esakal | कसा असेल तुमचा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope and panchang

भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा एक प्रकारचा अश्‍वमेध यज्ञच सुरू होत आहे.

कसा असेल तुमचा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कलाकारांचा भाग्योदय 
मेष : भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा एक प्रकारचा अश्‍वमेध यज्ञच सुरू होत आहे. सप्ताहाचा शेवट अतिशय शुभलक्षणी. कलाकारांचा भाग्योदय. नवपरिणितांच्या जीवनावर श्रीगणेशाची कृपा होईल. अपत्यसंभव. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याच्या सोमवारी घात वा अपघातापासून सावध राहावं. कुयोगाचा रोख राहील. 


परिस्थितीचं भान ठेवा 
वृषभ : मंगळाशी होणारा शनीचा केंद्रयोग नैसर्गिक साथ देणार नाही. अपवादात्मक परिस्थितीचं भान ठेवा. बाकी, गुरुवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत भाग्योदयाचा. वरिष्ठांचा कृपाशीर्वाद. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. रस्त्यावरील कुत्र्यांपासून जपून. 


आध्यात्मिक प्रसन्नतेचा लाभ 
मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह निश्चितच पर्वणीसारखा. विशिष्ट शुभारंभ कराल. ता. २७ ते २९ हे दिवस आध्यात्मिक प्रसन्नतेचे. थोरा-मोठ्यांच्या संपर्कातून मोठी कामं मार्गी लागतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रिटी होतील. सप्ताहात उंची खरेदी कराल. हाता-पायाला दुखापती होणार नाहीत याची मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. 


औषध लागू पडेल! 
कर्क : सध्या तुम्ही चौकार-षटकार ठोकण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त फील्डवर टिकून राहा. शनी-मंगळाच्या कडक फील्डिंगमधून धावबादही होऊ नका. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती ता. २५ ते २७ या कालावधीत नोकरीच्या ठिकाणी प्रभावशाली बनतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. औषध लागू पडेल! 


तरुणांचं टेक ऑफ! 
सिंह : राशीचे रवी-बुध तुम्हाला निश्चितच स्वयंप्रकाशी करतील. तरुणांचं टेक ऑफ होईल. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार मोठ्या सुवार्तांचा. बाकी, ता. २३ व २४ या दिवशी यंत्र, वाहन आणि उपकरणांसंदर्भात काळजी घ्या. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी ‘शुभमंगल सावधान’चा योग! 


असंगाशी संग नको 
कन्या : शनी-मंगळाचा योग तुम्हाला आचारसंहिता पाळायला लावणार आहे. पाळाच! असंगाशी संग नको. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी गावातल्या कुप्रवृत्तींपासून दूर राहावं. बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ते २९ हे दिवस धनलाभाचे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवनातील प्युअर सिक्वेन्स लागतील! 


अलौकिक घटना घडतील 
तूळ : हर्षलच्या फील्डवर शनी-मंगळाचा योग होत आहे. महामार्गावर जरा जपून. रस्त्यावरील सिग्नल पाळा. बाकी, गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती ता. २७ ते २९ या काळात अफलातून राहील. अलौकिक घटना घडतील. तरुणांना शैक्षणिक सूर गवसेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक मुहूर्तमेढ रोवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. मात्र, मध्ये ज्योतिष आणू नका! 


आतला आवाज ऐका! 
वृश्‍चिक : सप्ताहातील ग्रहस्थितीचा कौशल्यानं लाभ घ्या. अट्टहास नको. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. तरुणांनो, आतला आवाज ऐका आणि निर्णय घ्या. ता. २७ ते २९ हे दिवस एकूणच तुमच्या राशीला शुभग्रहांच्या मंत्रालयातून शुभदायक. अथर्वशीर्षाची आवर्तनं कराच. 


सतत सद्विचारात राहा 
धनू :
या सप्ताहात राशीचा गुरू पूर्णपणे प्रभाव पाडेल. सतत सद्विचारात राहा. उत्तरं मिळत जातील. आणखी काय! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी चमत्काराची प्रचीती येईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ची परिवर्तिनी एकादशी खरोखरच उत्तम परिवर्तनाची. विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्याच. पत्रिका ठेवा बाजूला! 


व्यवसायात चमत्कार 
मकर : सप्ताहातील शनी-मंगळाचा योग फील्डिंग टाइट करणाराच. महामार्गावर काळजी घ्या. नातेवाइकांशी जपून वागा. बाकी, व्यावसायिकांना गणेशोत्सव तेजीचा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गणेशोत्सवाच्या काळात ता. २७ ते २९ या दिवशी व्यवसायात चमत्काराची प्रचीती येईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात सासुरवास. संयमानं घ्या. 


मित्रांच्या आहारी जाऊ नका 
कुंभ : शुभग्रहांची मंत्रालयं तुम्हाला सातत्यानं सहकार्य करणार आहेत. मात्र, मित्रांच्या आहारी जाऊ नका! वाहतुकीचे नियम पाळा. बाकी, ता. २७ ते २९ हे दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय लाभदायक. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा योग. परिचयोत्तर विवाहयोग. ऑनलाइन राहाच. 

मोठी कामं होतील 
मीन : गणेशोत्सवाच्या या सप्ताहात राश्‍याधिपती गुरूची ताकद कळून येईल. थोरा-मोठ्यांच्या सहकार्यातून मोठी कामं होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनातील हुकमी सिक्वेन्स लागतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या तरुणांना मोठ्या शैक्षणिक संधी. शुक्रवार दैवी चमत्काराचा!