधींमुळे निराशाग्रस्त होऊ नका. 
================== 
सीमापार टोलेबाजी कराल 
कर्क ः
राशीचे मंगळ-बुध हर्षलच्या कुयोगात राहतील. न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या काळात विशिष्ट व्यावसायिक गुप्त चिंता सप्ताहाच्या सुरवातीला सतावतील. ता. तीन व चार हे दिवस ग्रहांच्या हाय टेन्शन वायरखालील! आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार उत्कर्षातून सीमापार टोलेबाजीचा. परदेशगमनाची संधी. 
================== 
पावलं जपून टाका! 
सिंह ः
पावसाळ्याच्या दिवसांतला निसरडा सप्ताह! पावलं जपून टाका. ता. दोनच्या अमावास्येच्या आसपासच्या काळात तिन्हीसांजसमयी काळजी घ्या. मघा नक्षत्राच्या तरुणांनी सहलीत-प्रवासात अतिरेक टाळावा. बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहाच्या शेवटी शुभ घटनांमुळे फ्लॅश न्यूजमध्ये येतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पोटदुखीचा त्रास शक्‍य. 
================== 
हितशत्रूंपासून सावध राहा 
कन्या ः
सप्ताहातल्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या प्रभावाखाली येत आहात. हितशत्रूंपासून सावध राहा. मंगळ-बुध सहयोग विचित्र प्रकारचा प्रभाव पाडेल. ता. तीन व चार हे दिवस सर्वच प्रकारे असुरक्षित. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार विजयोत्सवाचा. 
================== 
नोकरीत संयम बाळगा 
तूळ ः
अमावास्येच्या प्रभावातला हा सप्ताह मंगळ-बुध कुयोगाला मोठा वाव देणारा. नोकरीच्या ठिकाणी सांभाळून राहा. नातेवाइकांबाबतच्या कुवार्ता कळण्याची शक्‍यता. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नावीन्यपूर्ण फळं मिळतील. तरुणांना परदेशी नोकरीची संधी. व्यावसायिकांची कर्जवसुली. 
================== 
कोणतीही जोखीम नको! 
वृश्‍चिक ः
ता. दोन व तीन हे दिवस पूर्णतः असुरक्षित. कोणतीही जोखीम टाळाच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. नोकरीत अपवादात्मक परिस्थितीतून मोठा ताण येण्याची शक्‍यता. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट रिलॅक्‍स करणारा. गुप्त चिंता जाईल. 
================== 
प्रिय व्यक्तींची काळजी घ्या 
धनू ः
अमावास्येच्या आसपासच्या काळात अतिशय विचित्र ग्रहमान राहील. घरातल्या प्रिय व्यक्तींची चिंता सतावेल. काळजी घ्या. स्त्रीवर्गानं भाजण्या-कापण्यापासून जपावं. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण संजीवक ठरेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा मान-सन्मान होईल. 
================== 
रडारयंत्रणा सज्ज ठेवा! 
मकर ः
मंगळ-बुधाचं ग्रहसमीकरण विशिष्ट अस्त्रासारखं राहील. हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात. ता. 3 आणि 4 रोजी शत्रूकडून हवाईभंगाची शक्‍यता! तुमची रडारयंत्रणा सज्ज ठेवा! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती लक्ष्य होऊ शकतात. अमावास्या स्त्रीचिंतेची. 
================== 
रागाला आळा घाला 
कुंभ ः
राशीच्या नेपच्यूनच्या पार्श्‍वभूमीवर होणारा मंगळ-बुध सहयोग विचित्रपणे संसर्गजन्य असेल. वस्तू आणि वस्तू हाताळणाच्या व्यक्ती आजूबाजूला गोंगाट करतील. क्रोध आवरा. न दिसणाऱ्या ग्रहणप्रभावक्षेत्रात स्त्रीवर्गाशी जपून वागा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना झटका बसू शकतो. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ. 
================== 
तरुणांनो, सापळ्यात अडकू नका 
मीन ः
ता. 2 जुलैच्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या आसपासच्या काळात अपवादात्मक ग्रहमान होत आहे. नियतीचे विशिष्ट ट्रॅप लावले जातील, त्यात अडकू नका. तरुणांनो, सावध राहा! बाकी, शुक्रभ्रमण आणि गुरुभ्रमणाची विशिष्ट फेज उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट भाग्योदयाचीच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com